भाकरचोर कथासंग्रह मनोगत नवीन

'भाकरचोर' कथासंग्रह 
मनोगत....... 

मनुष्य हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. प्रत्येक व्यक्तीला गोष्टी ऐकायला, वाचायला खूप आवडतात. अगदी प्राचीन काळापासून कथांचा उगम झालेला आपणास पहावयास मिळतो. अगदी सुरुवातीच्या काळात पद्य हा वाड़मय प्रकार होता. या पद्यामध्येही कथाबीज होते. गद्य स्वरूपातील साहित्य प्रकार महानुभाव पंथ काळापासून अस्तित्वात असलेला आपणास पहावयास मिळतो. तो चक्रधर स्वामींच्या आठवणींच्या लीळाचरित्राच्या स्वरूपात होता. प्राचीन कथा, मध्ययुगीन कथा, लघुकथा पूर्वकथा, लघुकथा, नवकथा असा कथांचा प्रवास झालेला आपणांस पाहायला मिळतो. पूर्वीच्या कथा मौखिक पद्धतीच्या होत्या. परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी मुद्रण कला भारतात आणली. ह. ना. आपटे यांनी लघुकथेचा पाया घातला असे मानले जाते. त्यानंतर दिवाकर कृष्णांनी मराठी कथेला नवे वळण दिले आहे. ना.सी.फडके वि. स. खांडेकर यांनी कथेला उच्च शिखरावर नेले आहे. य.गो.जोशी, श्री. म. माटे, चिं. वि. जोशी यांनी कथेची भाषाशैली, तंत्र, अनुभव, दृष्टीकोन याबाबत बदल  करत आपली वेगळी कथा निर्मिती केलेली दिसून येते. 
          गंगाधर गाडगीळ, कुसुमावती देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, पु. भा. भावे यांनी नवकथेला वेगळ्या उंचीवर नेलेले आहे. या कथांमधून वास्तवता, वास्तववादी दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्वाबाबत बदललेली कल्पना, मानवी मनावर प्रभाव पडलेला दिसून येतो. १९६० नंतर कथेने नवनवीन क्षितिजे सर केलेली दिसून येतात. यामध्ये अनुभवांचा अस्सलपणा, रचनेचा स्वतंत्रपणा, अभिव्यक्तीतील नवचैतन्य यांनी कथा समृद्ध झालेली पहावयाला मिळते. रा. रं. बोराडे, उद्धव शेळके, मधु मंगेश कर्णिक यांसारख्या लेखकांनी कथा समृद्ध केलेली आहे.     
           ग्रामीण कथा, दलित कथा, स्त्री विषयक कथा असे प्रवाह निर्माण झालेले आढळून येतात. यातून मानवाच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या कथा निर्माण झाल्या आहेत. कलात्मक दृष्टिकोन, सामाजिकता, लोकांचे व पशूंचे जीवन चित्रण कथांमधून येऊ लागले. मनोविश्लेषण व आत अंतर्मनाचा ठाव घेणारी कथा निर्माण होऊ लागली. 
            कथा हे जीवनाचे साधन न होता , ते जीवनाचे माध्यम व्हावे अशी नवी दृष्टी निर्माण झाली. समाजातील घडणारे बदल, परिवर्तन माणसांच्या विचारांमध्ये होत गेलेला बदल, जीवनमूल्यांचा ऱ्हास, हरवत चाललेली माणुसकी यांचे चित्र कथांमधून येऊ लागले. याचाच अर्थ वास्तव जीवनाचे दर्शन कथांमधून होऊ लागले. समाजाचे प्रतिबिंब साहित्यातून उमटू लागले. 
             समाजात डोळे उघडे ठेवून पाहत असताना जे घडलं, जसं दिसलं, जे अनुभवलं ते कथेच्या रूपात प्रकट होत गेलं. देवदर्शनाला किंवा प्रवासाला जाणे ही एक साधारण घटना आहे; पण प्रवास करताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, घटना आणि माणसा-माणसातील सहसंबंध आणि त्यावेळी मनात आलेले विचार माझ्या 'वाट ही पुनवेची' या कथेतून आपल्या दर्शनास येईल. आजकाल लग्न जमवणे हा बिकट प्रसंग निर्माण झालेला आहे. यातूनच दलाल लोकांची निर्मिती झालेली आहे. आज मुलांचे शिक्षण कमी तर मुलींचे शिक्षण खूप होत आहे. त्यामुळे लग्न जुळवणे अवघड होत आहे. पण माणुसकी म्हणून आपल्याच रक्त संबंधातील व्यक्तीचे कल्याण करणे हा मूलभूत विचार सांगणारी माझी 'सत्त्वपरीक्षा' कथा. रक्ताचं नातं श्रेष्ठ की जोडलेलं नातं श्रेष्ठ असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी मानवता हेच नातं श्रेष्ठ आहे, हे सांगणारी 'रावसाहेब' कथा. आज नेत्रदान, देहदान, अवयव दान, रक्तदान या संकल्पना रुजू होत आहेत. वडील आणि मुलगी यांच्या नात्याची महती सांगणारी कथा म्हणजे 'नेत्रदान श्रेष्ठदान' ही कथा अनुभवावयास मिळते.
