१) *वाट ही पुनवेची (पुनर्लेखन)*

*वाट ही पुनवेची*
         नृसिंहवाडीत श्री दत्ताचे दर्शन घेतले आणि  मदन गावाकडे परत जाण्यासाठी निघाला. एस.टी.ला खूप गर्दी होती. कारण पौर्णिमा होती. तीही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा. म्हणजे दत्त जयंती होती. हजारो भाविक दत्त दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडीत आले होते. सूर्य मावळतीकडे झुकला होता. गाव ओढीने लोक परत चालले होते. नृसिंहवाडीपासून जयसिंगपूरपर्यंत सारख्या गाड्या होत्या. तिथून वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या सुटत होत्या. त्यातील एक गाडी पकडून मदन जयसिंगपुरात आला. 
         कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागला. एक आराम गाडी आली. त्या गाडीत चढला. परत खाली उतरला. कारण त्या गाडीला तिकीट दर नेहमीपेक्षा अधिक होता. पण त्याचे काही वाटले नसते त्याला. पण कोल्हापूरपर्यंत उभे राहून जावे लागले असते. त्याने जनता गाडीनं जायचा विचार केला. जनता गाडी येण्यास अजून थोडा अवधी होता. म्हणून तो चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेला. 
        जनता गाडी आली. गाडीत चढायला झुंबड उडाली.  उतरणार्‍या प्रवाशांना वाट मिळेना. कंडक्टरने आवाज दिला- ''बाजूला सरका जरा. आतली पॅसेंजर बाहेर येऊ देत. सर्वांना घेऊन जातो. कुणालाही ठेऊन जाणार नाही. तुम्ही आधी मागे सरका बघू." वाट काढत प्रवासी खाली उतरले. वर चढण्यासाठी पुन्हा सगळे एकदम तुटून पडले. प्रत्येकाला आपल्या घरी जायचे होते. प्रत्येक जण धडपडत होता. कारण आपल्याला बसायला जागा मिळाली पाहिजे असा जो तो विचार करत होता. गर्दीच्या महापुरातून त्याने गाडीमध्ये प्रवेश मिळवला. बसायला जागा मिळते का? हे बघत बघत पुढे सरकत होता. काहींनी बाहेर असतानाच खिडकीत हात घालून सीटवर रुमाल, पिशवी अशी सापडेल ती वस्तू टाकून जागा रिझर्व्ह केली होती. एके ठिकाणी रिकामी जागा दिसली. पटकन जाऊन तिथे बसला. प्रवाशांमध्ये बाचाबाची सुरू झाली. 
       "इथं बसू नका. आमचं माणूस यायचं आहे अजून."
      "अगं ये मंदा, ये ना तू. किती हा वेळ? "
      "अहो बाई, बाजूला व्हा. इथं बसू नका."
      "ये ताई,  बस इथं."
      "काय इरसाल माणसं असतात एकेक. एका वेळी चार पाच माणसांची जागा धरतात. इतरांनी कुठं बसायचं?"               
    "बाईमाणूस दिसत नाही यांना. आजची कार्टी अशीच संधी साधून धक्काबुक्की करतात." ......असे संवाद कानावर येत होते. 
        त्याच्याशेजारी त्याच्या अगोदर एक युवक बसलेला होता. तो अगदी शांत वाटत होता. काही बोलत नव्हता. त्यानं मदनला बसायलाही विरोध केला नाही. यावरून तो एकटा होता. हे निश्चित झालं होतं. मदनही एकटाच होता. एका सीटवर  दोघे बसलेले होते. तो तरुण खिडकीतून बाहेर नवीन इमारती पाहण्यात गर्क होता. गाडी अगदी भरगच्च भरलेली होती. काही प्रवासी उभे राहून प्रवास करीत होते. मदनच्या शेजारी एक वयस्कर स्त्री उभी होती. तिच्या मागे एक तरूणी उभी होती. त्याच्या मनाला खटकलं होतं, की ती स्त्री असून उभी राहिली. आणि मी पुरुष असून बसलो आहे. हे त्याच्या मनाला बरं वाटलं नाही. म्हणून तो त्या वयस्कर स्त्रीकडे पाहून म्हणाला, "मावशी बसा तुम्ही. मी उभा राहतो." असं म्हणून तो उठला. त्याने आपली जागा रिकामी करून त्या त्या मावशीला दिली. पण त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्याला वेगळाच अनुभव आला. तो म्हणजे ती वयस्कर स्त्री तिथं बसली नाही. तर तिने त्या तरुणीला तिथं बसायला सांगितलं होतं. असा निर्णय का घेतला असावा त्या मावशीनं! याचा उलगडा त्याला काही झाला नाही. तो त्या तरुणीच्या शेजारी उभा राहिल्याने काही गैरवर्तन घडेल असा विचार तर मावशीच्या मनात आला नसेल? अशी शंका त्याच्या मनात आली. काहीही असो. पण त्याने आपले कर्तव्य केले होते. एका स्त्रीला बसायला जागा दिली होती. वयस्कर स्त्री बसली नाही तरी तरुण स्त्री बसली होती. हेही नसे थोडके. 
     "तिकीट....तिकीट..... सुट्टे पैसे काढा." असा कंडक्टरने आवाज दिला. डबल बेल झाली. गाडीने जयसिंगपूर स्टेशन सोडले. झाडे, इमारती, विजेचे खांब मागे पळू लागले होते. पहिले स्टेशन मागे गेले. सारी गाडी बोलत होती. बोलत नव्हते फक्त ते दोघे. तो तरुण आणि त्याच्याजवळ बसलेली ती तरुणी. तो खिडकीतून बाहेर पाहात होता. तो काहीतरी न्याहाळत होता. काय पाहत होता ते त्यालाच ठाऊक! पाण्याने भरलेला घडा घरात असताना तो सोडून मृगजळाच्या पाठी लागावं अशी त्याची गत झाली होती. तीही डोळे झाकून कसला तरी विचार करत असावी असं वाटत होतं. कोणत्या तरी शास्त्रज्ञाने शोध लावला आहे की, 'विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण होते. तर सजातीय ध्रुवामध्ये प्रत्याकर्षण होते. पण हा नियम येथे साफ खोटा ठरला होता. तो आपलं अंग चोरून बसला होता. ती आपलं अंग शैल सोडून बसली होती. 
        दुसरं स्टेशन आलं. गाडी थांबली. ब्रेक जोरात लागल्याने तिचा तोल गेला आणि ती त्याच्याकडे थोडी झुकली. तिच्या मुखातून 'स्वारी' हे शब्द बाहेर पडले. 'दॅटस् ओके' तोही म्हणाला. पुन्हा दोघेही आपापल्या स्वप्नात रममाण झाली. डबल बेल झाली. गाडीने वेग घेतला. कोणताही नियम सत्यावर आधारित असतो याची जाणीव होऊ लागली. अग्नीच्या सहवासात लोणी आल्यास ते विरघळते.  बर्फाला थोडेसे तापमान मिळाले की त्याचे पाणी होते. पण राजधातू सोने वितळण्यास खूप तापमान असावे लागते. प्रत्येकाचा द्रवणांक वेगळा असतो हेही खरे आहे.  तिच्या हालचालीवरून तिचं चलबिचल होणे दिसत होतं. तिची चुपके चुपके नजर त्याच्याकडे जात होती. तो मात्र स्थितप्रज्ञ दगडासारखा स्थिर होता. त्याची नजर बाहेरच होती. काय करावं हे तिला सुचत नव्हते. ही कोंडी कशी फोडावी या विचारात ती होती.  हे तिच्या चेहऱ्यावरून मदनला जाणवत होतं. 
        तो अगदी खिडकीला चिकटून बसला होता. ती मात्र त्याच्याकडे सरकली होती. खरंच आजकालच्या तरुणी इतक्या बिनधास्त आणि बेधडक बनलेल्या आहेत. तरुणांनीच काय तो संयम पाळावा. धक्काबुक्की होईल म्हणून त्यांनी स्वत:ला जपायचं. पण आजच्या तरुणींनी मनाला येईल तसं वागायचं. पाहा, पाहा कसा चोरून बसला आहे तो. ज्वालामुखीसारखा उद्रेक उसळून आला असेल का त्याच्या मनात? म्हणून त्याने बाहेर केलेले तोंड आत वळवले असावे. त्याच क्षणी तिने आपली मान सर्रकन फिरवली. शून्यात नजर लावून बसली. माझं काही अडलं नाही. 'गरज असेल तर त्यानं बोलावं अगोदर' असं तर तिच्या मनात आलं नसावं? झुंजीच्या बैलाप्रमाणे दोघे आपापल्या जोशात उभी होती. कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. तिला वाटत असावं की त्याने आधी बोलवावं. त्यांच्या या अबोल भांडणात गाडीने चौथे स्टेशन कधी मागे टाकले हे कळलेही नाही. डबल बेल झाली. गाडी वेगाने धावू लागली. त्याचवेळी तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले..... 
      "अहो मिस्टर, ऐकताय ना?''
     "ऐकत नाही, मी तर पाहतोय बराच वेळ."
      "काय?"
     "खिडकीतून बाहेर...... आजूबाजूची झाडं."
      "त्याबद्दल बोलत नाही मी."
     "मग कशाबद्दल?" त्याची नजर अजूनही खिडकीतून बाहेर. 
     "मी काय म्हणते ते ऐकताय ना?"
      "आपण काय बोलतच नाही. आणि ऐकताय ना....ऐकताय ना.... काय लावलंय!" थोडा रागात तो म्हणाला.         
   "पण तुम्ही समजूनच घेत नाही. मग समजणार कसं?"           
     "पण काय?"
     "हेच की....."
     "ना ओळख ना पाळख आपली. मग बोलायचं कसं?"          
     "पण बोलल्याशिवाय कशी होणार ओळख?"
       "हो ना. आततायीपणा केला म्हणून गालही चोळायला मिळायचा स्वतःला स्वतःचा. असंच ना!"
       "तसं काही नाही हो. मला कळतोय शब्दातला अर्थ. गेले नसते मी इतक्या थराला."
      "खरंच! मग काही हरकत नाही. बरं. आपण जाता वाटतं कॉलेजला?" त्यानं विचारलं. 
      "हो. कॉलेजला शेवटच्या वर्षाला आहे." ती म्हणाली.             . 
     तिची गाडी सुरळीत चालू झालेली पाहून मावशीच्या डोळ्यात चमक जाणवू लागली. वेळाने का होईना, पण यश येतंय हे पाहून तिला कृतकृत्य वाटलं. आपण एका जबाबदारीतून मुक्त होणार या आनंदात ती असावी असं वाटत होतं. 
    "मला काय म्हणालात?" तिने विचारले. 
    "काही नाही. तुमचे ओठ हलल्यासारखे दिसले."                      
      "आपलं......" विचारावं की नको यातच अडकला होता तो. 
      "अहो विचारा ना तुम्ही. असं ढेपाळता का मध्येच? आणि आपण, आपलं म्हणायचं बंद करा आधी. तू म्हणा नाहीतर तुम्ही म्हटलं तरी चालेल." दुरावा कमी करण्याचा तिने केलेला हा प्रयत्न. 
    "आपलं....चुकलोच. तुमचं नाव काय?" धाडस करून त्याने विचारलं. 
     "इतकंच होय. माझं नाव अश्विनी." असं म्हणून नावा- गावापासून सारी माहिती तिने दिली. मावशी तर आपल्या मुलीवर बेहद्द खुश होती. आज दीड वर्ष होऊन गेले होते. प्रत्येक पौर्णिमेला तिला वाडीला घेऊन येते . असं जमत येतं तिचं, तोवर काहीतरी बिनसते आणि मोडते लग्न. गावाजवळच्या लेण्यात राहणाऱ्या महाराजांनी सांगितले होते की 'वाडीला जाऊन २१ पौर्णिमा करा, म्हणजे या मुलीचं लग्न जमेल.' हे शब्द आठवून मावशीचं अंग शहारलं होतं. कारण मुलीनं टाकलेला गुगली वेगळाच होता. विकेट पडणार हे निश्चित होतं. म्हणून मावशी हुरळून गेली होती. 
      "अहो! तुमचे नाव काय?" बराच वेळ रंगाळत राहिलेला प्रश्न तिने विचारला. 
     "अविनाश अरविंद अडसुळे" त्यानं नाव पूर्ण केलं. 
     "व्वा! 'ए'चा घन म्हणायचा." नावावर कोटी केली तिनं.                
      "काय करताय म्हणायचं तुम्ही?" मूळ मुद्द्यालाच हात घातला तिनं. 
      "बऱ्यापैकी नोकरी आहे." 
      "तसाच बर्‍यापैकी पगारही असेल?"
      "एका सहकारी संस्थेत क्लार्क म्हटल्यावर जेमतेम चार हजारापर्यंत." 
        "हो चालेल."
        "मला काय म्हणालात?"
        "नाही. तसं काही नाही. आपण राहता कुठे?" तिने फिरकी घेतली. 
        "कोल्हापूर शहरात. माजी आमदारांच्या बंगल्याजवळ. तेथे असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये राहतो."
        "फारच छान. माझी चुलत बहीणही तिथेच राहते कुठेतरी."
       "पण तुम्ही मला दिसला नाही कुठे तिथं?"
        "कशी दिसणार मी? ती नांदायला आहे ना तिथं."                      
       "तुम्ही कधी आला नाही वाटतं तिथं?"                               
      "लग्नात आले होते तिच्या. दोन वर्षांपूर्वी.'' 
    "घरात कोण कोण असतं तुमच्या?" अगदी ठेवणीतला प्रश्न विचारला. 
     "आई-वडील, लहान भाऊ आणि...."
      "आणि कोण आहे?" त्याचं वाक्य मध्येच तोडत तिनं विचारलं. 
      "आणि माझी पत्नी." त्याने मुळावरच घाव घातला.                     
        तोच कचकन ब्रेक लावल्याचा आवाज आला. गाडी थांबली. कारण आठवे स्टेशन आले होते. त्या उत्तराने ती पूर्ण कोसळून पडली होती. त्याचे स्टेशन आल्याने तो आपले साहित्य घेऊन खाली उतरू लागला. जाता जाता "बरं येतो मी. मला खाली उतरून घराकडे जाणारी गाडी पकडली पाहिजे." असं म्हणून तो खाली उतरला. पण तिच्यात मान वर करून पाहण्याचं त्राणही उरलं नव्हतं. पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे तिची अवस्था झाली होती. आर्त गाणे गात होती. रिकाम्या झालेल्या जागेवर तिच्याजवळ बसून पाठीवरुन हात फिरवत मावशी म्हणाली, "बाळ, असं उदास होऊन कसं चालेल? ही तर आपली १७ वी फेरी आहे. अजून चार फेऱ्या बाकी आहेत. परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याने चोच दिली आहे. तसा तो अन्नसुद्धा देईल. डबल बेल झाली. गाडीने वेग घेतला. ती जलद गतीने धावू लागली. पुढे.....पुढे.....आणि पुढे.........

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील