९. सपान
९. *सपान*
रामपूरवाडी तसं हजारभर लोकवस्तीचं गाव. गावाजवळून एक भली मोठी नदी वेडीवाकडी वळणे घेत वाहत होती. गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं. या गावाचा इतर गावाशी येण्या-जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. गावातल्या माणसांना परगावी जायचे असेल किंवा परगावच्या लोकांना या गावात यायचं असेल; तर नावेतून ये-जा करावी लागत होती.
फेब्रुवारी ते मे या उन्हाळी महिन्यात नदीतून चालत जाण्यासाठी वाट होती. कारण नदीचे पाणी कमी व्हायचे. पण मृगाचा पाऊस सुरू झाला की नदीला पाणी येई. त्यावेळी अल्याड पल्याड करायला नावेशिवाय पर्याय नव्हता. नाव चालवायला त्याच गावातील एक कुटुंब होते. लोक त्यांना 'आंबी' असे म्हणत होते. नाव चालवायचा मक्ता महादेव आंबी यांच्याकडे होता. सारा गाव त्यांना म्हादू मामा म्हणायचं. नदीकडे जाण्यासाठी एक पाणंद होती. ती अरुंद होती. अगदी पायवाटेसारखीच होती. तिला 'नावंची वाट' असे म्हणत होते. दोन्ही बाजूंनी शेती होती. शेतकऱ्यांनी शेतीच्या भोवती कुंपण घातलेलं होतं. त्या चिंचोळ्या वाटेनंच मार्ग काढत गुडघाभर चिखलातून चालत जावे लागायचे. पावसाळ्यात गावापासून नदीपर्यंत आणि नदीपासून गावापर्यंत येताना जीव अगदी मेटाकुटीला यायचा. कारण गुडघाभर चिखलातून यावं लागायचं. एक पाय काढला की दुसरा पाय चिखलात अडकून बसायचा. याला इलाज नसायचा. पण मोठा महापूर आला की मात्र सगळ्यांना चांगलं वाटायचं. कारण नाव अगदी गावाच्या जवळ यायची. तिथं नावंत बसलं की दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उतरायला मिळायचं. या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर पोहोचायला अर्धा तास लागायचा. खूप मजा यायची. एखाद्या समुद्रावर गेल्यासारखं वाटायचं. सगळीकडे लाल भडक पाणी दिसायचं.
या महापुरात नाव चालवायची म्हणजे नावाड्याची खरी कसरत असायची. नदीकाठानं हिरवीगार झाडं होती. गावाला जोडलेल्या लाईटचे खांबही होते. शिवाय पलीकडे पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेल होते. या साऱ्या अडथळ्यांना पार करत लोकांना नावेतून आल्याड पल्याड करायची जबाबदारी आंब्याची होती. एखादी बाळंतीन अडली असेल किंवा आजारी माणूस असेल तर रात्री-अपरात्री माणूस म्हणून मामाला उठवायला यायचा. पण कधीही म्हादू मामांनं कोणाला मागं पाठवलं नाही. तो नेहमी तयार असायचा. म्हणून सारा गाव म्हादू मामाच्या उपकारानं दिला होता. तरीही म्हादू मामाला याचं अप्रूप वाटायचं नाही. तो नेहमी म्हणायचा की हा माझा धर्मच आहे. माणसानं माणसाच्या उपयोगी पडलं पाहिजे.
नाव नदीत सोडण्यापूर्वी तो मोठ्याने ओरडायचा, "अरे मागं कोणी राहिलाय का? दहा-बारा माणसं जमली तरी तो नाव हलवायचा. तसा म्हादू मामा अंगापिंडानं धडधाकट होता. अंगात हत्तीसारखं बळ होतं. नावंचा सुकाणू हातात धरावा लागायचा. त्यावरच नावंचा सगळा समतोल असायचा. नावंला योग्य दिशा आणि गती देण्याचं काम यावरती असायचं. खूप कष्टाचं काम होतं. पावसात, थंडीत काम करावं लागायचं. त्यामुळे म्हादू मामाला दिवसभराच्या श्रमपरिहारासाठी रात्री थोडी दारू प्यावी लागायची. तो अतिशय सज्जन होता. तो कोणाला काही वाईटवंगाळ म्हणायचं नाही. तो धनानं गरीब होता पण मनानं भला माणूस होता. नावेच्या कामासाठी गावकरी त्याला बैतं म्हणून सूप भरून भात घालायचे. गूळ, भुईमुगाच्या शेंगा, मक्कं जे असेल ते लोक द्यायचे. त्यावर त्याचं कुटुंब चालायचं. नावेतून परगावचा कोणी दिसला; तर त्याच्याकडे म्हादू मामा पैसं मागायचा. पण त्यानं गावातील एखाद्या माणसाचं नाव सांगितलं; तर तो पैसे घ्यायचा नाही.
अशा म्हादू मामाचा संसार मात्र हलाखीत चालला होता. त्याची बायको, एक मुलगा, दोन मुली असा त्याचा परिवार होता. त्याला शेती नव्हती. पण एक म्हैस पाळली होती. त्याची बायको राधाक्का फार जिद्दी बाई होती. नवरा दारुडा होता. संध्याकाळ झाली की म्हादू मामा नाव बंद करून दारू पिऊनच घरी यायचा. घरात लहान लहान पोरं. इंदू सर्वांत मोठी, नामदेव मधला आणि धाकटी मंजू. पोराबाळांचं आणि म्हशीचं करून राधाक्काचा जीव मेटाकुटीला यायचा. ती कधीकधी दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायची. संसाराचा गाडा चालवताना ती थकायची. एखाद्या दिवशी जेवण करायला उशीर व्हायचा. म्हादू मामाला घरात आल्या आल्या जेवायला लागायचं. वेळेत जेवायला मिळालं नाही; तर तो राधाक्काला शिव्या देऊ लागला. कधीकधी मारायचासुद्धा. एखादा दिवस उपासमार व्हायची. म्हादुमामा शिव्या देत अंथरुणावर पडायचा. इंदू आईबरोबर कामाला जाऊ लागली. नामदेव म्हैस घेऊन डोंगर माळावर जायचा. त्याच्या संगती पोरांची गॅंग होतीच.
दिवसामागून दिवस निघून जात होते. जून महिना आला. शाळा सुरू झाल्या. नामदेव सात वर्षाचा झाला होता. त्याच्याबरोबरच्या मुलांची नावे शाळेत कधीच घातलेली होती. नामदेवचं नाव शाळेत घालायला म्हादुमामा तयार नव्हता. कारण आपण 'आंबी लोक आपला नाव चालवण्याचा पिढीचा धंदा. तोच धंदा आपला नामदेव करील. नाहीतर शिकून तरी नोकरी कुठे मिळते?' असा त्याचा विचार होता. त्याला नामदेव शिकण्यापेक्षा म्हैस घेऊन जाणं जास्त चांगलं वाटायचं. मात्र राधाक्काला नामदेव शाळा शिकवा असं वाटायचं. पण ती कोणाला सांगणार!
ते पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. नदीला महापूर आला होता. नाव सुरू होती. जुलै महिन्याचा पहिला आठवडा होता. शाळा खात्यात बदल्या झाल्या होत्या. रामपूरवाडीला सातवीपर्यंतची शाळा होती. या शाळेत एक नवीन शिक्षक बदली होऊन आले होते. त्या शिक्षकांचे नाव होते काकासाहेब जाधव. त्यांना नावेनं या गावात येण्याचा पहिलाच अनुभव होता. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून चालताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागायची. हाडाचे शिक्षक असलेल्या या शिक्षकांमुळे गावाचे भाग्य उजळले होते. ते शुक्रवारी गावीच वस्तीला राहायचे. काही दिवस नावेनं प्रवास करताना म्हादुमामाशी त्यांची चांगलीच ओळख झाली. एके दिवशी काकासाहेब गुरुजींनी त्यांना विचारले, "तुमचा मुलगा काय करतोय? तेव्हा म्मा
म्हादुमामानं सांगितलं, "तो म्हैशी राखायला जातो." तेव्हा काकासाहेब गुरुजींनी त्याला शाळेत पटवायची विनंती म्हादुमामाला केली. नाही होय करता-करता त्यांनी परवानगी दिली. कारण शाळेसाठी येणारा सर्व खर्च स्वत: करतो असं काकासाहेब गुरुजींनी म्हादुमामाला वचन दिलं होतं.
नामदेव शाळेला जाऊ लागला. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. वर्गशिक्षक होते जाधव गुरुजी. ते पहिलीच्या वर्गाला शिकवायला होते. सारा गाव त्यांना काका गुरुजी या नावानेच बोलवायचा. नामदेवच्या रूपानं काका गुरुजींना हाती एक हिरा सापडला होता. त्याला नावारूपाला आणायचंच असं त्यांनी पक्कं ठरवलं होतं. कारण तो अभ्यासात खूप हुशार होता. जरा काय सांगायचा अवकाश तो पटापट उत्तरं द्यायचा. याचा स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयोग करून घ्यायचा असा त्यांनी निश्चय पहिलीच्या वर्गातच केला होता. त्याला जे काय लागेल ते द्यायला त्यांनी सुरुवात केली होती.
नामदेव चौथीच्या वर्गात आला होता. त्याचं नाव स्कॉलरशिप परीक्षेसाठी निश्चित केलं होतं. काका गुरुजींनी त्याला स्कॉलरशिपचं गाईड आणून दिलं होतं. शैक्षणिक सहल पुणे, देहू, आळंदी कशी गेली होती. सहलीचा सारा खर्च गुरुजींनी स्वत: केला होता. मन लावून त्याला शिकविले. जिद्दीने स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्याचा नंबर आणला. आपले स्वप्न पुरे केले. सोन्यासारख्या या पोराचं पुढं काय करायचं असा प्रश्न गुरुजीसमोर होता. राधाक्का गुरुजीकडे येऊन सारखी म्हणायची, "एवढं केलंस ना! आता पुढं कसं शिकवायचं ते बघा. तुम्हीच त्याचं मायबाप हायसा. हाडाची काडं करीन. त्याला काहीबी कमी पडू द्यायची नाही." नामदेवच्या आईची मूर्ती त्यांच्या डोळ्यापुढे सारखी दिसायची. त्यावेळी जिल्हा परिषदेची एक शाळा होती. तिथं हुशार मुलांनाच प्रवेश दिला जायचा. गुरुजींच्या मनात आलं की नामदेवला त्या शाळेत घालावा. त्याला प्रवेश मिळाला तर किमान दहावीपर्यंत तरी काही काळजी नाही. संपूर्ण शिक्षण मोफत मिळेल. शिवाय स्कॉलरशिपही मिळते. म्हणून गुरुजी त्याला जि. प. च्या प्रवेश परीक्षेसाठी स्वतः घेऊन गेले. त्या परीक्षेतही नामदेव चांगल्या मार्काने पास झाला. त्या शाळेत त्याला प्रवेश मिळाला. त्या शाळेत त्याला पाठवायचा म्हणजे सुरुवातीस थोडा खर्च करावा लागणार होता. त्यासाठी काय करायचे या विचारात असतानाच त्यांनी नामदेवचा सत्कार करण्याचे ठरविले. सत्काराच्या वेळी पाचशे रुपये जमा झाले होते. स्कॉलरशिप परीक्षा पास झालेला नामदेव हा गावातील पहिलाच मुलगा होता. त्याला एक पत्र्याची ट्रंक, ड्रेसचे दोन जोड, चादर इत्यादी साहित्य खरेदी केले. ते स्वतः नामदेवला त्या शाळेत घालवायला आले होते. कारण म्हादुमामा आणि राधाक्का अडाणी होत्या. त्यांना शहराची ना ओळख ना पाळख. या सत्काराचा मोठा फायदा झाला तो म्हादुमामावर. सत्काराचा सोहळा पाहिल्यावर म्हादुमामाला वाटले की आपला मुलगा मोठा झाला की त्याला लोक काय म्हणतील? एका दारुड्याचा मुलगा म्हणून त्याची ओळख होईल. म्हादुमामानं त्यावेळेपासून दारू पिण्याचे बंद केले.
नामदेव मन लावून शिकत होता. त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. आपली आई किती कष्ट करते. दोन बहिणींची लग्नं करायची आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला शिकायला पाहिजे. या विचाराने तो खूप अभ्यास करायचा. त्याने दहावीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला.
'पुढे काय करायचे?' असा प्रश्न नामदेवला पडला होता. यासाठी तो काका गुरुजींच्या घरी गेला. त्यांच्या पाया पडला. आपला प्रश्न त्यांना सांगितला. गुरुजींनी त्याला सांगितले, "तू आता डी. एड. कर. म्हणजे तुला लवकर नोकरी लागेल. त्यांचा आशीर्वाद घेऊन तो घरातून बाहेर पडला. गुरुजी त्याला देवासारखे वाटायचे. त्याने आपणही यांच्यासारखे आदर्श शिक्षक व्हायचे ठरविले. दोन वर्षाचा डी. एड. कोर्स पूर्ण केला. आणि शिक्षक म्हणून कामावर रुजू झाला.
काका गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो अध्यापनाचे कार्य करू लागला. त्याला सामाजिक कार्याची आवड होती. यातूनच तो ज्या गावात शिक्षक झाला होता. त्या गावात त्याने सार्वजनिक वाचनालय सुरू केले. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणाची मोहीम राबविली. या त्याच्या साऱ्या कार्याची नोंद घेऊन जिल्हा परिषदेने नामदेवची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली. त्याचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला त्याने आपल्या काका गुरुजींना आवर्जून आणले होते. सत्कार झाल्याबरोबर तो आपल्या गुरुजींच्या पाया पडला. हे सारं त्यांच्यामुळे झालं. आज मी जो आहे तो त्यांच्यामुळेच आहे असे उद्गार त्याने मनोगतातून काढले होते.
नामदेव घराजवळ आला. त्याचे स्वागत करायला सारी मंडळी उभी होतीच. दारात येताच त्याने 'आई' अशी हाक मारताच राधाक्का धावतच बाहेर आली. तिने त्याला डोळे भरून न्याहाळले. ती म्हणाली, "बाळा तू या बिचारीचं 'सपान' पुरं केलंस. तू आता फार मोठा माणूस झालास." असं म्हणताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले. त्या आसवात नामदेव भिजून चिंब झाला. आणि तो फार फार भूतकाळात निघून गेला होता.
Comments
Post a Comment