देणाऱ्याने देत जावे.......

                   *देणाऱ्याने देत जावे......* 
          ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांनी एक छानशी कविता लिहिली आहे. ती म्हणजे 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे| घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावेत||'  ही कविता मला आठवण्याचं कारणही तसंच आहे.
                 रांजणवाडी नावाचं छोटेसं गाव होतं. त्या गावात राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था सुरू केलेली होती. गावातील लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरविण्यात आलेले होते. यानिमित्ताने होतकरू विद्यार्थी, प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे सभासद आणि या संस्थेमुळे ज्यांचे जीवन घडले, फुलले अशा थोर व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बगळेसाहेबांना आमंत्रित केले होते. तर अध्यक्ष म्हणून गावातीलच ज्येष्ठ नागरिक कावळेदादांची निवड करण्यात आलेली होती. 
            कार्यक्रम सुरू झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते सर्व सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने गावातील पहिला इंजिनियर झालेला अजय पवार यांना सूत्रसंचालकांनी मनोगत व्यक्त करायला आमंत्रित केले. पायात बूट घातलेला, इनशर्ट केलेला, गळ्याभोवती टाय बांधलेला अजय बोलायला उभा राहिला. सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या स्वागतानं अजयचा ऊर भरून आला होता. 'अजय...अजय...' असा लोकांनी जयजयकार सुरु केला. 
           अजयने बोलायला सुरुवात केली. ''आज मला धन्य धन्य वाटत आहे. मी उभा राहिलो आहे ते या राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेमुळेच. मी जे काही मिळवले आहे, ते या संस्थेमुळेच. माझे शिक्षण या संस्थेमुळे पूर्ण झाले आहे. आज इंजिनियर म्हणून मी जे काम करत आहे, तेही या पतसंस्थेमुळेच. कारण योग्य वेळी योग्य मदत मला मिळाली नसती; तर मी अभ्यास करू शकलो नसतो. माझे शिक्षण पूर्ण झाले नसते. पण याच पतसंस्थेमुळे माझे शिक्षण पूर्ण झाले. मला योग्य वेळी योग्य आर्थिक मदत मिळाल्यामुळे  इंजिनिअर म्हणून काम करत आहे तेही या पतसंस्थेमुळेच.'' असा विचार मांडत असतानाच त्याचा त्याला सारा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून पुढे सरकू लागला. 
      पुढे तो सांगू लागला, "पंचवीस वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली. त्यावेळी मी इयत्ता सातवीत शिकत होतो. माझे वर्गशिक्षक दादासाहेब गायकवाड होते. सर्वजण त्यांना 'दादा गुरुजी' या नावाने बोलवत होती. त्यांनी माझे ज्ञान पाहून मला शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले होते. त्यांनी माझा खूप अभ्यास करून घेतला. प्रत्येक शुक्रवारी ते शाळेमध्ये मुक्कामाला राहत होते. २३ जून १९९० रोजी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेत माझा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २१ वा क्रमांक आला होता. स्कॉलरशिप परीक्षेत येणारा गावातील पहिलाच विद्यार्थी मी होतो. त्यामुळे दादा गुरुजींनी माझा सत्कार करायचे ठरवले होते. त्यावेळी मला माझ्या गावातील लोकांनी खूप मदत केली होती. मला एक हजार रुपये बक्षीस मिळाले होते. पण त्यातील निम्मी रक्कम म्हणजे पाचशे रुपये याच राजर्षी शाहू पतसंस्थेने मला बक्षीस म्हणून दिली होती. या संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब यांनी मोलाचा वाटा उचलला होता. याच बक्षीसामधून माझ्या पुढील शिक्षणाचा खर्च भागवणे सोपे झाले होते."
            कोल्हापूर संस्थानाच्या राजर्षी शाहू महाराजांनी विविध जाती, धर्माच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली होती. विविध जाती, धर्माच्या मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली होती. कोल्हापुरातील एका वस्तीगृहात अण्णासाहेबांनी  त्याला प्रवेश मिळवून दिला होता. कारण त्यावेळी त्या गावात सातवीपर्यंत शाळा होती. पुढचं शिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरातील शाळेला जावं लागत होते. म्हणून अजयने इयत्ता आठवीमध्ये ऐतिहासिक दसरा चौकातील साई हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तिथेच असलेल्या राजर्षी शाहू मराठा वस्तीगृहात राहत होता. उत्तम गुणांनी दहावी परीक्षा पास झाला. बारावी पास झाला. त्याच्या शिक्षणातील अडचणीला सुरुवात झाली होती ती तो उच्च शिक्षण घेत असताना. उच्च शिक्षणाचा खूप खर्च असल्यामुळे तो भागवणे त्याच्या वडिलांना शक्य नव्हता. 
           बारावीनंतर त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. त्याला मेकॅनिकल इंजिनिअरला प्रवेश घ्यायचा होता. पण त्याला बारावी परीक्षेत गुण कमी असल्यामुळे सिव्हील इंजिनियरिंगला प्रवेश घ्यावा लागला. त्याला लॅपटॉप घ्यायचा होता. पण त्याला विकत घेणे शक्य झाले नाही. चार बँकेत जाऊन चौकशी केली. पण तारण देण्यासाठी त्यांच्याकडे शेती नव्हती किंवा गृहकर्ज घेण्यासाठी मोठे घरही नव्हते. राहण्यापुरते दोन आकनी घर होते. त्यावर फी भरण्याइतके कर्ज मिळणे शक्य नव्हते. त्याच्या बाबांनी अनेक लोकांच्या घराचे उंबरे झिजवले. पण कोणीही मदत केली नाही. शेवटी  त्याचे बाबा अण्णासाहेबांच्या घरी गेले. ते अण्णासाहेबाकडे गेले आणि म्हणाले, ''अण्णासाहेब, तुमचे आमच्यावर फारच उपकार आहेत. मी सगळ्यांकडे हात पसरला पण कोणीच मला मदत केली नाही, म्हणून मी तुमच्याकडे मदतीचा हात मागायला आलोय. काहीही करा; पण मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत करा. त्याला लॅपटॉप घ्यायचा आहे. त्यासाठी पैसे हवे आहेत." त्यावर अण्णासाहेब म्हणाले, "शंकर, मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. तुला मी वैयक्तिक मदत करू शकत नाही." 
      "असं का म्हणता अण्णासाहेब?"
       "मी तुला पैसे दिले; तर माझ्यात आणि खाजगी सावकारकी करणारा यात काय फरक राहिला? मी खाजगी सावकारकीच्या पूर्णपणे विरोधी आहे. मला खाजगी सावकारकी मान्य नाही."
       "मग मी काय करू म्हणता?" शंकरराव. 
       "शंकर, तू आता घरी जा. संध्याकाळी पतसंस्थेत ये. यावर काहीतरी मार्ग काढू या."
      शंकर घरी निघून गेला. तो संध्याकाळी सात वाजता पतसंस्थेत आला. तेव्हा पतसंस्थेत संचालक मिटिंग सुरू होती. शंकरने आणलेला आपला अर्ज शिपायाकडे दिला. शिपायांने तो अर्ज आणून मिटिंगमध्ये दिला. शंकरच्या कर्जावर चर्चा रंगू लागली. "शंकरला कशाच्या आधारावर कर्ज द्यायचे?"
    "त्याच्याकडे ना शेती, ना चांगले घर. मग हा कसं काय कर्ज फेडणार तो?"
         या लोकांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन अण्णासाहेब म्हणाले, "हे बघा मंडळीनो, माझी ठेव पावती आहे या पतसंस्थेत. त्या पावतीवर लोन करून शंकरला पैसे देऊन टाका." 
          हे बोलणं ऐकताच सर्व संचालक गप्प झाले. मॅनेंजरला सर्व सूचना देऊन आपल्या ठेव पावतीवर कर्ज काढून अजयच्या बापाला पैसे दिले. 
           अशाप्रकारे  अजयची गरज भागवली गेली. ती अण्णासाहेबांच्या संस्थेतील ठेव पावतीवर. त्याच मिळालेल्या पैशामुळे अजय सिव्हिल इंजिनियर झाला. तो कामं करू लागला. त्याने पतसंस्थेचं कर्ज थोडं थोडं भागवलं. सरकारी कामं करू लागला. 
            भाषणाचा शेवट करताना तो म्हणाला, "मी या संस्थेचे घेतलेले सर्व कर्ज फेडलेले आहे. पण मी संस्थेच्या आणि अण्णासाहेबांच्या ऋणातून मात्र मुक्त झालेलो नाही. यांच्या ऋणातच राहणे पसंत करेन. म्हणून मी ठरवले आहे, की या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने पतसंस्था नवीन इमारत बांधत आहे. या इमारतीचा प्लॅन आणि देखरेख मी स्वतः करून देणार आहे. तोही विनामोबदला. तसेच या बांधकामासाठी माझ्याकडून जी मदत हवी आहे, ती करण्यास मी वचनबद्ध आहे. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना ही पतसंस्था मदत करत आहे. अनेकांचे जीवन फुलवत आहे. आणि इथून पुढेही आपले कार्य ही संस्था चालू ठेवणार आहे. माझ्यासारखीच माणसे घडावीत अशी इच्छा व्यक्त करतो. मी माझ्या नावाने या पतसंस्थेत एक लाख रुपये ठेव ठेवतो. त्या रक्कमेच्या व्याजातून गावातील गरीब आणि होतकरू मुलाला बक्षीस म्हणून या पतसंस्थेने मदत करावी." 
         'विना सहकार नहीं उद्धार' या बोध वाक्याचा खरा अर्थ अजयला कळला होता. तो त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिला होता. म्हणून त्याचे भाषण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. रौप्य महोत्सवी पतसंस्थेचा कार्यक्रम संपन्न झाला. 

Comments

Popular posts from this blog

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.