रोबो नाट्यछटा १०
रोबो
अहो वैताग आलाय या जीवनाचा. किती आवरायचं म्हटलं तरी काही आवरता येत नाही. बाबांना कितीही सांगितलं तरी तेही ऐकत नाहीत. अहो, कशाबद्दल काय म्हणतोय मी? आणि का वैतागलोय मी? अहो, सकाळी उठल्यापासून सारा पसारा आटपायला लागलोय तरी ते काम काय संपत नाही. बाबांना किती सांगितलं की तुमचं ऑफिसचं काम घरात आणू नका. माझं ऐकतील ते बाबा कसले? त्याची पण एक गंमत आहे. अहो ते दुसरीकडे कोणाकडे नोकरीला नाहीत, तर त्यांची स्वतःची एक प्रयोगशाळा आहे. ती आणि कसली? म्हणून काय विचारताय. ते एक शास्त्रज्ञ आहेत. काय? तुम्हाला माहिती नाही. तसे ते फार मोठे शास्त्रज्ञ नाहीत, जगाला सांगण्यासारखे मोठे नाहीत, पण मला खात्री आहे की एक ना एक दिवस ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाल्याशिवाय राहणार नाहीत. होय. होय. त्यांच्या करामतीवरून तरी मला तर तसेच वाटते बघा. अहो, हेच बघा ना. त्यांचा मांडून ठेवलेला पसारा. ते मला नेहमी म्हणतात की, हे बघ रामू, आपण काही साधीसुधी माणसं नाही आहोत. आपण या जगातली लय भारी माणसं आहोत. एक ना एक दिवस माझी नोंद या जगाला घ्यावीच लागेल. कारण मी असा नवा शोध लावून दाखवीन तरच मी खरा शास्त्रज्ञ म्हणून नाव सांगीन. हां, तर मी काय सांगत होतो....तर माझे बाबा नवीन नवीन शोध लावायची कामं करतात. काय म्हणताय? आजपर्यंत कोणते शोध लावलेत? फारसे नाहीत म्हणजे तसा एकही शोध लावलेला नाही आजपर्यंत. पण यापुढे लावणार नाहीत असे मात्र म्हणता येणार नाही. त्यांचे फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. हेच बघा ना! किती साहित्य पडलेलं आहे. आमच्या घरात या लोखंडी सळ्या, ही चाकं आहेत. आणि ही वेगवेगळी साधनं आहेत. काय म्हणताय? ही तर बंगला बांधायला आणलेलं मटेरियल आहे ? नाही हो, नाही. माझ्यावर विश्वास ठेवा की ते बंगला बांधायचं साहित्य नाही. ते माझ्या बाबांचे प्रयोग करायचे साहित्य आहे. काय इतकं मोठं साहित्य कसं? अहो, ते बाजारातली खेळणी बनवणार नाहीत, तर ते रोबो तयार करणार आहेत. हां. हो. काय? तुम्हाला रोबो माहीत नाहीत? तो कसा असतो? अहो, रोबो म्हणजे यंत्रमानव. तो अजून आपल्याकडे आलेला नाही. पण आला, तर मात्र मज्जा येईल. मज्जा. हे मला कसं माहिती? तसे बाबा फार चांगले आहेत. त्यांनी मला सगळं सांगितलं आहे. पण कोणालाही सांगू नको अशी ताकीद दिली आहे. नाहीतर त्यांचे पेटंट कोणतरी चोरेल अशी भीती त्यांना वाटते. एकदा का त्यांचा प्रयोग यशस्वी झाला, की ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ नक्की होतील. काय म्हणताय? या रोगाचा उपयोग काय? अहो अनेक देशांमध्ये या रोबोचा अनेक क्षेत्रांमध्ये उपयोग केला जात आहे. पण आपल्या देशात याचा फारसा उपयोग केला जात नाही. आपल्याही देशात या रोबोचा वापर करून मोठ-मोठी कामं करता येतील. कोण म्हणाले ते की, ही सारी कामं आपल्याकडे केली जातात. ती जेसीपी आणि पोकलेनच्या साह्याने तुमचेही बरोबर आहे म्हणा ना. नाही तरी आपल्या शिवाजी पुलाचे काम करायला त्याचाच वापर सुरू आहे. पण थोडासा विचार करा, की आज हॉटेलची किती संख्या वाढलेली आहे! हॉटेलमध्ये काम करायला वेटरच मिळत नाहीत. शिवाय त्यांना खूप पगार द्यावा लागतो. पण माझ्या बाबांनी तयार केलेला एक रोबो अनेक वेटरचं काम करील. एकदा विकत घेतला, की त्याला पुन्हा फारसा खर्च येणार नाही. एकदा त्याची सेटिंग करून ठेवली, की तो आपले काम इमाने इतबारे करेल. मग काय? हॉटेल मालकाचा फायदाच फायदा. दवाखान्यात रोबोचा वापर सुरू झाला, की डॉक्टरांचा त्रास कमी होईल आणि लोकांचा पैसा वाचेल. काय म्हणालात? या रोबोत जीव नसतो. तो निर्जीव आहे. त्याच्यात बिघाड झाला, तर सारा खेळ खल्लास. अनेक लोकांचा जीव जाईल. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांचा रोजगार बुडेल. अहो, थांबा. मला आपलं सारं पटतंय. आजच नव्हे तर आताच माझ्या बाबांना सांगायला जातो. रोबो तयार करायचं काम बंद करा म्हणून. बरं झालं माझे डोळे उघडले. मी जातो आता माझ्या बाबांचे डोळे उघडायला. राम राम. जय जय राम.
Comments
Post a Comment