पुस्तक परीक्षण -गोष्ट साडेपाच मिलियन डाॅलरची

*गोष्ट साडेपाच मिलियन डाॅलरची* 
        *धनाजी माळी*

प्राथमिक शिक्षक असणारे आणि लेखनाच्या प्रेमात पडलेले धनाजी माळी यांनी *गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची* हा कथासंग्रह लिहिला आहे. हा कथासंग्रह वाचून मी नुकताच संपविला. खरे तर अतिशय सुंदर कथासंग्रह म्हणून याची नोंद घेता येईल. त्यामुळेच दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरसारख्या एका साहित्यिक संस्थेचा पुरस्कार या कथासंग्रहात प्राप्त झाला आहे. खरं म्हणजे शिक्षिकी पेशामध्ये आल्यानंतर पुस्तकांचे वाचन करावे लागतेच. अनेक शिक्षक अनेक पुस्तके वाचत असतात. परंतु सर्वच शिक्षक लेखन करतात असे नाही. लेखन करावे वाटले तरी ते लेखनाच्या भानगडीत पडतात असे नाही.
     पण आमच्या धना गुरुजींनी अनेक साहित्यिकांची पुस्तके वाचली. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकरांपासून चारुता सागर, आप्पासाहेब खोत, जयवंत दळवी, आनंद यादव, विश्वास पाटील, कृष्णात खोत, सचिन पाटील, डॉ. श्रीकांत पाटील अशा लेखकांची वेगवेगळे साहित्यिक मूल्य असणारी पुस्तके वाचली. या लेखकांच्या साहित्याचा प्रभाव धनाजी माळी यांच्यावरती पडलेला दिसून येतो.  
आणि याच दरम्यान धनाजी यांचा सहवास डाॅ. सुनीलकुमार लवटे, चंद्रकांत निकाडे, डाॅ. श्रीकांत पाटील या विभुतींशी आला. याच नव्या उर्मीतून *गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची*  हा कथासंग्रह वाचकांच्या हाती दिलेला आहे.
 खरे तर काळ झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात नवयुवक समाज माध्यमांवर नवनवीन विचार मांडत आहेत. याच प्रसार माध्यमांमध्ये धनाजी माळी हे गायक म्हणून पुढे आले. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी गायन सुरू केले. प्रसार माध्यमातून छोटे छोटे विचार मांडायला सुरू केले. चंद्रकांत निकाडे, डाॅ. सुनीलकुमार लवटे यांच्या सहवासातून त्यांच्या साहित्यांवर संस्करण होऊ लागले. लेखनाची उर्मी मिळाली. त्यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून छोट्या छोट्या प्रसंगाचे अतिशय सुंदर लेखन केले. त्यातून त्यांना कथेची बीजं मिळत गेली. आणि त्यांच्या हातून कथालेखन झाले.
        विद्यार्थी दशेत घडलेले प्रसंग त्यांनी गमतीदार प्रसंगातून मांडणी करून लिहिले. त्यातून *भूतचेष्टा* ही कथा लिहिली गेली. किशोरवयातील मुलामुलींचे आकर्षण लक्षात घेता त्याच वयातील नाजूक, निरागस प्रेम संबंधाबाबत *रुबाब* नावाची कथा निर्माण झाली. एसएससी बोर्ड परीक्षा ही सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग असणारी घटना. पण बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांची अवस्था, कुटुंब, समाज, मित्रपरिवारात घडणारे प्रसंग. त्याचे भावस्पर्शी चित्रण त्यांनी *जिद्द* या कथेतून केले आहे. खरा भारत ग्रामीण भागात आहे असे म्हणतात. ग्रामीण भागात अठरापगड जाती जमाती विखुरलेल्या असतात. त्यांचे कष्ट, उदरनिर्वाह चालवण्यासाठी करावे लागणारे कष्ट. देवाच्या नावाखाली भिक्षा मागून पोट भरणारा समाज. त्याचे वर्णन *डोंबलाचे मोल*  या कथेत  प्रामाणिक कष्ट करणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे वर्णन आले आहे. शिकूनही सुशिक्षित बेकार होऊन नोकरी मिळत नाही म्हणून घालमेल होते. पण परिस्थितीवरती मात करून निर्णय दाखवणारी *इंटरव्यू* कथा जन्माला येते.
         आज समाजामध्ये बदल घडलेला दिसून येतो पण बालवयात झालेल्या संस्कारामुळे प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेली राजकीय संधी. त्याचाच वापर समाजाच्या विकासासाठी करून देणाऱ्या एका नायिकेचे दर्शन *गुणी नंदा* या कथेत आपणाला घडते. महाविद्यालयीन जीवन अचंबित करणारे कर्तृत्व, यशाचा मिळणारा सुखद धक्का यामुळे सुसंस्कृत ध्येयवादी तरुण-तरुणीची प्रेरणादायी वाटचाल हे सर्व *मीही तिचा फॅन झालो*  या कथेत येते. तसेच करिअर किती महत्त्वाचे आहे हे दाखवून देणारी ही कथा आहे. 
           या कथासंग्रहाला दिलेले नाव असणारी कथा म्हणजे *गोष्ट साडेपाच मिनिट डॉलरची*  ही शीर्षक कथा आधुनिक काळात समाज माध्यमांचा प्रभाव किती मोठा आहे हे सांगणारी कथा आहे. संपर्काच्या कक्षा गाव - शहर -  राज्य - देश - विदेशी पातळीपर्यंत रुंदावलेल्या आहेत. घडलेल्या विविध घटनेतून वाचकाला वेगळा बोध ही कथा देऊन जाते. बदललेली समाज रचना, नाविन्यपूर्ण संदेश देणारी ही कथा आहे.
        या कथासंग्रहातील कथा वास्तवदर्शी आहेत. कथेतील भाषाशैली साधी व सोपी आहे. कथेतील पात्रं ही आपल्या जवळची वाटतात. कथेतील वाक्ये छोटी छोटी आहेत. कथेतील प्रसंग हे आपल्या जीवनातील घडलेले प्रसंग आहेत असे वाटण्याजोगे आहेत. 
      *गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची* ही कथा गुढ रम्यतेवर आधारित आहे. या कथेतील रमण हा तिसीतील तरुण नायक. एका खाजगी कंपनीत पंधरा हजार रुपये पगारावर नोकरी करतो. सहा जणांचे कुटुंब. त्यालाही वाटायचं काहीतरी चमत्कार होऊन आपणाला खूप पैसे मिळावेत. आणि खरंच एकदा तसा मेसेज त्याच्या फोनवरती येतो. त्याला लॉटरी लागली होती. साडेपाच मिलियन डॉलरची. म्हणजे ३८ कोटींचा खजिना त्याला मिळणार असे त्याला वाटत होते. त्याची स्वप्नं सुरू होतात. वृक्षारोपण, दुष्काळ निवारण अशा अनेक योजना तो ठरवत असतो. त्यातील ६० टक्के रक्कम गरीब व अनाथ लोकांसाठी आणि ४० टक्के रक्कम स्वतःसाठी ठेवायची अशी योजना तो तयार करतो. या स्वप्नामध्येच त्याचे दिवस भराभर जात असतात. शेवटी त्याला ते बक्षीस मिळत नाही.  तरीही तो आशा सोडत नाही. तो मंगल दिन व भाग्याचा क्षण आपल्या आयुष्यात येईल याची तो चातकाप्रमाणे वाट पाहतो. खरंच रमणच्या जीवनात काय काय घडामोडी होतात हे कळण्यासाठी स्वतः पुस्तक वाचायलाच हवे. सर्व कथा वाचनीय आहेत.
        नव्या पिढीतील नव्या दम्याच्या लेखकाचा *गोष्ट साडेपाच मिलियन डाॅलरची* हा कथासंग्रह प्रत्येक वाचकांनी वाचायला हवाच. कारण या कथासंग्रहाला दमसासारख्या अनेक संस्थांचा पुरस्कार प्राप्त होत आहेत. प्रत्येक गावातील प्रत्येक वाचनालयात हा कथासंग्रह ठेवायला हवाच...
************************
 पुस्तकाचे नाव - *गोष्ट साडेपाच मिलियन डाॅलरची* 
लेखक - *धनाजी माळी*
प्रकाशन - *भाग्यश्री प्रकाशन*
मुखपृष्ठ - *संतुक रामराव गोलेगांवकर*
पृष्ठे - *१६८*
किंमत - *₹२५०*
************************

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील