सैनिक आम्ही
सैनिक आम्ही शिवरायांचे
सैन्य आमुचे खडे
हाकेसरशी युद्ध गर्जना
आस्मानाला भिडे||धृ||
महाराष्ट्राची अजिंक्य माती
सैनिक आम्ही निधडी छाती
तळपे आमुच्या भगवा हाती
साक्ष द्यावया चहुबाजूला
सह्याद्रीचे कडे||१||
संदेश येई तुफान वेगाने
गीत तयांचे गर्जुनी सांगे
मायेचे हे तुटले धागे
धरु वाटही रणांगणाची
गनिमा चारू खडे||२||
करू प्रतिज्ञा एकदिलाने
आता गुलामी नच भोगणे
देशासाठी प्राण अर्पिणे
स्वराज्यातून सुराज्य हे
विचारांतून घडे ||३||
भाषा आमची मायमराठी
विकास घडवू आपल्या हाती
शत्रूपाठी घालू लाठी
घेता शपथा शिवरायांच्या
पावित्र्याचे सडे ||४||
Comments
Post a Comment