मोबाईल नाट्यछटा ९
' मोबाईल ' नाट्यछटा
काय म्हणायची ही कटकट? किती आलेत हे मेसेज? आणि कसले कसले मेसेज हे? काय म्हणे तर गुड मॉर्निंग, गुड नाईट. नुसता वैताग आला या मेसेजचा. त्यात आणखी इतके मेसेज. कोणताही ग्रुप घ्या. प्रत्येक ग्रुपवर हेच आणि असलेच मेसेज. बरं किती वेळा सांगायचे यांना, ऐकतील ते कसले सदस्य? कितीही सांगा यांना. यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणतात ना की, 'गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.' अहो, थांबा थांबा. असा तुम्हीबी गोंधळ घालू नका. तुम्हाला बोलत नाही मी. अहो, मी बोलतोय ते मोबाईलवर येणाऱ्या व्हाट्सअपच्या मेसेजबाबत. तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. अहो मंडळी, काय म्हणताय? याचा तुम्हालाही चांगलाच अनुभव आलाय. अहो येणारच. जिथे मला अनुभव आलाय, तिथं तुम्हालाबी आला असणारच. एकेकाला कितीही वेळा सांगा. पण ऐकतोय कोण? काय बरं म्हणतात ते ..... हं आठवलं आता. 'दोन हाणा पण मला दादा म्हणा' तसं झालंय बघा सगळ्यांचं. यांना कितीही सांगा. पण फरक मात्र काहीच पडत नाही. गुड मॉर्निंग आणि गुड नाईट असले मेसेज पाठवणारच. लोकमान्य टिळकांनी म्हटले होते, की 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' याप्रमाणे मोबाईलवरील बहाद्दर म्हणतात, की 'व्हाट्सअप हा माझ ग्रुप आहे आणि त्यावर मी गुड मॉर्निंग, गुड नाईट असले मेसेज टाकणारच.' अहो मंडळी, असे लोक आपला स्वत:चा वेळ वाया घालवतात आणि दुसऱ्या लोकांचाही वेळ वाया घालवत असतात. तो कसा काय? असा प्रश्न विचारतोयस तू गण्या. अरे तू पण त्यातलाच आहेस. तुलाही अनेक वेळा सांगितलं तरी तू तेच करतोयस. खरं तर तुला अनेकवेळा आमच्या ग्रुपवरून रिमूव्ह केलं, पण तू माझा जिगरी दोस्त पडलास ना! म्हणून तुला परत परत जॉईन करून घेतलं. खरं म्हणजे या लोकांना कसलं ते वेळेचं महत्त्वच नाही. उगाच आपलं बसायचं मोबाईलवर काहीतरी लिहीत. दुसऱ्याला वाटलं पाहिजे की किती अभ्यास करतोय! अहो, कसला अभ्यास नि काय घेऊन बसलात? सारखं सारखं गाणी बघत असतो. नाहीतर चॅटिंग करत असतो रात्रंदिवस. खरंच आजचा माणूस इतका गुंतला आहे मोबाईलमध्ये की त्याला आपल्या आजूबाजूला काय चाललेला आहे याचं भानही राहिलेलं नाही. सतत डोकं आपलं मोबाईलमध्येच. तुम्हाला म्हणून सांगतो राव... आमच्या शेजारचा सोम्या मोबाईलमध्ये इतका गुंतलेला असतो, की त्याला साऱ्या जगाचा विसर पडलेला असतो. एकदा त्याची आई त्याला बोलवायला आली. म्हणाली की, सोमू जेवायला येतोस ना! सोमू 'हो' म्हणाला. आणि डोकं घातलं परत मोबाईलमध्ये. घरात कुत्रं येऊन जेवण केव्हा खाऊन गेलं हे त्याला कळलंच नाही. आईला वाटलं आपला बाळ सोमू जेवला असेल. अशा एक की अनेक गोष्टी घडत असतात या मोबाईलमुळे. मलाही आता मोबाईल बंद करून गेलं पाहिजे जेवायला. नाहीतर माझीही गत व्हायला नको सोम्यासारखी. शाळेची वेळ झाली आहे. मी निघतो आता. नाहीतर आपल्या मराठी भाषेत म्हण आहे, की 'लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण' असे व्हायला नको. राम राम मंडळी. परशराम रामा आंबी
मुख्याध्यापक,
श्री नवनाथ हायस्कूल,
पोहाळे तर्फ आळते
ता. पन्हाळा
भ्रमणध्वनी ९४२१२०३७३२
Comments
Post a Comment