वाचन एक छंद

                             वाचन एक छंद
           मला चांगलंच आठवतं की माझ्या लहानपणी गावात काही घरामध्येच लाईट आलेली होती. अनेक घरात दिवा, कंदील यांच्या प्रकाशातच वाचन, लेखन करावं लागायचं. आमच्याच घरी नव्हे, तर आमच्या गल्लीतही लाईट नव्हती. मी अभ्यासासाठी समोरच्या यशवंत बाबू पाटील (वकील) यांच्या घरी जात असे. त्यांच्या घरी दिवा घेऊन वाचन करत असलेला मी अजूनही माझ्या स्मरणात आहे. वाचताना खाली वाकल्यानंतर माझ्या डोक्यावरील केसांना धग लागून चर चर आवाज झाल्याचे अजूनही आठवते. 
               मी माझ्या मित्राबरोबर शाळेला प्रथमतः गेलो तो दिवस मला आठवतो. गावात बालपणी श्रावण महिन्यात पोथी-पुराणांचे वाचन व्हायचं. त्यावेळी आम्ही ते ऐकायला जात होतो. प्रसाद खायला मिळतो या आशेने अधिक जात होतो. त्यावेळी पांडवप्रताप, श्री विजय, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ वाचले जात होते. ग्रंथाचा अर्थ सांगितला जात होता. त्यावेळी मला फारसे कळत नव्हते. पण मला वाचनाची गोडी लागण्यासाठी ते फार महत्त्वाचे ठरले असे वाटते. लहानपणी वाचन म्हणजे अभ्यासाची पुस्तके होती. आम्हाला शिकवायला काकासाहेब जाधव नावाचे जोतिबा डोंगरावरचे शिक्षक होते. ते आम्हांला अनेक गोष्टी सांगत होते. अगदी पोती भरून त्यांच्याकडे गोष्टी होत्या. 
         आम्ही १९७८-७९ साली चौथ्या इयत्तेत होतो. मला स्कॉलरशिप परीक्षेला काकासाहेब जाधव गुरूजींनी बसवले होते. त्यांनी खूप अभ्यास करून घेतला होता. त्याकाळी आमच्या वर्गातील आम्ही चौघे विद्यार्थी स्काॅलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आलो होतो. यामध्ये मी, संजय कांबळे, शिवाजी जाधव आणि मिलिंद कांबळे. माझी हुशारी पाहून मला काकासाहेब जाधव यांनी त्यावेळी राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, शिंगणापूर या शाळेच्या प्रवेश परीक्षेत बसवले होते. त्या शाळेमध्ये माझी निवड झाली. त्यावेळी माझा सत्कार काका जाधव गुरुजींनी केला होता. त्यावेळी १५ पैसे चहा आणि ३५ पैसे भजी किंवा वडा होता. मला पाचशे रुपये बक्षीस मिळाले होते. त्यातून एक पत्र्याची पेटी, कपडे, अंथरून पांघरूण घेतले होते. 
                      राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेतला आणि माझ्या वाचनाला खरी सुरुवात झाली. त्या शाळेमध्ये चांदोबा, चंपक अशी मासिके येत होती. ती शाळा जिल्हा परिषदेची असल्यामुळे त्या शाळेमध्ये समृद्ध असे ग्रंथालय होते. शिक्षकही खूप मेहनत करून घेत होते. त्या शाळेत अनेक उपक्रम राबवले जात होते. विद्यार्थ्यांना  ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जात होती.  मला वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी विद्यानिकेतनचे प्राचार्य जो.म.साळुंखेसर यांचे योगदान मोठे आहे. तर लेखनासाठी मला जी. टी. महाजनसर यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी भित्तिपत्रकासाठी स्वलिखित लेखन करण्यास सांगितले होते. लेखनाची आवड निर्माण झाली ती इयत्ता सातवीला असताना. त्यावेळी मी 'दोन केळे' ही कथा 
लिहिली होती. तर इ. ९ वीला असताना 'विशाल भारत' नावाची एकांकिका लिहिली होती. ती एकांकिका सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण केली होती. त्यावेळी श्री. पेडणेकरसरांनी मला ५१ रुपयाचे बक्षीस दिले होते. 
                 १९७९ ते १९८५ या सहा वर्षांमध्ये कथा, कविता यांचे वाचन केले. त्यावेळी दिवाळी अंक प्रकाशित होत होते. त्यातील विविध विषयावरील कवितांचा संग्रह करण्याचा उपक्रमही सांगितला जात होता.          
                शाळेतून बाहेर पडल्यानंतर कॉलेज जीवनात सायन्सला असल्यामुळे थोडीशी वाचनात मरगळ आली होती. मात्र पुढारी, समाज यासारख्या वर्तमानपत्रांचे वाचन सुरू होते. परंतु घरच्या परिस्थितीमुळे आणि सायन्सची आवड नसल्यामुळे मी बारावी सायन्स नापास झालो. त्यानंतर बारावी आर्टसला प्रवेश घेऊन वाचनाची गोडी वाढवली. परीक्षेत चांगले गुण प्राप्त झाले बारावीनंतर संयुक्त बी.ए.बी.एड. महावीर कॉलेजला प्रवेश घेतला. बी. ए. बी. एड. करत असताना वाचन म्हणावे तितके होऊ शकले नाही. जून १९९२ साली बी.एड. पूर्ण झाले. नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते येथे शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. खऱ्या अर्थाने वाचनाला तिथूनच सुरुवात झाली. शाळेच्या ग्रंथालयात असणारी अनेक पुस्तके वाचून काढली. शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडेसर यांनी वाचनाबरोबरच लेखनाला प्रोत्साहन दिले. शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय' कादंबरी वाचली. 'माती, पंख आणि आकाश' हे ज्ञानेश्वर मुळे यांचे आत्मचरित्र, लक्ष्मण माने 'उपरा', लक्ष्मण गायकवाड 'उचल्या', दया पवार 'बलुतं', नामदेव व्हटकर 'माझ्या जन्माची कथा' डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे 'खाली जमीन वर आकाश' चंद्रकुमार नलगे 'रातवा' अशी आत्मचरित्रे वाचली. 
             चंद्रकांत निकाडेसर यांचे 'कुडतं' ग्रामीण कथासंग्रह,  'बोन्साय', 'विटाळ' असे एकांकिका संग्रह वाचलेले आहेत. राजाराम तावडे यांचे 'साखरू' आईचे चरित्र व 'मन वढाळ वढाळ' कादंबरी. डॉ. श्रीकांत पाटील यांची 'गोट्या', 'गाव शिवारातील फिनिक्स', व 'लाॅकडाऊन' ही कोरोना महामारीवरील वैश्विक कादंबरी वाचलेली आहे. याबरोबरच श्याम कुरळे, गोविंद गोडबोले, बाळ पोतदार, मनोहर मोहिते, संभाजी चौगले अशा लेखकांच्या पुस्तकांचाही आस्वाद घेतला आहे. 
                 'वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे वाचन कला छंद म्हणून जोपासली आहे. विंदा करंदीकरांनी म्हटले आहे, 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे' यात थोडासा बदल करून मला असे म्हणावे वाटते,  'लिहिणाऱ्याने लिहीत जावे, वाचणार्‍याने वाचत जावे, वाचता वाचता एक दिवस लिहीत जावे.' याप्रमाणे मी वाचत गेलो. वाचता वाचता लिहीत गेलो. यातूनच 'कर्तव्य' एकांकिका संग्रह आणि 'यशस्वी नाट्यछटा' हा नाट्यछटा संग्रह ही पुस्तके प्रकाशित झाली. विविध वर्तमान पत्रे, दिवाळी अंकांतून कथा प्रकाशित झाल्या. 
                 वाचनाने आणि लेखनाने मला समृद्ध केले. पुस्तक हे मस्तक घडवत असते याचा अनुभव मला घेता आला हे माझं परम भाग्य समजतो. मोबाईलच्या काळातही वाचन संस्कृती जतन करून ठेवली पाहिजे. भरपूर वाचन करावे असे मी वाचक रसिकांना विनंती करतो. 
                  विश्वास सुतारसाहेब यांनी मला या लेखाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. लेखन प्रपंच थांबवतो. 
 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.