११. असे घडले साहित्य संमेलन
११. *असे घडले साहित्य संमेलन*
नवं वर्ष उजाडलं की नवं वारं व्हायला सुरुवात होते. अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हटलं की, त्याचं स्थळ, अध्यक्षपद, स्वागताध्यक्ष यांची रणधुमाळी सुरू होते. त्याचबरोबर विद्रोही साहित्य संमेलन, परिवर्तन साहित्य संमेलन, अखिल विश्व मराठी साहित्य संमेलन अशी कितीतरी साहित्य संमेलने होतात. काही ठिकाणी प्रादेशिक साहित्य संमेलने भरविली जाऊ लागली आहेत. याचाच परिपाक म्हणजे आज खेड्यापाड्यांतसुद्धा साहित्य संमेलने भरवली जाऊ लागली आहेत. साहित्य चळवळीला उर्जितावस्था प्राप्त झाली. साहित्य संमेलने ही सार्वत्रिक झाली आहेत. मग याला आमचं गावही कसं अपवाद राहील. तसं आमच्या गावचं नाव थोडं विचित्रच आहे. अवघडवाडी. या अवघडवाडीतील किसन्या, पक्या, बाळा आणि झेंगाट. होय झेंगाट म्हणतात त्याला. तसं त्याचं खरं नाव उत्तम तांगमारे. पण साऱ्या गावात झेंगाट लावायला एक नंबर. याचं त्याला सांग, त्याचं याला सांग. कोणाला कसं पालथं घालावं हे त्याच्याकडूनच शिकावं. एकही दिवस असा जायचं नाही की गावात कधी धुसफूस झाली नाही. असं कुणाचं चांगलं चालायला लागलं की हा तिथं दत्त म्हणून हजर व्हायचा. मग काय सांगता? झाला सारा बट्याबोळ. त्याला आधुनिक कलियुगातील नारदच म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. असं सगळं व्यवस्थित जमत आलं की यानं लावली काडीच. मग काय विचारता? झालं झिंगाट सुरू.
असं हे आमचं गाव. गावाचं नाव ऐकायला अवघड वाटलं तरी माझा इलाज नाही. कारण सगळ्याच 'का'ची उत्तर मिळतात असं नाही. गाव तसं छोटं. डोंगरकपारीत वसलेलं. गावाच्या तिन्ही बाजूने नदीनं वेढा दिलेला. गावातली माणसं खाऊन पिऊन सुखी. खरं म्हणजे गाव तसं चांगलं पण झेंगाटानं वेशीला टांगलं.
गाव म्हटलं की उकिरडा आलाच. उकिरडा म्हटला की गाव आलाच. या गावात जशी चांडाळ चौकडी होती. तशीच काही शहाणी माणसेही होती. त्यामध्ये काकासाहेब कालेकर नंबर वनचा माणूस. ते बँकेत क्लार्क होते ; पण ते मॅनेजर असल्याचा आव आणायचा. दुसरा नंबर भाऊसाहेबांचा. भाऊसाहेब भटकर होते मराठी शाळेत शिक्षक. शांत स्वभावाचे. कुणाच्या अध्यात न मध्यात, आपलं काम बरं, आपण बरं. नाकासमोर चालणारा सरळ मार्गी माणूस.
काकासाहेबांनं पुढाकार घेऊन गावात एक मंडळ स्थापन केले. त्याचं नाव 'ज्ञानमाऊली कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अवघडवाडी. काकासाहेब बँकेच्या नोकरीमुळे चार गावचे पाणी प्यायलेला माणूस, सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध स्पर्धा आयोजित करून त्या यशस्वी करून दाखवल्या. सर्वत्र होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या वाऱ्यामुळे काकासाहेबांच्या मनात आलं की आपल्या अवघडवाडीत असं साहित्य संमेलन आयोजित करावं. त्यांनी हा प्रस्ताव भाऊसाहेबांच्या समोर ठेवला. भाऊसाहेब एका पायावर संमेलन घ्यायला तयार झाले.
कारण ते हाडाचे शिक्षक होते. त्यांना साहित्य चळवळ वाढवायची होती. नाहीतरी दूरदर्शन केबल वाहिन्या यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. मुलं वाचनापासून दूर चाललेली आहेत. ही वाचन संस्कृती वाचवण्यासाठी साहित्य संमेलनाचा फायदा होईल अशी त्यांची खात्री होती. म्हणून त्यांनी काकासाहेबांना लागलाच होकार दिला.
काकासाहेबांनी एक नोटीस वजा पत्र काढलं. मंडळातील सर्व कार्यकर्ते, गावातील काही लोकांना कळवले. रविवारी सायंकाळी ठीक सात वाजता मराठी शाळेच्या हिरवळीवर बैठक बोलावली होती. काय आश्चर्य! बैठकीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. वीस-पंचवीस कार्यकर्ता जमा झाले होते. कार्यकर्त्यापुढे आपला हेतू, प्रतिपादन करताना काकासाहेब म्हणाले, "हे पहा माझ्या मित्रांनो, आपलं गाव जगाच्या फार मागे आहे. त्याचं कारण आपलं गाव शहराच्या आडोशाला आहे. डोंगर कपारीला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर जवळ असलं, तरी शहराशी संपर्क कमी आहे. आपणाला आपल्या गावाला पुढे न्यायचा असेल, तर साहित्य चळवळ सुरू करायला हवी. साहित्य संमेलन घ्यायला हवं."
"ह्ये समदं खरं हाय पर साहित्य म्हणजे काय रं?" नामानं विचारलं.
"अरे नाम्या, साहित्याबद्दल तुला माहिती न्हाई व्हय रं!" गणू तात्यानं म्हणाला.
"मग सांग ना काय ते तूच?" नामा म्हणाला.
"अरे बाबा, साहित्य म्हंजे खोरे, कुदळ, आयदान, पाटी, घमेलं हेच नव्हं का!" गणू तात्याचं स्पष्टीकरण. त्यावर सगळीजण पोट धरून धरून हसायला लागली.
"का हसतायसा रं गड्यांनू?" आशाळभूत चेहऱ्यानं गणू तात्यानं विचारलं.
"याला साहित्य म्हणत्यात व्हय गा गणू तात्या?" पक्या म्हणाला.
"तर मंग. माझा समदा जनमच गेला नव्हं शेतात राबून." "गणू तात्या, तुजं बरोबर हाय. पर ते शेतापाई वापरत्यात. त्याचं इथं काय काम?" शांतपणे सगळं ऐकत असलेला कुशाबा म्हणाला.
"मग हे आणि कसलं साहित्य असतंया?" न राहून गणू तात्यांनं विचारलं.
"अरे बाबांनू, आपलं भाऊसाब मास्तर हाईत. काकासाब बँकेत हाईत. त्ये जे कागदावर उतरवून काढत्यात, त्येला साहित्य म्हणत्यात. समजलं का?" त्याच्याच भाषेत सोमामामानं सांगितलं.
"आपण आपली अडाणी माणसं. आम्हाला काय कळतंया त्यातलं. बोलावली मिटिंग म्हणून आलोया." गणू तात्या म्हणाला.
अशा संवादात बैठक संपली. भाऊसाहेब आणि काकासाहेब यांनी साहित्य संमेलन कसं असतं. ते कसं भरवलं जातं. त्याचे कोणकोणते फायदे असतात. याबाबत सविस्तर माहिती सांगितली. पुन्हा दोन दिवसांनी बैठक बोलावण्याचे ठरलं.
दोन दिवसांनी पुन्हा बैठक जमली. बैठकीला हातावर मोजण्याइतकी संख्या होती. काकासाहेबांना कळंना की संख्या का रोडावली असेल. त्याचं कारण असं होतं की, मिटिंगला गेल्यावर वर्गणी द्यावी लागणार. कार्यक्रम यशस्वी करावा लागणार. त्यासाठी राबावं लागणार. त्यापेक्षा मिटींगला नाही गेलं, तर काहीच करावं लागणार नाही. या विचाराने बरेच जण आले नव्हते. तरीही काकासाहेब डगमगले नाहीत. त्यांच्याबरोबर कोणीही आले नाहीत, तरी चालणार होतं. कारण त्यांना सोबतीला भाऊसाहेब मास्तर होतेच. ते एकटेही साहित्य संमेलन घडवतील याची खात्री काकासाहेबांना होती. एकनिष्ठ असणाऱ्या पाच-सहा मावळ्यांना घेऊन लढा द्यायचा निश्चय काकासाहेबांनी केला होता. मदतीला जीवाची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे अर्थात भाऊसाहेब होते. तसेच चांडाळ चौकडी त्यांच्यात सामील झाली होती.
अवघ्या सात मर्द मराठ्यासह गड सर करायची मोहीम काकासाहेबांनी हाती घेतली होती. पहिला हल्ला सरपंचावर करायचा ठरला होता. त्या सात जणांचे शिष्टमंडळ सरपंचांना भेटायला निघाले. तेही 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आविर्भावात.
वेळ होती सायंकाळी सातची. सर्वजण जाऊन बसले सरपंचाच्या खोलीत. आठ वाजून गेले तरी सरपंचांचा घरी येण्याचा पत्ता नव्हता. सरपंच आठवलेसाहेब हे पक्षाच्या मिटिंगसाठी गेले होते कोल्हापूरला. आता काय करायचं? किती वेळ वाट पाहत बसायची? सर्व कार्यकत्यांनी एकमताने ठरले की, आजची मिटिंग रद्द करू या. पुन्हा भेटीला येऊ ते परवानगी काढूनच. कारण असं ताटकळत बसायला नको. तेव्हा झेंगाट म्हणाले, "चला उठा. आपापल्या राजवाडी जाऊ." सगळेजण उठून जाऊ लागले. इतक्या सरपंचाची गाडी दारात आली. गाडीचा नंबर होता - (MH-12 AK-3333) एमएच बारा एके तीन तीन तीन तीन. सरपंचांनी एक पाय आत टाकताच ऑर्डर सोडली, "चहा पाठवून द्या."
"नको सरपंच साहेब, आत्ताच घेतला आहे. तुम्ही येण्यापूर्वी." काकासाहेब.
"पुन्हा एकदा घ्या. तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो." असं म्हणून ते आत गेले. दहा-पंधरा मिनिटांनी बाहेर आले. "नमस्कार मंडळीनो, "आज अचानक कसं काय येणं केलंत गरिबाच्या घरी?" खोचकपणे प्रश्न.
"थोडं काम होतं म्हणून."भाऊसाहेब.
"कामाशिवाय माणूस कसा येईल इकडं?" तिरक्या नजरेनं सरपंचांचा प्रश्न.
"तसं नव्हं साहेब. आम्ही गावात साहित्य संमेलन भरवायचं म्हणतोय." झेंगटानं गुगली टाकली.
"भरवा की. आम्ही कुठं नको म्हणतोय. आमच्या कानावर आली बातमी उडत-उडत." सरपंच.
"आपली काहीतरी मदत व्हावी." दबकत दबकत काकासाहेब म्हणाले.
"करू या की. नाही कुठं म्हणतोय मी." सरपंच. नियोजनाचा कागद पुढे सरकवत भाऊसाहेब म्हणाले, "ही पहा आम्ही तयार केलेली रूपरेषा आहे."
कागद हातात घेऊन त्यावरून एक कटाक्ष टाकला आणि कागद बाजूला सारला. काही वेळ शांततेत गेला. "मग काय ठरलं साहेब?" किसनानं विचारलं.
"कशाचं?"
"या कार्यक्रमाबाबत." झेंगाट म्हणालं.
"अगोदरच नियोजन केलंया. त्यातही काकासाहेब आणि भाऊसाहेबांचे नियोजन म्हणजे विचारायलाच नको."
"तसं नव्हं!"
"मग कसं?"
''मी स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे. कोणाची भीडभाड ठेवायची मला गरज नाही. पण तुम्हांला राग येणार नसेल तर बोलू का?" सरपंच.
"बोला साहेब. जे काय असेल ते बोला. लोकशाही आहे. आपल्या देशात. तुमचं मत तुम्ही मांडू शकता." भाऊसाहेबांनी नागरिकशास्त्राचं पान उघडलं.
"तुम्ही नियोजन केलंत ते बरोबर आहे तुमचं; पण यात माझा देव कुठे आहे?" साहेबांच्या या प्रश्नावर सर्वजण अवाक् झाले.
त्यांचंसुद्धा बरोबर होतं म्हणा. ते ज्यांच्यामुळे सरपंच झाले, गावाचा कायापालट झाला, गावात नळ पाणीपुरवठा झाला, महिलांना पाणी आणण्यासाठी नदीवर जावं लागायचं ते बंद झालं. नदीवर धरण बांधल्यामुळे कोल्हापूर शहर जवळ आले. गल्लोगल्ली डांबरी रस्ते झाले. ग्रामदैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. अशी महत्त्वाची कामे ज्यांनी आमदार फंडातून केली होती. अशा महान व्यक्तीचा साधा नामोल्लेखही कार्यक्रम पत्रिकेत कुठे आलेला नव्हता. ती व्यक्ती अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आलेली होती. पण सांप्रत त्या व्यक्तीच्या नावापूर्वी 'माजी' असा शब्द लागलेला होता. ते म्हणजे माजी आमदार बगळेसाहेब. मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा विसर पडलेला होता. अशा महनीय व्यक्तींचा कार्यकर्ता असलेल्या सरपंच साहेबांचा पारा चढणे स्वाभाविकच होते. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.
गप्प बसंल ते झेंगाट कसलं! दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र जमवले. 'आता चला' तो म्हणाला.
बाळ्यानं विचारलं, "कुठं?" त्याच्यावर खेकसून झेंगाट म्हणालं, "स्वारीवर निघण्यापूर्वीच कुठलास ते बरं केलंस. तुझ्या तोंडात काहीतरी घालायला हवं." त्याला मध्येच आडवून भाऊसाहेब म्हणाले, "अरे बाबांनो, कामाचं बघा अगोदर. मग भांडत बसा. झेंगाट साहेब आपणच सांगा पुढची मोहीम. कोणती आखलेली आहे ती. तुम्ही व्हा पुढे. आम्ही आहोत तुमच्या बरोबर."
"आजची स्वारी चेअरमनांच्या घरी." असे झेंगाट बोलताच सारा मोर्चा सेवा संस्थेच्या चेअरमन दादासाहेबांच्या घरी आला. सारा गाव त्यांना दादासाहेब म्हणतो. त्यांचं खरं नाव आदिनाथ. गावावर त्यांचं वर्चस्व गेली तीस वर्षे आहे. त्यांची सत्ता सेवा संस्थेवर आहे. दादासाहेब खुर्चीतच बसले होते.
"यावं यावं तरुण मंडळीनो, सकाळी सकाळीच येणं केलंत आमच्या घरी!"
"ताकाला जाऊन मोगा कशाला लपवायचा? सरळ विषयाला हात घालतो चेअरमन साहेब." झेंगटानं सुरुवात केली.
"आम्हालांही अशीच माणसे आवडतात. विषयाचं बोला."
"काय आहे दादासाहेब, गावात साहित्य संमेलन घ्यायचे ठरवले आहे." काकासाहेबांनी सूर लावला.
"असं होय. मग मला काय विचारता? माझी आणि परवानगी कशाला लागते?" दादासाहेबांची उंटासारखी तिरकी चाल.
"तसं नव्हे दादासाहेब, आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या कानावर बातमी घालावी; म्हणून आलोय." समजुतीच्या स्वरात भाऊसाहेब म्हणाले.
"कार्यक्रमाचे नियोजन कसे केले. कार्यक्रमासाठी कोणकोणत्या व्यक्तींना निमंत्रण दिले. कोणाच्या हस्ते उद्घाटन ठेवले." अशा प्रश्नांची दादासाहेबांनी सरबत्ती सुरू केली.
किसन्यानं खिशात ठेवलेला कागद हळूच बाहेर काढला. टेबलावर ठेवला. दादासाहेबांनी कागद उचलला डोळ्यासमोर धरला शब्द दिसेनात म्हणून टेबलावर ठेवलेला चष्मा घेतला आणि डोळ्यावर ठेवला. वाचता वाचता मध्येच थांबले. म्हणाले, "वा रे वा! फारच चांगली कार्यक्रम पत्रिका तयार केली आहे. नावं ठेवायला जागा ठेवली नाही. ही सुपीक कल्पना भाऊसाहेबांच्याच डोक्यातून आलेली दिसते."
"म.....माझ्या नाही दादासाहेब." भाऊसाहेब चाचरले. "मग काकासाहेब तुमच्या?"
" ना...... नाही. माझ्या डोक्यातून नाही." काकासाहेब.
"मी सांगतो. मी तयार केलीया कार्यक्रम पत्रिका." झेंगाट बोललं.
"मग तर फारच छान झालीया. खरंच तुझ्याशिवाय कुणाच्या डोक्यातून अशी कल्पना बाहेर येणार नाही. काकासाहेब, भाऊसाहेब हे तुमचं काम नव्हे. किती झकास कार्यक्रम पत्रिका झालेली आहे. त्याला तोड नाही." चेअरमन साहेब.
"काय आहे चेअरमन साहेब, आमचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. कसा घ्यायचा? कसा पार पाडायचा? याचा काहीच अनुभव नाही आम्हाला. आम्हांंला वाटलं त्याप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली.'' झेंगाटानं स्पष्टीकरण दिलं.
"अरे! या कार्यक्रम पत्रिकेत एका तरी पुढारी माणसाचं नाव आहे का?" चेअरमनला राग आला होता. कारण ते विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते होते. आमदार कावळेना आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमदाराच्या आशीर्वादाने ते सेवा संस्थेचे चेअरमन बनले होते. त्यांना वाटत होते की, या साहित्य संमेलनाला आमदार साहेब असते तर मलाही मिरवायला मिळाले असते. जिथे आमदार साहेबांचा पत्ता कापला; तेथे माझी काय किंमत असणार?" या विचारातच ते बोलले, "या कार्यक्रमात आमदाराचे साधे नाव सुद्धा आलेले नाही. तरीही तुम्ही माझ्याकडे आलात. चला चालते व्हा."
"तसं नाही, चेअरमन साहेब. माझं ऐकून तरी घ्या."
"काय ऐकून घ्यायचं?"
"अहो, हा कार्यक्रम आहे साहित्याचा. गावातील लोकांना साहित्याची ओळख व्हावी, वाचनसंस्कृती वाढावी, गावात नवनवे लेखक-कवी यावेत. त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा. गावात नवीन लेखक-कवी निर्माण व्हावेत. असा शुद्ध विचार घेऊन हा कार्यक्रम ठेवला आहे." भाऊसाहेबांनी आपला हेतू स्पष्ट केला.
"या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येऊ नये; म्हणून कोणाही राजकीय व्यक्तींची नावे यात आलेली नाहीत." झेंगटानं आपली युक्ती सांगितली.
"पण आमदार साहेबांना बोलावायला काय अडचण होती? आपले नेते आहेत ते. त्यांनी मंडळाला केलेली मदत विसरला वाटतं तुम्ही? पण मी कसा विसरेन. त्यांना कार्यक्रमाला बोलावलं पाहिजे. माझ्या आमदारांना बोलवलं पाहिजे. ते मला काही माहिती नाही; पण आमदार साहेब कार्यक्रमाला आलेच पाहिजेत. नाहीतर भाऊसाहेब, तुमची बदली आजरा, चंदगड भागात झाली म्हणून समजा." हे वाक्य भाऊसाहेबांच्या कानावर पडताच त्यांना आपल्या डोक्यात कोणीतरी घणाचे घाव घालतात असं वाटायला लागले. 'काय म्हणून काकासाहेबांच्या मागे लागलो आणि पायावर दगड मारून घ्यायला लागलो. पण म्हणतात- 'ना आधी गुंतू नये, मग कुतू नये.' या विचारात असताना झेंगटाने एक युक्ती काढली. तो म्हणाला, "हे बघा चेअरमन साहेब, आमदारांना आम्ही निमंत्रण देतो. पण माजी आमदारांनाही निमंत्रण देणार आहे. तुमची काही अडचण नाही ना?"
"तसं कसं? एकावेळी दोघे कसे एकत्र जमतील? आमदार एका पक्षाचे आणि माजी आमदार दुसऱ्या पक्षाचे आहेत."
"हे बघा चेअरमनसाहेब, आमदारांना आणू सकाळी उद्घाटन करायला आणि माजी आमदार येथील सायंकाळी समारोप कार्यक्रमाला. कोणीही येणार नाहीत कोणाच्याही समोरासमोर." काकासाहेबांनी काढलेल्या तोडग्यावर एकमत झाले. सगळ्यांनी माना डोलावल्या. भाऊसाहेब बिनधास्त झाले. कारण त्यांची बदली होणार नव्हती. आमदार येणार म्हणताच चेअरमनाना आनंद झाला. त्यांना पुढे पुढे करता येणार होते. तर माजी आमदारही कार्यक्रमाला येणार हे कळताच सरपंचानाही खूप आनंद झाला.
.........काही दिवसानंतर पुन्हा रविवारी सायंकाळी सात वाजता मराठी शाळेच्या हिरवळीवर मिटिंग भरली. कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. फेब्रुवारी महिन्यातील तिसऱ्या रविवारी पहिले ग्रामीण साहित्य संमेलन एकमताने मंजूर झाले. पहिले सत्र कथाकथन. दुसरे सत्र परिसंवाद आणि तिसरे सत्र काव्यवाचन. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कावळेसाहेब येणार होते. त्यामुळे चेअरमनसाहेब निश्चित उपस्थित राहणार होते. समारोप कार्यक्रमासाठी माजी आमदार बगळेसाहेब प्रमुख पाहुणे होते त्यामुळे सरपंच साहेब उपस्थित राहणार होते. या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्यामकुमार जोंधळे यांची एकमताने निवड करण्यात आली. स्वागताध्यक्ष म्हणून कोणाची निवड करायची हा एकच प्रश्न सर्वासमोर होता. काकासाहेब कालेकर की......भाऊसाहेब भटकर की......झेंगाट उर्फ उत्तमराव वाघमारे......की...... आणखी कोण?
शेवटी झेंगाटानं हा प्रश्न काकासाहेब आणि भाऊसाहेब यांच्यात भांडणे लावून परस्परच मिटवला. आणि स्वतः स्वागताध्यक्षपदाचा मान मिळवला. अशा तऱ्हेने 'होणार.....होणार' म्हणून गाजत असलेलं आमच्या गावचं ग्रामीण साहित्य संमेलन वळण-वाटांनी गचके खात खात का असेना, पण पार पडले. ही आमच्या ग्रामदैवताची कृपा.
Comments
Post a Comment