प्रस्तावना - वास्तव कथासंग्रह - फातिमा मुल्ला

*प्रस्तावना*
*समाजातील सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीवर आणि दांभिकपणावर ओढलेले आसूड म्हणजे वास्तव कथासंग्रह*
           आज आपण एकविसाव्या शतकात वावरत असताना आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. आपले जीवन जगताना आयुष्यामध्ये चाललेली आपली कुतरओढ पाहायला मिळते. आज माणसाचं जीवन व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, ऑडिओ कथांचा खजाना यांनी व्यापून टाकलेलं आहे. जन्माला आलेल्या लहान बाळापासून ते वृद्ध आजी-आजोबापर्यंत सर्वजण मोबाईल फोनच्या माध्यमाकडे आकृष्ट होत आहेत. मोबाईल हे माणसाचं मनोरंजनाचं साधन न राहता ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर आपल्यासमोर ज्ञानाचा विस्फोट झाला आहे; पण त्यातून आपणाला नेमके तेवढे ज्ञान निवडून घेता आले पाहिजे. आपल्यासमोर सर्व प्रकारचा मोहजाल पसरलेला  दिसून येतो. तरीही  आपणाला पुस्तक रूपात मिळालेला खजिना वाचताना निश्चितच आनंद होत असतो. प्रसार माध्यमांच्या या कालखंडात आजही अनेक पुस्तकांची निर्मिती होत आहे. कथा, कविता, नाटक, एकांकिका, संकीर्ण स्वरूपात वाचनासाठी खूप मोठा खजिना आपल्या हाती मिळत आहे. प्रसार माध्यमातून हा खजिना उपलब्ध असतानादेखील लिखित स्वरूपातील पुस्तके वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
          लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून श्री. जमीर मुल्ला यांच्याशी माझी ओळख झाली. रात्री गप्पागोष्टी चालू असताना त्यांनी मला सांगितले की, आपली पत्नी सौ. फातिमा यांना कथा लेखनाचा छंद आहे. त्यांनी काही कथा लिहिलेल्या आहेत.  त्यांना आपला कथासंग्रह प्रकाशित करायचा आहे. मी त्यांना हृदय प्रकाशन, पोहाळे-कोल्हापूर याच्या प्रकाशिका सौ. छाया चंद्रकांत यांच्याशी संपर्क जोडून दिला. योगायोगाने या कथासंग्रहाला प्रस्तावना लिहायची जबाबदारी माझ्यावर आली. त्यानिमित्ताने  मी त्यांच्या कथा वाचून काढल्या. कथा वाचून झाल्यानंतर प्रत्येक कथेवर चिंतन करून काही टिपणे काढली आणि प्रस्तावना लिहायला हाती घेतली. मी अनेक पुस्तकांवर परीक्षणे लिहिली आहेत. पण प्रस्तावना लिहायचा पहिलाच अनुभव आहे. मी माझे मित्र श्री. जमीर मुल्ला, लेखिका सौ. फातिमा मुल्ला आणि प्रकाशिका सौ. छाया चंद्रकांत यांना धन्यवाद देतो. 
           आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसांचा स्वार्थीपणा, संधीसाधूपणा आणि  समाजामध्ये चाललेल्या गोष्टींचं वास्तवदर्शी चित्रण *'वास्तव'* या कथासंग्रहात लेखिकेने केलेले आहे. या कथासंग्रहात एकूण दहा कथा समाविष्ट आहेत. परंतु कथासंग्रहाला एकाही कथेचे शीर्षक नाव दिलेले नाही हेच या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.  लेखिकेने समाजात, आपल्या आजूबाजूला जे घडत आहे. ते पाहिले. तेच कथेच्या रुपात मांडण्याचा खराखुरा प्रयत्न केला आहे. वास्तव समाजजीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून या कथासंग्रहाला दिलेले *'वास्तव'*  हे शीर्षक सार्थ वाटते. कारण लेखिकेची जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची क्षमता, समाजातील निरनिराळ्या गोष्टींचे केलेले निरीक्षण आणि समाजात घडत असणाऱ्या सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, पारंपरिक रीतिरिवाज, रुढी, चालीरीती अशा वास्तव गोष्टींचे निरीक्षण करून त्यांच्या मनाला भिडलेलेल्या आणि मनाला अस्वस्थ करणारे वास्तव त्यांच्या कथांतून उमटलेले आहे. 
          त्यांची पहिली कथा ही दीर्घ म्हणजे सुमारे बावीस पानांची आहे. इतर कथा ह्या संक्षिप्त म्हणजेच दोन-तीन-चार पानापर्यंत मर्यादित आहेत. त्यांच्या कथांचा आढावा घेताना मला त्या कथांतून कळलेला मतिथार्थ या प्रस्तावनेच्या माध्यमातून मांडताना खूप आनंद होत आहे. या कथासंग्रहाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे *वास्तव* कथासंग्रहातील प्रत्येक कथेत नायक नसून नायिका आहे. नायक स्त्री आहे. स्रीप्रधान कथासंग्रह आहे. ती प्रत्येक समस्येशी झुंज देते. लढा देते. काही वेळा तिचा जय होतो, तर काही वेळा तिचा पराजय होतो. हे *पराजयातील जय* या कथेतून आपणाला पाहायला मिळते. काही वेळेला तिचे त्यात अस्तित्वही संपते. ही दीर्घ कथा असल्यामुळे यात अनेक उपकथानके  आली आहेत. पराजयातील जय या कथेची नायिका *कुसुम* आहे. छोट्याशा भावविश्वात वावरणारी ही कुसुम. ती तिच्या जीवनात  अनुभवाचे अनेक चटके सहन करते. त्यातून तिला खूप मोठा अनुभव मिळतो. तिच्यात झालेल्या वैचारिक परिवर्तनामुळे जय पराजयाच्या बाहेरील जगाची तिला जाणीव होते. ही या कथासंग्रहातील दीर्घ कथा आहे. २२ पानांची ही कथा वाचल्यानंतर वाचकांच्या मनामध्ये विचारचक्र सुरू होते. आणि खरंच जय पराजय याच्याही पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव वाचकांना झाल्याशिवाय राहत नाही. 
      दुसरी कथा *वर्चस्व*  ही असून त्याची नायिका ज्योती आहे. ज्योतीच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांची जाणीव वाचकाला करून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. आजही एकविसाव्या शतकात आपण परिवर्तनाची वाट शोधतो आहोत. जाती, धर्माच्या दबावाखाली समाज वावरतो आहे. विचारवंताची विचारशक्ती हीन होत आहे.  परिवर्तनाची वाट बिकट होत असली, तरी परिवर्तन घडणे महत्वाचे आहे हे या कथेतून लेखिकेने स्पष्ट केले आहे. 
            *उपजिल्हाधिकारी* या  कथेत आजही समाजात शिकलेल्या, उच्च विद्याविभूषित स्त्रीची धन, मान, प्रतिष्ठा आणि उपजिल्हाधिकारी असूनही तिला स्री असल्यामुळे अपमानित व्हावे लागते. दुसऱ्या पुरुषाची (उपजिल्हाधिकारी) साथ घेतल्याशिवाय नराधमाला वठणीवर आणू शकत नाही, याचे वास्तव चित्रण या कथेत आलेले आहे. सम विचाराच्या पुरुषाच्या साथीने समाज बदलवण्याची जिद्द ती ठेवते. 
          रजिया आणि काजोल या बहिणींच्या भोवती फिरणारी कथा म्हणजे *अपघात*. एका वडिलांना दोन मुलीचा बाप असणे हेच पाप वाटते. रजिया आणि काजोलच्या जीवनात येणारी वादळे ही त्यांच्या बापाला सोसावी लागणारी शिक्षा वाटते. स्त्रीकडे पाहण्याचा आजही दृष्टिकोन वाईटच आहे.  एकीकडे स्त्रियाला मान सन्मान दिला जातो. त्यांना सावित्रीच्या लेकी म्हणून पूजले जाते. पण तो मान केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांना अन्याय, अत्याचार भोगावे लागतात. 
            नीरा आणि स्वरा या दोन्ही बहिणींना कशी तोडजोड करावी लागते, ते *तडजोड* कथेतून लेखिकेने मांडलेले आहे. निराच्या एका निर्णयामुळे स्वराचं सारं जीवनच बदलून जाते. तिला आपल्या यशाचा मार्ग सापडतो. 
            *प्रतिभा* ही एका बुद्धिवंत मुलीची कथा आहे. पण ती स्त्री असल्यामुळे तिला नजरेआड व्हावे लागते. 
         व्यक्तीचं खरं रूप ओळखणे फार कठीण असतं.  हे प्रतिमा कथेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तीची खरी प्रतिमा कोणती? बाह्य रूपातील की अंतर्मनातील? हे सांगणे कठीण आहे; पण याचा उलगडा लेखिकेने कीर्तीच्या रूपातून केलेला आपणाला प्रतिमा कथेतून पाहायला मिळतो. 
          खरंतर माणसाचं जीवन म्हणजे एक प्रकारची परीक्षाच आहे. त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावरच आपल्या जीवनाचा निकाल अवलंबून असतो. याच आशयाची कथा म्हणजे परीक्षा सीमा आणि वैष्णव या दांपत्यांच्या आयुष्यात येणारे चांगले-वाईट प्रसंग. त्यातून सीमाने हिंमतीने दाखवलेले धाडस, जिद्द, चिकाटी म्हणजे परीक्षा कथा. 
          २१ व्या शतकात वावरत असताना मुलगा किंवा मुलगी होणे हे पुरुषावर अवलंबून असताना आजही मुलगी झाली म्हणून स्त्रियांचा छळ केला जातो. घटस्फोट दिले जातात. म्हणजे आजच्या काळातील ज्वलंत प्रश्न म्हणजे घटस्फोट. ज्यात स्त्रीचा काहीही दोष नसताना तिला दोषी ठरविले जाते. मुलगा झाला नाही तर त्या स्त्रीच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होतो. काही जणी त्याला तोंड देतात, काही जणी कोलमडून पडतात, तर काही जणी आपलं आयुष्य संपवून शेवट करतात. मात्र गुन्हेगार फिरतात उजळ माथ्याने पुन्हा गुन्हे करण्यासाठी. 
            या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे *भूक.* याची नायिका आहे समीना. ही आपल्या भावासाठी, वडिलांसाठी नियमाविरुद्ध लढते. एक स्त्री असूनही पुरुषाप्रमाणे लढा देते. वडिलांना मदत करते आणि भावाला भुकेपासून मुक्त करते.
           हा कथासंग्रह उत्तम आहे. याची भाषाशैली साधी, सोपी, आकलन सुलभ आहे. हिंदी भाषेचा लहेजा आहे. हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्की उतरेल असे मला वाटते. त्यांच्या पुढील लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा. 
                  परशराम आंबी
                       कार्यवाह
मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर. 
                    मुख्याध्यापक, 
श्री नवनाथ हायस्कूल, पोहाळे

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील