शेतकरी (मुले) २०१७ नाट्यछटा ७
शेतकरी (मुले)
अहो, कोणी पाणी देता का पाणी ? माझ्या शेताला पाणी देता का? अहो, खूप वेळच नाही तर खूप दिवस झाले आहेत. माझ्या शेताला पाणी पाजून. पाण्याची पाळी अजून आलेली नाही. अहो, जीव कसा नकोसाच होतोय बघा. पार सुकून गेलाय माझे जीव. माझंच मला बघूसुद्धा वाटंना त्याच्याकडं. जीव अगदी कासावीस होतोया. तासभर आपल्याला पाणी मिळालं नाही तर घसा कोरडा पडतोया आपला. आणि इथं माझ्या शेताला एक महिना होत आलाय पाणी पाजून. काय म्हणत असेल हो ते? माझं शेत वाळवून घट्ट झालंया. बिचाऱ्याला बोलतापण येत नाही. नाहीतर माझ्यासारखंच ओरडून सांगितलं असतं त्यांनं. पण काय करणार बिचारं? टाचा घासून घासून गप्प पडलंया. काय म्हणतोस रे लेखा गणप्या? नदीला पाणीच नाही तर देणार कोण? आणि कुठलं? होय रे बाबा, तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे. आवंदा पाऊस पडला नाही, त्यामुळे दुष्काळच पडलाय. माहिती मला, त्येला तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार? पण कायतरी मार्ग काढायला पाहिजे का नको? तू सांग मर्दा. होय रे बाबा, तुझं खरं हाय. मायबाप सरकार मदत करणार हाय, तसं आसवासनबी दिलंया सरकारनं. समद्या शेतकरी बांधवांनी आंदोलन केलंया, कर्जमाफी करणार हाय सरकार. तेबी आले या म्हणत्यात, माझा नातूबी मला सांगत होता, की पेपरातनं असलं काय बाय आले म्हणून. व्हय, व्हय शिवा. आपला फार मोठा गौरव केला जातो. आरं शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा कणा हाय कणा असं प्रत्येकजण आपल्या भाषणातून सांगत असतो. या देशाला ७५ वर्षे स्वातंत्र्य मिळून झालेली आहेत. पण हा कणा काय अजून सरळ झाला नाही. गप रे सर्जा, असं काय म्हणतोयस, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. त्याला कितीदातरी नळीत घातलं, तरी ते वाकडेच होतंया. येईल ते सरकार असंच काहीतरी आश्वासन देतंया आणि वेळ मारून नेतंया. म्हणत्यात नव्हं का - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या. असली अवस्था झालीया बघ आपली. वा! वा! काय छान गाणं म्हणायला लागले. कोणतं बरं ते? सोनू , माझ्यावर भरोसा नाय काय? हाय रे बाबांनो, समद्यावर भरोसा हाय. पण आमच्यावरच कुणाचा भरोसा नाही. काय करायचं आम्ही? शेत पिकवतोया म्हणून सगळ्यांना खायला तरी मिळतेया. नाहीतर कुणावर भरोसा ठेवून ही खाणार आहेत म्हणायची? एकीकडं हा निसर्गराजा दमवायला लागलाय. कवा पडतोया तर कवा पडतच नाही. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीया. दुबार पेरणीचं संकट आलंया. सावकाराच्या व्याजानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. सरकारने कर्जमाफी करायची ठरविल्या, परंतु त्याला इतक्या अटी घालतात की या जन्मी काही त्या पुऱ्या व्हायच्या नाहीत. म्हणत्यात नव्हं का की 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी गत झालीया आमच्यासारख्या शेतकऱ्यांची. कितीतरी शेतकरी आज आत्महत्या करायला लागल्यात. अनेकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागल्यात. परंतु मी मात्र असं दळभद्री जीवन जगणार नाही. तर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत जगणार आहे. एक ना एक दिवस या बळीराजाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. मी एवढेच म्हणेन की, 'हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, एक दिन. हो हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन.
सादरीकरण प्रणव श्रीरंग जाधव इ. नववी (उत्तेजनार्थ बक्षीस २०१७)
Comments
Post a Comment