आरक्षण - नाट्यछटा ३

आरक्षण
अबब! केवढी मोठी गर्दी झालीया म्हणायची ही! कशाबद्दल जमलेत लोक म्हणायचे एवढे? मोर्चा निघालाय हा? आणि कशासाठी? आरक्षणासाठी! पण आरक्षण म्हणजे काय बुवा? हा शब्द मी आजपर्यंत ऐकलाच नाही....काय म्हणालात बाबा? आरक्षण म्हणजे राखीव जागा. हां बरोबर आहे. राखीव जागाबाबत मला माहिती आहे. निवडणुकीच्या वेळेला राखीव मतदार संघ असतात. त्या जागेवर मागासवर्गीय समाजातील माणसांनी निवडणुकीला उभे राहायचे असते. तिथं दुसऱ्या समाजातील माणसांना उभे राहता येत नाही. होय होय चिंगी, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. स्त्रियांसाठीपण राखीव मतदारसंघ असतात.  सॉरी सॉरी स्त्रियांसाठी नाही, महिलांसाठी. अगं चिंगे, स्त्रिया म्हणजे महिलाच. मतपत्रिकेवर महिला असे लिहिलेले असते. म्हणूनच आज अनेक ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज आलेले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्येही महिलाराज आलेले आहे. त्यांच्यासाठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत ना! आहेत पण....दादा, या मोर्चामध्ये पुरुषाप्रमाणे महिलाही दिसत आहेत. मग कशाबद्दल मोर्चा आहे म्हणायचा हा? आणि सगळीकडे भगवेच भगवे झालेले आहे ना. काय म्हणतोयस दाद्या? मराठा मोर्चा आहे हा! मराठी माणसं आहेत. होय किरण, भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे सदरे, भगवी उपरणे आणि भगव्या साड्या. आणि पहा पहा आवाज कसा येतोय 'जय भवानी जय शिवाजी हाच आमचा नारा. आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे, असा देतो सरकारला इशारा'...काय म्हणताय बाबा? मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. तसं संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलेलं आहे. मग का बरं मिळालेलं नाही अजून त्यांना हे आरक्षण? त्यावेळी नको होते त्यांना आरक्षण की सरकारने त्यांना दिले नाही. त्यानंतर आलेल्या मंडल आयोगानेही शिफारशी स्वीकारलेल्या होत्या. सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने त्यांना ताकतुंबा दाखवला होता. म्हणूनच त्यांना रस्त्यावर यावं लागलंय, संघर्ष करावा लागलाय. होय बाबा, यापूर्वी मराठ्यांनी अठ्ठावन्न मोर्चे काढले गेले. सगळं कसं शांततेत सुरू होतं. सरकारने आश्वासनाशिवाय बाकी काहीच दिलेलं नाही.... काय म्हणालास दाद्या तू? म्हणून त्यांना हिंसक मार्गाकडे वळावं लागले. जे अठ्ठावन्न मोर्चाने मिळवलं , ते एका फटक्यात घालवलं. म्हणजे काय? एस.टी.बसेस जाळल्या. सरकारी कार्यालयाची मोडतोड केली. देशाचे फार मोठे नुकसान झालं. याची जबाबदारी कोण घेणार? या मोर्चामुळे गावोगावी बंद पाळल्याने लोकांचे नुकसान झाले. त्याची जबाबदारी कोण घेणार? सरकार घेणार की मोर्चा काढणारे घेणार? 
सरकारने कशाकशाची जबाबदारी घ्यायची? आणि कोणाकोणाची घ्यायची? काय म्हणालास सचिन?  यामध्ये अठरा व्यक्तींचे जीवन समाप्त झाले! त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा जीव परत येणार आहे का? कधी? मला वाटते की मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. पण ते पहिल्या अठ्ठावन्न मोर्चाप्रमाणे. शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने मिळाले पाहिजे. आणि लोकांनीही विचार केला पाहिजे, की आपणाला मिळालेले अनमोल जीवन का संपवायचे? चला चला. मलापण आई गेलं पाहिजे. 'जय भवानी जय शिवाजी' म्हणायला. 

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील