लॉकडाऊन - नाट्यछटा १
लॉकडाऊन
नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय आपलं? बरं आहे ना! असं मी का विचारतोय? आपण सगळेच लॉकडाऊन आहोत ना! म्हणून म्हटलं कसं वाटतंय? काय म्हणताय...बांधून घातल्यासारखं वाटतंय. खूप दिवस झाले घरातून बाहेर जाता आलं नाही किती दिवस. मॉर्निंग वॉक नाही, बाजारात जायला मिळालं नाही, नोकरीवर जायला मिळालं नाही. पाहुण्यांच्या घरी जाता येत नाही. असं तर सगळ्या मोठ्या लोकांचं रडगाणं सुरू झालं आहे. हॅलो हॅलो बोल की गोट्या, काय सांगायला लागलायस ते कळू दे तरी. अरे मोठ्याने बोल की. ऐकू येत नाही. काय म्हणतोयस? मी काय करतोय? काय करणार! 'आलिया भोगासी असावे सादर, ओढून घ्यावी चादर, खालवर' असं मी का म्हणतोय? मग ऐक तर...अरे बाबा! तुला माहिती नाही? असं काय करतोयस? अरे बाबा, आपण लॉकडाऊनमध्ये आहे. काय करणार मी? खायचं आणि झोपायचं याशिवाय दुसरं काय काम आहे? बरं. तुझं काय चाललंय? अरे, व्वा! मस्त. सुट्टीत चांगलं काम सुरू आहे म्हणायचं. काय काय केले आहेस? पिंपळाच्या पानावर सुंदर नक्षीकाम केलेस. वा मर्दा वा! काय म्हणतोयस? छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांची सुंदर चित्रे काढलीस तू. म्हणजे वेळेचा फारच छान उपयोग करून घेतलास म्हणायचं. आणि हा कोणाचा फोन आला म्हणायचा? हं कोण? अरे वा! तू होय गोप्या! काय चाललंय तुझं? काही नाही म्हणतोस, तरीपण बातम्या बघतोयस ना! बघ बघ. काय? जगात कोरोना बाधितांची संख्या वाढायला लागलीया. काय म्हणतोयस? भारतातील संख्या वाढतीया. पण ती इतर देशाच्या तुलनेने खूपच कमी आहे. याचे कारण म्हणजे प्रसंगाचे गांभीर्य ओळखून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वेळीच पावले उचलून लॉकडाऊन केला आहे. त्याचा परिणाम आहे हा. समजलं का काय म्हणतोय ते. या लॉकडाऊनने फार नुकसान केले आहे! ते कसं काय? खायला काय मिळेना, बाहेर पडता येईना, कसं बांधून घातल्यासारखं झालंया. होय रे बाबा होय. तसं झालंय खरं, पण तू माणसाचा विचार सोडून दुसरा कशाचा विचार केलायस का? असे मी का म्हणतोय गोप्या? बघ बघ बाहेर बघ जरा. कशा नद्या निर्मळवाणी वाहतात. वातावरण कसं स्वच्छ झालंय. दिल्ली चाळीस टक्के प्रदूषण कमी झाले आहे. धुक्यात हरवलेले डोंगर स्पष्टपणे दिसायला लागलेत कधी नव्हे ते मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिनचे दर्शन झाले. गगनबावडाच्या रस्त्यावर गवारेडे मनसोक्त फिरत आहेत. पाहिलेस का तू? माणसापेक्षा इतर प्राण्यांना या लॉकडाऊनचा कसा फायदा झाला ते. म्हणजेच आम्हा मानवाला हा लॉकडाऊन शिक्षा वाटत असला तरी इतरांच्या जीवनात सुख-समृद्धी आणली आहे या लॉकडाऊनने. म्हणजेच मानव प्राण्यासाठी शाप वाटणारा हा लाॅकडाऊन इतरांना वरदान आहे. म्हणूनच मी म्हणतो, 'सारे जहाँ से अच्छा हा लाॅकडाऊन हमारा.
Comments
Post a Comment