8शाळा कथा

                               शाळा
             कोल्हापूर शहरापासून नऊ-दहा कि.मी. अंतरावर आटपाट नावाचे एक गाव होते. हे गाव शहरापासून आडवळणाला होते. गावात सातवीपर्यंत शाळा होती. गावात आठवीचा वर्ग नसल्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुलांना कोल्हापूर शहरात जावं लागत होते. कोल्हापूर शहर आणि या गावाच्या मधून  पंचगंगा नदी वाहत होती. या नदीवर पूल होता. पण त्याची उंची अतिशय कमी होती. थोडा जरी मोठा पाऊस पडला तरी त्या पुलावर पाणी यायचे. पाणी पुलावरून वाहत होते. महिना-दोन महिने या पुलावर पाणी राहत होते. या गावाच्या उत्तरेला एक डोंगर होता. त्या डोंगराखालून पायवाटेने पंचवीस-तीस किलोमीटर पायपीट करून कोल्हापूरला शाळेसाठी मुलांना जावे लागत होते. शाळा सुटल्यानंतर घरी परत येताना तेवढेच अंतर चालत यावे लागायचे.  साऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी गावातील प्रमुख व्यक्ती तानाजीराव आडसुळे यांनी गावातील काही लोकांना एकत्र बोलावले. आपल्या मनातील गोष्ट सांगितली. गावातील लोक त्यांना मानत होते. कारण गेली पंचवीस वर्षे ते गावचे आद्य नागरिक म्हणजे सरपंच पदी विराजमान झालेले होते. ते लोकांना म्हणाले, "लोक हो! आपल्या मुलांना शाळा शिकण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो, हे आपण पाहात आहात. ऐन पावळ्यात त्यांना खूप कसरत करावी लागत होती. शाळा शिकण्यासाठी दररोज पन्नास ते साठ किलोमीटर पायपीट करावी लागते. येण्या-जाण्यामध्येच त्यांचा खूप वेळ जातो. पहिले काही तास त्यांचे चुकतात. तर शेवटच्या काही तासांना त्यांना रामराम करावा लागतो. पावसाळ्यातील किमान दोन महिने मुलांचे वाया जातात. त्यासाठी आपणाला काहीतरी करायला हवे असे मला वाटते." जमलेले लोक त्यांना म्हणाले, " जे काय करायचं सर, ते तुम्हीच करा आणि अण्णा आणि आम्हांला सांगा. सारा गाव सरपंचांना 'अण्णा'  या नावाने बोलावत होतं. अण्णा म्हणाले, "मुलांचे हाल थांबवण्यासाठी आपण आपल्या गावात एक शाळा काढू या." 
         "आता शाळा काढायची? आपणाला शाळा काढता येते?"
        "होय. आपण शाळा काढायची. मुलांबरोबर मुलीही शाळा शिकतील. आपल्या गावातील मुलं-मुली किमान दहावीपर्यंत शाळा शिकतील." अण्णांच्या या प्रस्तावाला गावातील प्रतिष्ठित लोकांनी मंजुरी दिली. गावात 'गुरुनाथ शिक्षण संस्था' स्थापन झाली. संस्थेमध्ये संचालक म्हणून अण्णांच्या पार्टीची आणि अण्णांच्या मर्जीतील लोकं होती.  आमदारांच्या मदतीने संस्थेला रजिस्ट्रेशन मिळाले. सारा गाव गुलालामध्ये रंगून गेला.
           संस्थेच्या सभासदांची मिटिंग झाली. सर्वात महत्त्वाचा विषय पुढे आला. शाळेसाठी शिक्षक पाहिजेत. तानाजीरावांनी साऱ्यांना सांगितले, "त्याची फिकीर तुम्ही करू नका. ते काम माझ्यावर सोपवा." असे ऐकताच सर्वजण अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. 'हा मास्तर आणणार कुठून?"  तरीही सर्वांनी विचारलंच, "पण अण्णा, तुम्हांला सापडेल मास्तर?" लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वजण तानाजीरावांना 'अण्णा' या नावानेच बोलवत होती. 
          "सापडेल म्हणून काय विचारता? अहो सापडलासुद्धा मला. आमचा पाहुणा आहे. तो बी.एड. का काय म्हणतात ते होऊन बाहेर पडलेला आहे. त्याला विचारलं म्हणजे झालं. नाही म्हणायचा नाही तो. नाही म्हणाला तरी त्याचं मानगुठ धरून आणीन इथंपर्यंत."
         "वा अण्णा! तुम्ही तर कमालच केली. धाडसी नेतृत्व आहे तुमचं. तुम्ही तर कमालच केली बुवा." अशा गौरवात सभा संपली. 
        तानाजीराव गेले मलकापूरला. त्यांनी गाठलं प्रतापला. त्याला सारं समजावून सांगितलं. प्रताप म्हणाला, " अहो मामा, यावर्षीच मी बी.एड. ची परीक्षा दिली आहे. अजून निकालसुद्धा लागला नाही परीक्षेचा. तरीही नोकरी देता तुम्ही मला!"           
        "अरे लेका, नुसती नोकरीच देत नाही, तर आमच्या हायस्कूलचा हेडमास्तर करणार आहे तुला." असं तानाजीरावांनी सांगताच प्रतापनं टुणकन उडी मारली. तो त्यांच्या पाया पडला. त्यांनी दहा रुपयाची नोट काढून दिली. प्रतापने त्याचे पेढे आणून गल्लीभर वाटले. तो दिवस त्याच्या घरी एखाद्या सणासारखा साजरा झाला. जेवणासाठी पुरणपोळीचा बेत आखला होता. तानाजीरावांनी जेवणावर येथेच्छ ताव मारला. 
         जून महिन्याची ७ तारीख मृग नक्षत्र. या नक्षत्रावर रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. मातीतून सुगंध दरवळला. वातावरणात उत्साह निर्माण झाला. मुलांबरोबर मोठी माणसेही येरझाऱ्या घालू लागली. दत्त मंदिराचा परिसर गजबजून गेला. कारण गावात सुवार्ता पसरली होती की दत्त मंदिरात हायस्कूल सुरू झाले आहे. गुलालाच्या उधळणीत आणि गुरूनाथाच्या जयघोषात दिवस कधी सरला हे कळलेच नाही कुणाला. 
        आठ जून शाळेचा पहिला दिवस. सकाळपासून लोकांची रीघ लागली होती. उद्घाटनाचा कार्यक्रम होता आज. सकाळचे साडेदहा वाजले. मंदिराचे आवार माणसांनी फुलून गेले. गावातील व गावालगतच्या परिसरातील लोक जमा झाले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक होते भैरवनाथ पाणीपुरवठ्याचे चेअरमन पांडुरंग पाटील. अकरा वाजून गेले तरी ते उपस्थित राहू शकले नाहीत. काही निरोपही आला नाही. पाहुण्याविना उद्घाटन करण्याचे खोळंबले होते. सर्वांनी तानाजीरावांना विनंती केली, "साहेब, आपणच शाळा आणली आहे या गावात. आपल्याच हस्ते उद्घाटन होऊ द्या." पण त्यांनी कोणाचे ऐकले नाही. ते प्रतापला म्हणाले, "अहो प्रतापराव, तुमच्या हस्तेच होऊ द्या शाळेचे उद्घाटन. आपण शाळेचे मुख्याध्यापक आहात ना. हा मान आपलाच आहे." 
प्रताप म्हणाला, "नको मामा. माझ्या हस्ते नको. आपल्याच हस्ते होऊ द्या उद्घाटन. आपण अध्यक्ष आहात संस्थेचे."
     "अरे लेका, शाळेचा पहिला घटक मुख्याध्यापक. आणि मुख्याध्यापक तूच आहेस. तेव्हा होऊ दे तुझ्या हस्ते उद्घाटन.  हे बघ प्रताप, वाटीत सांडलं काय आणि ताटात सांडलं काय, एकच झालं शेवटी."
          शेवटी प्रतापच्या हस्ते उद्घाटन झाले. शाळेचा श्री गणेशा सुरु झाला. साऱ्या गावाचं कल्याण करणारी शाळा सुरू झाली. अतिशय आनंदाच्या वातावरणात तीन वर्षे कशी भुर्रकन निघून गेली हे कळलेच नाही. 
        आणि तीन वर्षानंतर......
       'नेहमीची येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे जून महिना आला. शाळेतील वातावरण गढूळ होऊ लागलं. नवनवीन वार्ता कानावर येऊ लागल्या. यातील एक वार्ता अशी ------
          तानाजीरावांचा पुतण्या संजय बी.एड. होऊन आला आहे. तो शाळेत शिक्षक म्हणून येणार आहे. पण शाळेमध्ये याबाबत विशेष काही वाटत नव्हते. त्याने बी.एड.ला प्रवेश घेतला तेव्हाच हे ठरलेलं होतं. पण आता वेगळीच गोष्ट घडणार होती. तो केवळ शिक्षक म्हणून येत नव्हता, तर तो शाळेचा मुख्याध्यापकच बनवून येत होता. याचाच अर्थ असा होता की प्रतापची मुख्याध्यापक पदावरून उचलबांगडी होणार होती. त्याला आता सहाय्यक शिक्षक म्हणून काम करावं लागणार होतं. प्रताप तानाजीरावांचे शब्द मानणार ही काळया दगडावरची रेघ होती. असं साऱ्यांना वाटत होतं. इतकंच नव्हे तर ते सत्य वाटत होतं. कारण प्रताप तानाजीरावांच्या शब्दाबाहेर  जाणार नाही. कारण त्याला नोकरी दिली होती ती तानाजीरावांनी. त्याच्या भाकरीची सोय केली होती तानाजीरावांनी. प्रताप तीन वर्षे मुख्याध्यापक होता. सलग चौथ्या वर्षी मुख्याध्यापक झाला असता, तर तो कायमचा त्या पदावर बसला असता. ही गोष्ट तानाजीरावाला माहीत होती. ते त्यांना परवडणारही नव्हतं. प्रताप जवळचा असला तरी पाहुणा होता. पाहुणा तो पाहुणाच. त्याला आपल्या घरची सर केव्हाच येणार नाही. त्यांना आपला माणूस मुख्याध्यापकपदी हवा होता. म्हणून त्यांनी आपला पुतण्या संजयला बी.एड. ला पाठवला होता. संजय चांगल्या नोकरीवर होता. कारखान्यात मॅनेजर पदावर होता. शिवाय त्याला चांगला पगारही होता. ते सर्व सोडून त्याला भरपूर डोनेशन देऊन बी.एड. ला पाठवला होता. तो कशासाठी? फक्त तो शिक्षक व्हावा म्हणून? नाही. तानाजीरावांना असं घडणं योग्य वाटत नव्हतं. संजय हाच मुख्याध्यापक होणे त्यांना आवश्यक वाटत होतं. कारण अध्यक्षपद आणि मुख्याध्यापकपद दोन्हीही आपल्याच घरात पाहिजे असे त्यांच्या मनात होतं. 
           या बातमीने प्रतापचं डोकं ठिकाणावर राहिलं नाही. ज्या शाळेचा पाया आपण घातला. सलग तीन वर्षे मुख्याध्यापक म्हणून ज्या पदावर आपण राहिलो.  त्या शाळेत आपण शिक्षक म्हणून राहायचं! हे त्याच्या मनाला पटत नव्हतं. अपयश हे मरणाहून वाईट असतं. तसंच पदावनतीपेक्षा नोकरी नसली तरी चालेल, असा विचार करून त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि त्यांने आपल्या घरची वाट धरली.                 मोठ्या दिमाखात संजयने शाळेत आगमन केलं. सारी शाळा संजयच्या आगमनानं गंधित झाली. पद ग्रहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचवेळी त्यांनी साऱ्या संचालक मंडळाला सांगून टाकलं, ''शालेय व्यवस्थापनात कुणीही ढवळाढवळ करायची नाही. ते मला आपणास नाही. माझे निर्णय पक्के ठरलेले असतील. तानाजीरावांचा तो पुतण्या असल्याने सर्वांनी त्याचा शब्द प्रमाण मानला. अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून तानाजीरावांनी संजयची मुख्याध्यापकपदी निवड झाली असे अधिकृतपणे जाहीर केले. संजयने तिथेच मुख्याध्यापकपदाची ऑर्डर स्वीकारली. शासकीय नियमाप्रमाणे सर्व प्रस्ताव तयार करून घेतला. तो शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे स्वाक्षरीसाठी पाठवून दिला.              संजयने साऱ्या शिक्षकांची मने जिंकली. हा मुख्याध्यापक नाही तर आपला भाऊच आहे अशी सर्वांची भावना झाली. मायेने विचारपूस चालली होती. डब्यातील भाजी एकत्र करून मुख्याध्यापक सर्वांना एकसारखी भाजी वाटून देत होते. प्रत्येक घासाबरोबर प्रेम वाढतच चालले होते. बघता बघता थंडीचा मौसम संपत आला. एके दिवशी मिटिंग भरली. मुख्याध्यापकांनी मिटिंगला सुरुवात केली. ते म्हणाले, "माझंच दुसरं नाव क्षमा आहे. माझ्यासारखा दुसरा कोणीही क्षमाशील माणूस तुम्हांला भेटणार नाही. आपण सर्वजण एकच आहोत. एकमेकांना अडचणीत मदत केली पाहिजे. प्रत्येकाला मदत करणं हेच माझं काम आहे. मी आपल्या सर्वांच्या पाया पडतो. तुमच्या पायाशी मला जागा द्या. अतिशय केविलवाण्या शब्दांत बोलत ते सर्वांना विनवणी करत होते. सर्वजण त्याच्या नाटकाला फसत होते. पण त्यांना कळत नव्हते की आपण काय करायला जात आहोत. सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या  माणसाच्या आहारी आपण जात आहोत.  याची पुसटशीही कल्पना त्यांना होत नव्हती. सौ. काळे मॅडम म्हणाल्या, "सर असं काय करत आहात आपण?  विनवणी करणं आपणाला शोभत नाही. आपण आमचे मुख्याध्यापक आहात. आपण फक्त सांगायचं आणि आम्ही ते काम करायचं. बस्स एवढेच.              
              सर्वजण आपल्या विश्वासात आलेले पाहून ते म्हणाले, "आपण सर्वजण मिळून उद्या सकाळी एज्युकेशन ऑफिसात जायचं आहे. 
        "पण कशासाठी?" भोळेसरांनी भोळेपणाने विचारले. 
           ती फेब्रुवारी महिन्यातील २५ तारीख होती. सर्व शिक्षकांना घेऊन मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले. कारण त्यांना सर्व शिक्षकांकडून 'नो ऑब्जक्शन' म्हणजे 'ना हरकत' दाखला' असे लिहून घ्यायचे होते. संजय मुख्याध्यापक झाला होता. पण त्याची सेवा जेष्ठता सर्वांच्या नंतर होती. एक-एक करून सर्वांनी लिहून दिले होते. संजयने आपला डाव साधला होता. 
संजयच्या हाती शाळेची सर्व सत्ता आली होती. त्यामुळे त्याने अनेक उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवले होते. सर्व सहकाऱ्यांची त्याला चांगली साथ मिळाली. अनेक उपक्रमांमध्ये त्या शाळेने आपले वर्चस्व निर्माण केले. आपले नाव प्रस्थापित केले. त्यामुळे साऱ्या पंचक्रोशीत त्या शाळेच्या नावाचा धबधबा निर्माण झाला होता. त्या शाळेची प्रगती यशाच्या शिखरावर पोहोचली होती. तानाजीरावांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होत होता. 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.