प्रकरण ३
              माझा जन्म झाला त्यावेळची गोष्ट.  मी लहानपणी खूप रडायचो. कितीही शांत करायचा प्रयत्न केला तरी माझं रडणं काही थांबायचं नाही.  सर्व प्रकार करुन पाहिले.  पण मी रडायचा थांबलो नाही.  एकदा एक शेजारची आजी घरी आली होती. ती म्हणाली , " याचं रडणं थांबवायचं असंल तर त्याचं नाव बदललं पायजं.  तुमच्या घरातल्या मरण पावलेल्या एखाद्या माणसाचं नाव त्याला ठेवा , म्हणजे तो रडायचा थांबेल. "  मग माझं नाव परसू असं ठेवण्यात आलं. कारण माझ्या आजाचं म्हणजे वडलांच्या वडिलांचं नाव परसू असं होतं. नाव बदललं त्याचा फारसा परिणाम झाला की नाही मला माहीत नाही ,  पण थोडं  रडणं कमी झालं. असं मला नंतर कळायला लागल्यावर सांगण्यात आले.  रडणं कमी झालं.  पण हट्टीपणा काही कमी झाला नाही.  मी लहानपणी  खूप चहा पीत होतो.  माझ्यासाठी चहा पिण्यासाठी चिनी मातीचा एक मोठा कप होता.  साधारणत: अर्धा लिटर होईल इतका मोठा. तो कप (मग) भरून चहा दिल्या शिवाय माझं समाधान व्हायचं नाही. नाहीतर तो चहा सांडायचो. असे आता सांगितलं असतं तर माझा विश्वास बसला नसता.  पण मला कळत होतं . त्यावेळी मी स्वतः तो कप (मग) पाहिलेला आहे.  
           आई जेवण करायची. मी रडायचो. तेव्हा  आईचा एक हात भाकरी थापण्यासाठी तर दुसरा हात माझ्या पाळण्याची दोरी ओढण्यासाठी असायचा. मोठी भावंडं रजपूतवाडीत असायचीत शिकण्यासाठी. ती रानात गेली की तिचा पदर धरून मीही तिच्यासोबत जायचो. वरणगेत असताना मी तिला कधी एकटे सोडलेच नाही. पावसाळा सुरू झाला की ती वाकळ शिवायला घालत होती. किमान दहा-बारा तरी वाकळा तिनं शिवलेल्या होत्या. वरणगेत दोन - चार वाकळा ती गेली तेव्हा होत्या.   तितक्याच रजपूतवाडीत होत्या. तुम्हांला आश्चर्य वाटेल. कारण आज रेडिमेडचा जमाना आहे. आज चादरी , जमखाना , बेडशीट असं सारं हवं ते मिळते आहे. पण माझ्या मामाने माझ्या आईची आठवण आजही जपून ठेवलेली आहे ती म्हणजे तिने शिवलेली वाकळ. आज पंधरा - सोळा वर्षे झाली ती वाकळ फारशी वापरात नाही. कारण ती वजनाने फार मोठी आहे. ती उचलून घडी घालण्याइतपत ताकद राहिली नाही.  पण वर्षातून दोन वेळा  ती वाकळ बाहेर काढली जाते. एक गुढी पाडवा आणि दुसरा दसरा. कारण धुवून वाळवून ठेवण्यासाठी. मामा म्हणतो , " माझ्या आक्काची ती एकच आठवण मागे शिल्लक आहे. ती जावून पन्नास वर्षे होत आहेत. तिनं जे भोगलं , सोसलं . इतरांसाठी काय काय केलं , ते जाणू द्यात अगर नाही जाणू द्या. मला सगळं जाणवतं. नव-यानं आयुष्यभर छळलं आणि पोरानीसुद्धा छळलं. आधी मुलं होईनात. झाली तर जगनात.  त्या काळी इंग्रज मिशनरीचे डाॅक्टर किशा बापूंच्या बंगल्यात यायचे. डाॅक्टरांकडून औषधोपचार करून घेतले. मग मुलं होऊ लागली. सगळ्यात थोरला संभाजी झाला. तो थोडा मोठा झाला. एकदा रुसला आणि जोतिबाच्या डोंगरावर गेला. माऊलीचं रडून डोळं सुजलं. नवसानं झालेला पोरगा. तो असा घरातनं निघून गेला.  कितीतरी घटना तिनं पचवल्या आहेत. अशा माझ्या आक्काच्या आठवणी त्या वाकळंसोबत जपतो आहे. ती निव्वळ वाकळ नाही तर वाकळंबरोबर मला माझ्या आक्काचा भास होतो." मामाच्या शब्दा-शब्दातून माझ्या आईचं अस्तित्व पाझरत असतं. 
               माझा चुलत मामा बंडू हा लहानपणी आमच्या घरी होता. तो कधी वरणगेत तर कधी रजपूतवाडीत असायचा.  आमच्या घरी काळा बैल होता.  तो 'बाळा ' बैल म्हणून ओळखला जायचा . तर घरच्याच गाईला रजपुतवाडीत एक  खोंड झालेला होता.  त्याचं नाव असं ठेवलं नव्हतं , पण त्याला ' पाडा' असे म्हणत होते.  काळा बैल व पाडा यांच्याकडून शेतातील काम केली जात होती.  त्याचप्रमाणे गौरी गणपती सण झाल्यानंतर पाडळी येथील डोंगरांमध्ये गवत कापण्यासाठी वाटणी घेतलेली असायची. गवत कापण्यासाठी बंडू मामा आणि थोरला भाऊ संभाजी किंवा दुसरा भाऊ धोंडिराम  बैलगाडी घेऊन जात होते.  आमच्या गावात भैरोबा देवाला वळू बैल सोडलेला होता.  त्याचे नाव ' भोला ' ठेवलेलं होतं. त्यावेळी तो वळू बंदिस्त होता.  गावातील लोकं बैलगाडीतून देवळावरून जात असताना वळू बैलासाठी वैरणीच्या पेंड्या टाकतात. त्याची देखरेख करण्यासाठी एका माणसाची नेमणूक केलेली होती. गावातील काही लोकांनी त्या माणसाच्या जेवणाची सोय केली होती.  दर रविवारी रात्री नऊ - दहा वाजता देवाची आरती आणि पालखी झाल्यानंतर त्या वळूला सोडले जायचे. तो रात्रभर यथेच्च फिरून , चरून पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत स्वतःहून आपल्या खोलीत येऊन बंदिस्त होत होता.  त्या दरम्यान कोणतीही गाडी त्याच्या जवळून जाता कामा नये. नाहीतर तो त्या गाडीवर चालून जायचा. सर्व लोकं याची काळजी घ्यायचे.  पण कोणी त्याची छेड काढली तर तो गावातील बैलांच्या मागे लागायचा.  मला आठवते की आमच्याही बैलगाडीच्या मागे हा वळू एक-दोन वेळा लागलेला होता. कारण काय ते समजले नाही. डोंगरातून  गवत घेऊन गाडी येत होती. वाटंकरी लोकांच्या वाटणीचे गवताचे भारे टाकत गाडी घराकडे येत होती. त्यावेळी कसा काय आवाज ऐकून वळू आमच्या बैलगाडीवर चालून आला. त्याला चुकवणं फार मुश्किल असायचं , पण बंडू मामा आणि भाऊ अगदी चलाकीनं त्याला चुकवून गाडी पुढं काढली.  वळूनं पाठलाग चालू केला. गाडी पुढं आणि वळू मागं असा अर्धा कि.मी. पाठलाग सुरू होता. काय करावं गाडीवानाला सुचंना.  त्यांनी गाडी पळवत आणली. आमच्या घरालगत छप्पर होतं.  छप्पर आणि शेजारचे घर यामध्ये जागा रिकामी होती. त्यात गाडी घातली. त्यामुळे वळूला पुढे जाता आले नाही. तोपर्यंत लोकं जमा झाली. त्यांनी वळूला हुसकावून लावले. आणि आमचे बैल वळूच्या तावडीतून बचावले. बंडू मामाला हायसे वाटले. 
            असा हा बंडू मामा अतिशय थट्टेखोर होता.  तो मला आणि माझ्या बाल मित्रांनो एकत्र घेऊन बसायचा आणि चेष्टा करायचा.  माझा जिवलग मित्र केशव हा आमच्या समोरच त्याच्या मामाकडे राहत होता.  त्याला बंडू मामा नेहमी म्हणायचा केशाचा आबा बंपुरीवर उभा.  कारण केशव त्याच्या वडिलांना      'आबा '  म्हणत होता.  केशवचा आबा मुंबईला कामाला होता. 
        आमच्या बंडू मामाला शिरगावमध्ये दत्तक घातलेला होता.  म्हणजे बंडू शिवाप्पा आंबी दत्तक झाल्यानंतर त्याचे नाव झाले बंडू दत्तू आंबी.  तो शिरगावला दत्तक झाला , तरी त्याचे लग्न रजपूतवाडी येथे मोठ्या धुमधडाक्यात लावून दिले होते.  त्यावेळी सांगलीहून
 व-हाड कोल्हापुरात आलेलं होतं.  कोल्हापुरातून 
रजपूतवाडीला व-हाड नेण्यासाठी त्यावेळी बैलगाड्या होत्या.  आंबेवाडीतील दोन- तीन बैलगाड्या आणि आमची एक बैलगाडी होती.   ती बैलगाडी चालवायला भाऊ धोंडिराम होता. त्याच्याबरोबर मीही होतो. कोल्हापुरातील तोरस्कर चौकातून बैलगाड्या निघाल्या. आंबेवाडी सोडली आणि बैलगाडी कोणाची पुढे जाते अशी जणू स्पर्धा होती.  आमच्या गाडीला बाळा बैल आणि नुकताच वझलेला पाडा होता.  आमची गाडी  मागे होती. पुढच्या गाड्या पळू लागल्या.  माझ्या भावाला चेव आला. भाऊंनं बैलाच्या शेपटीला हात लावताच बाळा बैल उधळला.   त्यानं पाड्यासह गाडी ओढून सर्वांच्या पुढे नेली.  बंडू मामाचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी मामीसह तो शिरगावला गेला.

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.