पूरग्रस्त मी (२०२१) ५

पूरग्रस्त मी २०२१
       कोणी घर देता का घर, या पूरग्रस्तांना घर देता का घर. अहो मंडळी, थांबा ना थोडं. अहो, सांगतो मी सारं. काय म्हणताय? मदत मागायला आलोय मी? नाही. मला काहीही मदत नकोय. जी मिळाली ती भरपूर झाली. यातून मी माझा संसार सावरला आहे. अहो, ही दानत आपल्याला महाराष्ट्रातच पाहायला मिळते. या महापुरानं सगळीकडे हाहाकार उडवला होता. उभ्या आयुष्यात असा महापूर मी कधी पाहिला नव्हता. अहो, माझे आजोबा आज ८० वर्षाचे आहेत. ते सांगतात की त्यांनीसुद्धा त्यांच्या आयुष्यात असा महापूर कधी पाहिला नव्हता. हा महापूर का आला? त्याची कारणं काय आहेत? याबाबत मी काही बोलणार नाही. कारण ते काही माझ्या हातात नाही. पण या महापुराने मला भरपूर काही दिले. होय. खरं आहे ते. या महापुरात माणसाने तांदूळ, डाळ, तेल, पिण्याचे पाणी असं सारं काही आणून दिलं. किती किती आणि काय काय दिलं म्हणून सांगावं. ही महाराष्ट्र भूमी आहे. ही भूमी शिवरायांची आहे. भिमरायाची आहे. आणि साधुसंतांची आहे. अजूनही गावोगावी मदतीचा महापूर येतच आहे. काय म्हणताय? हां बरोबर आहे. पण मला जे सांगायचं आहे ते विसरूनच गेलो बघा. मला तर खरे आभार मानायचे आहेत ते आपल्या आर्मीवाले लोकांचे. का का म्हणून विचारत आहात तुम्ही? ते आलेत म्हणून तर आज मी आपल्यासमोर बोलतोय. ते कसं? मग आपल्याला सांगायला हवं. अहो पावसानं सुरुवातीला ओढ दिली होती. इतकंच नव्हे तर वेधशाळेनही पावसाची शक्यता कमीच वर्तवली होती. त्यात आणि ते अरबी समुद्रात वादळ झालं होतं. मिरगात येणारा पाऊस थांबला. पाऊस लांबणीवर पडला. तो थोड्या उशिराने चालू झाला. नुसता चालू झाला नाही, तर तो कोसळायला लागला. नदी नाल्यांना पूर आला. पावसानं थोडी उसंत घेतली. पूर ओसरला. राजूदादा तुझं बरोबर आहे. तू म्हणतोस ते खरं आहे. पाणी नदीपात्रात गेलं होतं. आता पाऊस लवकर येणार नाही, असं वाटत असतानाच म्हातारा पाऊस सुरू झाला. आणि एकसारखा सपाटाच लावला त्यानं. एक, दोन, तीन नव्हे तर सलग नऊ दिवस एकसारखा कोसळायला लागला होता. लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं. सगळे लोक १९८९ व २००५ ची पाणी पातळी समजून बसलेली होती. यापेक्षा जास्त पाणी येणार नाही असा गैरसमज करून बसले होते. पाणी वाढू लागले. बघता बघता कधी पूररेषा ओलांडून पुढे गेलं, ते समजून आलेच नाही. तासाला फुटाने पाणी पातळी वाढत होती. होय रे सर्जा, तू म्हणतोयस तसंच झालं. माणसांची धावपळ सुरू झाली. गावातील उंच भागावर काहीजण जमा झाले, तर काही दुसऱ्या मजल्यावर जाऊन चढून बसले. काही वेळानंतर पाणी वसरू  लागेल अशी आशा होती. पण ती आशा संपली. पाऊस कमी झाला नाही की पाणी कमी होण्याचं नावच नाही. मग एकच गडबड गोंधळ उडाला. त्यात लाईट नाही. मोबाईल चार्जिंग नाही. संपर्काचे साधन नाही. पण काहीचे मोबाईल सुरू होते. कारण त्यांच्या घरी इन्व्हर्टर होता. त्यांनी जिल्हाधिकारी ऑफिसशी संपर्क साधून बोटी मागवून घेतल्या. तीन दिवस बोटीतून माणसं काढायला सुरुवात होती. सुमारे ५००० माणसं पुरातून बाहेर रजपुतवाडीच्या माळावर काढली. सारी जनावरं गंगामाईनं वाहून नेली.  जनावरांचे गोटे पाण्यात बुडून गेले. छाती एवढ्या पाण्यात जाऊन जनावरांची दावी कापून दिलीत. तर काही लोकांनी दुसऱ्या मजल्यावर जनावरे चढवून नेली. होय ग छक्की, कुसुमाग्रजांनी याचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. ते लिहितात- 
गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. काय म्हणतेस संगे? या महापुरानं काय दिलं? मग ऐक तर - जमाखर्च हा पूरग्रस्तांचा मी मांडतो आहे काय मिळवलं आणि काय हरवलं ते सांगतो आहे. सगळी माणसं या पावसाला नाकं मुरडाय लागलीत. शिव्याशाप द्यायला लागली आहेत. या पावसानं सगळ्यांचं नुकसान केलं. कोणाचं शेतीचं नुकसान केलं, रानातलं उभं पीक वाहून गेलं. तर कोणाच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालं. त्याचा संसार उघड्यावर पडला. या महापुरानं फार मोठी कामगिरी केली. पूरग्रस्तांना अनेक लोकांनी मदत केली. संस्थांनी मदत केली. शाळेतील मुलांना वह्या, पेन आणि दप्तर दिले. पण या महापुरानं जाती-पातीची बंधनं तोडून, हिंदू मुस्लिम शीशी, ईसाई या धर्माच्याही पलीकडे एक धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता धर्म. मानवता हाच खरा धर्म, तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे दाखवून दिलं. म्हणूनच साने गुरुजी म्हणाले आहेत - खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. 

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील