परिसंवाद - 'काय आहेत मोबाईलला पर्याय'

परिसंवाद विषय *काय आहेत मोबाईलला पर्याय*
 मोबाईल! मोबाईल!! मोबाईल!!!
 या मोबाईलनं आज माणसाचं सारं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि काही वेळा झोपल्यानंतरही मोबाईल आणि मोबाईलचा विषय आपल्या आजूबाजूला सुरू असतो. म्हणजेच मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. उठता बसता या मोबाईलचेच नाव आपल्या ओठावर येते. या मोबाईलचाच अति वापर झाला आहे. याला कारण कोरोनाचा काळ. या काळामध्ये शाळा बंद झाल्या होत्या. आणि ऑनलाइन शिक्षणाचा जमाना आला होता. चार वर्षात कोरोना गेला पण मोबाईल मागे ठेवून. असं म्हणतात की 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज हा भारत देश सोडून गेले. पण इंग्रज आपली शिक्षण पद्धती आणि कायदे इथेच ठेवून गेले. त्याप्रमाणे कोरोना आला नाही गेला, पण मोबाईल मात्र आपल्या ताब्यात देऊन गेला. खरंतर आजचे शिक्षण, मनोरंजन, संपर्क आणि व्यवसायसुद्धा मोबाईलमय  झाला आहे. आज असं एकही क्षेत्र नाही की जिथे मोबाईलचा वापर केला जात नाही. खरं तर या मोबाईलच्या अतिवापराने आपले वैयक्तिक आरोग्य, सामाजिक जीवन आणि मानसिक विकार यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणूनच आज या साहित्य संमेलनातील परिसंवादाला विषय मिळाला आहे - *काय आहेत मोबाईलला पर्याय*
 खरंच! पूर्वी मोबाईल नव्हता म्हणून मानव जीवन जगत नव्हता का? का माणसांचे जीवन योग्य आणि चांगले नव्हते? होतेच ना! त्याप्रमाणे आजही आपणाला मोबाईलला काही पर्याय आहेतच. आणि ते शोधण्याची आपणाला नितांत गरज आहे. माझ्यामते या मोबाईलला पुढील प्रमाणे निश्चित पर्याय आहेत.
*१) शिक्षण क्षेत्रातील पर्याय*
 ग्रंथालय व पुस्तके - ग्रंथालय आणि पुस्तके हेच ज्ञानाचे खरे व शाश्वत स्त्रोत आहेत. या पुस्तकांमुळे संविधान कर्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारखे महामानव निर्माण झालेत. त्याप्रमाणे ग्रंथांचे आणि पुस्तकांचे वाचन करणे हे फार महत्त्वाचे आहे. पण आज-काल पुस्तकांचे वाचन फारसे होतच नाही. ते करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना, मुलांना परावर्तित केले पाहिजे. पुस्तक वाचनाने माणूस घडतो असे माझे मत आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे.  अवांतर वाचनाची गोडी लावली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा, प्रात्यक्षिके यातून अनुभवावर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. मग मुले आपोआप वाचनाकडे वळतील. 
*२) संवादाचे पर्याय* 
आजही प्रभावी आणि वैयक्तिक भेटीगाठी घेणे महत्त्वाचे आहे. आपण पाहतो की पूर्वी साधे पत्र लेखन होते, तरी त्या पत्राच्या माध्यमातून वेगवेगळी नाती अधिक दृढ होत होती. मामा-भाचे, आजोबा-नात/नातू, मित्र अशी कितीतरी नाती जोडली गेली होती. आजही आपण पत्र लेखनाला प्राधान्य दिले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटीगाठीतून संवाद साधला पाहिजे. त्यामुळे मनं जवळ येतील आणि मोबाईल दूर होईल. मोबाईलच्या पूर्वी दूरध्वनी म्हणजे लँडलाईन हे सुरक्षित आणि कमी व्यसनाधीन करणारा पर्याय होता. पण आज मोबाईलमुळे  जीवन खूपच व्यापक झाले आहे. त्यामुळे संवादाचा पर्याय निवडल्यास मोबाईल हा आपोआप दूर जाईल.
*३) मनोरंजनाचे पर्याय*
मनोरंजनाच्या पर्यायामध्ये खेळ हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये मैदानातील खेळ जसे की कुस्ती, कबड्डी, खोखो यांसारखे पारंपरिक देशी खेळ खेळल्यामुळे मनोरंजन तर होते. त्याचबरोबर आपले आरोग्य आणि शरीर तंदुरुस्त राहते. तसेच खेळांमुळे एकमेकांना चांगली वागणूक दिली जाते व निर्दोष स्पर्धा जोपासली जाते. त्याचबरोबर बुद्धिबळ, कॅरम यासारखे बैठे खेळ खेळल्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा विकासही होतो. त्याचबरोबर नाटक, चित्रपट यामधून मनोरंजन होते आणि सांस्कृतिक जाणीव वाढविली जाते. समृद्ध केली जाते. संगीत, चित्रकला, छंद जोपासायला सांगितले पाहिजेत. त्यातून सर्जनशीलता वाढवण्यासाठी मदत होते.
*४) सामाजिक व मानसिक पर्याय* 
कुटुंबीय समवेत वेळ घालवल्यामुळे घरगुती संवाद वाढतो व मायेचे नाते मजबूत होते. म्हणून मुलांना एकत्र घेऊन जेवायला बसावे. वेगवेगळ्या विषयावरती मुलांशी हितगुज करावे. म्हणजे मुलांचे सामाजिक व मानसिक आरोग्य वाढेल. त्याचबरोबर मुलांना आपल्या मित्राशी मैत्री करण्यास सांगून त्यांना गप्पागोष्टीमध्ये वेळ घालवण्यास सांगावे. तसेच मित्रांची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर मिळणारा आनंद आणि मानसिक समाधान हे वेगळेच असते म्हणून मुलांना मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा गप्पागोष्टीमध्ये वेळ घालवण्यास सांगणे हे फार महत्वाचे आहे. तसेच मुलांना ध्यान आणि योग यांचे महत्त्व सांगून ते करण्यास सांगावे. म्हणजे मुलांच्या मनातील मानसिक ताण तणाव कमी होऊन मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहील.
*५) आरोग्य विषयक पर्याय*
आज आपण मोबाईलचे दुष्परिणाम किती आहेत हे  जाणतोच आहे. यामध्ये मुलांच्या डोळ्यांचे, मानेचे आजार वाढलेले दिसून येतात. म्हणून मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांना सकस आहार दिला पाहिजे. व्यायामाचे महत्त्व सांगितले पाहिजे. तसेच ते जितके खेळतील तितके त्यांचे आरोग्य चांगले राहील हे त्यांना पटवून दिले पाहिजे. म्हणजे मुलांचे आरोग्य चांगले राहील.
 खरं म्हणजे बदलत्या काळामध्ये बदलणे आवश्यक आहे.ई मोबाईलचा उपयोग आज आहेच. पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता त्याला पर्याय शोधून आपण संतुलित राहणे गरजेचे आहे. कारण आपल्या जीवनाचे मोबाईल हे साधन आहे; पण ते साध्य नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजेच आपले जीवन सुकर होईल व भरभराटीचे होईल.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी