काळ्या दगडावरची रेघ डॉ. श्रीकांत पाटील
*"काळ्या दगडावरची रेघ"*
कवी - डॉ. श्रीकांत पाटील
त्रिकालाबाधित सत्य ज्या काव्यसंग्रहातून डॉ. श्रीकांत पाटीलसरांनी मांडले आहे तो काव्यसंग्रह म्हणजे काळ्या दगडावरील रेघ.
डॉ. श्रीकांत पाटील यांनी लाॅकडाॅऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या यशस्वी कादंबरी लेखन आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त "सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल" या बालकादंबरीनंतर काव्य लेखनाच्या सागरात मनसोक्त विहार केला तो *काळ्या दगडावरील रेघ* काव्यसंग्रहाने.
या काव्यसंग्रहातून शिक्षण, शाळा, समाज, दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक आपत्ती, नातेसंबंध असे नानाविध विषय डॉ. श्रीकांत पाटील यांनी हाताळलेले दिसून येतात. कविता कशावर लिहावी असा प्रश्न आपणास पडावा इतके असंख्य विषय भोवताली आहेत.... म्हणूनच कवी आपल्या कवितेतून लिहितात ....
कशाकशावर लिहावी कविता,
माणसांमुळे बदललेल्या निसर्गावर
की, माणसांच्याच बदललेल्या नेचरवर...
कार्टून्स, कुठे हरवली शाळा, कोरी पाटी, जीवनाचा वाटसरु या कवितातून आजच्या परिस्थितीवर कविता लिहिल्या आहेत.
खालील ओळीतून नेमके भाष्य करताना कवी लिहितात की,
कुठे हरवली शाळा?
कोण होणार मुलं..
देशाचे नागरिक होणार ....
की कार्टून्स ?
भविष्यात मुलांच्या मनाची पाटी कोरीच असेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ग्रंथालय ही सर्वांसाठी देवालय आहेत. म्हणूनच
ग्रंथालय आमुचे देवालय या कवितेतूनही ते ग्रंथालयांचे महत्त्व सांगतात -
'ग्रंथच आमुचे गुरु
अन् ग्रंथच आमुचे देव.'
ऋतुचक्र, अवकाळी, अतिवृष्टी या कवितांतून बदललेल्या व कोपलेल्या निसर्गाचा वेध घेतलेला आहे. तर 'झरा' कवितेतील
'भरलेलं पात्र पाहाता
रुक्ष मनी पालवी फुटे'
या शेवटच्या ओळीतून कवीचा आशावाद स्पष्ट दिसतो.
'पाणपोई' कवितेतून मानवतेची गरज व्यक्त केली आहे. हरवत चाललंय घर, माणूस हरवला आहे यातून मनाची व्यथा जाणवते.
कोरोना महामारी, सर्जिकल स्ट्राइक या कवितांमागे घडणाऱ्या घटनेमागची व्यथा नि अस्वस्थता आहे.
तरीही नैसर्गिक संकटांना सामोरे जाताना ते मेघाची आळवणी करताना दिसतात. नातेसंबंध बिघडल्याचे कटुसत्य मांडतानाच ते
'सुकले जरी रक्त तरी
नाती कशी विसरायचीत' म्हणत नाती अबोलपणे जपायची असतात असे सांगतात. नेट, इंटरनेट अशा तंत्रज्ञानावर आधारित कवितांबरोबरच प्रवास, बांडगूळ, बुजगावणं, कावळा, शिवार, संघर्ष, गुलमोहर अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या या संग्रहातील कविता हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. कवींचा आशावादी दृष्टिकोन कवितांतून दिसून येतो.
*काळ्या दगडावरची रेघ* या कवितेत सर्वांसाठी अटळ असा एक महत्त्वपूर्ण विचार दिसतो. तो म्हणजे मानवाने प्रायोगिक तत्त्वावर जरी अनेक गोष्टी सुरु केल्या असल्या तरीसुध्दा जीवनावश्यक अन्न, पाणी नि श्वास देणारी धरित्री हा आपल्यासाठी अंतिम पर्याय आहे. आणि हे त्रिकालाबाधित सत्य मांडणारी ही कविता असल्याने काव्यसंग्रहाला दिलेले नाव *काळ्या दगडावरील रेघ* समर्पक वाटते.
परशराम आंबी
कार्यवाह,
मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर.
_______________________
Comments
Post a Comment