इच्छा असेल तर मार्ग दिसेल

               एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक छोटंसं कुटुंब राहत होतं.  त्या कुटुंबात वडील, मुलगा व त्याच्या तीन बहिणी असा परिवार राहत होता. लहान मुलाची खूप मोठी स्वप्न होती. पण आपली परिस्थिती नसल्यामुळे आपण काही करू शकणार नाही असे त्याला वाटत होते. तो उदास उदास वाटत होता. त्याच्या वडिलांना कळलं की हा उदास आहे. त्याच्या वडिलांनी मनोमन विचार केला  'हे असंच चालू राहिलं तर संपवून टाकेल सगळं. पुढं काहीच नाही घडणार.' त्याच्या या उदासपणातून त्याला बाहेर काढायचं असं त्यांनी ठरवलं. 
                    एके दिवशी त्याच्या वडिलांनी एक अत्यंत फाटकं व जीर्ण झालेलं  कापड घेतलं. त्या कापडाचा एक रुमालाएवढा तुकडा फाडला.  ते म्हणाले, "बाळा हा तुकडा कोणी दहा रुपयाला विकत घेतं का बघ? "  अत्यंत जीर्ण झालेलं ते कापड होतं,  
           " किती जुनं कापड आहे हे बाबा? कोणी घेईल का? "
            " प्रयत्न तरी करून बघ." 
             तो मुलगा म्हणाला, "ठीक आहे."    
          ते कापड स्वच्छ धुवून व इस्त्री करायची म्हणून आपल्या अंथरुणाच्या खाली ठेवले.   सकाळी उठून ते कापड घेऊन तो बाजारात गेला . तो ओरडू, लागला, " घ्या दहा रुपयाला कापड,   घ्या रुपयाला कापड." एक तास झाला . दोन तास झाले, तीन तास झाले . बघता बघता सात तास झाले.  शेवटी एक माणूस आला. त्याने विचारलं, "बाळा कितीला आहे हे कापड?" 
               "दहा रुपये "  म्हणून मुलाने सांगितले. त्या माणसाने दहा रुपये दिले.  तो माणूस कापड घेऊन निघून गेला.  मुलगा आनंदाने दहा रुपये घेऊन उड्या मारत मारत घरी आला. 'बाबा दहा रुपये, बाबा दहा रुपये.' बाबांना खूप आनंद झाला. बाबांनी त्याला कुशीत घेऊन कवटाळले.  म्हणाले, " बरं झालं. या दहा रुपयांची मोठी मदत मिळेल आपल्या कुटुंबाला.* तो मुलगा आनंदित होऊन झोपला.       
                दुसऱ्या दिवशी त्याच कापडाचा दुसरा तुकडा बाबांनी मुलाला दिला.  ते म्हणाले, " बाळा याच कापडाचा तुकडा तू काल दहा रुपयाला विकलास , आज याच कापडाचा तुकडा कोणी चाळीस रुपयाला विकत घेते का बघ?"  
             "बाबा! काल याच कापडाचा तुकडा दहा रुपयांना विकता विकता सात तास गेले. त्याच कापडाचा तुकडा कोण चाळीस रुपयाला विकत घेणार?"
               बाबा म्हणाले, "अरे बाळा, प्रयत्न तरी करून बघ.  चाळीस रुपये आले तर आपल्या कुटुंबाला खूप मोठा हातभार लागेल.  कर ना प्रयत्न."  बाबांची ती अर्जव बघून मुलगा म्हणाला, "ठीक आहे. हे कापड चाळीस रुपयाला विकायचा मी प्रयत्न करतो."  
                 मुलाने तो कापडाचा तुकडा रात्री स्वच्छ धूवून इस्त्री करायची म्हणून स्वतःच्या अंथरूणाखाली ठेवला.  सकाळी लवकर उठून तो बाजारात गेला. तासभर बघितलंं पण तो फाटक्या कापडाचा तुकडा कोणी चाळीस रुपयाला विकत घेईना.  त्याला अचानक एक कल्पना सुचली. तो परत घरी आला. आपल्या शाळेचं रंगरंगोटीचं साहित्य काढलं. त्या कापडाच्या तुकड्यावर  डोनाल्ड डकचं चित्र काढलं.  ते  कापड घेऊन तो शाळेच्या बाहेर उभा राहिला. त्याला माहीत होतंं की लहान मुलांना कार्टून खूप आवडतं.  म्हणून तो एका शाळेच्या बाहेर उभा राहून चित्र विकत होता.  शाळा सुटल्यानंतर तो म्हणू लागला,   डोनाॅल डकचं कापड, डोनाॅल डकचं कापड,  पण मुलं बघत बघत  जाऊ लागली.  एका लहान मुलाने आपल्या आईकडे हट्ट धरला , "मला ते डोनाॅल डकचं कापड पाहिजे."  त्या माऊलीला काही बोलता येईना. शेवटी नरमली.  तिने ते डोनाॅल डकचं कापड चाळीस रुपयाला विकत घेतलं. पण या बारा तेरा वर्षांच्या मुलाला विचारलं, "बाळ तू का असं शाळेबाहेर उभारून रुमाल का विकतोयस? "  त्यावेळी तो मुलगा म्हणाला, "माझी परिस्थिती नाही. म्हणून माझ्या वडिलांनी मला हे कापड चाळीस रुपयाला विकायला सांगितले. म्हणून मी इथे कापड विकायला आलोय."  त्या माऊलीला मोठा आनंद झाला. त्या माऊलीने त्याला आणखी शंभर रुपये दिले. तीी म्हणाली, " हे शंभर रुपये माझ्याकडून तुला भेट म्हणून ठेव."  तो आनंदाने घरी आला.  वडिलांना सर्व हकिकत सांगितली. 
              बाबा म्हणाले,  "शाब्बास !"  आपल्याला खूप मोठी मदत होईल या पैशांची.  तो मुलगा परत आनंदाने झोपी गेला. 
                दोन दिवस  निघून गेले. परत त्याच कापडाचा तिसरा तुकडा फाडून त्या मुलाला दिला व म्हणाले, "हा तुकडा कोणी दोनशे रुपयाला विकत घेते का बघ?" 
               " अहो बाबा, दहा-वीस रुपयाला कोणी घेत नव्हतं हे कापड. मग हे कापड दोनशे रुपयाला कसं घेईल? काहीतरी काय सांगताय!"
                " हे बघ बाळा, दहा रुपयाचे कापड तुला विकायला सांगितलं, तेव्हा पण तू असाच म्हणाला होतास. पण घेतलं ना कुणीतरी! तेच कापड चाळीस रुपयाला विकायला सांगितलं. त्यावेळी पण तू म्हणालास की कोण घेणार? पण घेतलं ना तेही कापड. मला माहिती आहे की आत्तासुद्धा हे कापड दोनशे रुपयाला कोणीतरी घेईल. तू प्रयत्न तरी कर. प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही विकलं गेलं कापड तर आपलं नुकसान तरी नाही होणार? झाला तर फायदाच होईल."  
                हा मुलगा परत तयारीला लागला. आता दोन वेळचा अनुभव पाठीशी होता. दोनशे रुपयाला कापड विकायचं होतं. रात्री स्वच्छ धुवून इस्त्री करायची म्हणून आपल्या अंथरूणाखाली कापड ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्याला बातमी लागली की, आपल्या शहरात शूटिंगसाठी ऐश्वर्या राॅय येणार आहे. ती कापड घेतलं आणि जिथं शूटिंग चालू आहे तिथं हा मुलगा गेला. उंचीने लहान असल्यामुळे याच्या त्याच्या पायातून तो पुढे गेला. ऐश्वर्या राॅयजवळ पोहोचला. तो म्हणाला, "मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे, मला माझ्या रुमालावरती तुमची सही द्याल का? ऐश्वर्या राॅयला त्या छोट्या मुलाचं मोठं कौतुक वाटलं. तिने ते कापड घेतलं आणि त्या कापडावर आपली सही केली. सही केल्याबरोबर ते कापड घेऊन तो मुलगा धावत पळत बाजारात आला. एका कट्ट्यावर उभा राहून ओरडू लागला ,"ऐश्वर्या राॅयनं सही केलेलं  कापड फक्त दोनशे रुपयाला, ऐश्वर्या रॉयने सही केलेलं कापड फक्त दोनशे रुपयाला ऐश्वर्या राॅयची  सही असल्यामुळे त्याचं ते कापड एका मिनिटात विकलं गेलं. कापड घेण्यासाठी तेथे दोन व्यक्ती आल्या. "कितीला आहे कापड?" असं त्या मुलाला विचारलं. 
               तो मुलगा म्हणाला, "फक्त दोनशे रुपये."  त्यातील एक व्यक्ती म्हणाली, "मी तुला या कापडासाठी तीनशे रुपये देतो पण मला हे कापड दे."  इतक्यात दुसरी व्यक्ती म्हणते, "मी तुला चारशे रुपये देतो. मला ते कापड दे."  त्या व्यक्तीने चारशे रुपये त्या मुलाला देऊन टाकले. तो माणूस निघून गेला. हा मुलगा चारशे रुपये घेऊन आनंदाने उड्या मारत घरी गेला. "बाबा चारशे रुपये, बाबा चारशे रुपये असे म्हणत घरी पोहोचला. त्याच्या बाबांंनी त्याला कुशीत कवटाळलं. बाबा म्हणाले, "शाब्बास! मला माहिती होतं की तू हे करून दाखवशील. बाळा, तू याच्यातून काय शिकलास?" 
              तो मुलगा म्हणाला, " करायची इच्छा असेल, तर मग मार्ग सापडतो."  त्याचे वडील म्हणाले, "मीपण तुला हेच सांगत होतो. एका फाटक्या तुटक्या कापडाची किंमत चारशे रुपयेपर्यंत जाते, तर एका सरळ मुलाची किंमत एक अब्जापर्यंत का नाही जाऊ शकत? तू काम तर कर सुरू . मग बघ कसे मार्क मिळतात ते!" त्यांचे हे बोलणे ऐकून त्याने शिक्षणाला सुरूवात केली.
                    दिवसामागून दिवस सरले. एके दिवशी तो मुलगा आपल्या बापाला खाकी वर्दीवरती सॅल्युट मारत म्हणाला, " बाबा, मी आय.पी.एस. अधिकारी झालो आहे."
केदार उत्तम मोरे इ. १० वी
                

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.