कथा-- नेत्रदान

                              *नेत्रदान* 
         आज श्रीकांत  रडत होता. पण ते दु:खाश्रू नव्हते, तर आनंदाश्रू होते. त्याच्या कुशीमध्ये त्याची मुलगी सपना होती. तीही रडत होती. त्याला कारणही तसेच घडलेले होते.  ते म्हणजे श्रीकांतने आपल्या मुलीला म्हणजेच सपनाला आपले दोन्ही डोळे दान केले होते.  म्हणून सपना आज सारे जग पाहत होती, पण श्रीकांत मात्र काहीच पाहू शकत नव्हता.  कारण त्याचे दोन्ही डोळे त्याने आपल्या मुलीला सपनाला दान दिले होते. सपनाला दृष्टी आली होती. ती सारखी सारखी न्याहाळून पाहू शकत होती , पण जेव्हा तिला कळले होते , की मी जे पाहू शकते ते माझ्या बाबांच्या डोळ्यांनी पाहू शकतेय, मात्र माझ्यामुळेच माझ्या बाबांना दृष्टिहीन व्हावे लागत आहे .  म्हणून तिला खूप खूप वाईट वाटत होते. तिचाच तिला राग येत होता. म्हणून ती हमसून हमसून रडत होती.  श्रीकांतही रडत होता. मात्र ते त्याचे दुःखाश्रू नव्हते, तर ते सुखाश्रू होते . कारण आज आपली मुलगी सपना सारे जग पाहत होती, म्हणून त्याला आनंद झाला होता. त्या आनंदाच्या क्षणाने तो रडत होता. आणि त्याचवेळी त्याच्या डोळ्यासमोरुन सारा भूतकाळ तरळून गेला........      
          वरणगे गावामध्ये श्रीकांत आणि सुलोचना यांचा सुखाचा संसार सुरू होता , पण त्यांच्या संसारामध्ये  मुलाची उणीव होती .  लग्न होऊन बारा वर्षे  होऊन गेली.  पण त्यांना मूलबाळ झालं नाही. नवस-सायास झाले. उपास-तापास झाले. त्यांना मूल काही होऊ शकले नाही. असतो एखाद्याचा पाळणा लांब , या भावनेने श्रीकांत आणि सुलोचना सारे दु: ख सहन करत होते.  'आज ना उद्या आपल्याला बाळ होईल' या आशेने ते जगत होते. 
          कर्मधर्मसंयोगाने एक तपानंतर त्यांना एक मूल झालं . घरादारात आनंदी आनंद झाला . बारा वर्षानंतर मूल झालं . पण ती मुलगी होती. मुलगा नव्हता. आजच्या या जमान्यात प्रत्येकाला मुलगाच हवा अशी अपेक्षा असतानाही श्रीकांत आणि सुलोचनाला मुलगी झाली होती. तरी ते दोघे खूप आनंदात होते. कारण काहीही नसण्यापेक्षा काहीतरी आहे, यात ते समाधान मानत होते. मुलगी झाली म्हणून काय झाले? जगाकडून वांझोटी म्हणवून घेण्यापेक्षा तरी बरे, असा त्याने विचार केला होता. अगदी धुमधडाक्यात त्याने मुलीचे बारसे केले होते. सर्व गावाला जेवणाचे आमंत्रण दिले होते.  मुलगी झाली होती तरी त्यानं लाडवाचं जेवण केलं होतं. जेवणात काहीही कमी पडू दिले नाही. एखाद्या श्रीमंताला लाजवेल इतक्या मोठ्या प्रमाणात बारसं करण्यात आले  होते. मुलीचे नाव 'सपना' असे ठेवण्यात आले.  खरंच स्वप्न पाहिल्यासारखं त्यांना इतक्या वर्षानंतर बाळ झालं होतं. आणि स्वप्नात पाहिल्यासारखी ती मुलगी होती. अगदी परीसारखी छान दिसत होती. नाकी डोळी छान . रंगाने गोरीपान. म्हणून तिचे नाव 'सपना' असे ठेवले होते. लहानपणी तिचे खूप कोड - कौतुक झाले . 
          दिवसामागून दिवस निघून गेले. काही महिने झाले. सुखानं चाललेल्या घराला कुणाची तरी दृष्ट लागली होती. कारण लहान बाळ हाक मारल्यानंतर त्या दिशेला पाहते. तशी सपनाही पाहत होती. तिला ऐकू यायचे, पण तिला दिसत नाही असे श्रीकांत आणि सुलोचनाच्या लक्षात आले होते. त्यांनी खूप प्रयत्न केले. अनेक डॉक्टरांना दाखवले. पण तिची दृष्टी येणे शक्य नाही असे प्रत्येक डाॅक्टर सांगत होते. तरीसुद्धा श्रीकांत तिला दवाखान्यात दाखवण्यात कमी पडत नव्हता.  
         सपना हळूहळू मोठी होऊ लागली. मैत्रिणींच्या मध्ये खेळू लागली. सुलोचनाने सपनाला सुंदर स्वयंपाक करायला शिकवला होता. सर्व प्रकारचे जेवण ती अतिशय सुंदर बनवत होती. प्रत्येक काम ती जीव लावून करायची. जनावरांना फिरवायला घेऊन जायची. गावातील लोकं थक्क व्हायची. सगळे आश्चर्यचकित व्हायचे. ही सपना आंधळी असूनही काम कसे डोळस माणसालाही लाजवेल अशी करायची.  सगळं कसं व्यवस्थित आणि नीटनेटके काम करायची. अनेक मुलींना तिचा हेवा वाटायचा. कारण त्यांचे बाप त्यांना सपनाचे उदाहरण द्यायचे.
          दिवस आनंदात जात होते. देवाने यापेक्षा आणखी द्यायला हवे होते? 
         एके दिवशी शेतामध्ये काम करत असताना सुलोचनाच्या पायाला काहीतरी चावल्याचे निमित्त झाले आणि ती गतप्राण होऊन पडली . श्रीकांतवर आकाश कोसळून पडले. सपना आईविना पोरकी झाली. पण सारं दु:ख बाजूला टाकून श्रीकांतने ठरवलं की आपणच बापाची आणि आईची भूमिका वटवायला हवी. आनंदी असलेल्या सपनाला दुःख होऊ नये, म्हणून तो हातावरच्या फोडाप्रमाणे तिला जपत होता. श्रीकांत शेतातले काम करायचा. काही वेळा दुसरीकडे रोजगाराला जायचा. सपना घरातली सारी कामं करत होती. 
              आज सपनाचा वाढदिवस होता. आईविना पहिलाच वाढदिवस साजरा होत होता. सपनाने मैत्रिणींना आपल्या घरी वाढदिवसासाठी बोलावले होते. सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. सगळ्या जणी खेळण्यात दंग झाल्या होत्या. सपनानं अतिशय सुंदर असं जेवण बनवलेलं होतं. मैत्रिणी खेळून झाल्यानंतर सपनानं त्यांना जेवायला बोलवलं होतं. मैत्रिणी जेवायला बसल्या होत्या. पण कुणास ठाऊक काय झाले? मैत्रिणींच्यात भांडण सुरू झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की सगळ्या मैत्रिणी काहीच न खाता निघून गेल्या. सपनानं हातानं चाचपून पाहिलं की प्रत्येकीच्या ताटामध्ये जेवण तसंच होतं आणि मैत्रिणी निघून गेल्या होत्या. तिला काहीच कळंना की असं काय झालं की सगळ्या मैत्रिणी जेवणावरून उठून का गेल्या? तिला फार वाईट वाटलं होतं. कारण आपण अंध असल्यामुळे आपल्या मैत्रिणीने आपण केलेलं जेवण खाल्लं नाही, याचं तिला खूप वाईट वाटत होतं. ती हमसून हमसून रडत होती. दुपारपासून सायंकाळपर्यंत तिचं रडणं सुरू होतं. 
             शेतात गेलेला श्रीकांत संध्याकाळी  परत आला. त्याने पाहिलं की सपना रडत होती. तिचं डोळं सुजलेलं होतं. त्यांनं तिला विचारलं, "बाळ सपना, काय झालं?"  तेव्हा ती म्हणाली, "तुम्हाला तर माहिती आहे की मी किती चांगला स्वयंपाक करते."
          "हो बाळ. तू चांगलाच नव्हे, तर स्वादिष्टच स्वयंपाक करतेस. "
           " आजही मी तितकाच सुंदर आणि स्वादिष्ट स्वयंपाक केलेला होता. पण माझ्या मैत्रिणी काहीच न खाता निघून गेल्या. याचं मला वाईट वाटत आहे," असं म्हणून ती श्रीकांतच्या कुशीत शिरून खूप खूप रडत होती.    
           श्रीकांतला काहीच सुचंना. आपण काय करावं म्हणजे माझ्या मुलीला आनंद होईल. त्यांनं मनाशी ठरवलं, की मला आता काहीतरी केलं पाहिजे. त्याने तिची खूप समजूत काढली. आईची शपथ घातली. पण सपनाला काही मानायला तयार होईना. दोघंही रात्री जेवली नाहीत. रात्रभर त्याला झोप लागली नाही. विचारांमध्ये रात्र सरत नव्हती. एकेक क्षण हा  एकेक युगासारखा वाटत होता. केलेलं एवढं जेवण वाया गेलं याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. पण सपनाच्या मनाला झालेल्या वेदना श्रीकांतच्या मनाला झोंबत होत्या.        
             तो सकाळी उठला. पायात चप्पल घातले आणि त्यांनं शहराची वाट धरली. कोल्हापूरमध्ये जितके डोळ्यांचे डॉक्टर आहेत. त्यांच्या दवाखान्यात जाऊन त्याने आपल्या सपनाच्या दृष्टीसाठी विचारायला सुरुवात केली. पण सर्व डॉक्टरांचे म्हणणे एकच होतं की सपनाला दिसायचं असेल तर तिला डोळे बसवले पाहिजेत. असे केले तरच ती जग पाहू शकेल.  दिवसभर फिरून श्रीकांत घरी परत आला. विचार करु लागला .......'कुणाचे डोळे तिला बसवता येतील? कोण आपलं डोळं देतील? दुसऱ्याचं डोळं विकत घ्यायचं तर चार-पाच लाख रूपये  डॉक्टरांनी खर्च सांगितलेला होता. 'इतकं पैसं कुठून आणायचं?' असा विचार करत होता. विचार करत असताना त्याला सुचलं की मग मी माझं डोळं तिला दिलं तर ........  
            त्यांनं निर्णय घेतला. आपलंच डोळं द्यायचं सपनाला. नाहीतरी आपलं आयुष्य आता कितीसं राहिलंय! माझ्या डोळ्यानं ती जग पाहू शकेल. 
              सपनाने आपल्या बाबांना विचारले, "बाबा आज सकाळपासून तुम्ही कुठे होता?" तेव्हा श्रीकांत म्हणाला, "बाळ, मी तुला आता आनंदाची बातमी देणार आहे." 
             "आनंदाची बातमी! माझ्यासाठी!" सपनानं आतुरतेनं विचारलं.
               "होय. आनंदाचीच बातमी आहे. तू आता हे जग पाहू शकतील."  श्रीकांतने सांगितले. 
              "कसे?" सपनाने उत्सुकतेने विचारले.
             "बाळ, काळ आता फार पुढे गेला आहे. सरकारने राबवलेल्या नेत्रदान कार्यक्रमामुळे मयत व्यक्तीचे डोळे काढून दुसर्‍या अंध व्यक्तीला बसवले जातात. त्यामुळे डोळे नसलेल्या माणसाला दृष्टी येऊन तो जग पाहू शकतो. म्हणूनच मी कोल्हापुरात जाऊन जवळकर डॉक्टरांना सारे विचारले आहे. त्यांनीच मला हे सांगितले आहे. हे ऐकताच सपनाला खूप आनंद झाला. "खरंच बाबा , मीही जग पाहू शकेन?" असं म्हणून तिनं आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली.      
           श्रीकांत या प्रसंगाने शहारून गेला. फक्त ऐकून सपनाला इतका आनंद झाला असेल, तर हे जग पाहिल्यानंतर तिला  किती आनंद होईल! म्हणून त्याने तिच्यासाठी हा धाडसाचा निर्णय घेतला होता. 
              तो दिवस उजाडला. सपनाला घेऊन तो डाॅ. जवळकर यांच्या दवाखान्यात गेला. एका बेडवर सपना झोपली होती. तिला डोळे बसवायचे होते, तर दुसर्‍या बेडवरती श्रीकांत झोपला होता. कारण त्याचे डोळे काढायचे होते.  ऑपरेशनची सर्व तयारी झाली. डाॅ.जवळकरांनी श्रीकांतचे डोळे काढले. तेच डोळे  सपनाला प्रत्यारोपण करून बसवण्यात आले.  
           काही दिवस निघून गेले. आज सपनाच्या डोळ्यावरची पट्टी काढून तिला हे जग दाखवायचे होते. त्यावेळी तिला विचारले, "तुला पहिल्यांदा काय पाहायचे आहे?" तेव्हा ती म्हणाली, "डॉक्टरसाहेब,  ज्या व्यक्तीने मला डोळे दिलेत , त्यांना मला पाहायचे आहे." 
            "ठीक आहे."असे डॉक्टर म्हणाले. 
             तो क्षण आला. सपनाला खुर्चीवर बसवले आणि डॉक्टर तिच्या डोळ्यावरची पट्टी काढू लागले. डोळ्यावरची पट्टी हळूहळू काढली आणि सपनाला हळूहळू डोृळे उघडण्यास सांगितले. ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागली. हळूहळू ती पाहू लागली. त्यावेळीच तिच्यासमोर खुर्चीत बसलेली व्यक्ती तिने पाहिली आणि तिला धक्काच बसला. ज्या व्यक्तीने मला डोळे दिले, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझे वडीलच आहेत. हे तिला कळल्यावर ती म्हणाली, "बाबा, तुम्ही माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलात. मला दिसावे म्हणून तुम्ही तुमचे डोळे मला दिलेत. बाबा तुम्ही का केलेत असं? का स्वतःहून आंधळेपणा ओढावून घेतलात?"  असं म्हणून ती रडू लागली. तेव्हा बाबा तिला म्हणाले, "माझं आयुष्य आता कितीसं राहिलं आहे. अगं मी म्हणजे  वटलेल्या झाडाचं पिकलेलं पान, कधी गळून पडेल सांगता यायचं नाही. पण सपना मी मेलो काय, जगलो काय? फारसा फरक पडत नाही. पण लक्षात ठेव बाळ, मी मेलो तरी तुझ्या डोळ्याच्या रुपानं जिवंत राहणार आहे. तेव्हा फार विचार करू नकोस. मी हे जग पाहिलेच आहे. याच जगाने तुझी केलेली हेटाळणी पाहिली आहे. आणखी दु:ख तुझ्या वाट्याला यावं असं मला वाटत नाही. मी फार मोठं काही केलं नाही. तुझ्या डोळ्याच्या रूपानं मी तुझ्या सोबतच आहे. आणि बाळ, तू लक्षात ठेव की, ज्यावेळी तुझं निधन होईल. त्यापूर्वी तू हे तह मृत्यूपूर्वी नेत्रदान फाॅर्म भरून दे." हे ऐकल्यावर सपना आपल्या बाबांना म्हणाली, "बाबा, मी तुमचीच मुलगी आहे. आताच मी डाॅ. जवळकरसाहेबांना नेत्रदानाचा फाॅर्म भरून देत आहे." असं म्हणून सपना बाबांच्या कुशीत शिरून रडू लागली. डॉक्टर आणि नर्स कौतुकानं या दृश्याकडे पाहत राहिले. पाहतच राहिले.. आणि पाहतच राहिले.
 लेखन : परशराम आंबी
     वरणगे पाडळी
     ता. करवीर
     मोबा.९४२१२०३७३२

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.