म्हणे आता घंटा वाजवा (नाट्यछटा)

अहो, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणताय! माणसांची गर्दी नव्हे, ही तर गाढवांची गर्दी आहे असं तुम्हांला वाटते? असं का म्हणताय तुम्ही? पण इतकी माणसं का उभी राहिलीत म्हणायचीत? अहो, आता वाजलेत किती? नऊ! म्हणजे नऊ वीसची बस आहे ही. आता सुटेल लगेच. त्यानंतर पुन्हा बस नाही असं कोण म्हणालं म्हणायचं? आलेपाक घ्या, लेमण गोळ्या घ्या, भडंग घ्या, पाण्याची बॉटल घ्या असं म्हणणाऱ्यांनो, तुम्ही खाली उतरा. अहो तुम्ही खाली उतरा अगोदर. गर्दी किती झाली दिसत नाही का तुम्हाला?  तिकीट, तिकीट. बोला तिकीट. कोणाचं द्यायचं राहिलं असेल तिकीट घ्या आधी.  अहो सुट्टी पैसे काढा अगोदर, सगळे येतात ते नोटाच बाहेर काढतात. कुणाकुणाला आणि किती किती मोड द्यायची! सुट्टे पैसे काढा. अहो, किमान वरचे तरी सुट्टै पैसे काढा. काय म्हणताय? सुट्टे पैसे आणणार कुठून?  आणि देणार कसे? अहो, मग आम्ही काय करायचं? रुपया, दोन रुपये, पाच रुपये कुठून द्यायचेत?  प्रत्येक जण 100-500 रुपयांच्या नोटा काढताय. आम्ही काय सुट्ट्या पैशांचा कारखाना काढला आहे का आम्ही? मागंल त्याला सुट्टे पैसे द्यायला! अहो, काय म्हणताय तुम्ही? अहो, काय झालंय? गाडीत चढला नाही तोवर खाली उतरायला? बोर्ड वाचला नाही नीट? अहो, ही गाडी कोल्हापूर ते निटवडे जाते. काय म्हणताय सरळ दिसलं नाही. नीट वड्याला जाते. अहो, ओढ्याला किंवा नदीला जात नाही ही गाडी. काय? या गावाला यायचं नाही?  मग उतरा खाली. उतरा खाली, उतरा खाली. नीट बोर्ड वाचत नाहीत. दिसली बस की चढलीतच आतमध्ये. एकेक काय काय नग असतात. तिकिटाला पैसे काढा म्हटले की कोण म्हणतं घरी विसरलो, तर कुणाचा खिसा रिकामा असतो. मग मला सांगा की अशी कधी तुमची बायको स्टॅंडवर विसरते का?
 बरं, बरं. पैसे काढा. तिकीटाचे पैसे काढा. अहो, अशी ढकलाढकली करू नका. सगळ्यांनाच नेणार आहे. कुणाला इथं ठेऊन जाणार नाही. सरका, सरका जरा बाजूला. मी पुढे सरकत येतो.  अहो बसचा प्रवास सुखाचा प्रवास. आरामदायी प्रवास. वडापनं जाणार आहे? मग जावा ना. कोण अडवते तुम्हाला? पण वडापमध्ये किती प्रवासी कोंबतात हे बघितलं का कधी! तीन आसनी रिक्षात ७/८ जण भरलेले असतात. पण बसमध्ये मात्र रिकाम्या जागा असूनही लोक बसत नाहीत. तर काय म्हणे, स्टॅन्डवर आले की वडाप तयार असते. बससाठी वाट पहात कोण बसणार? आणि वडापवालेपण हुशार! बस येण्यापूर्वीच पाच मिनिटे अगोदर प्रवासी घेऊन जातात. हां पण शासनानं लाडकी बहीण योजना आणून अर्ध तिकीट केलं. त्याचा मात्र बससाठी फारच फायदा झाला बरं का. आज-काल बसेस पूर्ण भरून जात आहेत. अर्ध्या तिकिटामुळं महिलाबरोबर पूर्ण तिकीटवाले पुरुषही बसमध्ये बसत आहेत. बस ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे हे तर आमचे ब्रीद वाक्य आहे. म्हणूनच आता बस भरली आहे. घंटेवर घंटा डब्बल घंटा वाजली आहे. बसचा प्रवास सुरू झाला आहे. बस चालली चालली. पुढे चालली.

Comments

Popular posts from this blog

बोलतो मराठी

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम