'कोरोना आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था. '

'कोरोना आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था'
        'फिरत जावे कधी या गावी तर कधी त्या गावी, शिकून यावे नवीन काही.'
        काही दिवसापूर्वी मीच रचलेल्या कवितेच्या या ओळी आहेत. माझ्या जीवनात भटकंती किती प्रिय आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. माझा प्रवास सुरू असताना अचानक कोरोनासारखं महासंकट केवळ एका देशावर आले ; नाही तर संपूर्ण विश्वावर येऊन कोसळलं होतं. त्याला प्रतिबंधक म्हणून लॉकडाऊन हाच सर्वोत्तम पर्याय निवडला गेला. तेव्हा सतत भिरभिरणारी माझी पावले अचानक स्थिरावली . 'कोरोना आणि महाराष्ट्र शिक्षण व्यवस्था' याविषयी मी आपल्यासमोर विषय मांडत आहे. 
         मित्रांनो, लाॅकडाऊन नंतरची जी सकाळ उजाडली, ती अतिशय जिवंत वाटत होती. इतके दिवस अबोल झालेली घरे बोलकी झालेली दिसत होती. सकाळी जसा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू यावा, अगदी तसाच माणसांचा गोंगाट ऐकू येत होता. न्यूज पेपरचं पहिलं पान व्यापणाऱ्या खून, बलात्कार, गाडी अपघात या बातम्या केव्हाच हद्दपार झाल्या होत्या. हे सारं एका कोपऱ्यात कायमचं साठवून ठेवण्यासारखे होतं. 
          सतत आईला दोष देऊन तिच्यावर रागावणारी मी, या दिवसात कधी शांत झाले हे माझं मला कळलंसुद्धा नाही. माझ्या कल्पनेतील माझी आई आणि वास्तवातील माझी आई यामधील खूप मोठा फरक मला आता जाणवत होता. कधीही मिरची न खाणारी मी आज मला तेही अप्रुप वाटू लागलं होतं. आणि हीच मिरची खाऊन माझे आई बाबा दिवसभर रानात काबाडकष्ट करतात, या जाणिवेनं टचकन डोळ्यात पाणी आले. एक तरी पोपट आपल्या पिंजऱ्यात असावा असा बाबांकडे हट्ट करणारी मी. जेव्हा स्वतःच एका पिंजऱ्यात कैद झाले. तेव्हा जिवंतपणे मी मरण अनुभवले. आणि पुन्हा एकदा पोपट हा पिंजरा असावा अशी कल्पना करणेसुद्धा नको वाटू लागलं. जसं माणसाला मन असतं, तसं पशुपक्ष्यांनादेखील मन असतं याची चाहूल लागली. 
            घरातील सर्व एकत्र आल्यानंतर मी एकटीच होते हा विचारही मनातून पुसून गेला. आणि केसावरून हात फिरवणारी माझी आई, जेव्हा मायेचे गोड शब्द माझ्याशी बोलायला लागली की पाण्याचा झरा व्हावा तसा आपुलकीचा झरा वाहू लागतो असं वाटायचं. इतके दिवस मला याच सहवासाची गरज होती. असं मनाला पटून गेलं. मन हलकं झालं. जेव्हा भाऊबंदाशी मनसोक्त गप्पा मारल्या, तेव्हा आनंद मुसंडी मारत बाहेर पडल्याची चित्रं निर्माण झाली. आणि माझी आनंदाची परिकल्पना बदलून गेली. ती एका रक्ताच्या नात्यात बांधली गेली. हा सर्व आनंद अनुभवत असताना एकीकडे मनाला हुरहूर वाटत होती. जेव्हा माझी नजर आजूबाजूला डोकावत होती. आणि
        खुले मोकळे आकाश शुभ्र, आज अंधकार दाटला |      
        उजेड असतानाही आता, काळोख मात्र पसरला ||
    या कवितेच्या ओळी माझ्या ओठावरती येऊ लागल्या. त्याचं कारण म्हणजे  कोरोनानं जसं माणसांना बंदिस्त केलं. तसं शिक्षणालाही बंदिस्त करून टाकलं. याचा अर्थ मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेणं बंद झालं. ऑफलाईन शिक्षण बंद होऊन ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. जगातील सगळ्याच देशात ही परिस्थिती निर्माण झाली होती. भारतातील विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती खूपच वेगळी आहे. महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांनी, उंच डोंगरांनी बनलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पण महाराष्ट्रात डोंगरकपारीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रेंजचा प्रॉब्लेम येऊ लागला. जिथे रेंज यायची तेथील गरीब मुलांना मोबाईल मिळायचे नाहीत. जिथे मोबाईल असायचे तिथे पालक आपले मोबाईल घेऊन कामावर जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाइल उपलब्ध व्हायचे नाहीत. त्यामुळे काही शाळेतील शिक्षकांनी सकाळी सात ते दहा या वेळेत तास ठेवायचे. नाहीतर पालक कामावरून परत आल्यानंतर रात्री सात ते दहा या वेळेत तास ठेवायचे. ऑनलाईन तास सुरू झाले तर काहीवेळा शिक्षकांचे आवाज नीट ऐकू यायचे नाहीत. असा हा कोरोना काळात महाराष्ट्रातील शिक्षणाचा सारा खेळखंडोबा सुरू होता. म्हणून  मला असे वाटते की,
        झाडाखाली भरायचा आम्हा पक्षांचा मेळा 
        कुठून आली देवा ही ऑनलाइन शाळा 
        तुम्ही सांगा नाही दंगा आणि नाही मस्ती 
         मोबाईलची स्क्रीन पाहुनि डोळे दुखती
         सक्तीच्या सुट्टीचा या आला हो कंटाळा
         नको नको रे देवा ही ऑनलाइन शाळा
       कोरोना काळापूर्वी आई म्हणायची, "ठेव तो मोबाईल आणि अभ्यासाला बस." तर आता आई म्हणते, "घे तो मोबाईल आणि अभ्यास कर." आता साक्षात आई, कुटुंबीय, शिक्षक आणि महाराष्ट्र शासन यांच्याच परवानगीने विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला. झूम, गूगल मीट, टीच मीट, बायझूस, टॉप स्कोरर यासारखी अनेक ॲप डाऊनलोड करून घेण्यात आली. ऑनलाइन वर्ग सुरू झाले. या ऑनलाईन तासाबरोबरच शासनामार्फत अभ्यासक्रम पाठवून दिले जातात, तो प्रत्येक विद्यार्थ्यांना सोडवावा लागतो. मागील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नावली त्यालाच सेतू असे म्हणतात. किंवा अभ्यासमाला दिल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यावर खूप ताण पडत होता. पण त्याला पर्यायही नव्हता. कारण येणाऱ्या काळाला सामोरे जाण्यासाठी ऑनलाइन शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहेच. खरंच ज्यांची इच्छा प्रबळ असते. त्यांच्यासाठी मला म्हणावेसे वाटते--
        लाथ मारुनी आव्हानांना, गंध यशाचा धुंद करावा 
        आपली स्वप्ने मिठीत घ्यावी, 
    महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्गाला यशस्वी आयुष्याच्या सदिच्छा देताना, महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था पुन्हा उच्च स्तरावर न्यावी. ऑफलाइन शिक्षण असो किंवा ऑनलाईन शिक्षण असो. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी ध्यास घ्यावा. शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेली मरगळ झटकून टाकावी. नव्या दमाने सुरुवात करावी. या विचाराने मी केशवसुतांच्या शब्दात एवढेच म्हणेन-
     'नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
     कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे'

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.