भाकरचोर कथासंग्रह मनोगत नवीन
'भाकरचोर' कथासंग्रह मनोगत....... मनुष्य हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. प्रत्येक व्यक्तीला गोष्टी ऐकायला, वाचायला खूप आवडतात. अगदी प्राचीन काळापासून कथांचा उगम झालेला आपणास पहावयास मिळतो. अगदी सुरुवातीच्या काळात पद्य हा वाड़मय प्रकार होता. या पद्यामध्येही कथाबीज होते. गद्य स्वरूपातील साहित्य प्रकार महानुभाव पंथ काळापासून अस्तित्वात असलेला आपणास पहावयास मिळतो. तो चक्रधर स्वामींच्या आठवणींच्या लीळाचरित्राच्या स्वरूपात होता. प्राचीन कथा, मध्ययुगीन कथा, लघुकथा पूर्वकथा, लघुकथा, नवकथा असा कथांचा प्रवास झालेला आपणांस पाहायला मिळतो. पूर्वीच्या कथा मौखिक पद्धतीच्या होत्या. परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी मुद्रण कला भारतात आणली. ह. ना. आपटे यांनी लघुकथेचा पाया घातला असे मानले जाते. त्यानंतर दिवाकर कृष्णांनी मराठी कथेला नवे वळण दिले आहे. ना.सी.फडके वि. स. खांडेकर यांनी कथेला उच्च शिखरावर नेले आहे. य.गो.जोशी, श्री. म. माटे, चिं. वि. जोशी यांनी कथेची भाषाशैली, तंत्र, अनुभव, दृष्टीकोन याबाबत बदल करत आपली वेगळी कथा निर्मिती केलेली दिसून येते. ...