कडेलूट - परीक्षण - परशराम आंबी

*जसं करावं तसं भरावं म्हणजेच  पर्यावरणाचा नाश केला तर माणसांचाच नाश होईल हे वास्तव मांडणारी कादंबरी म्हणजे कडेलूट*
   *- परशराम आंबी* 

       डॉ. श्रीकांत पाटील यांनी कोरोना महामारीमुळे झालेल्या लाॅकडाऊन मधील जीवनावर आधारित लॉकडाऊन कादंबरी लिहिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारी ऊसकोंडी कादंबरी लिहिली. तर २०१९ व  २०२१ च्या महापुराच्या परिस्थितीवर आधारित पाणीफेरा ही कादंबरी लिहिली. अशा सलग तीन यशस्वी कादंबऱ्यानंतर *कडेलूट* ही चौथी कादंबरी वाचकांच्या समोर आणलेली आहे.  मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून डॉ. श्रीकांत पाटील यांचे नाव होत आहे. 
        डॉ. पाटील यांची संशोधन दृष्टी अचाट करणारी आहे. त्यांची हयात गाव-खेड्यात गेल्याने अवती-भवतीचा परिसर, निसर्ग, राजकारण, समाजकारण, ग्रामसंस्कृती, शेतीसंस्कृती यांचा चांगला अभ्यास त्यांनी केला आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी ते अस्वस्थ होतात.  याच अस्वस्थेतून त्यांचे लेखन होत असते. 
        प्रस्तुत 'कडेलूट' ही निसर्गावर होणाऱ्या मानवी आक्रमणांमुळे होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून देणारी दमदार कादंबरी संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी मराठी वाचकांच्या भेटीस आणली आहे. प्रकाशिका डॉ. सुनिताराजे पवार यांनी आणली आहे. कादंबरीमध्ये डॉ. श्रीकांत पाटील यांनी मानवी आक्रमणामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारी वाढ याकडे संशोधक, निसर्ग अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे लक्ष वेधले आहे. निसर्ग हा वेळोवेळी संकेत देत असतो. त्याकडे दुर्लक्ष केले की मानवी जीवित व वित्तहानी ही हमखास होत असते. हेच डॉ. श्रीकांत पाटील यांना सांगावयाचे आहे. त्यांच्या कादंबरीतून फक्त समस्या मांडलेल्या दिसून येत नाहीत, तर त्या समस्येच्या मुळाशी जाऊन, चहूअंगांनी विचार करून त्यावर उपाय सुचविले जातात. कादंबरीतील पात्रांकडून, उपपात्रांकडून त्यांच्या वैचारीक कृतींतून लेखकाचा उद्देश अधोरेखित होतो. हेच त्यांच्या कादंबरीचे वेगळेपण आहे. हे वेगळेपण या कडेलूट कादंबरीतूनही पाहायला मिळते.  
        कादंबरीची पात्ररचना करताना डॉ. श्रीकांत पाटील यांनी विशेष भान राखलेले दिसून येते. देशातील सत्तर टक्के लोक शेती करतात.  त्याहून अधिक लोकं खेड्यामध्ये राहतात. 
          लेखक स्वतः खेडे गावात राहत असल्याने खेडूतांची मानसिकता, राहणीमान, चांगुलपणा, निसर्ग जपण्यासाठीची धडपड पाहायला दिसून येते. समकालीन पिढीची समस्या मांडताना जी काळजी घ्यावी लागते ती लेखकांनी घेतलेली आहे. म्हणून कादंबरीचा नायक तुकाराम हा या कादंबरीचा नव्हे तर संपूर्ण समकालीन पिढीचा प्रतिनिधीत्व करणारा नायक आहे असे मानता येईल.  तुकाराम हा शेतकरी आहे. तसाच तो गावात राहून जोडधंदा म्हणून रोडलगत हॉटेल चालवत आहे. 
            लहानपणी आपल्या संज्या, तुका, बंड्या, पिंट्या, बजरंग या मित्रांच्या संगतीने कथानायक तुकाराम गावातील निसर्गरम्य वातावरणात वाढला आहे. त्यांच्या बरोबरीने करवंदं, जांभळं, चिंचा, बोरे अशा रानमेव्यांचा त्याने आस्वाद घेतला आहे. जनावरांच्या पाठीमागे तो डोंगर कपारीतून फिरला आहे. त्यामुळे गावाची शिव, पंचक्रोशीचाही त्याने धांडोळा घेतला आहे. लेखकाने अतिसूक्ष्म बारकावे टिपले आहेत. त्यामुळे सारा परिसर आपलाच आहे असे वाचकाला निश्चितच वाटते. 
        तुका शेतकरी असून दूध उत्पादकही आहे. साधारणत: खेडेगावात प्रत्येक शेतकरी हा जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतोच. शेतीकडे फिरत गेला तरी जनावरासाठी वैरण घेऊन येतोच. पण या कादंबरीचा नायक थोडा वेगळा आहे. तो आधुनिक विचाराचा आहे. त्याला जनावरांना दावं लावून बंधनात अडकवणे पसंत नाही. म्हणून त्याने आपल्या शेतातच मुक्त गोठा पद्धत सुरू केली आहे. नैसर्गिक गोष्टींची त्याला आवड असल्याचे दिसून येते. 
        ग्रामीण कादंबरी लेखन करणे फारच जोखमीचे असते. निसर्गसौंदर्य हा तिचा गाभा असतो. लेखकाचं कसब आणि कौशल्य पणाला लागते. याचा प्रत्यय या कादंबरीत दिसून येतो. नेमक्या वाक्यातून चित्र डोळ्यांसमोर उभे करण्यात लेखक यशस्वी झालेला आहे असे मला वाटते... 
उदाहरणार्थ : 
*आग ओकणारा सूर्य मावळतीकडे झुकला कशी वाऱ्याची झुळूक मनाला उभारी देऊन गेली. (पान नं. ९)* या वाक्याने केलेली सुरुवात आकर्षक वाटते. श्रीकृष्णाच्या मंदिराबाहेरील मंडपात प्रवचनाची लगबग सुरू झाली, स्पीकरवरून विठू नामाचा गजर सुरू झाला. अशा वाक्यातून चैतन्य सळसळत वाहते याची प्रचिती येते. आजही खेडेगावातून भजन, कीर्तन, प्रवचन यांचा अनुभव आपणास येतो. 
*आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. पौर्णिमा जवळ आल्याने रात्रीच्या वेळी सुद्धा आजूबाजूचा परिसर चकचकीत दिसत होतं. (पान नं. १२)* 
*कडेलूट होताना राखोळीला गेलेल्या मुलांनी पाहिलं. ते अस्वस्थ झाले. सांगायचं कुणाला या विचारत असताना आपल्याच गावातील शिक्षक असलेल्या आंबीसरांना सांगण्याचे त्यांनी ठरविले. (पान नं. २०)* 
*"आप्पा, काय खरं नाही बघा. गाडी इथंपर्यंत आणताना अगदी नाकी नऊ आले." (पान नं. २३)* यावरून रस्त्यांची झालेली वाताहत दिसून येते. 
      डोंगरावर महादेवाचं मंदिर होतं. कधीकधी पायवाटेनं मंदिराकडे जायचे. *जाताना हर हर महादेव अशा घोषणा द्यायचे. (पान नं. १६२)*
         संवाद हा कादंबरी लेखनाचा आत्मा असतो असे मानले जाते. त्यातही बोली संवादाला वेगळाच मान असतो.  स्थानिक वारणाकाठच्या बोली भाषेचा योग्य वापर हे या कादंबरीचे आणखी एक बलस्थान आहे. त्यात कोल्हापुरी बोलीचा रांगडेपणाही दिसून येतो. 
उदाहरणार्थ : 
*"आरं ए तुका, संज्या...आरं कुठं हायसा?" (पान नं २५)*
*"आज आपण निसर्ग रक्षणासाठी योगदान दिलेल्या सरांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला. (पान नं. ३७)*
*सतत पाऊस पडला तर भांगलण टोंगलण कशी करणार? (पान नं. ३७)* 
*"म्हणजे, तुला काय भविष्य कळते काय?" (पान नं.५०)*
*माळीण आणि परवा आमच्याकडं ईशाळवाडीत डोंगरानं गाव गिळलंया! (पान नं. १७१)*
          कादंबरीच्या शेवटी परिशिष्ट दिले आहे. शब्दसूची देऊन बोली भाषेतील शब्दांचे अर्थ दिले आहेत. यातून डॉ. श्रीकांत पाटील यांची संशोधकवृत्ती ध्यानात येते. 
       आशय समृद्धीबरोबरच लेखकाच्या लेखनशैलीसही अनन्यसाधारण महत्त्व आहे. कमीतकमी शब्दांत हुबेहुब वर्णन करण्याचा लेखकाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे, 
*रस्त्यावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. एक कुत्र भुंकलं की लागलीच दुसरी त्याला साथ देत होती... (पान नं ६४)*

*मुंबईला जाताना घाटात रस्ता रुंदीकरणात पोखरलेल्या डोंगरकड्यांना लोखंडी जाळी मारून त्यावर गिलावा थापला आहे... (पान नं. १३६)* 
*आता सारं संपलं.. डगरी भुईसपाट झाल्या...(पान नं. १६२)* 
        त्याचबरोबर जनार्दन महाराज, आंबीसर, खबाले साहेब, नाना, बहीण पुष्पा, धनाजी, अरुण पेपरवाला, संभाजी, तुकादादा, रवी, विशाल, संभाजी... ही कादंबरीतील पात्रे आपापली भूमिका योग्य निभावतात व कादंबरीचा पैस आणि खोली फार मोठी आहे. काॅलेजात शिकणारी मुले, कर्नाटकातील नातेवाईक, मुंबईसारख्या शहरात राहणारे नातेवाईक, यांमुळे कादंबरीचा आवाका फार मोठा आहे.  गुजरात हायवे, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभाग, निपाणी- शिवणी गाव, पुणे-मुंबई हायवेचे वर्णन तिथले ढाबे, मुंबईतले चकचकीत रस्ते, माॅल असे सरमिसळ वर्णन या कादंबरीत आले आहे. 
        कादंबरीची सुरुवात ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील एका ओवीने नि तिच्या निरुपणाने होते, 
         गांवीचे देवळेश्वर। नियामकचि होती साचार 
         तरी देशींचे डोंगर। उगे का असते।। 
         तर कादंबरीचा शेवट संत तुकारामांच्या अभंगाने होतो, 
         वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। 
         पक्षीही सुस्वरे आळविती।। 
        संत परंपरेशी जोडलेले नाते , जीवा-शिवाशी जोडलेला भावबंध याचे लेखन 'कडेलूट'मधून आले आहे. जसा कादंबरीला अध्यात्माचा पाया आहे. तसाच निसर्ग व पर्यावरण जतन करणे हा आत्मा आहे. निसर्ग असो, एखादा प्राणी असो त्याला जीव लावला तर तोही आपल्याला भरभरून देतो. पण त्याची आपण नासधूस केली तर निसर्ग मानवजातीवर कोपल्याशिवाय राहात नाही.  हे लक्षात ठेवण्यासाठीच डॉ. श्रीकांत पाटील यांनी या कादंबरीची निर्मिती केली आहे असे मला वाटते. 
         डॉ. श्रीकांत पाटील यांच्या कादंबरीमालेचा आलेख असाच चढता राहो. एकापेक्षा एक सरस, आशयसंपन्न कादंबर्‍या त्यांनी लिहाव्यात. मराठी भाषा अधिक समृद्ध करावी. 
           कादंबरीबरोबर त्यांनी कविता, कथा, नाटक, बालसाहित्य, नाट्यछटा, ललितगद्य, समीक्षा अशा साहित्यातील सर्व प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. आणखीन करावे अशी शुभेच्छा देतो. माझ्याकडून त्यांच्या भावी लेखन कार्यास खूप खूप शुभेच्छा! 
***

कादंबरी: कडेलूट 
लेखक : डॉ. श्रीकांत पाटील 
प्रकाशन : संस्कृती प्रकाशन पुणे 
पृष्ठे : २००, मूल्य : ३०० रुपये 
***

*श्री. परशराम रामा आंबी*
मुख्याध्यापक, 
श्री नवनाथ हायस्कूल, पोहाळे
(कार्यवाह, मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर) 
मोबा. ८८३०१५९४३७

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील