९. सपान

                    ९. *सपान*
            रामपूरवाडी तसं हजारभर लोकवस्तीचं गाव. गावाजवळून एक भली मोठी नदी वेडीवाकडी वळणे घेत वाहत होती. गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं. या गावाचा इतर गावाशी येण्या-जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. गावातल्या माणसांना परगावी जायचे असेल किंवा परगावच्या लोकांना या गावात यायचं असेल; तर नावेतून ये-जा करावी लागत होती.
            फेब्रुवारी ते मे या उन्हाळी महिन्यात नदीतून चालत जाण्यासाठी वाट होती. कारण नदीचे पाणी कमी व्हायचे. पण मृगाचा पाऊस सुरू झाला की नदीला पाणी येई. त्यावेळी अल्याड पल्याड करायला नावेशिवाय पर्याय नव्हता. नाव चालवायला त्याच गावातील एक कुटुंब होते.  लोक त्यांना 'आंबी' असे म्हणत होते. नाव चालवायचा मक्ता महादेव आंबी यांच्याकडे होता. सारा गाव त्यांना म्हादू मामा म्हणायचं. नदीकडे जाण्यासाठी एक पाणंद होती. ती अरुंद होती. अगदी पायवाटेसारखीच होती. तिला 'नावंची वाट' असे म्हणत होते. दोन्ही बाजूंनी शेती होती. शेतकऱ्यांनी शेतीच्या भोवती कुंपण घातलेलं होतं. त्या चिंचोळ्या वाटेनंच मार्ग काढत गुडघाभर चिखलातून चालत जावे लागायचे. पावसाळ्यात गावापासून नदीपर्यंत आणि नदीपासून गावापर्यंत येताना जीव अगदी मेटाकुटीला यायचा. कारण गुडघाभर चिखलातून यावं लागायचं. एक पाय काढला की दुसरा पाय चिखलात  अडकून बसायचा. याला इलाज नसायचा. पण मोठा महापूर आला की मात्र सगळ्यांना चांगलं वाटायचं. कारण नाव अगदी गावाच्या जवळ यायची. तिथं नावंत बसलं की दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उतरायला मिळायचं.  या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर पोहोचायला अर्धा तास लागायचा. खूप मजा यायची. एखाद्या समुद्रावर गेल्यासारखं वाटायचं. सगळीकडे लाल भडक पाणी दिसायचं.  
           या महापुरात नाव चालवायची म्हणजे नावाड्याची खरी कसरत असायची. नदीकाठानं हिरवीगार झाडं होती. गावाला जोडलेल्या लाईटचे खांबही होते. शिवाय पलीकडे पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेल होते. या साऱ्या अडथळ्यांना पार करत लोकांना नावेतून आल्याड पल्याड करायची जबाबदारी आंब्याची होती. एखादी बाळंतीन अडली असेल किंवा आजारी माणूस असेल तर रात्री-अपरात्री माणूस म्हणून मामाला उठवायला यायचा. पण कधीही म्हादू मामांनं कोणाला मागं पाठवलं नाही. तो नेहमी तयार असायचा. म्हणून सारा गाव म्हादू मामाच्या उपकारानं दिला होता. तरीही म्हादू मामाला याचं अप्रूप वाटायचं नाही. तो नेहमी म्हणायचा की हा माझा धर्मच आहे. माणसानं माणसाच्या उपयोगी पडलं पाहिजे.
            नाव नदीत सोडण्यापूर्वी तो मोठ्याने ओरडायचा, "अरे मागं कोणी राहिलाय का? दहा-बारा माणसं जमली तरी तो नाव हलवायचा. तसा म्हादू मामा अंगापिंडानं धडधाकट होता. अंगात हत्तीसारखं बळ होतं. नावंचा सुकाणू हातात धरावा लागायचा. त्यावरच नावंचा सगळा समतोल असायचा. नावंला योग्य दिशा आणि गती देण्याचं काम यावरती असायचं. खूप कष्टाचं काम होतं.  पावसात, थंडीत काम करावं लागायचं. त्यामुळे म्हादू मामाला दिवसभराच्या श्रमपरिहारासाठी रात्री थोडी दारू प्यावी लागायची. तो अतिशय सज्जन होता. तो कोणाला काही वाईटवंगाळ म्हणायचं नाही. तो धनानं गरीब होता पण मनानं भला माणूस होता. नावेच्या कामासाठी गावकरी त्याला बैतं म्हणून सूप भरून भात घालायचे. गूळ, भुईमुगाच्या शेंगा, मक्कं जे असेल ते लोक द्यायचे. त्यावर त्याचं कुटुंब चालायचं. नावेतून परगावचा कोणी दिसला; तर त्याच्याकडे म्हादू मामा पैसं मागायचा. पण त्यानं गावातील एखाद्या माणसाचं नाव सांगितलं; तर तो पैसे घ्यायचा नाही. 
             अशा म्हादू मामाचा संसार मात्र हलाखीत चालला होता. त्याची बायको, एक मुलगा, दोन मुली असा त्याचा परिवार होता. त्याला शेती नव्हती. पण एक  म्हैस पाळली होती. त्याची बायको राधाक्का फार जिद्दी बाई होती. नवरा दारुडा होता. संध्याकाळ झाली की म्हादू मामा नाव बंद करून दारू पिऊनच घरी यायचा. घरात लहान लहान पोरं. इंदू सर्वांत मोठी, नामदेव मधला आणि धाकटी मंजू. पोराबाळांचं आणि म्हशीचं करून राधाक्काचा जीव मेटाकुटीला यायचा. ती कधीकधी दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायची. संसाराचा गाडा चालवताना ती थकायची. एखाद्या दिवशी जेवण करायला उशीर व्हायचा.  म्हादू मामाला घरात आल्या आल्या जेवायला लागायचं. वेळेत जेवायला मिळालं नाही; तर तो राधाक्काला शिव्या देऊ लागला. कधीकधी मारायचासुद्धा. एखादा दिवस उपासमार व्हायची. म्हादुमामा शिव्या देत अंथरुणावर पडायचा. इंदू आईबरोबर कामाला जाऊ लागली. नामदेव म्हैस घेऊन डोंगर माळावर जायचा. त्याच्या संगती पोरांची गॅंग होतीच. 
         दिवसामागून दिवस निघून जात होते. जून महिना आला. शाळा सुरू झाल्या. नामदेव सात वर्षाचा झाला होता. त्याच्याबरोबरच्या मुलांची नावे शाळेत कधीच घातलेली होती. नामदेवचं नाव शाळेत घालायला म्हादुमामा तयार नव्हता. कारण आपण 'आंबी लोक आपला नाव चालवण्याचा पिढीचा धंदा. तोच धंदा आपला नामदेव करील. नाहीतर शिकून तरी नोकरी कुठे मिळते?' असा त्याचा विचार होता. त्याला नामदेव शिकण्यापेक्षा म्हैस घेऊन जाणं जास्त चांगलं वाटायचं. मात्र राधाक्काला नामदेव शाळा शिकवा असं वाटायचं. पण ती कोणाला सांगणार! 
                  ते पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. नदीला महापूर आला होता. नाव सुरू होती. जुलै महिन्याचा पहिला आठवडा होता. शाळा खात्यात बदल्या झाल्या होत्या. रामपूरवाडीला सातवीपर्यंतची शाळा होती. या शाळेत एक नवीन शिक्षक बदली होऊन आले होते. त्या शिक्षकांचे नाव होते काकासाहेब जाधव. त्यांना नावेनं या गावात येण्याचा पहिलाच अनुभव होता. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून चालताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागायची. हाडाचे शिक्षक असलेल्या या शिक्षकांमुळे गावाचे भाग्य उजळले होते. ते शुक्रवारी गावीच वस्तीला राहायचे. काही दिवस नावेनं प्रवास करताना म्हादुमामाशी त्यांची चांगलीच ओळख झाली. एके दिवशी काकासाहेब गुरुजींनी त्यांना विचारले, "तुमचा मुलगा काय करतोय? तेव्हा म्मा
 म्हादुमामानं सांगितलं, "तो म्हैशी राखायला जातो." तेव्हा काकासाहेब गुरुजींनी त्याला शाळेत पटवायची विनंती म्हादुमामाला केली. नाही होय करता-करता त्यांनी परवानगी दिली. कारण शाळेसाठी येणारा सर्व खर्च स्वत: करतो असं काकासाहेब गुरुजींनी म्हादुमामाला वचन दिलं होतं. 
              नामदेव शाळेला जाऊ लागला. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. वर्गशिक्षक होते जाधव गुरुजी. ते पहिलीच्या  वर्गाला शिकवायला होते. सारा गाव त्यांना काका गुरुजी या नावानेच बोलवायचा. नामदेवच्या रूपानं काका गुरुजींना हाती एक हिरा सापडला होता. त्याला नावारूपाला आणायचंच असं त्यांनी पक्कं ठरवलं होतं. कारण तो अभ्यासात खूप हुशार होता. जरा काय सांगायचा अवकाश तो पटापट उत्तरं द्यायचा. याचा स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयोग करून घ्यायचा असा त्यांनी निश्चय पहिलीच्या वर्गातच केला होता. त्याला जे काय लागेल ते द्यायला त्यांनी सुरुवात केली होती.       
          नामदेव चौथीच्या वर्गात आला होता. त्याचं नाव स्कॉलरशिप परीक्षेसाठी निश्चित केलं होतं. काका गुरुजींनी त्याला स्कॉलरशिपचं गाईड आणून दिलं होतं. शैक्षणिक सहल पुणे, देहू, आळंदी कशी गेली होती. सहलीचा सारा खर्च गुरुजींनी स्वत: केला होता. मन लावून त्याला शिकविले. जिद्दीने स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्याचा नंबर आणला. आपले स्वप्न पुरे केले. सोन्यासारख्या या पोराचं पुढं काय करायचं असा प्रश्न गुरुजीसमोर होता. राधाक्का गुरुजीकडे येऊन सारखी म्हणायची, "एवढं केलंस ना! आता पुढं कसं शिकवायचं ते बघा. तुम्हीच त्याचं मायबाप हायसा. हाडाची काडं करीन. त्याला काहीबी कमी पडू द्यायची नाही." नामदेवच्या आईची मूर्ती त्यांच्या डोळ्यापुढे सारखी दिसायची. त्यावेळी जिल्हा परिषदेची एक शाळा होती. तिथं हुशार मुलांनाच प्रवेश दिला जायचा. गुरुजींच्या मनात आलं की नामदेवला त्या शाळेत घालावा. त्याला प्रवेश मिळाला तर किमान दहावीपर्यंत तरी काही काळजी नाही. संपूर्ण शिक्षण मोफत मिळेल. शिवाय स्कॉलरशिपही मिळते. म्हणून गुरुजी त्याला जि. प. च्या प्रवेश परीक्षेसाठी स्वतः घेऊन गेले. त्या परीक्षेतही नामदेव चांगल्या मार्काने पास झाला. त्या शाळेत त्याला प्रवेश मिळाला. त्या शाळेत त्याला पाठवायचा म्हणजे सुरुवातीस थोडा खर्च करावा लागणार होता. त्यासाठी काय करायचे या विचारात असतानाच त्यांनी नामदेवचा सत्कार करण्याचे ठरविले. सत्काराच्या वेळी पाचशे रुपये जमा झाले होते. स्कॉलरशिप परीक्षा पास झालेला नामदेव हा गावातील पहिलाच मुलगा होता. त्याला एक पत्र्याची ट्रंक, ड्रेसचे दोन जोड, चादर इत्यादी साहित्य खरेदी केले. ते स्वतः नामदेवला त्या शाळेत घालवायला आले होते. कारण म्हादुमामा आणि राधाक्का अडाणी होत्या. त्यांना शहराची ना ओळख ना पाळख. या सत्काराचा मोठा फायदा झाला तो म्हादुमामावर. सत्काराचा सोहळा पाहिल्यावर म्हादुमामाला वाटले की आपला मुलगा मोठा झाला की त्याला लोक काय म्हणतील? एका दारुड्याचा मुलगा म्हणून त्याची ओळख होईल. म्हादुमामानं त्यावेळेपासून दारू पिण्याचे बंद केले. 
             नामदेव मन लावून शिकत होता. त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. आपली आई किती कष्ट करते. दोन बहिणींची लग्नं करायची आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला शिकायला पाहिजे. या विचाराने तो खूप अभ्यास करायचा. त्याने दहावीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला. 
            'पुढे काय करायचे?' असा प्रश्न नामदेवला पडला होता. यासाठी तो काका गुरुजींच्या घरी गेला. त्यांच्या पाया पडला. आपला प्रश्‍न त्यांना सांगितला. गुरुजींनी त्याला सांगितले, "तू आता डी. एड. कर. म्हणजे तुला लवकर नोकरी लागेल.  त्यांचा आशीर्वाद घेऊन तो घरातून बाहेर पडला. गुरुजी त्याला देवासारखे वाटायचे. त्याने आपणही यांच्यासारखे आदर्श शिक्षक व्हायचे ठरविले. दोन वर्षाचा डी. एड. कोर्स पूर्ण केला. आणि शिक्षक म्हणून कामावर रुजू झाला. 
               काका गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो अध्यापनाचे कार्य करू लागला. त्याला सामाजिक कार्याची आवड होती. यातूनच तो ज्या गावात शिक्षक झाला होता. त्या गावात त्याने सार्वजनिक वाचनालय सुरू केले. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणाची मोहीम राबविली. या त्याच्या साऱ्या कार्याची नोंद घेऊन जिल्हा परिषदेने नामदेवची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली. त्याचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला त्याने आपल्या काका गुरुजींना आवर्जून आणले होते. सत्कार झाल्याबरोबर तो आपल्या गुरुजींच्या पाया पडला. हे सारं त्यांच्यामुळे झालं. आज मी जो आहे तो त्यांच्यामुळेच आहे असे उद्गार त्याने मनोगतातून काढले होते. 
            नामदेव घराजवळ आला. त्याचे स्वागत करायला सारी मंडळी उभी होतीच. दारात येताच त्याने 'आई' अशी हाक मारताच राधाक्का धावतच बाहेर आली. तिने त्याला डोळे भरून न्याहाळले. ती म्हणाली, "बाळा तू या बिचारीचं 'सपान' पुरं केलंस. तू आता फार मोठा माणूस झालास." असं म्हणताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले. त्या आसवात नामदेव भिजून चिंब झाला. आणि तो फार फार भूतकाळात निघून गेला होता. 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.