परिचय

*आदर्श शिक्षक, मार्गदर्शक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता म्हणून व्यासंगी, विनम्र, शांत आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजे परशराम आंबी.* 
           पंचगंगेच्या संगमावर वसलेले वरणगे हे त्यांचे जन्मस्थळ. त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नाव चालवणे. त्यावरूनच त्यांचे आडनाव पडले 'आंबी.' पूल नसताना वरणगे, पाडळी, निटवडे, यवलूज, पडळ या गावातील लोकांना कोल्हापूरला जाण्यासाठी नावेशिवाय पर्याय नव्हता. वाहतुकीसाठी पूर्वी याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आता पूल झाल्याने नावेचा व्यवसाय बंद पडला.  
             उदरनिर्वाहासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. १९७५ मध्ये 'काकासाहेब जाधव' या शिक्षकांच्या प्रेरणेमुळे ते शाळेत जावू लागले. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काकासाहेब जाधव यांनी त्यांना चौथी स्कॉलरशिप परीक्षेला बसवले. स्वतः त्यांनी लागणारी पुस्तके, वह्या परशरामला दिल्या.  त्यांच्या प्रेरणेमुळे आणि परशराम यांच्या जिद्द, चिकाटीमुळे ते स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत कोल्हापूर जिल्ह्यात एकविसावे आणि करवीर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने  उत्तीर्ण झाले. सन १९७८-७९ मध्ये स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत येणारे गावातील ते पहिलेच विद्यार्थी ठरले. परशरामसहित  शिवाजी जाधव, संजय कांबळे, मिलींद कांबळे यांचाही तालुका स्तरावर स्काॅलरशिप परीक्षेत क्रमांक आले होते. 
        काकासाहेब जाधव यांनी परशराम यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेची शाळा 'राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेत प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून दाखल केले. विद्यानिकेतनमध्ये असतानाही ते इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. 
             परशराम आंबी यांनी आपल्या गुरूंचा आदर्श घेऊन महावीर कॉलेजमधून बी.ए.बी.एड. (संयुक्त) परीक्षा जून १९९२ मध्ये उत्तीर्ण झाले. बी.ए.बी.एड.चा निकाल लागण्यापूर्वीच ते नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते तालुका पन्हाळा या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत झाले. १९९४मध्ये मराठी विषयामध्ये एम.ए. केले. २००४-२००५ मध्ये संस्कृत विषयामध्ये एम. ए. केले. त्यांनी आपल्या शाळेत मा. मुख्याध्यापक निकाडेसर  यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये वाचन वृद्धीसाठी 'नित्य वाचन' हा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रत्येक वर्षी १ जानेवारीपासून एका नवीन पुस्तकाचे वाचन केले जाते. त्या पुस्तकावर मुलांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतल्या जातात. आतापर्यंत डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे 'अग्निपंख',  डाॅ. नरेंद्र जाधव यांचे आम्ही आणि आमचा बाप', ज्ञानेश्वर मुळे लिखित 'माती ,पंख आणि आकाश', नसीमा हुरजूक लिखित 'चाकाची खुर्ची', तन्वी डोके लिखित 'मे आय कम इन...' अशा पुस्तकांचे वाचन शाळेत झाले आहे.
मुलांतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक वर्षी भित्तीपत्रक आणि हस्तलिखित चालवतात. त्यातूनच त्यांनी मुलांनाही लिहिते केले आहे. 'कर्तव्य' हा त्यांचा पहिला एकांकिका संग्रह प्रकाशित झाला. 'परिवर्तन', 'भाकरी', 'जिद्द', 'रक्षण करू या पर्यावरणाचे', 'कन्या वाचू या' अशा मुलांच्याच भावविश्वातील आणि मुलांना आवडतील अशा एकांकिकांचे लेखन केले. त्याचे प्रत्येक वर्षी मुलांच्याकडून सादरीकरण करून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामार्फत होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक वर्षी त्यांच्या एकांकिकाना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे बक्षीस मिळालेले आहे. त्यांची वेगळी खासियत म्हणजे त्यानी दुर्मिळ अशा नाट्यछटांचे लेखन केले आहे. दिवाकरानंतर 'नाट्यछटा' हा लेखन प्रकार हाताळणारे लेखक अपवादानेच  आढळतात. परशराम यांनी 'आमच्या वेळेला असं काही नव्हतं' 'जयहिंद' 'सावित्री' अशा संस्कारक्षम व बक्षीसपात्र नाट्यछटांचे लेखन केले.  त्याचे 'यशस्वी नाट्यछटा' या नावाने पुस्तक प्रकाशित केले आहे. 'सपान', 'दीपलक्ष्मी' 'राजकन्या चंद्रमुखी', 'भाकरी' 'विजय' अशा अनेक संस्कारक्षम बालकथांचे लेखन करून सादरीकरण केले आहे. मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्यामार्फत अनेक शाळांतून विविध उपक्रम राबवले आहेत.
       शैक्षणिक, साहित्यिक कार्याबरोबर त्यांना सामाजिक कार्याचीही आवड दिसून येते. त्यांनी 'ज्ञानमाऊली सार्वजनिक वाचनालय पाडळी बुद्रुक' याची स्थापना केली. त्यामार्फत 'प्रयाग साहित्य संमेलने' आयोजित केली. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्याम कुरळेसर, चंद्रकुमार नलगेसर, रा. तु. भगतसर  अशामान्यवर साहित्यिकांनी आपले योगदान दिले आहे. वाचनालयामार्फत   'चंद्रकुमार नलगेसर' यांची 'पुस्तकतुला' केली. सर्व पुस्तके वाचनालयास भेट दिली. यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम नलवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
       'महाराष्ट्र राज्य आंबी नावाडी संघटना' या  राज्य संघटनेवर ते सन २००३ पासून संचालक म्हणून काम करत आहेत. मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेशी त्यांचा घनिष्ठ ऋणानुबंध आहे. या संस्थेचे  'कोषाध्यक्ष' म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांचे उत्तम काम पाहूनच त्याला २०१४ सालचा बालकुमार साहित्य सभेचा 'सेवा गौरव' पुरस्कार देण्यात आला. त्यांनी ग्रामीण भागातील अनेक शाळांमधून लेखन शिबिरे आयोजित केली आहेत. लेखन स्पर्धेच्या माध्यमातून अनेक शाळापर्यंत मराठी बालकुमार साहित्य सभा पोचवली. बाल साहित्य संमेलनातून कविता वाचन, कथाकथन कार्यक्रम सादर केलेत.  
           अशा  शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक कार्यामुळे त्यांना पुढील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 
१) सन २०१४ मध्ये स्वातंत्र्य सैनिक एल. वाय. पाटील ट्रस्ट हुपरीचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार. 
२) सन २०१५ मध्ये बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर मार्फत 'साहित्य सेवा गौरव' पुरस्कार.  
 ३) सन २०१६-१७ मध्ये चंद्रकुमार नलगे वाचनालय उजळाईवाडीचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 'यशस्वी नाट्यछटा' पुस्तकास. 
४) सन २०१८ मध्ये कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित 'प्रेरणा' पुरस्कार. 
           अशा हरहुन्नरी शिक्षक परशराम आंबी यांना पुढील शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्यास मनापासून हार्दिक शुभेच्छा.
५) सन २०२०-२०२१ चा रोटरी क्लब ऑफ सनराईज कोल्हापूरचा 'नेशन बिल्डर' पुरस्कार

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील