रस विचार नाट्यछटा ८
रसविचार नाट्यछटा
नमस्कार मंडळी, नमस्कार. बरेच दिवस झाले तुमची गाठभेट होऊन. म्हणून यावं लागलं भेटायला तुम्हाला. नाहीतरी वर्ष गेलं असेल आपल्याला भेटून. अहो, असं काय बघताय माझ्याकडे? अहो, मीच तुमची मैत्रीण आहे. अगं चिंगे, थांब, थांब. मी सगळं सांगते तुम्हाला. एक नवा अनुभव देणार आहे मी तुम्हाला. तो आणि कसला अनुभव, म्हणतेस तू सोनू? अगंबाई, मी तुम्हाला रसाबद्दल सांगणार आहे. काय गं राणी? तुला माहिती आहे! मग सांग ना तूच. काय? उसाचा रस. अगं बाई, पण ऊस फार गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये. त्या रसाबद्दल मला सांगायचं नाही. अगं हिरा, नावसुद्धा घेऊ नकोस त्याचं. नुसत्या नावानंसुद्धा माझं तोंड कडू झालं बघ. अगं मी त्या रसाबाबत बोलत नाही. हं हे आणि कोण म्हणालं, की लोखंडाचा रस? चिंगे, तुझंच काम आहे हे. तुझे बाबा आहेत ना कारखान्यात, फाउंड्री उद्योगात. मग तुला या रसाशिवाय दुसरा रस कसा माहिती असणार? अगं बायांनो, मला या रसावर सांगायचं नाही. तर साहित्यातील रसाबद्दल सांगायचं आहे. ही कोण बोलली म्हणायची कोकिळा? खोरं, पाटी, नांगर म्हणून. बरोबर. अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्ही पडल्या गावाकडच्या पोरी. तुम्हाला या साहित्याशिवाय दुसरं साहित्य कसं माहिती असणार? हे झालं रानातलं साहित्य, काम करण्याचं साहित्य. मला म्हणायचं आहे ते कथा, कविता आणि कादंबरी या साहित्य प्रकारातील रसाबाबत. म्हणजे आपण कथा, कविता, कादंबरी वाचताना मन लावून वाचले पाहिजे. त्याचा आस्वाद घेत वाचले पाहिजे. असे वाचन केले की एक प्रकारचा वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव मिळतो. मनामध्ये भावभावनांचे तरल तरंग उठतात. गद्य आणि पद्य असे साहित्याचे मुख्य दोन प्रकार पडतात. त्यातील प्रत्येक साहित्य प्रकाराचा अनुभव वेगळा असतो. काय सुमे, काय म्हणतेस तू? आप्पासाहेब खोत यांची 'गवनेर' कथा वाचलीस तू. फारच छान. त्या एका कथेत अनेक रस ओथंबून वाहत आहेत. ती कथा वाचताना, ऐकताना आणि पाहताना अनेक अनुभव येतात. आपण प्राण्यांना जीव लावला, की तो आपल्यासाठी जीव देतो. आणि माणसाला जीव लावला, की तो जीव घेतो. या एकाच वाक्यातून प्राण्यांचा जिव्हाळा कळून येतो. गवनेरचा अंत तर जीवाला चटका लावून जातो. डोळ्यातून पाणी येतं. फार फार वाईट वाटतं. म्हणजे दुःख होतं, त्याला करूण रस असे म्हणतात. करुण रसात शोक असतो. वा! सविता वा! छान कविता म्हणालीस तू
'सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मरमर, ओढायचे'
यातूनही करुण रस दिसून येतो. कारुण्य म्हणजे दु:ख बालकवींची गाजलेली कविता म्हणजे 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे'
यातून हास्य रस दिसून येतो. हास्य रसात आनंद, हर्ष, उत्साहाची भावना दिसून येते. तसेच विसंगती, चेष्टा, विडंबन या भावनाही दिसून येतात. आणि बरं का मुला-मुलींनो, 'ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात' किंवा 'सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर. तयाला माझा नमस्कार' अशा प्रकारचे अंगावर शहारे आणणारे आणि अंगावर रोमांच उभे करणार गीत ऐकतो. त्यावेळी अंगात वीरश्री संचारते. त्याला वीररस म्हणतात. हा वीररस देशभक्तीपर गीते आणि पोवाडे यातून ओतप्रोत भरलेला असतो. सौंदर्याची खाण असलेला रस म्हणजे 'शृंगाररस' शृंगार म्हणजे लावण्य. याचं गाणं माहिती नाही तुम्हांला? अशा माना काय हलवताय! अहो, मग एकाच
'लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखऱ्याचं बोलणं गौ मंजुळ मैनेचं'
अशा नखरेल, मनोहारी लावण्यातून वर्णन केले जातं. त्याला शृंगार असं म्हणतात. महापूर किंवा महाप्रलय अशा प्रसंगाचे वर्णन केले जाते, त्यावेळी त्यातून जो रस बाहेर पडतो, त्याला रौद्ररस म्हणतात. त्याचे उदाहरण द्यावयाचे म्हणजे--- 'मनूच्या वर्तनाकडे त्याचे बाबा डोळे वटारून पाहत होते.' यातून राग, क्रोध, चीड अशा भावना व्यक्त होतात. तर युद्ध, मृत्यू, सूड, राक्षस किंवा स्मशान याचे वर्णन करताना भय किंवा भीती वाटते. त्या ठिकाणी भयरस दिसून येतो. तो गुरासारखा ओरडला. त्याचे रक्त उलटे पालटे होत होते. केवळ तिरस्कार, तिटकारा किंवा वीट येणाऱ्या गोष्टींचे वर्णन जेथे केलेले असते, तिथे बिभत्स रस असतो. त्याचे उदाहरण म्हणजे 'नाव सरदार; पण दुर्गंधीच्या जागेत राहतो.'
'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला' अशा गीतातून आश्चर्यकारक व विस्मयकारक गोष्टींचे वर्णन केलेलं असते. तेव्हा त्याला अद्भुतरस म्हणतात. आणि बरं का? या सर्व रसांचा राजा म्हणजे 'शांत रस'. तो कोठे असतो असे विचार विचारतेस तू, राणी? तर मग ऐक. तो साधुसंतांच्या अभंग आणि ओव्यातून पाहायला मिळतो. आपण पसायदान म्हणतो ना! हां तेच ' आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे' नमस्कार मंडळी. आता मला गेलं पाहिजे दुसऱ्या वर्गात. त्यांनाही माहिती दिली पाहिजे रसांची. मी एवढेच म्हणेन की आम्ही येतो तुमच्या वर्गात, नवनवीन विषय शिकविण्यास. आता जातो दुसऱ्या वर्गात, विसरू नये आमचा रामराम घेण्यास.
धन्यवाद
Comments
Post a Comment