८. *हा दोष कोणाचा?*
* हा दोष कोणाचा?*
(या कथेतील पात्रे, स्थळ, प्रसंग काल्पनिक आहेत. जर कोठे संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजावा.) सकाळी सातची वेळ. पूर्व दिशेला लाली पसरलेली होती. शहरातील मुख्य रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. याच रस्त्यावर महानगरपालिकेचा दवाखाना. अचानक दवाखान्याच्या दुसऱ्या मजल्यावरील पश्चिमेकडील एका खोलीतून 'माझा बाळ, माझा बाळ...माझा बाळ बोलंना झालाय अशा आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. दवाखान्यात एकच गडबड सुरू झाली. डॉक्टर, नर्स यांची तारांबळ उडाली होती. कुणीतरी १०० हा नंबर फिरवला. थोड्याच वेळात पोलीस गाडी दवाखान्याच्या दारात आली. या गाडीतून शिंदे साहेब दोन पोलीस शिपायांबरोबर आले होते. ड्युटीवर असलेले डॉक्टर माळी त्यांना सामोरे आले. ते शिंदे साहेबांना घेऊन स्त्री वार्डमध्ये त्या काॅटजवळ गेले. पोलीस अधिकारी असूनही ते काही क्षण थरारले. समोरचा प्रसंग पाहून त्यांची मती गुंग झाली. आपण पाहत आहोत ते सत्य आहे की स्वप्न? असा क्षणभर भास झाला. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तरीही ते सत्य होते.
तेथे असलेल्या त्या कोपऱ्यातील एका कॉटवर अवघ्या अडीच दिवसाचं एक लहान मूल निश्चित पडलेलं होतं. त्याची कोणतीच हालचाल सुरू नव्हती. दोन्ही पाय सरळ लांब केलेले. दोन्ही हात दोन्ही बाजूला पडलेले. चेहरा आकाशाकडे. जणू शांती झोपलेला आहे. लोभसवाणं रूपडं. श्वास मात्र बंद झालेला. बघणाऱ्याला वाटावं की त्याला उचलून छातीशी कवटाळावं. शिंदे साहेबांचे मन चिरत गेलेलं. अंगाला कापरे सुटलेलं. कारण ते मूल म्हणजे स्त्री बीज होतं. म्हणून त्या गोंडस जिवाचा अंत झाला होता. ते बीज जर पुरुष जातीचं असतं तर......तर असं घडलं असतं का? असा विचार आला महादेवराव शिंदे साहेबांच्या मनात. पण ते क्षणभरच. ते भानावर आले कारण त्यांना आपली ड्युटी बजावयाची होती.
त्या काॅटजवळ एक तरुण स्त्री सुन्न मनाने बसलेली होती. त्यांनी ओळखलं की हीच त्या निष्पाप मृत जीवाची आई असावी. कशी सुरुवात करावी या विचारात असतानाच अचानक तोंडून शब्द बाहेर पडले......"हे कधी घडले?"
"....... "ती तरुणी गप्पच.
त्यांनी विचारले, "अहो बोला ना काहीतरी. हे कधी घडले"
"मला माहीत नाही." एवढेच ती पुटपुटली
आता फारसं हाताला लागत नाही असं पाहून त्यांनी पोलिस हवालदारांना पंचनामा करायला सांगितला. जाता जाता ते म्हणाले, "यादव आणि जाधव हा मृतदेह घेऊन जा आणि शवविच्छेदन करून घ्या."
"बरं सर." असे म्हणून ते दोघे आपल्या कामाला लागले.
.........दुसऱ्या दिवशी सर्व सर्व वर्तमानपत्रातून बातमी प्रसारित झाली......'एका नवजात अर्भकाची हत्या!' 'का केली असेल हत्या?' 'मुलगी झाली म्हणून आईनेच घोटला असेल का गळा?' 'तसे असेल तर ती माता सुद्धा एक स्त्री होती ना?' 'माता न तू वैरिणी!' अशा अनेक प्रश्नांचे काहूर मनामनांत दाटले होते.
माधवराव शिंदे पुन्हा दवाखान्यात आले. कॉटवर कालची ती बाळंतीन बसलेली होती. तिच्याजवळ जात शिंदे साहेबांनी प्रश्न केला, "सांगा काल काय काय झालं? सविस्तर सांगा मला."
"माहिती नाही." पुन्हा तेच उत्तर. तिला कशी बोलती करावी हे उपअधीक्षक शिंदे साहेबांना उमजेना. काही वेळ शांततेत गेला. पुन्हा त्यानी विचारले, "तुमच्या बरोबर कोण आहे इथे?"
"मावशी. माझी मावशी."
"मावशी....मावशी" तिने हाक मारताच एक पन्नाशी उलटलेली स्त्री आत आली.
"मावशी .....तुम्हीच?"
"हो."
" मावशी, तुम्ही सांगाल काल काय झाले ते?"
"मला काही माहिती नाही." मावशीचं उत्तर सुद्धा तेच ठरविल्याप्रमाणे.
"तुम्हालाही माहिती नाही. छान!"
"तसं नाही हो साहेब."
"मग कसं?"
" मला तर शांत झोप लागलेली व्हती. कध्धी नाही त्यो त्या दिवशी डोळा लागला होता. मला काही सुदीक समजलं नाही. सकाळी उठून बघते तर समदं घडलेलं होतं. उठून नर्सबाईला बोलवलं इतकंच बस्स."
"बरं. तुम्ही बाहेर जावा आता." मावशी बाहेर निघून गेली. शिंदे साहेबांनी कसून चौकशी केली पण हाती काहीच लागेना. पोलीस परत गेले. डिस्चार्ज घेऊन बाळंतीन घरी गेली.
चार दिवस झाले. पाचव्या दिवशी पोलिस तपास करण्यासाठी जांभळवाडीला पोहोचले. पत्ता विचारत विचारत पोलीस हव्या त्या घरात शिरले.
"तुमचे नाव काय?" शिंदे साहेबांनी त्या तरुणीला प्रश्न विचारला.
"सुनिता."
"पूर्ण नाव सांगा."
"सुनिता सुनील सावंत."
"गाव?"
"जांभुळवाडी."
"पतीदेव काय करतात?"
"मजुरी."
"तुमचं लग्न केव्हा झाले? सासर कसं आहे? या बाबत माहिती सांगा."
'काय सांगावं? कुठून सुरुवात करावी?' या संभ्रमात सुनिता होती. 'मी सांगेल त्यावर पोलीस विश्वास ठेवतील का? तरीही जे खरं आहे ते सांगायला हवेच.' याच विचारत असताना शिंदे साहेब म्हणाले, "अहो, बोला काहीतरी. तुम्ही माहिती दिल्याशिवाय आम्हाला तपास कसा करता येईल? कायद्याला मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तेव्हा जे काय असेल ते सारं खरं खरं सांगून टाका. म्हणजे आम्हाला योग्य दिशेने तपास करता येईल. नाहीतर मुलीच्या हत्येसाठी तुम्हाला अटक करावी लागेल. मग खडी फोडायला जावं लागेल. कायद्याला मदत केली नाही म्हणून आणखी एखादे कलम लावावं लागेल."
मनाची पूर्ण तयारी करून सुनीता सांगू लागली. ...... गगनबावडाच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं जांभुळवाडी हे गाव. या गावातील सुनील सावंत यांच्याशी सहा वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. माझा संसार सुखात चालला होता. घरी वयस्कर सासू-सासरा, नवरा आणि नणंद. लग्नानंतर तीन वर्षे मूल झालं नव्हतं. चौथ्या वर्षी एक मुलगी झाली तिचे नाव दीपा ठेवले. कारण घरात उजेड पसरला दिव्याप्रमाणे. पहिली मुलगी झाली; तरी घरातील कुणी नाराज झाले नाहीत. सासू-सासरे म्हणायचे की पहिली बेटी तूप रोटी.......... माझं सासर गरीब असलं तरी दोन वेळंचं खायला मिळत आहे. तक्रार करायला काही जागा नाही. माझे मालकही खूप कष्ट करतात. त्यांचं फारसं शिक्षण झालेलं नाही. कसंतरी पाचवीपर्यंत शिकले आहेत. आज एकाच्या शेतावर तर उद्या दुसऱ्याच्या शेतावर कामाला जावं लागतं त्यांना. एक दिवसही ते बिनकामाचे राहत नाहीत. मालकांचा फार जीव आहे माझ्यावर. शनिवारी पगार व्हायचा. रविवारी आठवडी बाजारासाठी ते कोल्हापूरला जातात. येताना गजरा आणतात माझ्यासाठी न चुकता. एखादा बाजार विसरतील ते पण गजरा कधी विसरत नाहीत.
भावविश्वात रममाण झालेल्या सुनीताला जागे करत शिंदे साहेबांनी विचारले, "पण चार दिवसात फिरकले नव्हते तुमचे मालक दवाखान्याकडे? दुसरी मुलगी झाली म्हणून नाराज होते वाटतं तुमचे मालक?"
"खरंच! मला यातलं काही माहीत नाही. ते असं का वागले? पहिल्या बाळंतपणाच्या वेळी असं कधी ते वागले नव्हते. माझ्या सोबतच ते असायचे कायम. रात्री ते दवाखान्यात थांबत नव्हते; पण व्हरांड्यात थांबायचे वस्तीला. दुसरी मुलगी झाली म्हणून ते आले नाहीत असं मला वाटत नाही. ते म्हणायचे, 'मुलगा काय अन् मुलगी काय दोन्ही सारखीच. मुलगीला मुलगा समजून शाळा शिकवू. मी शाळा शिकलो नाही. पण मुलांना शाळा शिकवू. काही वाटेल ते करायची जिद्द होती त्यांची. मग माझा मालक दवाखान्यात यायचा कसा थांबेल? मला मुळीच पटत नाही. मोठी अडचण आली होती. पावसाची सारखी रिपरिप चालू होती. कुठे काम धंदा मिळाला नाही. त्यात दवाखान्याचा खर्च. शिवाय दवाखान्यात येण्याचा आणि जाण्याचा खर्च निराळाच. पैशाची जमवाजमव सुरू होती. माझा मालक मला भेटायला यायचा थांबणार नाही."
"तुमच्या बोलण्यावरून तरी मला पटते की तुम्ही हत्या करणार नाही."
"खरंच साहेब, मी कशाला माझ्या जिवाचा जीव घेऊ?" "पण तुमचा संशय कोणावर आहे का?" सुनिताची लिंक तोडत शिंदे साहेबांनी विचारले.
"मी संशय कोणावर घेणार साहेब?"
"डॉक्टर किंवा नर्सवर?"
"डॉक्टर किंवा नर्स? अहो साहेब, ते माणसांचा जीव वाचवतात. माझ्या बाळाला ते कशाला मारतील?"
"शेजारचे पेशेंट अगर नातेवाईक?"
"त्यांचे आणि माझे काही वाकडे आहे की भाऊबंदकी आहे. घराजवळ घर आहे की शेताजवळ शेत आहे. म्हणून त्यांनी बदला घेतला म्हणायचा? चार दिवसाचे ते सहप्रवासी. मग ते कशाला माझ्या बाळाला मारतील?"
"मग तुमचा संशय तुमच्या मावशीवर आहे का?" अगदी वर्मावर बोट ठेवत शिंदेसाहेब म्हणाले.
"त्या हो कशाला मारतील माझ्या बाळाला? मला माझ्या आईप्रमाणे आहेत त्या. शिवाय त्यांनाही एक मुलगी आहे. तिचंही लग्न झालेलं आहे. तिला दोन मुलगे आहेत."
म्हणूनच अकसानं त्यांनी तुमच्या मुलीचा बळी घेतला असेल?"
"नाही, नाही. मला तसं वाटत नाही."
"या मावशी म्हणजे तुमच्या आईची बहीणच आहे ना!" "नाही. माझ्या आईची बहीण नव्हं."
"मग तुम्ही त्यांना मावशी कशी काय म्हणता?"
"कारण ती माझ्या सासूची बहीण आहे. मालकांची मावशी ती माझी मावशी."
"एवढा तिच्यावर विश्वास?"
"हो. सासू आणि मावशी दोघी बहिणी असल्या तरी स्वभावाने एकच आहेत. सासू मला आईसारखी नव्हे तर आईच आहे माझी. काही कमी पडू दिले नाही मला. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही मला माहेरची कधी आठवण येऊ दिली नाही. पहिलं बाळंतपण माहेरी करायचं असतं असं म्हणतात. परंतु पहिल्या बाळंतपणासाठी मला माहेरी पाठवून दिली नाही. अशा मायेच्या सासूची बहीण कशी काय हत्यारा असू शकेल?" तिनेच प्रतिप्रश्न केला.
शिंदे साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि आपला मोर्चा सुनीलकडे वळवला.
"तुमचं नाव?"
"सुनिल सखाराम सावंत."
"काय करता तुम्ही?"
"मोलमजुरी."
"बायको बाळंत झाली असं समजल्यावर तुम्ही दवाखान्यात का गेला नाही? त्याचं कारण काय?"
"त्या दिसी काम व्हतं.''
"की.....दुसरी मुलगी झाली म्हणून?''
"नाई सायब. तसं काई नव्हतं."
"मग कसं?"
"हे बघा मायबाप. घरात अठरा विश्व दारिद्र्य. त्यादिसी जवळ पैका नव्हता. काम केल्याबिगर कोण देईल का पैका? दोघाकडनं मागितलं. परं मिळालं नाईत. म्हणूनशान पाटलाच्या मळ्यावर काम धरलं. ते पूर्ण केलं की शंभर रुपयं मिळणार व्हतं म्हणून गेल्तो त्यांच्या मळ्यावर. आई शप्पथ! खरं सांगतो सायब मी. पाटलाला विचारा तर हवं तर."
''ते तर आम्ही विचारणार आहेच. आमची ड्युटीच आहे ती. बरं तुझ्या आईला बाहेर बोलव बघू."
तो आत गेला. सत्तर वर्षे वयाची एक म्हातारी आली. ''आजीबाई, तुमचं नाव काय? नाव सांगा बघू तुमचं?" शिंदे साहेब मोठ्याने ओरडले.
"सरसाबाई म्हणत्यात मला."
सगळ्यांची 'स' या आध्याक्षरावरून नावाची सुरुवात पाहून शिंदे साहेब थोडे अचंबित झाले.
"बरं आजी. तुमच्या सुनबाईला नात झाल्यावर लेकाला दवाखान्यात का पाठवून दिले नाही?"
"तसलं कायबी न्हाई. मलाबी पोरगी हाय. ही सून नव्हं तर हीबी पोरगी हाय माझी."
"मग तिने लहान मुलीची हत्या का केली?"
"काय म्हणलासा मला कळलं न्हाई."
"तुमच्या सुननं तिच्या मुलीला का मारलं?"
"हो साहेब, काय बोलतायसा तुम्ही? कशाला मारंल हो आपल्या जीवाला? हरणाचं काळीज तिचं. इथं आल्यापासनं रडूनशान डोळं सुजवून घेतल्यात तिनं."
"म्हणजे तुमची सून निरपराधी आहे असं तुम्हाला वाटतं?"
"लेकरा असलं कायबी करणार न्हाई ती. माझा विश्वास हाय तिझ्यावर."
"बरं आजी. तुमची बहीण कोणत्या गावात आहे?"
"ती व्हय पोर्ल्यात राहते."
'तुमच्या सुनेला आणि लेकाला पोलीस स्टेशनला न्यावं लागेल. अधिक चौकशी करावी लागेल. तुमच्या बहिणीलाही बोलावून घ्यावे लागेल पोलीस स्टेशनला. सुनीता आणि सुनील तुम्ही चला माझ्याबरोबर." असे म्हणून शिंदे साहेब बाहेर पडले........
.........पोलिसांनी सखोल चौकशी केली. चौकशीअंती मावशी दोषी असल्याचे आढळून आले. रात्रीच्यावेळी मावशीने मुलीच्या गळ्याभोवती नाडी आवळून हत्या केली होती. आरोप सिद्ध झाल्याने मावशीला भ्रुणहत्येबाबत सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. सुनीता आणि सुनील यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सरसाबाईच्या डोळ्यात अश्रू तरळले. मुलगा आणि सून निर्दोष सुटले. मात्र सख्खी बहीण पक्की वैरी झाली. सरसाबाई न्यायालयाच्या आवारातच ओक्साबोक्शी रडायला लागल्या. तुरुगाकडे जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पहात राहिली. पहातच राहिली...पाहतच राहिली......
Comments
Post a Comment