७. * दीपलक्ष्मी*
७. *दीपलक्ष्मी*
आजही तो प्रसंग आठवला की ऊर भरून येतो माझा . माझे मलाच कळत नव्हते . माझ्या मनाची द्विधा अवस्था झालेली होती . समोर दिसणारे दोन प्रसंग .......त्यातील पहिला प्रसंग असा - मी सोप्यामध्ये बसलेलो आहे . पूर्वेकडील भिंतीवर लावलेली समोरची शोकेस . ती बक्षिसांनी भरलेली आहे. त्यामध्ये अनेक शिल्ड ओळींनी लावलेली आहेत. वक्तृत्व , निबंध आणि इतर स्पर्धा मधून मिळवलेली अनेक बक्षिसे. त्यावरून सारा भूतकाळ समजतो आहे. दीपा पहिलीत गेल्यापासून ते पदवी आणि पदविका मिळवेपर्यंतची .........आणि दुसरा प्रसंग असा आहे की -त्याचवेळी सासरी जमिनीवर निश्चित पहुडलेली ती . अगदी शांत शांत....तिच्या भोवतीने बायका जमलेल्या . आठवणीने तिच्या पराक्रमाच्या गोष्टीचे रडत गुणगान करणाऱ्या . त्यातच माझी बायकोही सामील झालेली . की जी या सर्व पराक्रमाची साक्षीदार होती . डोळ्यातील आसवांचा बांध फुटलेला . अनपेक्षित झालेल्या दुःखाने व्याकूळ झालेली . कारण तिच्या जीवाचा तुकडा तिच्यापासून दूर गेलेला. ज्या आशेने तिने हाडाची काडं करून तिला लहानाची मोठी केली होती . संस्काराची खाण रीती केली होती. जिच्या रूपानं भविष्याचा वेध घेण्याचे ठरवले होते . आज एकाएकी प्रेत होऊन ती समोर निपचित पडलेली . आपली मुलगी गेली यावर विश्वासच बसत नव्हता . कसा बसणार ? वेलीवर नुकतंच उमललेलं फूल . वाऱ्याच्या झुळूकीवर डोलणारं . उनाडक्या करणार्या मुलांनं यावं आणि पूर्ण उमलण्यापूर्वीच ते तोडून टाकावं. असंच काहीतरी माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेलं होतं . ती अर्ध्यावर डाव मोडून चाललेली होती .
माझी सोनुली दीपलक्ष्मी . जमिनीवर निश्चित पहुडलेली दीपलक्ष्मी . या विचारात गढून गेलेलो मी. माझं मलाच कळंना की सत्य कोणतं ?......
शोकेस कडे पाहिले . तर बाजूला धडपडणारी माझी दीपा . मी भूतकाळात केव्हा गेलो हे माझे मलाच समजले नाही .......
पंचवीस वर्षांपूर्वी माझा शशिकलाशी विवाह झाला होता . मला सुस्वरूप पत्नी मिळाली . त्यामुळे खूप आनंद झाला होता . त्यापेक्षाही शिकलेली आणि नोकरी करणारी पत्नी मिळाली होती. हे माझे भाग्यच ! सर्वांत महत्वाचे म्हणजे तिचे मन माझ्याशी जुळले होते . संसाररुपी वेलीवर एक सुंदरशी कळी उमलली होती . तिचे नाव ठेवले होते दीपलक्ष्मी . कारण तिचा जन्म दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेला होता .
चंद्र कलेप्रमाणे दीपलक्ष्मी वाढत होती . 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ' या उक्तीप्रमाणे दीपलक्ष्मी बालपणीच तल्लख बुद्धीची होती . मनमोहक आणि गोड बडबड करणारी होती . तिची आई तिला वर्ष - दोन वर्षाची असतानाच शाळेत घेऊन जात होती . शाळेत मुलांना सुंदर गाणी शिकवायची . आवाज गोड असल्यामुळे कवितांना सुंदर चाली लावायची . मुले मधल्या सुट्टीत किंवा ऑफ तासाला कविता चालीवर म्हणायचीत. त्या कविता , गाणी ऐकून दीपलक्ष्मी आपल्या बोबड्या बोलीत म्हणायची . ती गाताना आम्हांला खूप मजा वाटायची . देहभान विसरून आम्ही दोघेही टाळ्या वाजवायचो . मग दीपलक्ष्मी थोडी लाजायची . लाजताना तिच्या उजव्या गालावर खळी उमलायची . आणि काय आश्चर्य ! दीपलक्ष्मीच्या या बोबड्या बोलांनी तिच्या आईला कवयित्री केव्हा करून टाकले हे समजलेच नाही . दीपलक्ष्मी बोबडे बोल बोलायची त्यावेळी बोबडे गीत जन्म घ्यायचे . तिची आई त्याचं बडबडगीत तयार करायची . अशी अनेक बडबडगीते तयार झाली . मग मी तिला बडबड गीतांचे पुस्तक काढायला सांगितले . त्यावेळी त्या पुस्तकाचे खूप कौतुक झाले . ते पुस्तक आम्ही आमच्या चिरंजीव दीपलक्ष्मीला आशीर्वाद म्हणून समर्पित केले . पुस्तकाचे नाव ठेवले होते - 'दीपांजली '
दीपलक्ष्मीला आम्ही लाडानं ' दीपा ' म्हणायचो . दीपा सहा वर्षाची झाली आणि तिचं नाव पहिलीच्या वर्गात दाखल केलं . तेही तिच्या आईच्या शाळेत . माझ्या शाळेत तिला नेणं शक्य झालं नव्हतं . कारण मी दूरच्या शाळेत शिक्षक होतो . त्यामुळे घरातून लवकर बाहेर पडावे लागायचे आणि घरात वेळाने पोचावे लागायचे . शिवाय लहान मुलीला आईची जास्त आवश्यकता असते . तिची शाळा घरापासून जवळ होती . म्हणून तिच्याच नगरपालिकेच्या ' शाळा क्रमांक नऊ ' या शाळेत दीपा जाऊ लागली . पण ती चौथी च्या वर्गाला शिकवत होती . पहिलाला सौ. भोई मॅडम शिकवत होत्या . ती दीपाला पहिलीच्या वर्गात बसवून चौथीच्या वर्गात निघाली की दीपा तिच्या पाठोपाठ चौथीच्या वर्गात हजर होई . आईला सोडून पहिलीच्या वर्गात बसायला दीपा तयार व्हायची नाही . तेव्हा सौ. भोई मॅडमनी उत्तम मार्ग काढला . त्या म्हणाल्या , "पाटील मॅडम , बसू द्या तिला तुमच्या वर्गात काही दिवस . मी तिची हजेरी लिहिते .
काही दिवस निघून गेले सौ. भोई मॅडम दररोज चॉकलेट घेऊन यायच्या आणि मधल्या सुट्टीत जेवायला बसताना ते चॉकलेट दीपाला द्यायच्या . हळूहळू दीपाला भोई मॅडम यांचा लळा लागला . ती पहिलीच्या वर्गात जाऊन बसू लागली .
दिवसा मागून दिवस चालले होते . एके दिवशी भोई मॅडमला दीपाचा नवा पैलू आढळला . तो दिवस प्रजासत्ताक दिन होता . मॅडमनी तिला एक छोटेसे भाषण लिहून दिलं होतं . ते भाषण दीपानं जसंच्या तसं म्हणून दाखवलं . सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचं कौतुक केलं . प्रमुख पाहुणे चंद्रकात सुतार यांनी तिला पाच रुपये दिले होते बक्षीस म्हणून . येथेच उगम झाला दीपाच्या वक्तृत्व कलेचा . प्रत्येक कार्यक्रमात तिनं भाग घेतला पाहिजे असा हट्टच असायचा तो भोई मॅडम यांचाच . आमच्या मुलीपेक्षा ती त्यांची विद्यार्थिनी म्हणून जवळची बनली होती. तिची आई तिला वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील माहिती संकलन करून आणि विविध पुस्तकातील महत्त्वाचे उतारे एकत्र करून देऊ लागली . दीपाही वाचनात गुंग होऊन जायची . तेव्हापासून तिला कोडी सोडवायचा छंद लागला होता . तिच्या ज्ञानात भर पडत गेली .
दीपा चौथीच्या वर्गात गेली . तिला स्कॉलरशिप परीक्षेसाठी बसण्याचा आग्रह तिच्या आईने केला होता . त्यामुळे तिला वक्तृत्वाकडे थोडे दुर्लक्ष करायला सांगितले होते . तर ती खवळून उठली . माझ्याशी ती बोलायची बंद झाली . आईशीही तिने अबोला धरला होता . शेवटी आम्हांला माघार घ्यावी लागली . तिने स्कॉलरशिपबरोबर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला . फेब्रुवारी महिन्यात स्कॉलरशिप परीक्षा आणि शिवजयंती कार्यक्रम आलेला होता . एकीकडे स्कॉलरशिप परीक्षेची तयारी आणि दुसरीकडे वक्तृत्वाची तयारी अशी दुहेरी कसरत तिला करावी लागत होती . वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय होता - 'छत्रपती शिवाजी महाराज -जाणता राजा . ' त्यात तिने पहिला क्रमांक पटकावला . संपूर्ण शहरातून कौतुक झालं तिचं . नगराध्यक्षांच्या हस्ते मिळालेलं स्मृतिचिन्ह आजही त्या प्रसंगाची आठवण करून देते. ते स्मृतिचिन्ह शोकेसच्या डाव्या बाजूला अगदी पुढे ठेवलेले आहे . जून महिन्याच्या तीस तारखेला स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला . दीपाचा कोल्हापूर जिल्ह्यात २१ वा आणि शहर विभागात दुसरा क्रमांक आला होता . आम्हांला दीपाच्या यशाचा खूप आनंद झाला होता . पण आमच्या पेक्षाही भोई मॅडम यांना त्याचा आनंद अधिक होता . कारण सारं श्रेय त्यांचं होतं . त्यांनी संपूर्ण शाळेत साखर वाटली होती . दीपा तर त्यादिवशी मोरासारखी थुई थुई नाचत होती . शशिकलानं पुरणपोळीचा बेत केला होता . संपूर्ण गल्लीला जेवणासाठी बोलावलं होतं . सर्वांच्या जीवनातील तो एक अविस्मरणीय क्षण ठरला होता . भोई मॅडमनी दिलेला शब्द खरा करून दाखवला होता . दीपा आणि भोई मॅडम यांचे सत्कार अनेक ठिकाणी झाले होते. पण नगराध्यक्ष कोरे साहेबांनी केलेला सत्कार अवर्णनीय होता . त्यांनी केलेले कौतुक मॅडमच्या कामगिरीला साजेसे होते . सत्काराला उत्तर देताना मॅडम रडल्या होत्या . त्या म्हणाल्या , "या यशाची खरीखुरी मानकरी दीपाच आहे . माझ्या हाती कोहिनूर होता . त्याला फक्त पैलू पाडण्याचे काम मी केले आहे . बोलताना त्यांच्या शब्दांशब्दांतून दीपाबाबतचा सार्थ अभिमान व्यक्त होत होता .
एकेक पायरी सर करत दीपा आता दहावीच्या वर्गात गेली होती . जीवनाच्या नव्या उंबरठ्यावर ती उभी होती . दहावीचं वर्ष महत्वाचं मानलं जातं. विद्यार्थ्यांबरोबर पालकांना टेन्शन असतं . ताणतणावाचं वर्ष असते . अभ्यासाकडे खूप लक्ष द्यावे लागते . दीपानं नववीपर्यंत कधीही पहिला क्रमांक सोडला नाही . नेहमी ९० टक्क्यांच्या घरात ती खेळत होती . त्यामुळे नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . नाळे एस . एम . आणि सर्व शिक्षकांना तिच्याबाबत खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या . सर्वांचे एकच ध्येय होतं , की दीपाला बोर्डाच्या यादीत चमकावायचे आहे . त्यासाठी पडणारे सारे कष्ट सोसायला सगळे तयार होते . मुख्याध्यापक श्री . नाळेसरांनी नवनीत , सन्मित्र , चाणक्य , दहाड अशा अनेक प्रकारच्या प्रकाशनांच्या प्रश्नपत्रिकांचे संच खरेदी करून ठेवले होते . टॉप टेन विद्यार्थी निवडून त्यांना विशेष मार्गदर्शन ठेवले होते . दीपावली सुट्टी पूर्वीच सर्व अभ्यासक्रम संपवून दुसऱ्या सत्रात केवळ प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर दिला होता . जिल्ह्यातील प्रत्येक विषयातील तज्ज्ञ विषय शिक्षक बोलावून व्याख्यानमालेचे आयोजन केले होते .
शिक्षकांच्या या प्रयत्नाला आम्हीही आमच्या परीने मदत करत होतो . रात्री उशिरापर्यंत दीपा अभ्यासासाठी बसायची . तिच्याबरोबर तिची आई जागायची . तर मी सकाळी लवकर उठून दीपाला अभ्यासाला बसवायचं काम करत होतो . जणू दीपाच्या यशासाठी सगळ्यांनी जिद्द केली होती .
५ मार्च १९९९ रोजी एस. एस. सी. परीक्षा सुरू झाली होती . पहिला पेपर मराठीचा चांगला गेला होता . हिंदीचाही पेपर चांगला गेला होता . हे आम्हांला तिच्या घरी येण्यावरून कळत होते . अगदी खुशीत पळत ती घरी यायची . तिसरा पेपर इंग्रजीचा होता . अगदी मन लावून दीपा पेपर सोडवत होती . निम्मा पेपर सोडवून झाला असेल , अचानक भरारी पथकाने त्या परीक्षा केंद्रावर धाड टाकली . भरारी पथकातील लोकं सर्व वर्गातून फिरून दीपाच्या परीक्षा हॉलमध्ये आले . त्यावेळी अघटित असं घडलं . अधिकारी तपासणी करत दीपापर्यंत आले . तिला उठवले . कारण तिच्या पायात कागद पडलेला त्यांना दिसला होता . अधिकाऱ्यांनी तिला खडसावून विचारले , "बोल ही कॉपी कुणाची आहे? तुझीच आहे ना ही काॅपी ? "
" मी कॉपी केलेली नाही . " असे तिनं उत्तर दिलं .
" मग कोणी केली ? कशी आली इथे ? "
" मला काय माहिती ?" दीपा म्हणाली .
"असं काय ! तुला माहीत नाही ? दे तो पेपर इकडे . त्यावर शेरा लिहितो लाल शाईने काॅपी म्हणून ." असं म्हणून त्या अधिकाऱ्याने पेपर हिसकावून घेतला . दीपा ओक्साबोक्शी रडू लागली . गोंधळ ऐकून शेजारच्या रूममध्ये पर्यवेक्षण करणारे सानेसर तेथे आले . त्यांनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितले . ते म्हणाले , "साहेब , ही मुलगी कॉपी करणं शक्य नाही . तिचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत . ती आमच्या शाळेची आदर्श विद्यार्थिनी आहे . तिनं कॉपी केली नाही अशी मी साक्ष देतो ."
जेव्हा त्या अधिकाऱ्यांना दीपा आमची मुलगी आहे असं समजलं . तेव्हा त्यांना खात्री पटली . त्यांनी तिची पाठ थोपटली . ' शांतपणे पेपर लिही ' असं म्हणून ते हॉलच्या बाहेर पडले . पण त्या अनपेक्षित प्रसंगाने दीपा मात्र गोंधळलेली होती . तिच्या मनावर दडपण आलं होतं . त्याचा पेपरवर परिणाम झाला होता . कारण तिला इंग्रजी पेपरमध्ये अपेक्षेपेक्षा सहा गुण कमी पडले होते . आणि इथंच तिचा गुणवत्ता यादीतील क्रमांक हुकला होता . गुणवत्ता यादीत येण्यासाठी तिला एक गुण कमी पडला होता . याचं तिला खूप दुःख झालं होतं . आम्हीही नाराज झालो होतो . पण त्याहीपेक्षा जास्त शाळेतील सर्व घटकांना वाईट वाटत होतं . कारण एका गुणाने शाळेचा इतिहास घडला जाणार होता . संपूर्ण शाळा , शहर हळहळत होतं . हीच संधी होती . यापूर्वी कुणीही गुणवत्ता यादीत आलं नव्हतं आणि यानंतर कुणी येऊ शकेल हे सांगता येणार नाही . सर्वांचाच अपेक्षाभंग झाला होता . शाळेचे मुख्याध्यापक श्री . नाळेसर आमच्या घरी आले होते . कारण दोन दिवस झाले दीपा जेवली नव्हती . तिला आपली चूक आहे असं वाटत राहायचं . मुख्याध्यापक , शिक्षक व माझे आई-वडील , माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांची मी अपराधी आहे . म्हणून ती स्वतःला दोषी समजत होती . ती कोणाशीही मोकळेपणाने वागत नव्हती . तिचा चिडचिडेपणा फार वाढलेला होता . म्हणून आम्हीच मुख्याध्यापकांना घरी बोलावलं होतं . तेच काहीतरी मार्ग काढतील असं वाटत होतं .
श्री . नाळेसर घरी येऊन दीपाला म्हणाले , " जे व्हायचं होतं ते झालं . इंग्रजी पेपरच्या वेळी घडलेल्या रामायणामुळे हे घडलं . तू वाईट वाटून घेऊ नकोस . अगं तुझ्यासारखी अनेक जण या गुणवत्ता यादीपासून दूर राहिलेले आहेत . हे बघ दीपा , ही परीक्षा म्हणजे सर्वस्व नव्हे . अजून आयुष्यामध्ये भरपूर परीक्षा द्यावयाच्या आहेत तुला . मला खात्री आहे की , तू सर्व परीक्षांमध्ये पास होशील . असा आशीर्वाद आहे माझा . दीपा , निराशा हा काही जीवनातील उद्दिष्टपूर्तीचा मार्ग नव्हे . त्यासाठी आशेतूनच उद्दिष्टपूर्तीसाठी मार्गक्रमण करता येईल ."
श्री . नाळेसरांच्या बोलण्याचा प्रभाव दीपावर झाला . ती सावरली . तिला एस. एस. सी. परीक्षेत ८९.७ टक्के गुण मिळाले होते . .तिचा अनेक ठिकाणी सत्कार झाला . तिने शाळेत नवीन रेकॉर्ड निर्माण केले होते . तरीही ती गुणवत्ता यादीत आली नव्हती ही बोच तिच्या मनात होती .
अकरावीला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा याबाबत मतमतांतरे होती . श्री . नाळेसर आणि सर्व शिक्षकांना वाटायचं तिनं इंजिनीयर व्हावं . तिची इच्छा होती की , आपण डॉक्टर व्हावं . पण आम्हां माता-पित्यांना वाटायचं की तिनं आमचा वारसा पुढे चालवावा . शेवटी तिच्या इच्छेप्रमाणे तिचा प्रवेश विवेकानंद कॉलेजमध्ये अकरावी सायन्सला घेतला . वाऱ्यासारखी दोन वर्षे भुर्रकन उडून गेली . तिने बारावी सायन्सची परीक्षा मार्च २००१ मध्ये दिली . जूनमध्ये बारावीचा निकाल लागला . अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण तिला मिळाले होते . आपोआप मेडिकल आणि इंजीनियरिंगचा मार्ग बंद झाला होता. ती म्हणायची , "डोनेशन न देता मेडिकलला प्रवेश मिळाला तरच घेणार ." ८० टक्केला मेडिकलला प्रवेश मिळणे अवघड होते . त्यामुळे तिला डी. एड . कॉलेज , कोल्हापूर येथे प्रवेश घ्यावा लागला . या ठिकाणी तिच्या कलागुणांना वाव मिळाला . प्रत्येक कार्यक्रमात ती सहभाग घ्यायची . वक्तृत्व , निबंध , चित्रकला स्पर्धावर तिची हुकुमत होती . सांस्कृतिक कार्यक्रमात ती हिरीरीने भाग घ्यायची . प्रथम वर्ष डी. एड. मध्ये तिनं वीस बक्षिसं मिळवली होती . त्यावेळी प्राचार्य म्हणाले होते , "दीपा दुसऱ्यासाठी काहीतरी बक्षिसं ठेव शिल्लक ."
डी . एड. द्वितीय वर्षातील द्वितीय सत्रात असताना तिला एक स्थळ आलं होतं . मुलगा एका विद्यालयात शिक्षक पदावर काम करत होता . तो नोकरीवर कायमचा झालेला होता. त्यामुळे तो दीपाच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार हे निश्चित होतं . म्हणून तिचं लग्न करून दिलं . तिचा नवरा विनायक हा स्वभावाने शांत होता . त्याच्याबरोबर घरी विधवा आई होती . कोल्हापुरातील एका उपनगरात त्याने फ्लॅट घेतलेला होता .
.........दोघांचा राजा-राणीचा संसार सुरू झाला होता . दीपाचं डी. एड. पूर्ण झालं . विनायकनं दीपाला जवळच्या शाळेत नोकरीला लावलं . संसाररूपी वेलीवर एक सुंदर फूल उमललं . मोठ्या थाटामाटात बारसं घातलं . तिच्या पाय गुणाने दीपाला नोकरी लागली , म्हणून तिचं नाव गुणवंता ठेवलं . पोर सुद्धा गुणाची होती . शांत स्वभावाची . भूक लागली की कुरकुरायची . खायला घातले की हसत पडायची . ती हळूहळू मोठी होऊ लागली . ती 'गुणा ' नावानं परिचित झाली . गुणा सहा वर्षाची झाली . ती पहिलीच्या वर्गात जाऊ लागली . दीपाच्या शाळेत जात असल्यामुळे कोणतीही अडचण नव्हती .
त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. विनायक आणि दीपा यांच्यात खटके उडू लागले . कारण दीपाचे होणारे कौतुक विनायकला सहन होत नव्हते . दीपाचा वर्ग सुधारू लागला . मुलांमध्ये दीपा मिसळून गेली होती . शाळेत विविध उपक्रम राबवत होती . केंद्रप्रमुख , शिक्षणाधिकारी यांनी दीपाच्या कार्याचं कौतुक केलं होतं . अनेक शाळांमधून तिची व्याख्याने होऊ लागली . तिला सहकार्य करायचे सोडून तो तिचा द्वेष करु लागला . कारण त्याचा पुरुषी अहंकार जागृत झाला होता . तो तिच्याशी भांडू लागला . तिचा पगार झाला की , तो सगळा पगार काढून घेऊ लागला . तिच्या नावावर कर्ज काढू लागला . स्वतःचा पगार आणि तिचाही पगार तो व्यसनांमध्ये संपू लागला . इतके महाभारत होऊनही तिने आम्हाला काहीही कळू दिले नाही . मुकाटपणे ती सारे सहन करत होती .
...........आणि तो काळा दिवस उगवला . त्या दिवशी रविवार होता. तो सुट्टीचा दिवस होता . सकाळी उठल्याबरोबर तो दारू ढोसून आला होता . कर्जाच्या पासबुकावरून दोघांच्यामध्ये संघर्ष झाला . दीपा म्हणाली , "असं दिवसागणिक मरण्यापेक्षा एकदमच मारून का टाकत नाही ?"
" थांब तुला एकदमच मोक्ष देतो ." असं म्हणून त्यानं दीपाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले . दीपा त्यात संपूर्ण भाजलेली होती . तिला सरकारी दवाखान्यात विनायक घेऊन गेला होता . दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतलेला होता ..........
.........आणि अचानक आमच्या दारात अम्बॅसिडर गाडी उभी राहिली . गाडीत बसून दीपाच्या घरी पोहोचलो . तर आत सोप्यात तिला झोपलेली . विनायक ताडमाड उभाच . शशिकला आत गेली . दीपाच्या प्रेतावर पडून ओक्साबोक्सी रडू लागली . माझ्या डोळ्यात आसवं आली . भिंतीला टेकून टिपं गाळत उभा होतो . हळूहळू शेजारी-पाजारी जमा झाले . पाहुण्यांना कळवलं . शशिकलाची तर सारखी दातखिळी बसत होती .......
......... दीपाचं प्रेत उचललं . स्मशानभूमीकडे नेलं . ती आता आमच्यापासून खूप दूर निघून गेली होती . खूप दूर ....खूप दूर .....खूप दूर....
लेखन :
परशराम रामा आंबी
श्री नवनाथ हायस्कूल
पोहाळे तर्फ आळते
ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
मोबा . नं . ९४२१२०३७३२
कथा मिळाली की कळवा.
ReplyDeleteकथा मिळाली की कळवा.
ReplyDelete