*गावकुसाची कहाणी* *संभाजी केशव चौगले* प्रत्येक पुस्तकाला काहीतरी मूल्य असतं हे निश्चित. त्या दृष्टीने माजगावचे कवी-लेखक, अभिनेते, नाटककार असे अष्टपैलू संभाजी केशव चौगले हे *कवित्व* या नावाने कविता लेखन करतात. त्यांनी अभ्यासपूर्ण, संशोधकवृतीने आपल्या गावाची, गावपांढरीची यशोगाथा आपल्या शब्दांतून उतरण्याचा केलेला प्रयत्न हा खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. ही केवळ माजगावची कहाणी नाही, तर प्रत्येक गावाची ही कहाणी आहे. कारण प्रत्येक गावाची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या हेतूने, ध्येयाने, अगर प्रेरणेतून झालेली असते. अगदी पौराणिक, ऐतिहासिक गावांची माहिती घेतानासुद्धा याचा प्रत्यय आपणास येतो. अगदी पूर्वीच्या काळी द्रविड लोक हे मूळ भारतवासीय लोक. त्याचा इतिहासही आहे. पण उत्तरेतून खैबरखिंडीतून आर्यांचे आगमन झाले आणि त्यांनी नद्यांच्या काठावरती गावांची वस्ती निर्माण केली हेही आपण इतिहासातून पाहिले आहे. माजगाव हे कासारी नदीच्या किनारी वसलेले गाव. या गाव...