गावकुसाची कहाणी पुस्तक परीक्षण

*गावकुसाची कहाणी*        *संभाजी केशव चौगले*            प्रत्येक पुस्तकाला काहीतरी मूल्य असतं हे निश्चित. त्या दृष्टीने माजगावचे कवी-लेखक, अभिनेते, नाटककार असे अष्टपैलू संभाजी केशव चौगले हे *कवित्व* या नावाने कविता लेखन करतात. त्यांनी अभ्यासपूर्ण, संशोधकवृतीने आपल्या गावाची, गावपांढरीची यशोगाथा आपल्या शब्दांतून उतरण्याचा केलेला प्रयत्न हा खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. ही केवळ माजगावची कहाणी नाही, तर प्रत्येक गावाची ही कहाणी आहे. कारण प्रत्येक गावाची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या हेतूने, ध्येयाने, अगर प्रेरणेतून झालेली असते.         अगदी पौराणिक, ऐतिहासिक गावांची माहिती घेतानासुद्धा याचा प्रत्यय आपणास येतो. अगदी पूर्वीच्या काळी द्रविड लोक हे मूळ भारतवासीय लोक. त्याचा इतिहासही आहे. पण उत्तरेतून खैबरखिंडीतून आर्यांचे आगमन झाले आणि त्यांनी नद्यांच्या काठावरती गावांची वस्ती निर्माण केली हेही आपण इतिहासातून पाहिले आहे.          माजगाव हे कासारी नदीच्या किनारी वसलेले गाव. या गावाची इथंभूत माहिती घेऊन ती इतिहासाच्या पार्श्वभूमीवर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न संभाजी चौगले यांनी केलेला आहे.  *माजगाव* या गावाची निर्मिती कशी झाली,  केर्ली, आसुर्ले, शिरोली पुलाची या गावातील कुंभार समाजातील लोकांनी कामाच्या निमित्ताने, मातीची गरज होती, म्हणून ते फिरत फिरत डोंगर भागातून कासारी नदीच्या काठी आले. सुरुवातीला पावसाळ्यात नदीला येणाऱ्या महापुराच्या भीतीमुळे ते आपापल्या गावी परत जात होते. परंतु काही वर्षातच त्यांनी या गावाची कायमस्वरूपी वस्ती केली. आणि या गावकुसाची कहाणी सुरू झाली.....           संभाजी चौगले यांनी या पुस्तकाची मांडणी करताना वीस प्रकरणे लिहिली आहेत. जसे गाव विस्तारत गेले, काळ बदलत गेला, त्या पद्धतीने त्यांनी याची मांडणी केली आहे.          पहिले प्रकरण - *आणि आपल्या गावाचा जन्म झाला*  यामध्ये गाव कसे वसले, जंगलातील झाडे तोडून जागा करून कसे राहिले याचे अतिशय बारकाव्याने, निरीक्षणाने वर्णन केले आहे. ते लिहितात .....'प्रत्येक जण आपापल्या झोपडीसमोर धुमी करून राहू लागले. धुरामुळे रात्र अधिकच गडद दिसू लागली. त्यामुळे डासांचं गुणगुणणं थोडं कमी झालं. लाकडांनी पेट घेईपर्यंत आधारासाठी प्रत्येक जण एकमेकांना हाका मारत होते. लाकडांनी पेट घेतला तसा अंधार नाहीसा झाला ......... आपापल्या झोपडीतील मातीचे दिवे लावून घेतले. त्या दिव्याच्या लाल प्रकाशात झोपड्या उजळत होत्या. अंधार गायब झाला होता. (पान नंबर २२)            गावात वस्ती झाली त्याचे वर्णन करताना ते लिहितात - पुढे पाच-सहा मुलं नाचत आनंदात उड्या मारत येत होती. मागून बायका येत होत्या. प्रत्येकीच्या डोईवर पाण्याच्या लहान घागरी दिसत होत्या. *आंब्याची पाने लटकत होती* कुणाच्या डोक्यावर दह्या-दुधाची मडकी दिसत होती. कासारीचं पाणी घेऊन त्या इथंवर आल्या होत्या. सर्व सुवासिनींनी पिंडीवर व देवावर जलाभिषेक केला. गंध-गुलाल लावला, हळदी-कुंकू लावून घेतले, पिंडीवर बेल घातला आणि 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'चा गजर झाला. सर्व बायकांनी आपापल्या अंगणातल्या चुली पेटवल्या. दूध-भात उतू जाऊ दिलं. प्रत्येकीने दहीभाताचा नैवेद्य केला. झोपडीभोवती दहीभात शिंपडला. देवाला नैवेद्य दाखवला आणि भली मोठी पंगत अंगणात बसली. गडी-माणसं, पोरं पंगतीला बसलेत. सुवासिनी आग्रह करू लागल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कारण आज आपल्या गावाचा जन्म झाला होता. (पान नंबर २५) प्रकरण दोन *वहिवाट*       वाटांतून वहिवाट कशी निर्माण झाली. गावात प्रथम कोण आले, तर कुंभार समाजाची माणसं आली. ते आपला व्यवसाय करू लागले. आपला माल घोड्यांवर किंवा बैलांवर लादून दूर गावाला विकू लागले. अगदी कोल्हापूर शहरातसुद्धा ते आपला माल घेऊन जाऊ लागले. सुरुवातीच्या काळात म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये माजगावात बारा कुटुंबाची नोंद आढळते. गंगाराम कुंभार शके ४२६, चौगले बंधू शके ४२६, बाजीराव कदम इसवी सन १६८०. त्या काळामध्ये माजगावच्या परिसरात काही सणाला विशेषतः महाशिवरात्रीला साधू लोक येऊन महादेवाच्या पिंडीची पूजा करत होते. त्यावरूनच गावाचे दैवत महादेव म्हणजेच मेढेश्वराच्या रूपाने वास्तव्याला राहिले. ते ग्रामदैवत झाले. एक वर्षानंतर माझं माझं गाव म्हणून माजगाव आणि गावाचे दैवत म्हणून मेढेश्वर. प्रकरण तीन *१६ व्या शतकाकडे वाटचाल*          यामध्ये शके १२१८ कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजेच ८ ऑक्टोबर १२९६ पंढरपूर वारीचे वर्णन आले आहे. म्हणजे त्या काळापासून या माजगावातून पंढरपूरची वारी होत होती याचे पुराव्यासह वर्णन लेखक संभाजी चौगले यांनी केले आहे. गावामध्ये आसपासच्या गावातून काही लोक येऊन राहू लागले. आसपासच्या गावात सोयरीक होऊ लागल्या. बारा बलुतेदार गावात येऊ लागले. त्याचे वर्णन काव्याच्या रूपाने लेखकाने केले आहे.....  *मातीची भांडी करायला कुंभार आला* *कुंभाराच्या चाकासाठी सुतार आला* *सुताराच्या हत्यारासाठी लोहार आला* *लोहाराच्या भात्यासाठी चांभार आला* *चांभाराच्या चामड्यासाठी तेली आला* *तेल्याच्या चुन्यासाठी कोळी आला* *कोळ्याच्या शिकाईसाठी मांग आला**देवांच्या पूजेसाठी गुरव आला* *अंथरूण पांघरूण धुणारा परीट आला* *मेंढपाळीला ढोल्या धनगर आला* *गावावर नजर ठेवणारा महार आला* *आणि सर्वांची हजामत करायला न्हावी आला*               याद्वारे गावामध्ये बारा बलुतेदार होते याचा पुरावा सिद्ध होतो. (पान नंबर ४२) प्रकरण चार - *गावची विरघळ*         गावामध्ये ज्या विरगळी सापडतात त्यावरून गावात वीर पुरुष होऊन गेले याची प्रचिती त्यावरून येते. म्हणजेच यादव काळापासून खेड्यापाड्यांत विरगळी सापडतात. त्या पद्धतीने माजगावातही काही विरगळी, शिल्पे सापडलेली आहेत. यावरून या भागातही अनेक वीर पुरुष, पराक्रमी पुरुष होऊन गेलेले आहेत. कारण पन्हाळा गडाच्या पायथ्याशी माजगाव असल्यामुळे या गावातील अनेक वीरपुरुष इतिहासात होऊन गेलेले आहेत. याचा दाखलाच लेखकाने दिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर माजगावातील वीर जोत्याजी केसरकर होते. याचा पुरावा त्यांनी दिलेला आहे. त्या संदर्भातील कथाच त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. संदर्भ :- ( पान नं. ४७ --मंगेश गावडे पाटील यांच्या संग्रहातून) प्रकरण पाच *मिशनरी*        भारतावर इंग्रजांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले होते. त्या काळात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी भारतातील विविध ठिकाणी मिशनरी आल्या होत्या.  देशात विविध मिशनरी स्थापन केल्या होत्या. त्याच पद्धतीने माजगावातही १८८६ साली मिशनरी आली होती. त्यांनी मंडळ स्थापन केले होते. ते मंडळ आजही चांगल्या स्थितीमध्ये माजगावात आहे. ते *ख्रिस्ती मंडळ माजगाव* म्हणून चर्चच्या रूपाने उभे आहे. प्रकरण सहा - *भेंड्याच्या विटा आणि चोपणीची खापरी*          प्राचीन काळातील इमारती बांधकामासाठी वापरलेल्या पांढऱ्या मातीच्या भेंड्याच्या विटा आणि चोपणीच्या खापरी यांचे अवशेष आजही ग्रामीण भागामध्ये जुन्या घरांच्या रूपाने दिसून येतात. इतकेच नव्हे तर माजगावातील काही लोकांनी अशा इमारती जतन करून ठेवलेल्या आहेत. कुंभारांची घरे असल्यामुळे मातीच्या वस्तूंची निर्मिती तिथे होतच होती. मातीच्या वस्तू त्या काळामध्ये आणि आजही प्रसिद्ध आहेत. प्रकरण सात - *तालीमखाना-शाळा-ग्रुप ग्रामपंचायत*           छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात तालमींची परंपरा होती. समर्थ रामदास स्वामींनी गावागावांतून मारुतीची स्थापना केली होती. त्या पद्धतीने आबा राणा पाटील यांच्या सांगण्यावरून १६ व्या शतकात माजगावात मारुतीची स्थापना झाली हे स्पष्ट होते. म्हणजेच त्या काळापासून गावात पैलवान तयार झाले होते. शाहू महाराजांच्या काळात कुस्त्यांना प्रोत्साहन दिले होते. त्या पद्धतीने माजगावमध्येसुद्धा अगदी नावाजलेले पैलवान तयार झाले होते. देवाप्पा धनगर, मुन्ना, शिवाप्पा बेरड, पांडू भोसले, कृष्णा मर्दानी अशा मल्लांनी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर नाव मिळवलेले होते. ती परंपरा आजही माजगावात दिसून येते. आजही अनेक पैलवान माजगावमध्ये तयार झालेले आहेत. माजगावात चौगले तालीम आणि पाटील तालीम अशा तालमी निर्माण झाल्या होत्या. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिले होते. त्यातूनच माजगाव मध्ये १९०२ साली शाळा सुरू झाली होती. या शाळेतून अनेक सुशिक्षित, नोकरदार निर्माण झाले आहेत. माजगावात आलेल्या शिक्षकांनी दिलेलं शिक्षण, त्यांनी बसवलेल्या प्रार्थना सखाराम कुंभार गुरुजींची 'जीवन बाग फुलव, रे देवा माझी जीवन बाग फुलव', पानकर गुरुजींची 'सरस्वती तुझ्या पदी पूजना मी आणली' तर केकलेकर गुरुजींची 'दर्शन दे रे दे रे भगवंता' किंवा 'वैष्णव जन तव तोच म्हणावा, जो हरपीडा जाणी रे' अशा प्रार्थनांनी शाळेचे वातावरण मंगलमय होऊन जायचे. (पान नंबर ६७) त्याचप्रमाणे ग्रामपंचायतची स्थापना याचे अतिशय सुंदर वर्णन या पुस्तकात आलेले आहे. गावात १९६१ ला लाईट आली. गावाचा विकास सुरू झाला. प्रकरण आठ - *कृपा विठ्ठलाची प्रगती गावाची*        वारकरी संप्रदायाच्या योगामुळे गावामध्ये विठ्ठल सहकारी सोसायटीची स्थापना १९४४ साली झाली आणि गावात आर्थिक सुबत्ता सुरू झाली. धान्य भिशी सुरू केली. प्रकरण नऊ - *गाडीवान- गवळी- गौडबंगाल- कृषिउद्योगपती - देव जाधव - मुंबईवाला*     १९६३ मध्ये कुंभीकासारी सहकारी साखर कारखाना सुरू झाला. कारखान्यासाठी बैलगाडी, गाडीवान, चिटबॉय, फडकरी फड निर्माण झाले. माजगावात चौगले घराण्याने गवळी धंदा सुरू केला. परंतु गोकुळ दूध संघ झाल्यानंतर गवळी धंदा बंद झाला.  गौडबंगालमध्ये सत्तूने पडळच्या यात्रेत झालेल्या मरिआई देवीसाठी रेडा बळी देणार होते हे ऐकले होते. रेड्याचं शीर घेऊन सत्तू पडळच्या पांदीनं गावाच्या दिशेने पळू लागला. त्याच्या पाठीमागे पडळकर लागले होते. हातात काठ्या  कुराड्या होत्या. सत्तू गावतळ्याच्या जवळ आला. पडळकरांनी त्याची पाठ सोडली नव्हती. मेढेश्वराच्या देवळासमोर आला. त्याला जोराची ठेच लागली. तो खाली कोसळला. रेड्याचे शीर बाजूला फेकले गेले. त्याच्या छाताडावर काठ्याकुराडीचे घाव बसले. तो निपचितपणे कायमचा खाली पडला. गाववाल्यांनी सत्तूच्या वंशजांना एक एकर जमीन दिली. ती जमीन आजही गौडपट्टी म्हणून त्याचे वंशज कसत आहेत. हे वाचत असताना अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीची आठवण होते. त्यामध्ये जोगणीचा प्रसंग आला आहे. कृषिउद्योगपतीमध्ये नाथा महादेव कुंभार या माणसाची शेतीविषयी केलेल्या कार्याची माहिती मिळते. त्यांचा गुळ प्रसिद्ध होता. वखारीतील गुजराती लोक त्यांचे गुराळघर आणि ती व्यक्ती पाहण्यासाठी माजगावात आले होते. माजगावातील बरीच मंडळी १९५० पासून मुंबईमध्ये राहत आहेत. आजही मुंबईत माजगावकर कॉलनी आहे.          अशा पद्धतीने लेखकांनी सत्यशोधक समाजाची गावात झालेली स्थापना व तिचे कार्य, गावावर आलेले दुष्काळाचे संकट, गावात बसवलेले नाटक अफजलखानाचा वध आणि त्यावेळी झालेला अपघात, गावात होणारी म्हाई-यात्रा, पन्हाळगडाला पडलेला सिद्दी जोहारचा वेढा, १९७२चा दुष्काळ, गावाचे सण, दर रविवारी घातलेला जोतिबाचा खेटा आणि बालपणातील वीस तीस वर्षांपूर्वीचे खेळ आणि त्यांचे अनुभव याचे वर्णन या पुस्तकात अतिशय सुंदर व लालित्यपूर्ण केलेले आहे. वाचताना वाचक स्वतःला क्षणभर विसरून जातो. कारण शाळा, खेळ जोतिबाला जाणे हे आपलेच वर्णन आहे असे वाटते.         अशा या पुस्तकाला प्रसिद्ध गड-किल्ल्यांचे अभ्यासक डॉ. अमर अडके यांची तितकीच अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी प्रस्तावना लाभलेली आहे. असा ऐतिहासिक दस्तऐवज असणाऱ्या पुस्तकाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व राज्य पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांची पाठराखण मिळालेली आहे. सर्व वाचकांच्या सेवेसाठी पुस्तकांच्या रूपाने हे भांडार आणले आहे ते हृदय प्रकाशन यांनी. असा हा दस्तऐवज प्रत्येकांनी वाचायला हवाच नव्हे तर तो संग्रही ठेवायलाच हवा. सोबत परिशिष्टे दिलेली आहेत. काही ठिकाणी संदर्भही दिलेले आहेत.          लेखक संभाजी चौगले यांच्या पुढील लेखन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.         *परशराम आंबी*कार्यवाह, मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर-------------------------------------पुस्तकाचे नाव - *गावकुसाची कहाणी*लेखक - संभाजी केशव चौगलेप्रकाशन - हृदय प्रकाशन कोल्हापूरमुखपृष्ठ- स्मिता कुंभार, अतुल भालबरपाने १९२ किंमत - २३०₹

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील