पुस्तक परीक्षण - पाणीफेरा - डॉ. श्रीकांत पाटील

*२०२१च्या पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूराचा 'ऑंखो देखा हाल' मांडणारी वास्तववादी कादंबरी-पाणीफेरा* 
          डॉ. श्रीकांत पाटील

           डॉ. श्रीकांत पाटील यांची लाॅकडाऊन, ऊसकोंडी या यशस्वी कादंबरीनंतर तिसरी कादंबरी म्हणजे *पाणीफेरा*
आपल्या महाराष्ट्रात १९८९ पासून २०२१ पर्यंत अनेक वेळा महापूर आले आहेत. अलीकडेच २०१९ आणि २०२१ मध्ये महापूर आले होते. या महापुरांचा अनेक गावांना वेढा पडला होता. आणि महापूर काय असतो हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा, साक्षीदार होण्याचा योग अनेकांना मिळाला. पण ज्यांचं मन संवेदनशील असते त्यांच्या हातून काहीतरी चांगले कार्य होत असते. समस्येलाच संधी मानून त्याचा योग्य वापर करून घेत असतो तोच यशस्वी होतो. त्याप्रमाणे डॉ. श्रीकांत पाटील यांनी २०१९ आणि २०२१ या दोन वर्षी आलेल्या महापुराचा अनुभव, त्यावेळी होणारी माणसांची घुसमट, पर्यायी शोधलेले मार्ग, वेगवेगळी परिस्थिती. या साऱ्यावर समर्पक शोधलेले उत्तर याचे विवेचन डॉ. श्रीकांत पाटील यांनी आपल्या पाणीफेरा या कादंबरीमध्ये केलेले आहे. घटना, प्रसंग व पात्रांच्या माध्यमातून पाणीफेरा पुढे सरकत राहतो. लॉकडाऊन, ऊसकोंडी याप्रमाणेच पाणीफेरा ही कादंबरी सकारात्मक संदेश देणारी कादंबरी आहे. कादंबरीमध्ये पावसाळ्यापूर्वी असलेले वातावरण आणि पाऊस सुरू होताना झालेला बदल याचे त्यांनी सुंदर वर्णन केलेले आहे. 
         धडाम...धूम...अशी ढगांची गर्जना अवकाशात घुमू लागली. धोंडी नानाच्या छातीत धडकी भरली. क्षणार्धात वातावरणाचे मूळ स्वरूप बदलून गेले. कारण तगमग पार गारठ्यात बदलून गेली. (पृष्ठ ११) 
        या कादंबरीत खेडेगावातील वर्णन असल्यामुळे रावश्या, सुरेश, म्हादू अशी पात्रे आलेली आहेत. डेअरीला दूध घालणे, शेतातील कामे करणे याचेही वर्णन ताकदीने लेखकांनी केले आहे. "आवो,वळवाच्या पावसाने आपली एवढी दैना केली. मग पावसाळ्यात असा कोसळणारा पाऊस पडायला लागला तर? " असा प्रश्न बायको आपल्या नवऱ्याला विचारते. पाऊस एकसारखा कोसळत होता. विश्रांतीचं नाव घेत नव्हता. पाणी वाढत राहतं. नदीकाठच्या घरातून पाणी शिरलं. पाणी चढत चढत निम्म्याहून अधिक गावात शिरतं. त्या पाण्यामध्ये अडकलेल्या जनावरांची सुटका करणे, निवाराची सोय करणे, मुक्या प्राण्यांचा जीव वाचवणे यासाठी लोकांची चाललेली धडपड त्यांच्या लेखणीत आलेली आहे. टीव्हीवरून दिल्या जाणाऱ्या बातम्या - 'नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा' यामुळे माणसांच्या पोटात भीतीचा गोळा सुटला. अतिशय दर्दभरी कहाणी या कादंबरीमध्ये सुरू होते. परंतु लेखकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ही कादंबरी लिहिली आहे. नदीच्या महापुराच्या पाण्याबरोबर आलेली घाण, साप, मगर याचेही वर्णन लेखकाने केलेले आहे. 
        ही कादंबरी भारतीय शेती व्यवस्थेशी निगडित असून महापुराच्या काळात गावाची प्रेरणादायी कहाणी या कादंबरीतून आलेली आहे. आज निसर्ग कसा लहरी बनला आहे आणि त्याला मानवच कारणीभूत आहे हे लेखकाने मांडले आहे. एकीकडे पाऊस नाही म्हणून कोरडा दुष्काळ तर खूप जोरदार पावसामुळे निर्माण झालेला ओला दुष्काळ याचे वास्तव लेखकाने रेखाटले आहे. या कादंबरीमध्ये वारणा काठच्या खोऱ्यातील बोलीभाषा हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. तसेच संकटाच्या वेळी रडायचे नसून लढायचे असते, मोडलेला संसार पुन्हा उभा करायचा असतो. हे या कादंबरीतून शेतकऱ्यांच्या रूपाने निर्धारपूर्वक हे दाखवून दिले आहे. 
        कादंबरी वाचत असताना वाचकांच्या डोळ्यासमोर २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या महापुराचे दृश्य जसेच्या तसे उभे राहते. यातील प्रसंग आपल्याच बाबतीत घडतो आहे असा भास होतो. आपले गुंतून जाते. या कादंबरीतील घटना, पात्रे, प्रसंग आपलेच वाटतात. आपल्या अवतीभवती प्रसंग घडत आहेत असे वाटते. 
      डॉ. श्रीकांत पाटील यांनी ताकदीची कादंबरी लिहिली आहे. लाॅकडाऊन, ऊसकोंडीप्रमाणे ही कादंबरी अनेक पुरस्कारांना पात्र ठरेल आणि अकादमी पुरस्काराला गवसणी घालेल याची खात्री वाटते. या कादंबरीस प्रा. डॉ. मथुताई सावंत, नांदेड यांची पाठराखण मिळालेली आहे. ही कादंबरी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, नांदेड यांना अर्पित केलेली आहे. 
          डॉ. श्रीकांत पाटील यांच्या पुढील लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा! 

*परशराम आंबी,*
उपाध्यक्ष, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ, कोल्हापूर
........................................
पुस्तकाचे नाव - *पाणीफेरा*
लेखक - डॉ. श्रीकांत पाटील
प्रकाशन - संस्कृती प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ - विजय जोगमार्गे, मुंबई
पृष्ठसंख्या - २१८
किंमत -३००₹

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील