मी आता सुधारणार - नाट्यछटा

मी आता सुधारणार !
            (स्वगत) हां आज कोणता अभ्यास करावा? मला तर काही सूचंना झालंय. (प्रकट) मराठी वाचावं आता. मराठी शिकवणारे कोण बरे ते...हां. धोतर आणि टोपीवाले....बरोबर. तेच ते कुलकर्णीसर. काय बरे म्हणतात ते मराठीबाबत... मराठी म्हणजे आपली मातृभाषा. आपल्या आईची भाषा. मग कशाला याचा अभ्यास करायचा. पुस्तक बाजूला ठेवतो. हे कोण? वा गणितवाले जाड आणि मिशीवाले पाटीलसर. फारच मारतात बुवा ते. लक्षात राहण्यासाठी यांचा अभ्यास सकाळीच करावा. ये आई, मला सकाळी लवकर उठव ग.( चूक लक्षात येऊन) अरेच्चा! आई तर बाहेर गेली आणि मी कुणाला सांगत आहे. गणितवाले बाबा, तुम्ही आता बसा सकाळपर्यंत इथं असंच. अरे हो, या आमच्या इंग्रजीवाल्या मॅडम बरं का! आमच्याच वर्गशिक्षिका आहेत. तशा त्या माझ्या फार आवडत्या आहेत.  माझा आवडता विषय आहे ना इंग्रजी. हो. आहेच मुळी माझा आवडता विषय इंग्रजी. कारण त्यांचे इंग्रजी शिकवणे म्हणजे नुसतं गाणं. हं. त्यांचं नाव सांगायचं विसरून गेले बघा. काय बरं त्यांचं नाव.... हां आठवलं. गुणे मॅडम. आहेतच माझ्या मॅडम गुणाच्या. आणि बरं का त्यांनी शिकवलेलं गाणं मला येते म्हणलं. काय? म्हणू? म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही. बरं ठीक आहे. मग गाऊनच दाखवते. कोणतं बरं गाणं! ..... हं आठवलं. जाॅनी जॉनी एस पापा, इटिंग शुगर  .... नो पापा. टेलिंग युवर लाईज नो पापा. ओपन युवर माऊथ हां हां हां. चिंगे, वा वा! खूपच शहाणी झालीस तू. ( पाठ थोपटते) पुरे झाला आता अभ्यास. झोप आलीया मला. झोपलेलं बरं. नाहीतर कोणीतरी म्हटलेलं आहे, की 'लवकर झोपे, लवकर उठे त्याशी आरोग्य संपदे.' (जांभळी देते) चला झोपा आता. (अंधार झाला स्वप्न पडते) अरे कर्कटा, मला असा त्रास देऊ नकोस. करकट दादा का छळायला लागला आहेस मला. काय चुकलं माझं. अरे थांब की, रक्तबंबाळ झाले मी. टोचू नकोस ना मला. आई, ये आई, वाचव मला. आई ये आई, आई, काय झालं मला? अगं मला स्वप्न पडलं होतं. स्वप्न. काय म्हणतेस, काय बघितलं स्वप्नात मी? थांब सांगते आई तुला. मग ऐक तर आता सगळं. सारं दप्तरच माझ्या भोवती फिरत होतं. त्यात पिशवीताई, लेखणीताई, कर्कटदादा अशी सगळीच आली होती माझ्या स्वप्नात. कडकडून टोचून टोचून रक्तबंबाळ केलं मला.... का म्हणून काय विचारतेस? मी अभ्यास करत नाही म्हणून. झोपलेली असते सारखी मी. कर्कटदादा मला म्हणतो असा, की गणिताच्या तासाला माझा एक पाय मोडून लंगडे केलंस ना तू. तुला आता ठेवतच नाही बघ. थांब. तुझा जीवच घेतो आता. असं म्हणाला आणि माझं तोंड दाबायला लागला. मी कसंतरी मला वाचवलं त्याच्या तावडीतून. आणि पुस्तक काय म्हणाले? तुला माहिती आहे का? काय? तुला माहिती नाही! 
      काय म्हणाले होते? होय, खरं आहे तुझं. मी सांगितल्याशिवाय तुला तरी कसं कळणार? तर पुस्तक मला म्हणाले, की आम्ही आलोय तुझ्याशी भांडायला. तू आम्हाला दुकानातून आणलंस तेव्हा आमचं रूप कसं देखणं होतं! सुंदर सुंदर चित्रे होती. तू चित्रातल्या बायांना मिश्या लावल्यास आणि पुरुषांना टिकली लावलीस. अगदी घाणेरडे करून टाकलंस आम्हाला. या विश्वात मानवाचे खरे गुरु आम्हीच आहोत. त्यामुळे तो सुखाने जगत आहे. तुझ्याजवळ आम्ही आहे, म्हणून तुला काही वाटत नाही. पण आम्ही तुझ्यापासून दूर गेल्यावर आमची खरी किंमत तुला कळेल. तू खूप जपतेस मला. कारण कधीच काढत नाहीस तू मला पिशवीतून बाहेर अभ्यास करण्यासाठी. नुसती आळशी आहेस आळशी. बरं का, लेखणीताईसुद्धा आली होती स्वप्नात. काय ते? काय म्हणाली ती? ती म्हणाली, की आम्ही गरीब, निर्जीव म्हणून आमच्यावर राग का काढतेस! निर्जीव झालो म्हणून काय झालं! आम्हालांही आमची मनं आहेत तुझ्यासारखी हे लक्षात ठेव. नवी होते मी तेव्हा डोक्यावर घेऊन नाचत होतीस आनंदाने. सगळ्यांना दाखवत होतीस. आणि आता माझं रूप कसं केलंस ते बघ. माझी क्लिप, टोपणसुद्धा तोडलं आहेस. माझं सारं अंग खिळखिळं करून टाकलं आहेस. माझं टोक तोंडात घेऊन चावतेस. मला खूप वेदना होतात. अगं अजूनही कळ येते अंगातून माझ्या. आई, पिशवीताईची तर कैफियत वेगळीच होती. ती कोणती? ती तुला सांगायला पाहिजेच. मग ऐक तर. ती म्हणते, की वर्षातून एकदाच आंघोळ घालतेस मला. तेही शाळेच्या पहिल्या दिवशीच. बाकी ३६४ दिवस वापर करतेस तू आमचा, तेही अंघोळीविनाच. घाणेरडे करून टाकले आहेस मला. अंगाचा वास मारतो, म्हणून सारी सोडून जाणार आहेत मला. त्यांनी थांबावं म्हणून मी ओरडत होते. तुला वाटलं की मी किंचाळायला लागले. अगं, त्यांनी काही अटी घातल्या आहेत. त्या अटी पूर्ण केल्या तरच ते थांबणार आहेत. कोणत्या अटी? अगं सांगतो. थांब की थोडं. ऐक ऐक तू. मी काय सांगते ते. त्या सर्वांची काळजी घेईन मी. पुस्तकाची पाने पाडणार नाही. पुस्तकातील चित्रं रंगवणार नाही. विनाकारण रेघोट्या ओढणार नाही. लेखणीची मोडतोड करणार नाही. दप्तर व्यवस्थित ठेवीन. आणि महत्वाचं म्हणजे नियमित अभ्यास करीन मी. काय म्हणालेस आई? पुन्हा एकदा म्हण ना! काय गुणी माझी पोर! वा! अरे वा! असाच असू दे आई तुझा आशीर्वाद. कारण मी आता सुधारणार आहे. नमस्कार करते मी तुला आई. 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.