मनोगत भाकर चोर कथासंग्रह
'भाकरचोर' ही माझी तिसरी साहित्यकृती आपल्यासारख्या सुज्ञ वाचकांसमोर ठेवताना मला खूप खूप आनंद होत आहे. माझी पहिली साहित्यकृती सन २००४ मध्ये हृदय प्रकाशन, कोल्हापूरमार्फत 'कर्तव्य' एकांकिका संग्रह प्रकाशित झाला होता. तो श्री नवनाथ हायस्कूल पोहाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत निकाडेसर यांच्या प्रोत्साहनाने प्रकाशित झाला. 'यशस्वी नाट्यछटा' हा नाट्यछटांचा संग्रह सन २०१६ मध्ये ज्ञानसंवर्धन प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेला होता. ती माझी दुसरी साहित्यकृती. यासाठी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासनाचा वाङमय पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीकांत पाटीलसर यांच्या प्रेरणेतून प्रकाशित झालेली साहित्यकृती.
सन २०२२ मध्ये माझी तिसरी साहित्यकृती 'भाकरचोर' या नावाने कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित होत आहे. यातील काही कथा 'महान मराठा', 'कृषिराज', 'ज्ञानमाऊली', 'शब्दसुगंध', 'मासिक ऋग्वेद', 'बहिर्जी', 'न्यूज पेपर गंगाधर', अशा विविध दिवाळी अंकातून पूर्वप्रकाशित झालेल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि मार्गदर्शक श्री. चंद्रकुमार नलगेसर यांच्या प्रेरणेतून 'दैनिक महासत्ता' मधून रविवारीय पुरवणीत 'सत्त्वपरीक्षा' आणि 'वाट ही पुनवेची' या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'गोगो काका' म्हणजे गोविंद गोडबोले यांच्यामुळे 'सत्त्वपरीक्षा' आणि 'वाट ही पुनवेची' या कथांचे कोल्हापूर आकाशवाणीवरून प्रसारण झालेले आहे.
'भाकरचोर', 'दीपलक्ष्मी', 'सपान' या कथांचे मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरच्या विविध साहित्य संमेलनांमधून सादरीकरण केले आहे. 'दीपलक्ष्मी' ही कथा विश्वास सुतार संपादित 'नाळ' कथासंग्रहात प्रकाशित झालेली आहे.
मी अनुभवलेल्या, पाहिलेल्या, साहिलेल्या, जोखिलेल्या आणि ऐकलेल्या अनुभवांचे प्रकटीकरण म्हणजे हा 'भाकरचोर' कथासंग्रह आहे.
श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. जी. पाटील, स्कूल कमिटी चेअरमन श्री. व्ही. एस. काटकर, संचालक श्री. बी. एस. पोवार, श्री. बी. पी. जाधव, श्री. डी. एच. साळोखे, श्रीमती विमल वळके, श्रीमती रंजना चौगले या सर्वांचे सदैव मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला आहे.
माझे सर्व शिक्षक बंधू, भगिनी, कर्मचारी आणि मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर, अखिल भारतीय शिक्षक-साहित्य-कला-क्रीडा मंडळ या संस्थांचे मला मोलाचे सहकार्य मिळालेले आहे. अनेक मित्रांनी कथा लेखन करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे.
'भाकरचोर' कथासंग्रहासाठी डॉ. शिवाजी शिंदे कुलसचिव, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर यांची सुंदर प्रस्तावना लाभलेली आहे. डॉ श्रीकांत पाटीलसर यांनी पाठराखण (ब्लर्ब) केलेली आहे. अभि पोवार यांनी आकर्षक मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. आरोही ग्राफिक्स यांनी डी.टी.पी. करून दिले आहे. वीरा प्रिंट सर्व्हिसेस यांनी मुद्रण केलेले आहे. श्री. चंद्रकांत निकाडेसर यांनी मुद्रित शोधन केलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची जबाबदारी हृदय प्रकाशन, कोल्हापूर यांनी घेऊन पूर्ण केली आहे. माझी पत्नी आणि कुटुंबीय यांचेही मोलाचे सहकार्य मला मिळाले आहे. अशा ज्ञात-अज्ञात व्यक्तींमुळे माझा 'भाकरचोर' कथासंग्रह प्रकाशित होत आहे. या सर्वांचे आभार व्यक्त करणे उचितच आहे; पण त्यापेक्षाही मी त्यांच्या ऋणात राहणे अधिक पसंत करतो.
परशराम आंबी
वरणगे
गुढीपाडवा शालिवाहन शके १९४४ प्रारंभ
शनिवार दि. ०२/०४/२०२२
Comments
Post a Comment