आई तुझा आशीर्वाद - नाट्यछटा २
आई तुझा आशीर्वाद
(स्वगत) हां आज कोणता अभ्यास करावा? मला तर काही सूचंना झालंय. (प्रकट) मराठी वाचावं आता. मराठी शिकवणारे कोण बरे ते...हां. धोतर आणि टोपीवाले....बरोबर. तेच ते कुलकर्णीसर. काय बरे म्हणतात ते मराठीबाबत... मराठी म्हणजे आपली मातृभाषा. आपल्या आईची भाषा. मग कशाला याचा अभ्यास करायचा. पुस्तक बाजूला ठेवतो. हे कोण? वा गणितवाले जाड आणि मिशीवाले पाटीलसर. फारच मारतात बुवा ते. लक्षात राहण्यासाठी यांचा अभ्यास सकाळीच करावा. ये आई, मला सकाळी लवकर उठव ग.( चूक लक्षात येऊन) अरेच्चा! आई तर बाहेर गेली आणि मी कुणाला सांगत आहे. गणितवाले बाबा, तुम्ही आता बसा सकाळपर्यंत इथं असंच. अरे हो, या आमच्या इंग्रजीवाल्या मॅडम बरं का! आमच्याच वर्गशिक्षिका आहेत. तशा त्या माझ्या फार आवडत्या आहेत. माझा आवडता विषय आहे ना इंग्रजी. हो. आहेच मुळी माझा आवडता विषय इंग्रजी. कारण त्यांचे इंग्रजी शिकवणे म्हणजे नुसतं गाणं. हं. त्यांचं नाव सांगायचं विसरून गेले बघा. काय बरं त्यांचं नाव.... हां आठवलं. गुणे मॅडम. आहेतच माझ्या मॅडम गुणाच्या. आणि बरं का त्यांनी शिकवलेलं गाणं मला येते म्हणलं. काय? म्हणू? म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही. बरं ठीक आहे. मग म्हणून दाखवतेच. कोणतं बरं गाणं! ..... जाॅनी जॉनी एस पापा, इटिंग शुगर .... नो पापा. टेलिंग युवर लाईज नो पापा. ओपन युवर माऊथ हां हां हां. चिंगे, वा वा! खूपच शहाणी झालीस तू. पुरे झाला अभ्यास आता. झोप आलीया मला. झोपलेलं बरं. नाहीतर कोणीतरी म्हटलेलं आहे, की 'लवकर झोपे, लवकर उठे त्याशी आरोग्य संपदे.' (जांभळी देते) चला झोपा आता. (अंधार झाला स्वप्न पडते) अरे कर्कटा, मला असा त्रास देऊ नकोस. करकट दादा का छळायला लागला आहेस मला. काय चुकलं माझं. अरे थांब की, रक्तबंबाळ झाले मी. टोचू नकोस ना मला. आई, ये आई, वाचव मला. आई ये आई, आई, काय झालं मला? अगं मला स्वप्न पडलं होतं. स्वप्न. काय म्हणतेस, काय बघितलं स्वप्नात मी? थांब सांगते आई तुला. मग ऐक तर आता सगळं. दप्तरच माझ्या भोवती फिरत होतं. त्यात पिशवीताई, लेखणीताई, कर्कटदादा अशी सगळीच आली होती माझ्या स्वप्नात. कडकडून टोचून टोचून रक्तबंबाळ केलं मला.... का म्हणून काय विचारतेस? मी अभ्यास करत नाही म्हणून. झोपलेली होते मी. मला कर्कटदादा म्हणतो कसा, की गणिताच्या तासाला माझा एक पाय मोडून लंगडे केलंस ना तू. तुला आता ठेवतच नाही बघ. थांब. तुझा जीवच घेतो आता. असं म्हणाला आणि माझं तोंड दाबायला लागला. मी कसंतरी मला वाचवलं त्याच्या तावडीतून. आणि पुस्तक काय म्हणाले? तुला माहिती आहे का? काय? तुला माहिती नाही!
काय म्हणाले होते? होय, खरं आहे तुझं. मी सांगितल्याशिवाय तुला तरी कसं कळणार? तर पुस्तक मला म्हणाले, की आम्ही आलोय तुझ्याशी भांडायला. तू आम्हाला दुकानातून आणलं तेव्हा आमचं रूप कसं देखणं होत! सुंदर सुंदर चित्रे होती. तू चित्रातल्या बायांना मिश्या लावल्यास आणि पुरुषांना टिकली लावलीस. अगदी घाणेरडे करून टाकलं आम्हाला. या विश्वात मानवाचे खरे गुरु आम्हीच आहोत. त्यामुळे तो सुखाने जगत आहे. तुझ्याजवळ आम्ही आहे, म्हणून तुला काही वाटत नाही. पण आम्ही तुझ्यापासून दूर गेल्यावर आमची खरी किंमत तुला कळेल. तू खूप जपतेस मला. कारण कधीच काढत नाहीस तू मला पिशवीतून बाहेर अभ्यास करण्यासाठी. नुसती आळशी आहेस आळशी. बरं का, लेखणीताईसुद्धा आली होती स्वप्नात. काय ते? काय म्हणाली ती? ती म्हणाली, की आम्ही गरीब, निर्जीव म्हणून आमच्यावर राग का काढतेस! निर्जीव झालो म्हणून काय झालं! आम्हालांही आमची मनं आहेत तुझ्यासारखी हे लक्षात ठेव. नवी होते मी तेव्हा डोक्यावर घेऊन नाचत होतीस आनंदाने. सगळ्यांना दाखवत होतीस. आणि आता माझं रूप कसं केलंस ते बघ. माझी क्लिप, टोपणसुद्धा तोडला आहेस. माझं अंग सारं खिळखिळं करून टाकलं आहेस. माझं टोक तोंडात घेऊन चावतेस. मला खूप वेदना होतात. मला अजूनही कळ येते अंगातून माझ्या. आई, पिशवीताईची तर कैफियत वेगळीच होती. ती कोणती? ती तुला सांगायला पाहिजेच. मग ऐक तर. ती म्हणते, की वर्षातून एकदाच आंघोळ घालतेस मला. तेही शाळेच्या पहिल्या दिवशीच. बाकी ३६४ दिवस वापर करतेस तू आमचा, तेही अंघोळीविनाच. घाणेरडे करून टाकले आहेस मला. अंगाचा वास मारतो, म्हणून सारी सोडून जाणार आहेत मला. त्यांनी थांबावं म्हणून मी ओरडत होते. तुला वाटलं की मी किंचाळायला लागले. अगं, त्यांनी काही अटी घातल्या आहेत. त्या अटी पूर्ण केल्या तरच ते थांबणार आहेत. कोणत्या अटी? अगं सांगतो. थांब की थोडं. ऐक ऐक तू. मी काय सांगते ते. त्या सर्वांची काळजी घेईन मी. पुस्तकाची पाने पाडणार नाही. पुस्तकातील चित्रं रंगवणार नाही. विनाकारण रेघोट्या ओढणार नाही. लेखणीची मोडतोड करणार नाही. दप्तर व्यवस्थित ठेवीन. आणि महत्वाचं म्हणजे नियमित अभ्यास करीन मी. काय म्हणालेस आई? पुन्हा एकदा म्हण ना! काय गुणी माझी पोर! वा! अरे वा! असाच असू दे आई तुझा आशिर्वाद. नमस्कार करते मी तुला.
Comments
Post a Comment