भुईपाश कादंबरी - अशोक कोकाटे - पुस्तक परीक्षण

        'कुणी घर देता का घर, कुणी घर देता का घर'  हे वाक्य नटसम्राट नाटकातील असले तरी याची आठवण झाली. कारण म्हणजे माझे मित्र आणि ग्रामीण कथाकथनकार श्री. अशोक कोकाटे यांनी लिहिलेली *भुईपाश* नावाची कादंबरी नुकतीच माझ्या वाचनात आली. त्यांनी लिहिलेल्या या कादंबरीचा परामर्श घेताना नटसम्राट नाटकातील ही वाक्ये सहज माझ्या ओठावरती आलीत. कारण धरण की मरण, जगणं की मरण, माणूस की माणुसकी, कष्ट की नष्ट, दुःखग्रस्त की धरणग्रस्त अशा अनेक विषयांना स्पर्श करणारी श्री. अशोक कोकाटे यांची नवीन कादंबरी म्हणजे भुईपाश. या कादंबरीचा विषय खूप बोलका आहे. वाचकांनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे. कारण वास्तववादी कथानक हे या कादंबरीचे मूल स्त्रोत आहे. कारण लेखक आणि त्याच्या कुटुंबाने भोगलेला धरणग्रस्तांचा वणवा त्यांनी या कादंबरीत मांडलेला आहे. वारणाकाठची बोली, निवडक व मोजकेच प्रसंग, संकट काळात दाखवलेली माणुसकी आणि उरावर दगड ठेवून गावठाणातून पुनर्वसनाच्या ठिकाणी जाताना त्या लोकांची झालेली दयनीय अवस्था या कादंबरीत लेखक श्री. अशोक कोकाटे यांनी अतिशय उत्तम रीतीने लिहिले आहे. म्हणजे त्यांनी भोगलेला संघर्ष, सोसलेला वणव्याचे चटके हे मांडताना त्यामधील अतिरंजकता आणि पाल्हाळीकपणा काढून मोजक्याच घटना आणि प्रसंगाचा दस्तऐवज वाचकांसमोर कादंबरीच्या रूपाने मांडलेला आहे. खरेच माणसाच्या वाट्याला इतकं दुःख भोगायला येतं का? आणि ते भोगल्याशिवाय समजत नाही; म्हणून वास्तवलेखन केल्याबद्दल लेखक श्री. अशोक कोकाटे यांचे मनापासून अभिनंदन करावेच लागेल. 
            'पाणी आडवा पाणी जिरवा'  हा शासनाचा नारा खरं तर गावोगावी माणसांच्या घरापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. खरं तर आज अनेक नद्यांवर बंधारे, धरणे बांधलेली आहेत. त्यामुळे आज गावांचा कायापालट झाला आहे. त्याप्रमाणे शाळी नदीवर पालेश्वर बंधारा, कडवी नदीवर निनाई-परळी बंधारा कानसा नदीवर कांडवण बंधारा आणि वारणा नदीवर चांदोली धरण बांधले गेले. त्यामुळे शाहुवाडीची लाल माती ओलिताखाली आली आणि वारणा खोरा पिकांनी हिरवागार झाला पण वीस-एक वर्षापूर्वीची अवस्था काय होती याचे ऑंखो देखा हाल भुईपाश या कादंबरीत श्री. अशोक कोकाटे यांनी मांडलेला आहे. या कादंबरीचा नायक श्रीधर बारावीची परीक्षा पास झाला आणि त्याला कामधंद्यासाठी त्याच्या वडिलांनी मुंबईला पाठवून दिलं. परंतु गावामध्ये धरण होत असल्याने गावात सर्व्हे होणार होता. त्यासाठी तहसीलदार कार्यालयात खेटे घालून, हेलपाटे मारून, अर्ज-विनंती करून काहीच काम नोकरदार करत नव्हतं. म्हणून श्रीधर विचारण्यासाठी आला होता. त्यामध्ये जमिनीची प्रत टिकाऊ किती, नापीक किती याची माहिती हवी होती. जेव्हा प्रकल्पाचा खरा अर्थ त्यांना कळला. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लोकांचा त्याला विरोध नव्हता; परंतु जो सर्व्हे झाला पण तो चुकीचा होता. त्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु सरकारी माणसं थारा लागू देत नव्हती. 
           श्रीधर पत्र वाचताना त्याचे हात थरथर कापायला लागले होते. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. ते पाहून एक जणानं विचारलं, "आरं, काय एवढं पत्रात लिहिलंय, गंभीर होऊन वाचतोयस?"
त्यावर श्रीधरनं दिलेलं उत्तर पाहा - "आरं लेखानू, आपलं मरण वाचतोय." 
"काय तरी बोलू नकोस, गप्पगुमान जेव." असं म्हणून एक जणानं रश्श्याची पळी श्रीधरच्या ताटात वाढली. तर श्रीधरनं ताट पुढे सारलं आणि पत्र वाचायला लागला. (पान नं. १७) 
            श्रीधर सकाळी शेताकडे फिरायला गेला. बघेल तिकडं पांढऱ्या चुन्याच्या खुणा दिसतो त्या कुठे बांधावरील दगडाला कुठे झाडाच्या बुंध्याला तर कुठे दगड ठेवून त्यावर चुना मारला होता. जणू काय जागोजागी माणसं बसल्यासारखी भासत होती. ही माणसं उद्या आमच्या उरावर नसणार हे श्रीधर पाटलांना ओळखलं होतं (पान नंबर २२) 
गावठाण घराणे छोट्या मोठ्या मुलाला भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मोठ्या पुढाऱ्यांना भेटले, पण होणारं धरण थांबणार नाही हे सगळ्यांनी सांगितलं. यामध्ये गावातील राजकारण कसं चालतं याचेही वर्णन अतिशय हुकमी शब्दांत लेखकाने केलेला आहे. 
         निवेदने, मोर्चे झाले. पण सर्व्हे करताना त्यात सरकारी सावळा गोंधळ पाहायला मिळालाच. तेव्हा साहेब आणि श्रीधर यांच्यामध्ये झालेला संवाद बोलका आहे. 
"श्रीधर पाटील"
 "बोला साहेब,"
"तुम्ही आतापर्यंत निवेदने दिलीत, मोर्चे काढलेत बरोबर."
"होय साहेब." 
"आम्ही तुम्हाला सहकार्य केलं. तुमची मतं ऐकून घेतली."
"हो साहेब."
"तुमचा सर्व्हे झाला. त्याप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केलीसा. आणि आता नुकसान भरपाई घेताना गोंधळ का घालता?" 
"तसं साहेब काहीच झालं नाही. आमचं म्हणणं ऐकून घ्या. सर्कलसाहेबांच्या यादीत घोळ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची नावं यादीत नाहीत." "श्रीधर पाटील, तुमच्या गावातील शेती ही तुमच्याच पूर्वजांच्या आहेत. आम्ही काय दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी केलेल्या नसतात."
"पण साहेब, यात नसणाऱ्यांची नावं आहेत. खाते पुढे झालेल्या नाहीत दप्तरात पाहिजे तशा नोंदी व्हायला पाहिजे होत्या तशा नाहीत म्हणून लोकांची दिशाभूल झाली." (पान नंबर ६४-६५) 
        जंगलात वाघ शिरावा अन् मेंढरांचा कळप भुजून जीवाच्या आकांताने सैरभैर व्हावा अशी अवस्था गावठाणकरांची झाली. तो सर्व्हे नुकसान भरपाई, मोर्चे यापेक्षा जंगलात शिरलेले अक्राळविक्राळ बुलडोझर, डंपर, ट्रॅक्टर बघून गावठाणकार सैरभैर झाले आणि धरणांच्या पाया पूजनाचा दिवस उजाडला. (पान नंबर ७४) 
         श्रीधर एका हातात घोषणांचे फलक तर दुसऱ्या हातात तहसीलदारांना देण्यासाठी निवेदन घेऊन कार्यालयात जात होता. कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली---
"आधी जमीन - मगच धरण"
"तुमचं धरण आमचं मरण"
"आमच्या मागण्या मान्य करा."
"गोरगरीब जनतेला न्याय मिळालाच पाहिजे." "शेतकरी, कष्टकरी जनतेचा विजय असो." अशा घोषणा दुमदुमू लागल्या. 
        शेवटी तो दिवस उजाडला. एके दिवशी पोस्टमन नोटिसीचं लोखंडी घेऊन गावठाणात शिरला..... दोन मोठ्या कुटुंबासाठी एक ट्रक आणि लहान तीन कुटुंबासाठी एक ट्रक अशा पद्धतीनं नियोजन करून गावात उभे केले. गावठाणकरांनी आवरा-आवर करून ट्रकात सामान चढवलं. ज्याला जे गाव मिळालं त्या गावाच्या ट्रकात संसार भरला. आता कुणाची भेट कुठे आणि कधी होईल याचा नेम नव्हता. आयुष्यभर राजकारण आणि भाऊबंदकीच्या भांडणात झुंजणारी माणसं एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली......
....... गावातील भैरी, तुकाई, काळूबाई, ग्रामदैवत हनुमानाला तिथंच सोडून गावठाणकार नव्हे धरणग्रस्त आपापल्या ट्रकांतून पुढच्या गावाला निघाले. 
           या पुस्तकाला मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत निकाडे यांची कादंबरी, लघु कादंबरी, कथा, लघुकथा याच्या विवेचनासह अतिशय उत्कृष्ट प्रस्तावना लाभले आहे. तर मराठीतील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक आणि राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. 
पुस्तक परीक्षण - 
श्री. परशराम आंबी
उपाध्यक्ष, 
अखिल भारतीय शिक्षक साहित्य-कला- क्रीडा मंडळ कोल्हापूर
------------------------------------------------------------
पुस्तकाचे नाव - भुईपाश
पुस्तकाचा प्रकार - लघुकादंबरी 
लेखकाचे नाव - अशोक कोकाटे
प्रकाशन  - हृदय प्रकाशन, कोल्हापूर
पाने - ११२
किंमत - १७५ रुपये

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील