१० . कुलदीपिका
*कुलदीपिका*
कमळा वहिनीला पुन्हा एकदा मुलगीच झाली. हौसा सुईनींनं तिची यापूर्वी चार बाळंतपणं केली होती. तिचं हे पाचवं बाळंतपण होतं. नाक मुरडत, पदर पचत बाहेरच्या बाजूला आवाज देत हौसा म्हणाली, "बायजाक्का नात झाली बघ तुला." असं ऐकताच देवघरात जपमाळ करत बसलेल्या बायजाक्कानं आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला, "देवा, देवा, देवा. कुठल्या जन्माचे पाप भोगायल लावलंस रं बाबा तू. वळिनं चार पोरी दिल्यास, पण काय म्हटलं नाही तुला. आता पोरगा देशील असं वाटलं होतं. पण पाचव्यांदाही पोरगी दिलीस. किती आशेनं पाहत होते मी. बाजीरावाला सांगत होते की, अरे बाबा! कोल्हापुरातल्या डॉक्टरकडून तपासून घे. पण त्यांना नकार दिला होता. तो म्हणायचा की, अगं आई तपासणी करून घ्यायला बंदी आहे. डॉक्टर तयार होत नाहीत. पोरीचं लगीन करायचं म्हटलं तर हुंडा द्यावा लागतो. ओळीने पाच पोरीची लग्नं करावी लागणार. त्यासाठी राब राब राबावं लागणार."
असेच काही महिने निघून गेले. परमेश्वराच्या दरबारात येणार आहे. 'देर है लेकिन अंधेर नहीं है.' असं म्हणतात. त्याप्रमाणे बायजाक्काला परमेश्वर पावला. पंचकानंतर म्हणजे पाच मुलींच्या पाठीवर कमळा वहिनीला सहावा मुलगा झाला. घरात आनंदी वातावरण निर्माण झाले. बायजाक्काला तर स्वर्ग दोन बोटे उरला होता. तिला नातू झाला होता. घराला वंशाचा दिवा मिळाला होता. बायजाक्कानं साऱ्या गावात साखर वाटली होती. बारसं तर मोठ्या थाटामाटात घातलं होतं. तिनं नातवाचं नाव दीपक असं ठेवलं होतं. ती दीपकला हातावरच्या फोडाप्रमाणे जपायची. दीपकचे खूप लाड झाले होते.
दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्षे निघून गेली. बायजाक्काच्या केसांनी केव्हाच रुपेरी चांदणं धारण केलं होतं. पण आज ती एका वेगळ्याच काळजीत पडली होती. पंधरा वर्षापूर्वी वंशाचा दिवा नाही म्हणून तळमळत होती. त्याच वंशाच्या दिव्याने तिच्या घराण्याला काळीमा फसायला सुरुवात केली होती. तिचा नातू दीपक शाळेच्या पायर्या काही चढू शकला नाही. पण दारुच्या दुकानाच्या पायर्या मात्र दररोज झिजवत होता. रात्री दारू पिऊन यायचा. आपल्या आजीच्या साऱ्या खाणदानाचा उद्धार करायचा. लाडक्या नातवाचा पराक्रम पाहून बायजाक्काला जगावसं वाटत नव्हतं. तरी ती जगत होती. आपल्या एका नातीसाठी. तशी तिला कुठल्याही नातीची काही काळजी करायचं कारण नव्हतं. पहिल्या चार नातींची लग्नं होऊन त्या सासरी सुखात राहत होत्या. आनंदाने नांदत होत्या. तिची पाचवी नात मात्र हिरा होती. तिच्यासाठी ती जगत होती. या दुनियेची रीतच न्यारी असते. नातवासाठी आतुर असलेली बायजाक्का आत्ता मात्र नातवाच्या त्रासाने वैतागून गेली होती. नात नको म्हणणारी बायजाक्का त्याच नातीसाठी जगत होती. तिच्या पाचव्या नातीचं नाव होतं दीपा. सगळी तिला 'नकोशी'च म्हणायचे. कारण नको असताना ती जन्माला आली होती. पण खरोखरच तिने नावाप्रमाणे आपला प्रकाश पडला होता.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तिने आपल्या भारत देशासाठी पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. ती आपला आदर्श कविता राऊत हिला मानत होती. तिने मिळविलेल्या सुवर्णपदकासाठी तिचा सत्कार होणार होता. तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते. या सत्काराच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी अशी मोठी माणसे येणार होती. असंख्य प्रेक्षकांसमोर हा कार्यक्रम होणार होता.
सत्काराच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आजपर्यंत आपण गावातल्या मुलीबाबत संकुचित दृष्टी ठेवून वागत होतो. त्यांनी चूल आणि मूल एवढेच पहावे असा विचार करत होतो. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या महान कार्यामुळे मुली शिकू लागल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करून यश मिळू लागल्या. आजचेच उदाहरण पाहा ना! पोहाळेसारख्या एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या दीपाने पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले आहे. म्हणून आपण तिचा सत्कार करीत आहोत. आपले जुने विचार सोडून दिले पाहिजेत. केशवसुतांंनी म्हटलेले आहे की, 'जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळुनि किंवा पुरुनी टाका.' म्हणून आपण मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता त्यांच्याकडे समानतेने पाहिले पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या करू नका. तिला जन्मू द्या, जगू द्या, वाढू द्या, हे जग पाहू द्या. मी दीपाला मुख्यमंत्री फंडातून एक लाख रुपयाचा धनादेश देत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपाचा सत्कार करण्यात आला. तिच्या गळ्यात हार, हातात सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश पाहून आजीचं काळीज भरून आलं. ती काही काळ भूतकाळात गेली. ती सारं सारं आठवू लागलं.......
दीपाचा सत्कार झाला. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. एकच जयघोष सुरू होता ----'दीपा मानेचा विजय असो. दीपा मानेचा विजय असो. दीपा मानेचा विजय असो.'
या जयघोषात बायजाक्काचं मन चिंब भिजून गेलं होतं. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. भरल्या मनानं ती दीपाकडं पाहत होती.
Comments
Post a Comment