मला हवेत आजी आजोबा

        'देव जरी मज कधी भेटला 
         माग हवे ते माग म्हणाला
         म्हणेन प्रभू दे......'
खरंच! खरंच!! जर देव आमच्या घरी आला आणि म्हणाला, की हवे ते माग.
          तर आमच्या घरातील काय मागतील माहिती आहे ? अहो, माझे पप्पा काय मागतील माहित आहे तुम्हाला? ते म्हणतील की, देवा मला प्रमोशन दे. कारण त्यांना कारकुनाचे ऑफिसर व्हायचं आहे. आणि मम्मी काय मागेल? अहो ती आपल्याला कार मागेल. कारण तिला फिरायची फार हौस आहे. आणि दादा काय मागेल? बरोबर. तुम्ही बरोबर ओळखलंत. तो मोबाईल किंवा काॅम्प्युटर मागेल. कारण त्याला गेमने खेळायचा फार नाद आहे. पण मला यातलं काहीच नको. मी मात्र मागेन माझे आजी आजोबा. हो मला हवेत आजी आजोबा. आजच्या या सिमेंटच्या जंगलात. हो हो ही सिमेंटचीच जंगले आहेत. यांना घर कोण म्हणेल? या नुसत्या भिंतीच आहेत. यात प्रेमाचा ओलावा मुळीच नाही. या सिमेंटच्या जंगलात टी.व्ही., कॉम्प्युटर, फ्रीज, कुलर अशा निर्जीव वस्तूंना ठेवायला जागा आहे. पण माझ्या आजी-आजोबांना राहायला नाही.
          का? तर म्हणे घर लहान आहे. घरात खूप अडचण आहे. अहो याला घर नव्हे तर फ्लॅट म्हणतात. पण येथे येण्यापूर्वी आम्ही गावाकडे मजेत होतो. आजी-आजोबांच्या सावलीत घालवलेले ते दिवस मंतरलेले होते.
           गोष्टी सांग म्हणून केलेला आजीजवळ हट्ट. आजीजवळ झोपण्यासाठी केलेली भांडणं. मम्मी पप्पांच्या न कळत चोरून आणलेला आजोबांनी खाऊ. या साऱ्या गोष्टी किती मजेदार होत्या. पण आता त्या गोष्टी स्वप्नात जमा झालेल्या आहेत.
              माझे काळे कुरळे केस माझ्या आजीला खूप आवडायचे. ती मला नेहमी जवळ घेऊन वेणी घालायची. परवा मम्मीला म्हणाले, की वेणी घाल. तर तिने मला ब्युटीपार्लरचा रस्ता दाखवला आणि हे करून घेतले घोड्याचे शेपूट ! या माझ्या आखूड झालेल्या केसासारखीच मम्मी आणि पप्पांची मनंही आखूड झालेत की काय असं वाटतं कधी कधी मला.
          पप्पांना वेळ नसतो आमच्याकडे लक्ष द्यायला. कारण ते ऑफिसला जातात. मम्मीचा असते महिला मंडळ आणि टी.व्ही. घरात असूनही सवड नसते तिला. शहरात आल्यापासून आपण खूप मोठे झालोय असं तिला वाटायला लागले आहे. त्यामुळे आमच्या लहान गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांना गरज वाटत नाही आणि तशी त्यांना इच्छाही नाही.
             पण आमचे आजोबा असे नव्हते. त्यांचे सगळीकडे लक्ष असायचे. ते म्हणजे संस्काराचे माहेरघरच होते. दररोज सकाळी देवळात घेऊन जायचे, पण जाताना सरळ नाकासमोर बघून नाही चालायचं अशी त्यांची सक्त ताकीद होती. रस्त्याच्या बाजूला पाहत जायचे. ते म्हणायचे, "पाहिलेस का ते !'' 
 "हो" मी म्हणायची.
 "कशाचे आहे ते झाड?" ते विचारायचे.
 मी सांगायचे, "आंब्याचे."
 एवढ्यावरच ते थांबायचे नाहीत. ते म्हणायचे, "निरखून बघ. त्याचा आकार कसा आहे? रंग कसा आहे? घरी गेल्यावर त्याचे चित्र काढायचे आहे तुला."  या शिकवणीतूनच मला चित्रकला विषय आवडू लागला. त्यांनीच रंग, पेन्सिली, कागद इत्यादी साहित्य आणून दिले. चौथीत असताना माझा चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक आला होता. हे जेव्हा मी पप्पांना सांगितलं की माझा चित्रकला स्पर्धेत पहिला नंबर आला.
            मग काय म्हणताय? "मला शाब्बासकी दिली त्यांनी !"  अहो, शाब्बासकी द्यायची राहू दे. उलट माझ्यावर ते रागावलेच. म्हणाले, "नुसती चित्रं काढत बसू नका. अभ्यासही करा जरा. चित्रं काढून पोट भरत नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागतो." पण त्यांना कोणी सांगावं की मी राजा रविवर्मा किंवा आबालाल रहमानसारखी मोठी चित्रकारही होईन. आजोबांनी मात्र माझा पापा घेतला आणि म्हणाले, "खरंच एक दिवस चित्रकार म्हणून नाव मिळवशील तू. खरंच अजूनही तो प्रसंग मला जसाच्या तसा आठवतो.
आणि आजीनं गाणं शिकवलं बरं का मला. ती रोज सायंकाळी मला जवळ बोलवायची. देवापुढे बसवायची. 'शुभं करोति' म्हणायला लावायची. तिने शिकवलेलं गाणं आजही मला आठवतं - 'देवा तुझे किती सुंदर आकाश
 सुंदर प्रकाश सूर्य देतो' या गाण्याप्रमाणे घरातलं वातावरणही किती सुंदर होतं. त्यात जिव्हाळा होता. एकमेकांची मन एकमेकात गुंतलेली होती.
          शहरात आलो आणि हा जिव्हाळा संपला. दुरावा निर्माण झाला. फ्लॅटच नाव मात्र जिव्हाळा राहिलं, तेही अर्थ नसलेलं. परवा सहज मम्मीला म्हटलं, "संगीत रत्न गाण्याच्या स्पर्धेत मी भाग घेतो." ती खसकन ओरडलीच. कसलं म्हणून कौतुक नाही तिला.
           जपानी माणसांनी झाडाची वाढ खुंटवून बोन्साय केलाय. पण आजच्या आमच्या पालकांनी आम्हा मुलांचा बोन्साय केलाय. तो आमच्या आजी-आजोबांना दूर सारून. त्यांच्या सहवासात आमची झुडपं वाढली असती, बहरली असती. पण हे आज होतच नाही. कारण आज कितीही किमतीच्या शाली, चादरी घेतल्या तरी त्यांना आजीनं शिवलेल्या गोधडीची ऊब येणार नाही.
             आज-काल आजी, आजोबा म्हणजे घरातील फक्त अडगळीची वस्तू झाली आहे. पिकलं पान. ते नकोच आहे आजच्या आमच्या पालकांना. आणि बरं का ! आमच्या आजीने सांगितलेली एक गोष्ट नेहमी मला आठवते. त्या गोष्टीत एक म्हातारा होता. परसातल्या छप्परात राहत होता. एकदा त्याचा नातू तेथे खेळत होता. त्याने तेथील दृश्य पाहिलं. आजोबाच्या पाण्याचा लोटा, जेवणाची ताटी पाहिली. तेव्हा तो आजोबांना म्हणाला, "अहो आजोबा, ही भांडी फोडू नका. ती तशीच ठेवा."  त्यावर आजोबांनी विचारले, "का रे बाबा?"
त्यावेळी तो नातू म्हणाला, "माझी आई आणि वडील आणखी काही वर्षांनी म्हातारे होतील तुमच्यासारखे. तेव्हा त्यांच्यासाठी नको का हे सगळं. नाही तर मला नवीन खरेदी करावी लागतील भांडी." हे संभाषण जेव्हा त्या मुलाच्या आईनं ऐकलं. तेव्हा तिने ती भांडी घरात नेली आणि त्या आजोबांना घरात घेतले.
            पण माझ्या मम्मी, पप्पांची कान उघाडणी कोण करणार? वृद्धाश्रमातून आजी-आजोबांना कोण घरी आणणार? म्हणूनच मी देवाजवळ मागणं करते, की मला हवेत आजी-आजोबा. मला हवेत आजी आजोबा.

आजीशिवाय घर म्हणजे 
नुसता कोंडवाडा.
 साखरेशिवाय चहा लागतो
 काळा कडू काढा. 
आजीशिवाय घर म्हणजे 
भासते धर्मशाळा.
 आव जाव मन की मर्जी
 नसतो प्रेम जिव्हाळा.
 आजीशिवाय घर म्हणजे 
देवाशिवाय देऊळ.
 आपल्याच नादात धडपडणाऱ्या 
मुंग्यांचे वारूळ. 
आजीशिवाय जगणं म्हणजे
 विझलेले दिवे.
 खरंच देवा आजीसवे मला
आजोबाही हवेत.
 मला आजोबाही हवेत.

परशराम आंबी

Comments

Popular posts from this blog

बोलतो मराठी

देणाऱ्याने देत जावे.......

१२.चूक एकदाच होते---कथा