बंद रेशमाचे काव्यसंग्रह श्री रामदास कोरडे बुलढाणा
'बंध रेशमाचे' ह काव्यसंग्रह श्री. रामदास कोरडे साखरखेर्डा तालुका सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा यांनी लिहिलेला आहे. विविध विषयांनी नटलेला वास्तववादी कवितांचा संग्रह म्हणजे 'बंध रेशमाचे'.
आपल्या मनात आलेले विचार, भावना, अभिव्यक्ती करण्यासाठी कवी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो. मनातील भावभावना, सुखदुःख आणि अनुभव यांचा खजिना कवी श्री. रामदास कोरडे हे कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात. कवीने आपल्या जीवन प्रवासात पाहिलेले, अनुभवलेले, जोखिलेले आणि साहिलेले अनुभवांचे संचित कवितेच्या माध्यमातून साकारलेले आहे. बंध रेशमाचे या कवितासंग्रहात समाज, संस्कृती, अध्यात्म, भक्ती, प्रीती अशा विविध विषयातून कवितेची मांडणी केलेली आहे. कवितासंग्रहाची सुरुवात - 'अजूनही भेट तिची...' या प्रेम कवितेतून होते.
'अजूनही भेट तिची घडते कधीकधी
नकळत आसवे ती गाळते कधीकधी
झुरते ती झुरतो मी मनात कधीकधी
हृदयात आठवणी मी पचवितो कधीकधी'
यासारख्याच तुझ्यासाठी, मंगळसूत्र, बंध रेशमाचे, जीवनसाथी, तुझ्यात जीव गुंतला, जन्म हाच खरा, एक नकार यासारख्या प्रेम विषयक कविता या कवितासंग्रहात आल्या आहेत.
'पाऊस वाहून गेला' या कवितेत गरीब परिस्थितीत गांजलेल्या शेतकऱ्याविषयी लिहितात-
वैशाखाच्या वणव्यात माय बापासोबत राबली
अनवाणी पायाने उन्हात अंग अंग भाजली कवितेच्या शेवटी कवी लिहितो-
तहानलेला चातक व्याकूळ व्याकूळ झाला डोळ्यामधल्या आसवांत पाऊस वाहून गेला
अनेक कवींच्या कवितेचा विषय म्हणजे शेतकरी. तो स्वतः अन्नधान्य पिकवितो, शेतात माणिकमोती पिकवतो; पण त्याच्या मालाचा भाव त्याला ठरवता येत नाही. दलाल भाव ठरवत असतात. हे वास्तव चित्र कवीने या कवितेत मांडले आहे. शेतकऱ्याबद्दल कवी लिहितात- शेतकऱ्या, कष्टकऱ्या राबवतोस तू
हातावर भाकर खाऊन जगतोस तू
शेतामधी तूच मळ्यामधी तूच
काबाडकष्टाने जगतोस तू
पिकवितो माणिक मोती अन्नधान्य तू
भाव ठरविण्या त्याचा नसतोस तू
तुझ्यापेक्षा तर दलाल लयभारी
मळका, चळका फाटका असतोस तू
एकविसाव्या शतकातही कुटुंब व्यवस्था ही महत्त्वाची आहे. आई-वडील, आजी-आजोबा, अशी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे मुलांच्यावर होणारे संस्कार, प्रेम, जिव्हाळा मिळणारा एक स्त्रोत असतो. अशा आशयाच्या माय, माय-बाप, देव्हारा, बाप, माहेर, माय जाई पाथंवर या कविता आहेत. या कविता संग्रहातून आई, बाप आणि कुटुंब व्यवस्था याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणाऱ्या कविता आलेल्या आहेत. कारण कवीचे आई-वडील ही कवीची श्रद्धास्थाने आहेत.
मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. जन्मापासून मरेपर्यंत त्याची जडणघडण समाजात होत असते. मरणानंतरही काही विधी समाजात होत असतात. सामाजिक समस्यांचा विचार कवीने मानवात, काटे, झडप, पाणी, पोरी सोरी, मलाही जगू द्या रे, लक्षण अशा कवितेतून मांडलेला आहे.
शूर, वीर, संत, समाजसुधारक यांची महाराष्ट्र भूमी. अशा थोर व्यक्तींना कवीने आपल्या लेखणीच्या माध्यमातून वंदन केले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींना क्रांतिबा ज्योतिबा, अभिमान, विद्वानवीर, तोडून टाक तू अशा कवितेतून आपल्या शब्दांच्या माध्यमातून वंदन केले आहे. ते विद्वानवीर कवितेत लिहितात-
तुह्या भी मायचा माह्या भी मायचा
होता बाप लय दिलवार....
एक ज्योतिबा क्रांतिवीर एक भिमराव घटनाकार
ज्योतीने सोडले शिक्षण अर्ध्यावर
लावी मायबाप हातभार
भीम राही वर्गाबाहेर तरी त्यांचा पहिला नंबर
दोन्ही होते ते हुशार कीर्ती झाली त्यांची जगभर.
हा कवितासंग्रह वैदर्भीय बोली भाषेत लिहिला असल्यामुळे याचे वेगळेपण उठून दिसते. रोखठोक शब्दयोजना, ओघवती भाषा, गेयता, लय, ताल, सूर याचे भान असल्यामुळे श्री. रामदास कोरडे यांच्या 'बंध रेशमाचे' या काव्यसंग्रहाला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. अशाप्रकारचे काव्यसंग्रह त्यांच्या हातून लिहिले जावेत यासाठी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.
भक्ती, अध्यात्म, समाज, पर्यावरण, प्रेम अशा विविध विषयांवरील ५८ कविता या कवितासंग्रहात समाविष्ट आहे या कवितासंग्रहाला लाॅकडाॅऊन, ऊसकोंडी कादंबरीचे श्रेष्ठ लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांची प्रस्तावना लाभलेली आहे. सचिन भोसले यांनी अतिशय मार्मिक मुखपृष्ठ तयार केले आहे. शशिकांत पवार यांनी ललित पब्लिकेशन मुंबईमार्फत कविता संग्रह प्रकाशित केला आहे. ८० पानांचा कविता संग्रह असून १५० रुपये मूल्य आहे.
Comments
Post a Comment