नो मॅन्स लॅंड एकांकिका - सौ. नसीम जमादार
परवा एका लग्न समारंभासाठी जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी हळदीचा भरगच्च कार्यक्रम पाहताना मनाला खूप अस्वस्थ वाटत होतं. पाण्याचा होणारा अपव्यय, वेळेचा होणारा अपव्यय आणि असंस्कृतीचे दर्शन घडवणारा नाच पाहून खूप वाईट वाटत होतं. ही परिस्थिती साधारण: सर्वत्र आढळते. काही अपवाद वगळता. मानव कुठे चालला आहे असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. कारण आज अनेक समस्या असताना, मनुष्य बाटलीबंद पाणी पीत असताना ही पाण्याची चाललेली उधळपट्टी पाहून क्षणभर मी स्तब्ध झालो......
आणि मला मराठी बालकुमार साहित्य सभेच्या कार्याध्यक्षा सौ. नसीम जमादार यांनी लिहिलेल्या *नो मॅन्स लॅंड* या एकांकिका संग्रहाची आठवण झाली. खरंच आज पर्यावरणाची वाट बिकट होत चाललेली आहे. कोरोना हा शाप की वरदान हा संशोधनाचा विषय आहे. कारण यामध्ये मानवाची प्रचंड हानी झाली पण मानव सोडून इतर प्राण्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी झाल्या. समुद्रकिनारी अनेक जलचरांचं मुक्त वावरणं झालेलं होतं. यामुळे मानवाला नसेना पण इतर प्राण्यांना कोरोनाचा कालावधी हा वरदानच वाटत होता असे माझे वैयक्तिक मत आहे.
सौ. नसीम जमादार यांनी लिहिलेला *'नो मॅन्स लँड'* हा एकांकिका संग्रह माझ्या वाचनात आला. यामध्ये *नो मॅन्स लँड* शीर्षक असणारी पहिली एकांकिका आहे. सुसंस्कार ही दुसरी एकांकिका आहे. रंगपंचमी ही तिसरी एकांकिका आहे. या तिन्ही एकांकिका वेगवेगळ्या विषयाच्या आशयाच्या आहेत. *नो मॅन्स लँड* ही पर्यावरण रक्षण करण्याचा मूलमंत्र देणारी एकांकिका आहे. कारण मानवाला आवश्यक असणारे हवा, पाणी, झाड हे तीनही घटक या पृथ्वीतलावरून निघून गेले. मग त्यांच्या शोधासाठी मानवाची धडपड सुरू झाली. या एकांकिकेची सुरुवात अशी होते की, मानवांचा समूह हवा,पाणी व झाड यांना शोधण्यासाठी बाहेर पडतो. ते एकच प्रश्न विचारतात - 'कुठे गेलीत? कुठे गेलेत? आणि या एकांकिकेची सुरुवात होते पोलिसांच्या निवेदनाने....... 'नागरिक हो ....कोणीही घाबरून गोंधळून जाऊ नका... आपल्या पृथ्वीवरील निसर्गातील महत्त्वाचे घटक हवा झाडे पाणी अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे लोकांच्यावर कठीण प्रसंग ओढवला आहे....कोणीही घाबरून जाऊ नका..... पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.... नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे... (पान नंबर १५)
पात्रांच्या संवादातून झाडांचे महत्त्व, हवेची आवश्यकता, पाण्याची गरज याचे विवेचन होत जाते. बिसलरीचं बाटलीबंद पाणी याचं वर्णन येतं. त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या वस्तूंचा अतिवापर. आज आपण पाहतो वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये फुलांच्या ऐवजी प्लास्टिकची फुलं, झाडांच्या ऐवजी प्लास्टिकची झाडं यांचा वापर करून फोटो सेशन केलं जातं. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा होणारा भरपूर वापर. त्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार मानवाला गिळंकृत करीत आहेत. जलप्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडांचा नायनाट झालेला आहे याचे महत्त्वपूर्ण वर्णन या एकांकिकेत आपणाला पाहायला मिळते. पर्यावरण विषयक ही एकांकिका खूप महत्त्वाची आहे.
हे प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण इको वेंचर यांनी आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय माध्यमिक विभागात अनेक प्रथम क्रमांकांची बक्षिसे मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
दुसरी एकांकिका मायेची पाखर नावाची असून यामध्ये विभक्त कुटुंब पद्धती, वृद्धांची वृद्धाश्रमात रवानगी या विषयावर प्रकाशज्योत टाकणारी असून आजच्या लहान मुलांना आजी आजोबांची किती आवश्यकता आहे हे मनावर बिंबवणारी एकांकिका आहे. आजच्या मुलांच्या मनात वृद्ध माणसांविषयी तिरस्काराची भावना आहे. ती कमी होऊन वृद्धांविषयी आदर निर्माण व्हावा हे मूल्य देणारी ही एकांकिका आहे.
सून सासू-सासर्याशी नीट वागत नाही. मुलं टीव्ही पाहण्यात, मोबाईलवर चॅटिंग करण्यात गुंग झालेले आहेत. आजी-आजोबाविषयी त्यांच्या मनात मत्सर निर्माण होतो.
आजोबा (यशवंतराव) नातवंडांना म्हणतात, "बाळ प्रतीक, हे पूर्वा बाळा, अरे आम्ही म्हातारे झालोय यात आमचा काय दोष? म्हातारपण आलं की दुखणे येणारच. जसं आज आम्हाला आलं. तसं उद्या तुमची आई वडील म्हातारे होणारच. तुम्ही जो विचार करताय ना तो चुकीचा आहे. तुमचे आई-वडील घरी नाहीत म्हणून टीव्ही, मोबाईल सतत वापरणं हे चुकीचं आहे. (पान नंबर ४५-४६)
तिसरी एकांकिका आहे *रंगपंचमी* विनोदी ढंगाची असलेली रंगपंचमी एकांकिका. यामध्ये रंगपंचमीचे यथार्थ वर्णन केलं आहे. मित्रांमध्ये चालेली रंगपंचमी हळूहळू दुसऱ्यावरती रंग मारण्यापर्यंत जाते. वाहनधारकांना अडवून पैसे मागितले जातात. रिक्षावर रंग मारताना रिक्षात असलेल्या पोलीसाच्या अंगावरती रंग जातो. पोलिसाला पाहताच मुलांची पळता भुई थोडी होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांच्या आयडिया सुरू होतात. नदीवर जाऊन आंघोळ करून दडून बसतात. आणि शेवटी अशी रंगपंचमी पुन्हा करायची नाही हा निश्चय करून घरी परततात.
संस्कारक्षम, विनोदी, पर्यावरणविषयक मूल्य देणारे हे पुस्तक वाचकांनी वाचायला हवेच. शिवाय प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलांपर्यंत हे पुस्तक गेले पाहिजे. शाळाशाळांतून या प्रयोगशील एकांकिकांचे प्रयोग झाले पाहिजेत असे मला वाटते.
या एकांकिका संग्रहाला मराठी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि राज्य पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे.
सौ. नसीम जमादार यांना पुढील लेखन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
पुस्तक परीक्षण -
श्री. परशराम आंबी
मुख्याध्यापक,
श्री नवनाथ हायस्कूल,
पोहाळे
--------------------------------------
पुस्तकाचे नाव - *नो मॅन्स लॅंड
लेखिका - सौ. नसीम जमादार
प्रकाशन - हृदय प्रकाशन पोहाळे, कोल्हापूर
पुस्तकाचा प्रकार - एकांकिका
मुखपृष्ठ - अभि पोवार
पाने - ७२
किंमत - ७५ रुपये
Comments
Post a Comment