हाच विश्वास - नाट्यछटा ४
*हाच विश्वास*
ए आई, मला बाहेर जाऊ दे ना. बाहेर काय काय चालू आहे ते पाहू दे ना. मला सारखंसारखं असं का अडवतेस? काय म्हणतेस तू? कोण आले? कोरोना. तो आणि कुठून आलाय ग? चीनमधून! मग येईना की, मला काय त्याचं? काय म्हणालीस? म्हणून तर साऱ्या जगातली माणसं अशी कोंडून घेऊन बसल्यात! कोरोना म्हणजे काय ग? तो वायरस आहे होय. अगं पण वायरस म्हणजे तरी काय ग? हां बरोबर. तू सांगितलंस ते शंभर टक्के खरं आहे. आमच्या सरांनी सांगितलेलं मला आठवलं बघ. व्हायरस म्हणजे विषाणू. या विषाणूमुळेच आम्ही आजारी पडतो ना! ते कसं? काय काळजी घ्यावी? परवा नाही का मी बर्फाचा गोळा खाल्ला आणि मला सर्दी झाली होती. खेळल्यावर ताप आला होता. मग मला बाबांनी डॉक्टरमामाकडे नेलं होतं. तेव्हा डॉक्टरमामा म्हणाले होते, की मी विषाणूमुळेच आजारी पडलो होतो. आणि हे असं इंजेक्शन टोचलं गेलं होतं! (ॲक्शन करून) काय म्हणतेस गं आजी? आजारी पाडणारे विषाणू आहेत तसेच उपयोगी पडणारेही विषाणू आहेत. ते कोणते गं आजी? हो. बरोबर आहे तुझं. दुधाचे दही बनवणारे. आमच्या विज्ञानच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आम्हाला. त्याची आठवण आता झाली बघ. म्हणजेच विषाणूचे दोन प्रकार पडतात. एक उपयोगी आणि दुसरा निरोपयोगी विषाणू. काय म्हणताय बाबा? हा विषाणू फार भयंकर आहे. ते कसं हो? हां बरोबर आहे. कारण अजून त्यावर औषध उपलब्ध झालं नाही किंवा लसही उपलब्ध झालेली नाही. शिवाय तो विषाणू मरत नाही. कसा मरेल हो? सजीव असेल तर मरेल ना तो! तो तर निर्जीव आहे. आणि तो विषाणूचा पुंजका आहे. त्याच्यापासून वाचायचं असेल तर एकच उपाय बाकी आहे. तो आणि कोणता? असं काय हो विचारताय तुम्ही, आजोबा? इतकं सोपं कसं काय तुम्हाला माहिती नाही हो? अहो आजोबा, आपण एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहायचं. नाहीतरी एसटीच्या मागे लिहिलेलं असतं की, 'सुरक्षित अंतर ठेवा' म्हणजे अपघात होणार नाही. तसं अगदी तसंच. आपणाला कोरोना व्हायचा नसेल तर प्रत्येकाने एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवून राहिलं पाहिजे. अहो आजोबा, शेजारच्या काकांनी त्यांच्या वडिलांना ठेवले तसं नव्हे हो! म्हणजे वृद्धाश्रमात! बाबांनी तुम्हाला ठेवलं तर मी कसा जाऊ देईन तुम्हाला. तुम्ही गेलात तर मीही येईन तुमच्याबरोबर वृद्धाश्रमात. बरं मी काय सांगत होतो. हां आपण घरातच राहायचं. पण दोन मीटरचं अंतर ठेवून तेही मास्क किंवा रुमाल बांधूनच. ते बघा. त्या टीव्हीमध्ये कशी पटापट माणसं मरायला लागली ती. अगं आपल्या देशातलं नाही ते. ते युरोप आणि अमेरिकेतलं आहे. अमेरिकेत तर लाखानं माणसं मेलीत. आणि हजारों माणसं मरायला लागली आहेत. तशीच ती युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स या देशातही पटापटा माणसं मरायला लागली आहेत. काय म्हणताय आजोबा? अशी परिस्थिती आपल्या देशात आलेली नाही. या अगोदर कधी आली होती का हो आजोबा? काय म्हणताय? तुम्ही पाहिले होते तुमच्या डोळ्यांनी? ते केव्हा? १९१९ च्या काळात? ते कशामुळे? प्लेगची साथ आली होती? माणसं पटाटा मारायची अशीच! एकाला स्मशानात पोहोचवून परत आलं की दुसरे प्रेत तयार असायचं. अशी महामारी आलेली होती त्या काळात? म्हणून म्हणतो मी, की त्यावेळी आलेली महामारी पुन्हा नको असेल तर सुरक्षित राहा. स्वच्छ राहा. कारण त्यावेळी प्रेत उचलायला माणसं तरी यायची. आता प्रेत उचलायलाही कोण जवळ येणार नाही. किंवा उचलायलाच कोणी उरायचं नाही. म्हणून मी सर्वांना सांगतो की सुरक्षित अंतर ठेवा, तोंडाला मास्क बांधा, साबणाने वारंवार हात धुवा. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. काळ फारच बिकट आलेला आहे. सुरक्षित अंतर ठेवू आणि कोरोनावर विजय मिळवू. एक श्वास आणि एकच ध्यास, कोरोनावर विजय हाच मनी विश्वास.
Comments
Post a Comment