माझ्या स्वप्नातील भारत भाषण

       'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा' खरंच माझ्या स्वप्नातील भारत साऱ्या जगात उठून दिसेल. सर्व क्षेत्रात प्रगती केलेला माझा भारत देश असेल. विकसित राष्ट्रांमध्ये माझा भारत नंबर वन असेल. जिकडे तिकडे माझ्या देशाचा गाजावाजा झालेला असेल. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखात एकच नाव असेल ते म्हणजे भारत..भारत...आणि भारत. 
        'सबसे प्यारा सबसे न्यारा, गुलिस्ता हमारा' होय. असा आदर्श भारत माझ्या स्वप्नात आहे. म्हणून माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल याबाबत चर्चा करणार आहे. 
ज्याचा इतिहास महान आहे, त्याचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे, असा माझा भारत देश आहे. भारताची भूमी महान आहे. कारण ती साधू, संत, महंत, समाजसुधारक आणि क्रांतिवीरांची भूमी आहे. अहो, भारत म्हणजे रत्नांची खाण आणि बुद्धिमत्तेची शान आहे. भारतातील व्यक्तींची प्राचीन काळापासूनच बौद्धिक पातळी फार मोठी आहे. कॉम्प्युटरलाही मागे सारेल इतकी ती समृद्ध आहे. अनेक देशांना फार भीती वाटते म्हणून त्यांनी भारतात जातीय दंगली, बॉम्बस्फोट घडवून भारताला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. पण साऱ्यांना भारताने पराभूत केले. सर्व जग जिंकायला आलेल्या अलेक्झांडर सिंकदरला याच भारतात आपला जीव गमववा  लागला. 
            माझ्या भारतात भाषा, वेश, अन्न, धर्म, प्रादेशिकता, प्राकृतिकता यामध्ये विविधता आहे. अशा विविधतेत राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं काम माझ्या भारत देशाने केलेले आहे. सर्व लोक आपापसात गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यामध्ये एकता आहे. हेच तर माझ्या भारत देशाचे वेगळेपण आहे. विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे वैशिष्ट्य आहे. तरीही काही संधीसाधू लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी धर्माचा, जातीचा वापर करत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करून स्वतःच्या भाकरी भाजून घेत आहेत. पण माझ्या स्वप्नातील भारतात असे बिलकुल पहावयास मिळणार नाही. सर्वत्र सुख, शांती आणि आनंद असेल. जेव्हा परकीय आक्रमण होईल तेव्हा सर्व जाती, धर्मातील लोक एक होऊन परकीयांचा पराभव करतील. सर्व लोक शिक्षित झालेले असतील. सर्वांना नोकरी मिळालेली असेल. ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांनी व्यवसाय सुरू केलेले असतील. प्रत्येक हाताला काम मिळालेले असेल. जे हात दगडांचा वर्षाव करायला उत्सुकलेले आहेत, ते थांबवून देशाच्या प्रगतीला लावीन. होणारे उत्पात थांबवून लोकांच्यात सामर्थ्य निर्माण करून माझा भारत देश बलवान करीन. म्हणूनच साने गुरुजी म्हणतात, 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.'
          उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतात बर्फ वितळून महापूर येतो. त्यावेळी दक्षिण भारतात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणून संपूर्ण भारतभर माळेच्या आकाराचा कालवा काढलेला असेल. या विषम परिस्थितीवर मात करता येईल. म्हणजे उन्हाळ्यात उत्तरेकडील पाणी दक्षिण भारतात आणता येईल. विनाकारण समुद्राला जाणारे पाणी वाचवता येईल. 
           आज भारतात भ्रष्टाचार वाढलेला आहे. खासदार किंवा आमदार निवडीसाठी कोटी कोटी रुपयांची बोली लावली जाते. काळानुरूप जुन्या गोष्टी जातात त्या ठिकाणी नव्या जागा घेतात. जशी मीरा गेली मदिरा आली. कुंकू गेले टिकली आली आणि न्हाणीची भिंत सौभाग्यवती झाली. अंगणातील तुळस गेली. परसातील पळस गेला. देवळावरचा कळस गेला. राहिलाय फक्त आळस आळस आणि आळस. आज सर्वत्र चाललेला भ्रष्टाचार, गुंडगिरी, महिलावर होणारा अत्याचार, सीमावाद इत्यादी बाबत विचार करून ते थांबवले पाहिजेत. यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आखले जाईल. सर्व नेते, पुढारी हे सत्प्रवृतीचे असतील. पंतप्रधानापासून सर्व खासदार, मंत्री हे चारित्र्यवान असतील. त्यांचा आदर्श देशातील सर्व नागरिक घेतील. असे चारित्र्यसंपन्न भारतीय नागरिक असतील. याचप्रमाणे माझ्या स्वप्नातील भारतामध्ये पुरुष व स्त्री असा भेदाभेद असणार नाही. पुरुषांच्या बरोबरीने सर्व स्त्रिया नोकरी करतील आणि त्यांना समान वेतन असेल. स्त्रिया शास्त्रज्ञ असतील, विमान, रेल्वे चालवतील. अंतराळात जाऊन येतील. तर पुरुष मंडळी घरातील काम करतील, आपल्या घरातील स्त्रियांना मदत करतील. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये एक वेळ प्राण देईन पण माझी झाशी देणार नाही असे म्हणणारी राणी लक्ष्मीबाई असेल. प्राण गेला तरी कटवाल्यांची नावे सांगणार नाही असे पालुपद म्हणणारा मंगल पांडे असेल. परदेशी कपड्यांनी भरलेल्या ट्रकसमोर आपल्या रक्ताने भिजणारा बाबू गेनू असेल आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक असतील. अशी कितीतरी पुष्पे माझ्या स्वप्नातील भारतात असतील आणि या भारतभूमीला सुजलाम सुफलाम सस्यश्यामल करण्यासाठी झटतील. 
     हे ऐकल्यावर तुम्ही हसाल. पण मला खात्री आहे की माणूस हा स्वप्नावर जगतो असे म्हणतात ते चुकीचे नाही. ती स्वप्ने साकार करण्यासाठीच तो प्रयत्न करीत असतो. स्वप्नं खरी होत नसली तरी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. रेंगाळणाऱ्याची रात्र असते. थांबणाऱ्याचा अंत असतो. पण पाहणाऱ्याला प्रकाश दिसतो. धावणाऱ्याला देवही भेटतो. म्हणून धावायचं असतं. प्रकाशाच्या दिशेने २१ व्या शतकातून २२  शतकाकडे जात असताना माझ्या स्वप्नातील भारताकडे मी पाहत ते ......
        'भविष्याचा वेध घेत, इतिहासाकडून काही शिकायचं असते. चुकलेल्या वाटा शोधत काहीतरी चांगलं घडवायचं असतं.   जाणिवेतून मी पाहते. आणि खरंतर माझे स्वप्न हे स्वप्न नसून ते वास्तवात येईल याची मला खात्री वाटते. 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.