आर्मीवाला दादा

         *आर्मीवाला दादा*
गाव तसं चांगलं होतं. गावातली काही माणसं तालुका पातळीवर तर काही माणसं जिल्हा पातळीवर नेतृत्व करीत होती. पीकपाणी चांगलं होतं. सोबत पशुपालन हा जोडधंदा होता. हातात पैसा असल्यामुळं काहींनी आरसीसी इमारती बांधल्या होत्या. चार चाकी गाड्या दारातच उभ्या राहिलेल्या होत्या. शहराजवळील गाव असल्यामुळे काही लोकं चाकरमानी होती. कशाचीही काळजी करायचं काम नव्हतं. सारा गाव आनंदात नांदत होता. लोकं सुख-दुःखात एकमेकांना मदत करीत होती. 
         या गावातील लोकांना वर्षातील दोन महिने मात्र नकोसे वाटत होते. त्यातील आठ ते दहा दिवस तर त्यांना फारच नकोसे वाटतात. ते दिवस म्हणजे पावसाळ्यातील महापुराचे दिवस. एकदा, दोनदा महापूर येऊन गेला की बाकी वर्षभर कसं अलबेल असायचं. १९८९ व २००५  या दोन वर्षात महापूरानं थोडी झलक दाखवली होती. पण त्यावेळी फारसे नुकसान झालेले नव्हते. हीच मोठी सीमा झाली आहे असे सर्वांना वाटत होते. यानंतर मोठा महापूर येऊ शकणार नाही अशा गोड गैरसमजात सारी लोकं होती. त्यांचंही बरोबर होतं म्हणा ना? कारण या गावात अनेक पिढ्या होऊन गेलेल्या होत्या. ही दोन वर्षे सोडली, तर असा महापूर कधी आलाच नव्हता. त्यामुळे १९८९ व २००५ ही दोन वर्षे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ होती असा साऱ्यांचा ब्रह्म झाला होता. 
           'नेहमीची येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे जून २०१९ उजाडला. मृग नक्षत्र निघाले. त्या नक्षत्रानं पावसाच्या रिमझिम धारा कोसळू लागल्या होत्या. शेतकरी राजा सुखावला होता. कारण आवश्यकतेनुसार पिकांना पाणी मिळत होतं. शेतात डुलणारी पिकं पाहून शेतकरी राजा स्वप्न रंगवीत होता. 'मुलीचं लग्न धुमधडाक्यात करून द्यायचं,' 'मुलासाठी गाडी घ्यायची,' 'बायकोच्या गळ्यात कोल्हापुरी साज चढवायचा' अशा स्वप्नांमध्ये शेतकरी राजा मश्गुल होऊन गेला होता. पावसाची उघडझाप सुरू होती. तरण्या पावसाचं नक्षत्र सुरू झालं. त्यानं पावसाची सुरुवात केली. नद्यांना पूर आला. तरणा पाऊस थोडा थांबला. हळूहळू पाणी उतरू लागलं. म्हाताऱ्या पावसाचं नक्षत्र सुरू झालं; पण थोड्या उशिरानंच पावसाला सुरुवात झाली. नंतर त्यानं आपला वेग हळूहळू वाढवायला सुरुवात केली. तो ऐंशीच्या गतीनं पडू लागला. नद्यांना महापूर आला होता. आता थोडी विश्रांती घेईल असं साऱ्यांना वाटत होतं. कारण असं अनेक अनुभव लोकांच्या पाठीशी होते; पण आता पडणारा पाऊस काही थांबायचं नाव घेईना. नक्षत्र संपत आलंय जाता जाता थोडा लागत असेल. पुढचं नक्षत्र शांतपणे जाईल असा सगळ्यांचा कयास होता. कारण त्यांचे डोक्यावरचं केस अनुभवानेच पांढरे झालं होतं. सुरुवातीच्या काळात वेधशाळेनंही हाच अंदाज वर्तवला होता. आमच्या गावात गुढीपाडव्याच्या पंचांग वाचनातसुद्धा हेच वाचलेलं होतं, की या वर्षी होणाऱ्या पावसाचं प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून शेतकरी लोकांनी पावसाळ्यापूर्वी  अन्नधान्य व जनावरांसाठी चारा यांचा साठा करून ठेवलेला होता. माणसानं विज्ञानाच्या जोरावर कितीही प्रगती केली असली तरी तो निसर्गावर मात करू शकलेला नाही. आपण मात करतो असं त्याला वाटत असेल तर ते क्षणभरच. कारण निसर्गाच्या मनात आले; तर माणसाचं काही खरं नाही, हे त्यानं त्सुनामी, भूकंपाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. असे अनुभव प्रत्यक्षातून सुरू होतात. कारण आपल्याकडे समुद्र जवळ नाही किंवा धरण क्षेत्र जवळ नाही. त्यामुळे आपणांस असे अनुभव अनुभवता आले नाहीत.                  पण खरंच असा अनुभव प्रत्यक्षात आला तर..... आसळकाचा पाऊस सुरु झाला. 'लागल्या तर मघा, नाहीतर ढगाकडं बघा' अशी पूर्वापार चालत आलेली म्हण आहे. पण यावर्षी ढगाकडे बघायला लागलेच नाही. कारण एकसारखा पाऊस कोसळत होता. त्यामुळे गावात सगळीकडे त्रेधातिरपीट उडालेली होती. 
           "अरे रामा, आवर की लवकर. सारा गाव जमा झालाय एकत्र. प्रत्येकानं आपली जनावरं सोडून सोसायटीसमोर आणून बांधलीत." दादा पाटील आपल्या पोरावर ओरडत होता. 
          "अण्णा, तुला काय कळतंय का? बोंबलाय लागलायस ते - ढोरं बाहेर काढ, ढोरं बाहेर काढ. आपलं घर किती उंचावर आहे! माहित आहे ना तुला! १९८९ आणि २००५ साली एवढे मोठे महापूर आले होते तरीही आपल्या परड्यात पाणी आलेलं नव्हतं. शिवाय आपलं घर खूप उंचावर आहे. तेव्हा आपण आपलं घर सोडून कुठे जायचं नाही." रामा आपल्या बाबाला सांगत होता. 
           " अरं बाबा, सारं गाव खुळं आहे का? की तू शहाणा झाला आहेस!"
           "हे बघ अण्णा, तुला जायचं असेल तर जा. घरातली सगळी जावा. पण मी काही घर सोडून येणार नाही तिकडे सोसायटीत." 
           "रामा, तू म्हणत असशील आणि तुला खरंच खात्री असेल की पाणी येणार नाही; तर मग राहू द्या जायचं आपण." दादा पाटलानं पोरग्याच्या पुढं हार मानली होती. 
           पण काही तासांचा अवधी गेला नाही, तोच पाण्याचा वेग वाढला आणि बघता बघता पाणी दादा पाटलाच्या दारात कधी आलं हे समजलंच नाही. आवराआवर करताना पुरी वाट लागली. काय घ्यावं नि काय घेऊ नये हे सुचतसुद्धा नव्हतं. वरून पाऊस कोसळत होता आणि खाली पाणी वाढत होतं. जे हाताला लागेल ते घेऊन लोकं बाहेर पडत होती. तासातासाला फुटाने पाणी वाढायला लागलं होतं. कसंतरी दादा पाटलाचं कुटुंब बाहेर काढलं. म्हैशीला ओढत आणली. पण गाई मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर डोळ्यादेखत वाहून गेल्या. घरातल्या बायकांनी हंबरडा फोडला. रामा विमनस्क होऊन बसला होता. तशातही दादा पाटील समजुतीच्या स्वरात रामाला म्हणाला, "अरं बाबा, आपल्या नशिबात जे आहे ते भोगलं पाहिजे. किमान आपला जीव वाचला हे भगवंताचे उपकार आहेत. हा प्रसंग दिवसाचा घडला म्हणून बरं झालं. पण हेच रात्रीचं घडलं असतं, तर जीव वाचवण्यासाठी कुठं आणि कसं पळावं लागलं असतं कुणास ठाऊक?"
       सारेजण सोसायटीच्या दारात आली खरी, पण पाण्याने सोसायटीला वेढा घालायला सुरुवात केली होती. आता काय करायचं? बघावं तिकडं पाणीच पाणी होतं. माणसाच्या मनाची कालवाकालव सुरू झाली होती. नेतेमंडळींनी पुढारी लोकांना फोन लावले. जिल्हाधिकारी साहेबांना फोन लावले. महापुरातून लोकांना वाचवले पाहिजे. ही परिस्थिती आपल्या एकाच गावाची नाही. हा पाऊस सगळीकडेच पडत आहे. नदी काठावरील सगळ्या गावांची हीच अवस्था झालेली आहे. सगळ्यांची सोय केली पाहिजे. व्हाईट आर्मी, रेस्कू फोर्स, इंडियन आर्मी यांना पाचारण करून जिल्हाधिकांऱ्यानी नदी काठावरील महापूर आलेल्या सगळ्या गावात लोकांच्या बचावासाठी पाठवलेले होते. वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या तुकड्या पाठवलेल्या होत्या. त्यातील काही बोटी या गावात पाठवून दिल्या होत्या. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. गावातील स्त्रिया, लहान मुले यांना अगोदर नेण्यात आले होते. तरुण मंडळी मागे राहिली होती. शेवटची बोट आली होती. या बोटीत काही तरुणांसह दादा पाटील, रामा आणि त्याची बायको बसलेली होती. बोट चालू झाली. सोसायटी सोडून काही अंतरावर बोट गेली. तिथे एक मोठे झाड होते. त्या झाडावर एक अस्सल नागराज होता. तो त्या बोटीत झेप घ्यायच्या तयारीत होता. कारण प्रत्येक जीवाला आपला जीव वाचवणं गरजेचं होतं. त्यालाही आपला जीव वाचवण्याचा अधिकार होता. त्यालाही पाण्याच्या बाहेर जावं असं वाटत होतं. तेवढ्यात रामाच्या बायकोची नजर त्या झाडाकडे गेली. ती मोठ्याने किंचाळली. आर्मीतल्या एका अधिकाऱ्याने एका दणक्यात त्याला बाजूला पडला. जर सापाने बोटीत उडी घेतली असती तर.....आणि कोणाला दंश  केला असता तर.....या विचारानं प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला होता. कारण फार मोठा अनर्थ घडला असता. पण त्या आर्मीवाल्या दादानं अनर्थ टाळला होता. म्हणून रामाची बायको त्या आर्मीवाल्या जवानाकडे पाहून त्याचे पाय धरत होती. हा प्रसंग कोणीतरी त्या बोटीतून खाली उतरताना मोबाईलमध्ये पकडला होता. व्हाट्सअपवरून आपल्या मित्रांना तो व्हिडिओ पाठवला होता. बघता बघता तो प्रसंग सर्वत्र व्हायरल झाला. प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला. रामाची बायको एका दिवसात महाराष्ट्रभर पोचली होती. व्हाट्सअप, फेसबुक अशा अनेक प्रसारमाध्यमांतून या व्हिडिओला अनेक लाईक मिळू लागले होते. 
             १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन. त्यादिवशी कोल्हापुरातील आर्मी ऑफिसच्या ध्वजारोहणासाठी खास रामाच्या बायकोला बोलावण्यात आले होते. तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. एका सामान्य स्त्रीला सन्मान मिळाला होता. तो तिच्या आर्मीवाल्या दादाच्या आदरयुक्त प्रेमामुळेच. 

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील