वीरांगना हौसाक्का पाटील

.
*वीरांगना हौसाक्का पाटील*
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार करता आपल्या डोळ्यासमोर अनेक स्वातंत्र्यसेनानी उभे राहतात. त्यातील पहिले नाव आपल्यासमोर येते ते साताराच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचे. क्रांतिसिंह नाना पाटील म्हटले, की साताऱ्याचे प्रतिसरकार आठवते आणि त्यांचे पत्री सरकार आठवते. हा सारा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहे.                   पण मी आपल्यासमोर एक वेगळा विषय मांडत आहे. तो म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्येचा. हौसाक्का यांचा. लहानपणापासूनच हौसाक्का यांच्यावर त्यांच्या वडिलांचा म्हणजेच क्रांतीसिंह नाना पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्यातीलच हा एक प्रसंग.
           पोर्तुगीज पोलिसांच्या ताब्यात इंजिनाच्या बोटी होत्या. त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या क्रांतिकारकांच्या मागे लागलेल्या होत्या. पोर्तुगीज पोलिसांपासून वाचण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांनी गोव्याच्या मांडवी नदीच्या पात्रात उड्या घेतल्या होत्या. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी मांडवी नदीत रात्रभर पाण्यात पोहणारी 
वीरांगना म्हणजे हौसाक्का पाटील.
बीड जिल्ह्याचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील या अत्यंत धाडसी होत्या. हौसाक्का पाटील यांच्या कार्याचा इतिहास दुर्दैवाने महाराष्ट्राला माहीत झालेला नाही.

ब्रिटिशाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे मिळवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यामध्ये शस्त्र खरेदी करताना पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना पकडले होते आणि पणजीच्या कारागृहात बंद केले होते. 

पकडलेल्या क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी क्रांतिसिंहानी त्याची जबाबदारी आपली कन्या हौसाक्का पाटील व त्याचे सासरे यांच्यावर सोपवली होती.

हौसाक्का ही पकडलेल्या साथीदाराची बहीण म्हणून कारागृहात त्यांना भेटायल्या गेल्या होत्या. केसांच्या अंबाड्यात ठेवलेल्या चिठ्ठीत क्रांतिकारकांना निरोप दिला होता की आपण कारागृहातल्या झाडावरून झोका घेत नदीत उड्या मारा. आम्ही नदीत नाव घेऊन थांबतो. 
   
 ठरल्याप्रमाणे क्रांतिकारकांनी झाडावरून उड्या मारल्या आणि नावेत बसून निघाले.  पोर्तुगीज पोलिसांना याची चाहूल लागली. त्यांनी  इंजनाच्या होड्या क्रांतिकारकांच्या मागे लागल्या. 

नावेतून उड्या मारताना नावेत असलेले रॉकेलचे डबे पोटाशी धरून हौसाबाई व त्यांचे सासरे यांनी मांडवी नदीत रात्रभर पोहत राहिले होते. ते पोहत पोहत कर्नाटकातील जंगलात आले होते.

जंगलामध्ये जळू होत्या. त्या जळू पायाला लागल्या, की त्या माणसाच्या शरीरातील रक्त शोसून शरीर पोखरून टाकत होत्या. जळू शरीराला चिकटू नये म्हणून तंबाखू तोंडात चघळून ती पायाला लावावी लागते. हौसाबाईंना ते जमत नव्हते. कारण त्या तंबाखू खात नव्हत्या. त्यामुळे त्यांचे सासरे तंबाखू हातावर घेऊन मळत आणि तोंडात टाकून तो हौसाबाईंच्या पायावर थुंकत. असे पंधरा दिवस जंगलात भटकत राहिले. त्यानंतर काही दिवसांनी ते सांगलीला येऊन क्रांतिकारकांना भेटले. 

(*--हरिभाऊ सोळंके* 
सादोळा ता. माजलगाव जि. बीड यांच्या माहितीवरून)

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी