६. *कथा कोसळता पाऊस*

           ६.   *कोसळता पाऊस*
यंदा पावसानं विसावा कसला तो घेतलाच नाही. रोहिणी नक्षत्रापासून जो कोसळायला लागला तो थांबायला तयार नाही. मृग नक्षत्रात तो रिमझिम पडत होताच. नद्यांना पूर आला होता. खरं तर पुनर्वसू नक्षत्र हे पावसाचे नक्षत्र. त्यालाच तरणा पाऊस म्हणतात. तोरणा धो धो कोसळला.  नद्यांना महापूर आला  होता. नदी काठची सारी पिकं पाण्याखाली गेली होती. संततधार सुरू होती. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होत नव्हती. त्यानंतर म्हातारा पाऊस सुरू झाला.  पावसाने थोडी ओढ धरली. सर्वांना हायसे वाटले. पण दोनच दिवस.  पुन्हा ते नक्षत्र लागू लागले. हे नक्षत्र मघा. असं म्हटलं जातं की, 'लागल्या तर मघा नाहीतर ढगाकडं बघा. 'असं पूर्वापार चालत आलेली एक म्हण आहे . पण ढगांनी एवढी कृपा केली की  निसर्ग देवतेने आता पाऊस थांबवावा अशी देवाकडे लोकं प्रार्थना करत होती.  तरीही पाऊस पडत होता.  श्रावण महिना सुरू झाला की ऊन-पावसाचा खेळ सुरू व्हायचा. पण दोन अडीच महिने झाले तरी सूर्यनारायणाने कसले ते आपले तोंड दाखवले नव्हते. सारा पावसाचा खेळ सुरू होता. अशा पावसाळी वातावरणात आमच्या गावातील शंकरनाना व सारजाकाकू यांचं या पडणार्‍या पावसाबाबत गुलकंदी बोलणं चालू होतं............ 
"अगं सारजा,  या पावसानं थैमान घातलं  बघ. ह्यो बाबा रोहिण्यापासनं झोडपायला लागलाय त्यो थांबायचं नाव घेत नाही. "  त्यावर सारजाकाकू म्हणाली, "तर व्हय कारभारी, तोबी माणसाचं सतत बघतोय. "
"अन पाऊसपण माणसासारखा चेकाळण्यावानी कराया लागल्या. रोहिण्यापासनं सपाटा लावलाय त्यो थांबना बघ. तरणाबी इपरित लागला. म्हातार्‍यानं दिसाचा गोंडा दाखवला नाही. आसळकाचाबी पाऊस सुपानंच ओताय लागल्या बघ. "
"व्हय की हो धनी. या पावसानं सारं रेकाॅर्डब्रेक केल्या. " 
"तर गं मर्दिनी, लागल्या तर मघा नाहीतर ढगाकडं बघा असं म्हणायचं असतंया परं आवंदा आगावच झालंया म्हणा.या मघानी तर जीव आंबूनी गेलाया बघ. पावसानं आता थोडासा इसवाटा द्यावा बघ. " 
.......खरं तर या दहा बारा वर्षांत इतका पाऊस कधी असा पडलाच नाही. एखादं नक्षत्र लागायचं चार आठ दिवस. चांगला पाऊस पडायचा. नद्यांनाल्यांना महापूर यायचा पण काही दिवसांत पूर ओसरायचा. कधी पाऊस पडायचा  नाही. दुष्काळ पडायचा. पाऊस  पडावा म्हणून देवाला गार्‍हाणी घालावी लागायची.  पण यावर्षी सारं उलटं च झालेलं होतं. पाऊस सतत पडत होता.  शंकरनाना व सारजाकाकू आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागलेत............. 
"अगं सारजा, या धा-पंधरा वर्षात असा पाऊस कव्हा पडला नव्हता  बघ. "
"तर हो मालक , यंदाचा पाऊस फारच पडायला लागलाया. " "तुला सांगतो सारजा , असाच पाऊस आपल्या लहानपणात पडायचा. रानात जाताना अंगावर इरलं घेतल्याबिगर जाता येत नव्हतं. त्या काळात पाऊस खूप पडायचा. पण चार - आठ दिवसच. पुन्हा उघडझाप व्हायची. "
"आताचा पाऊस त्यामानाने चांगला म्हणायचा. पहिल्यावानी त्यात फार जोर दिसत नाही, परं सारखा जरा जरा ओताय लागलाया.  त्यामुळं नद्यांचे पाणी काही ओसरना झालंया."
"अगं बाई, आता कितीक बदल झालेत. नव्या नव्या सुधारणा झाल्या. रस्ते झाले. त्यांची उंची वाढली. भरावा पडला. पाणी अडून राहू लागलं.ते पुढं सरकना झालं. त्यात अन् ते कर्नाटकात झालेलं कोणतं बरं धरण? अलमट्टी धरण. त्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही. फुगवटा तसाच राहतोया."
खिडकीतून बाहेर पाहत शंकरनाना कॉटवरुन सारजाकाकूला सांगत होता. खिडकीच्या शेजारी काॅट ठेवलेला होता. कॉटजवळ खुर्चीवर सारजाकाकू बसली होती. पाऊस अजूनही सुरूच होता. शंकरनाना सारजाकाकूला म्हणाला, "अगं, जरा चहा प्यायला घेऊन ये जा की, सांज व्हायला आलीया. घोटभर चहा घेतला की बरं वाटंल."
"व्हय की. किती वेळ बोलण्यात गेला हे कळलंसुदीक नाही. कुठं आत बाहेर करावं तर ह्यो बाबा थांबत नाही. " असं ती उठून आत  गेली. शंकरनानाच्या डोळ्यांतून घळाघळा आसवं गळू लागली.डोळ्यासमोरून सारा भूतकाळ सर्रकन सरकला.......  
माझ्या बालपणी माझा बाप मेला होता. आईनं काबाडकष्ट करून मला मोठं केलं होतं. पदरचे रान नसताना मोल मजुरी करून मला शिकवलं. स्वतः उपासपोटी राहिली पण मला काही कमी पडू दिलं नाही. सातवी पास झालो नि तीही मला सोडून गेली. तिची सुटका झाली आणि मला वनवासी करून गेली. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत मी जगलो. पडेल ते काम केलं.थोडं पैसे साठवले. पावण्यातील सारजाशी लग्न केले. तिच्या पायगुणानं माझी बरकत झाली. देवाच्या कृपेने मुलगा झाला. त्याचं नाव महादेव ठेवलं. त्याला काही कमी पडू दिले नाही. त्यानंही चांगली साथ दिली. तो खूप हुशार होता. चौथी व सातवी स्काँलरशिप परीक्षेत चांगले यश मिळविले.  पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर शहरात पाठवला. तिथेही पहिला क्रमांक पटकावला. बँकेचे कर्ज घेतले पण त्याला शिकवले. मोठ मोठ्या परीक्षा देऊन परदेशात शिक्षण घेण्यासाठी  गेला. तिथेच नोकरी करत असताना त्यानं तिथल्या मुलीशी विवाह केला आणि तो तिथेच राहू लागला. राजाराणीचा संसार सुरू आहे. नाहीतरी एकदा जोडीने भेटून गेला आहे. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अधूनमधून फोन करतात तेवढाच आधार. पण आमच्या म्हातारपणात आमच्या घरी  कोण आहेत? आमच्या कार्यक्रमाला तरी येतील की नाहीत? कुणाला ठाऊक? पोटाला पोरगा असूनही बेवारशासारखं जगायचं आणि मरायचं?...... अशा विचारात असतानाच "अहो, च्या घेताय ना? " सारजाकाकूच्या हाकेनं शंकरनाना भानावर आले. डोळे पुसत हात पुढे केला. हातात कप घेऊन काही वेळ तसेच थांबले. "अहो, कशाला काळजी करताय? मी आहे ना तुमच्या संगं. आणि हे बघा,  मी जायची नाही तुमच्या अगोदर तुम्हाला असं सोडून. " असं सारजाकाकूचं बोलणं ऐकून हातातला कप कधी गळून पडला हे कळलंसुदीक नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या  आणि बाहेर पावसाला जोर चढला होता. त्या आवाजात शंकरनानाच्या डोळ्यांतील आसवांचा आवाज क्षीण होत गेला.... क्षीण होत गेला...... क्षीण होत गेला. 
श्री. परशराम रामा आंबी 
श्री नवनाथ हायस्कूल 
पोहाळे तर्फ आळते 
 ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
  पिन416229 
मोबाईल नंबर :9421203732

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.