                जीव जगवण्यासाठी चोरी करावी लागते. खरं तर माणूस हा वाईट नसतो, तर परिस्थितीने तो वाईट बनतो याचे ज्वलंत चित्रण माझ्या 'भाकरचोर'  कथासंग्रहाचे शीर्षक असणाऱ्या कथेतून आपणास पाहायला मिळतील. विज्ञान युगात आपण खूप प्रगती केली ; पण मुले परदेशी शिक्षणासाठी पाठवली जातात. ती तिथेच स्थायिक झाली. त्यामुळे मुलाविना घरी असलेल्या म्हातारा म्हातारी यांची काय दशा होते. याचं दुःख 'कोसळता पाऊस' मधून आले आहे. शिक्षण घेणे किती खडतर आहे याचा अनुभव 'दीपलक्ष्मी' आणि 'सपान' या कथातून आपणांस पाहायला मिळते. 
               मुलींचा टक्का घसरला आहे. तरीसुद्धा समाजामध्ये नवजात स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. याचे वास्तव दर्शन 'दोष कोणाचा?' कथेतून आलेले आहे. मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून आपल्या समाजात पाहिले जाते;  पण मुलापेक्षा मुलगी बरी हे सांगणारी कथा म्हणजे 'कुलदीपिका.' 
         एखादी गोष्ट पूर्ण करताना किती अडचणीला सामोरे जावे लागते, त्यावर कशी मात करावी याचा संदेश देणारी कथा 'असे घडले साहित्यसंमेलन' ही कथा जन्म घेते. "स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे. याचे वास्तव दर्शन घडवणारी कथा म्हणजे 'चूक एकदाच होते' ही कथा. 'चंद्रमुखी', 'आर्मीवाला दादा' यातून संस्कार किती थोर आहेत. ते कसे जपले पाहिजेत याची महती सांगितली आहे. 'विना सहकार नहीं उद्धार' हा संदेश देणारी व सहकाराचे महत्व पटवून देणारी कथा म्हणजे ' देणाऱ्याने देत जावे'.
         अशा 'भाकरचोर' कथासंग्रहाचे आपण सुज्ञ वाचक स्वागत कराल याची मला खात्री आहे. 
        सन २०२२ मध्ये माझी तिसरी साहित्यकृती 'भाकरचोर'  कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित होत आहे. यातील कथा 'महान मराठा', 'कृषिराज', 'ज्ञानमाऊली', 'शब्दसुगंध',  अशा विविध दिवाळी अंकातून पूर्वप्रकाशित झालेल्या आहेत.   'सत्त्वपरीक्षा' आणि 'वाट ही पुनवेची' या कथांचे कोल्हापूर आकाशवाणीवरून प्रसारण झालेले आहे. 
           श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. जी. पाटील, स्कूल कमिटी चेअरमन श्री. व्ही. एस. काटकर आणि संचालक मंडळ यांचे सदैव मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला आहे. माझे सर्व शिक्षक बंधू, भगिनी, कर्मचारी आणि मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर, अखिल भारतीय शिक्षक-साहित्य-कला-क्रीडा मंडळ या संस्थांचे मला मोलाचे सहकार्य मिळालेले आहे. अनेक मित्रांनी कथा लेखन करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. 
              'भाकरचोर' कथासंग्रहासाठी डॉ. शिवाजी शिंदे कुलसचिव, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर यांची सुंदर प्रस्तावना लाभलेली आहे. डॉ. श्रीकांत पाटीलसर यांनी पाठराखण (ब्लर्ब) केलेली आहे. अभि पोवार यांनी आकर्षक मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. आरोही ग्राफिक्स यांनी डी.टी.पी. करून दिले आहे. वीरा प्रिंट सर्व्हिसेस यांनी मुद्रण केलेले आहे. श्री. चंद्रकांत निकाडेसर यांनी मुद्रित शोधन केलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची जबाबदारी हृदय प्रकाशन, कोल्हापूर यांनी घेऊन पूर्ण केली आहे. माझी पत्नी आणि कुटुंबीय यांचेही मोलाचे सहकार्य मला मिळाले आहे. अशा ज्ञात-अज्ञात व्यक्तींमुळे माझा 'भाकरचोर' कथासंग्रह प्रकाशित होत आहे. या सर्वांचे आभार व्यक्त करणे उचितच आहे; पण त्यापेक्षाही मी त्यांच्या ऋणात राहणे अधिक पसंत करीन. 
 परशराम आंबी
  वरणगे
गुढीपाडवा      शालिवाहन शके १९४४ प्रारंभ     
शनिवार दि. ०२/०४/२०२२                                        

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील