१) *वाट ही पुनवेची (पुनर्लेखन)*
*वाट ही पुनवेची* नृसिंहवाडीत श्री दत्ताचे दर्शन घेतले आणि मदन गावाकडे परत जाण्यासाठी निघाला. एस.टी.ला खूप गर्दी होती. कारण पौर्णिमा होती. तीही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा. म्हणजे दत्त जयंती होती. हजारो भाविक दत्त दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडीत आले होते. सूर्य मावळतीकडे झुकला होता. गाव ओढीने लोक परत चालले होते. नृसिंहवाडीपासून जयसिंगपूरपर्यंत सारख्या गाड्या होत्या. तिथून वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या सुटत होत्या. त्यातील एक गाडी पकडून मदन जयसिंगपुरात आला. कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागला. एक आराम गाडी आली. त्या गाडीत चढला. परत खाली उतरला. कारण त्या गाडीला तिकीट दर नेहमीपेक्षा अधिक होता. पण त्याचे काही वाटले नसते त्याला. पण कोल्हापूरपर्यंत उभे राहून जावे लागले असते. त्याने जनता गाडीनं जायचा विचार केला. जनता गाडी येण्यास अजून थोडा अवधी होता. म्हणून तो चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेला. जनता गाडी आली. गाडीत चढायला झुंबड उडाली. उतरणार्या प्रवाशांना वाट मि...