'भाकरचोर' परीक्षण- श्री. धनाजी माळीसर

श्री. नवनाथ हायस्कूल पोहाळे शाळेचे शिक्षक.... वाचन-चळवळ वृद्धिंगत व्हावी व मुलांच्या जडणघडणीसाठी शाळेत पुस्तक वाचन, वक्तृत्व, कथाकथन, एकांकिका अशा विविध स्पर्धा आयोजित करणारे आमचे मार्गदर्शक, बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचे सचिव व वारणा साहित्य परिषदेचे सदस्य आदरणीय परशराम आंबी सर यांचे 'भाकरचोर' हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.
लेखक परशराम आंबी सरांच्या 'भाकरचोर' या पुस्तकात एकूण सोळा कथा असून प्रत्येक कथेतून कोणती ना कोणती तरी शिकवण मिळतेच. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांना लेखकाने कथेचे रूप दिले आहे. कथेतील भाषा सोपी, ओघवती आहे. योग्य ठिकाणी संवाद आलेले आहेत. म्हणींचा वापर अगदी योग्य आणि चपखलपणे केलेला आहे.
लग्न जमवताना किती अडचणी येत असतात, हे आपण कधी ना कधी अनुभवलेले असतेच. अन् मुलीचे लग्न जमवताना तर तिच्या आई-बाबांना किती चिंता सतावत असतात, याची कल्पनाच केलेली बरी. 'वाट ही पुनवेची' या कथेत आपल्या उपवर मुलीबद्दल आईला वाटणारी हुरहूर, लग्न जमणार अशी थोडीफार वाटणारी आशा आणि अपेक्षाभंग यांचं सुंदर चित्रण वाचायला मिळतं.
सत्त्वपरीक्षा ही एक सुंदर सुखांतिका असणारी कथा आहे. मधुकरच्या प्रामाणिकपणाची सत्त्वपरीक्षा पाहणारी ही एक आगळी वेगळी नि वाचनीय कथा आहे.
लेखक एक संवेदनशील शिक्षक आहेत. शाळकरी वयात किंवा शिक्षक म्हणून सेवा बजावत असताना त्यांच्या जीवनात अनेक अनुभव आलेले असणार. याच अनुभवातून त्यांना विविध कथाबीजे सापडली असणार. 'रावसाहेब ' या कथेत त्यांनी प्राथमिक शाळेतला प्रसंग चितारला आहे. सरांनी मनाला भिडणारं कथानक ओघवत्या शैलीत मांडलं आहे. बाप-लेकीच्या प्रेमाची, त्यांच्या आदर्श नात्याचं सुंदर कथानक असलेली 'नेत्रदान श्रेष्ठ दान' ही कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी आहे. ही कथा वाचताना वाचकाचं मन कृतज्ञतेनं भरून येतं. ही कथा सतत वाचत राहावी, असंच वाटतं. 'भाकरचोर' शीर्षक असलेली कथा पोटासाठी भाकरी चोरणाऱ्या शाळेतल्या एका प्रामाणिक मुलाची आहे, तशीच ती गरीब पण हुशार व होतकरू मुलाला... त्यानं चांगलं शिकून, उत्तम व चारित्र्यसंपन्न नागरिक घडावं, या हेतूनं मदत करणाऱ्या संवेदनशील मुख्याध्यापकांचीही आहे. ' कोसळता पाऊस ', ' आर्मीवाला दादा ' ह्या पावसाळ्यात घडलेल्या प्रसंगावर आधारित छान कथा आहेत.
आयुष्यात चांगला जोडीदार मिळाला नसला की,संसाराची धुळधाण होते. विनाकारण केलेली ईर्षा माणसातल्या चांगुलपणाचा कसा अंत करते अन् मग सारेच उद्ध्वस्त होते, हे ' दीपलक्ष्मी ' या कथेत वाचायला मिळते. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अन् मुलगी म्हणजे आई-बापाच्या जीवाला नुसता घोर. समाजात आजही मुलीला दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे मुलगी जन्मालाच न आलेली बरी अशीच समाजाची मानसिकता होऊन गेलेली आहे. स्त्रीभ्रूण हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हा छान संदेश 'दोष कोणाचा?' या कथेत आंबी सरांनी दिलेला आहे. आपल्या मुलानं चांगलं शिकावं, शिकून समाजात नाव मोठं करावं, असं प्रत्येक आई-बापाला वाटत असतं. अन् तसं घडलं तर त्यांना होणारा आनंद हा अवर्णनीय असतो हे ' सपान ' या कथेत वाचायला मिळते. 'मुलग्यापेक्षा मुलगी बरी | प्रकाश देते दोन्ही घरी ||' या गोष्टीचा बोध कुलदीपिका या कथेतून होतो.
चांगल्या गोष्टीतही राजकारण आल्यामुळे कामाचा कसा पचका होतो, हे 'असे घडले साहित्यसंमेलन' या कथेत वाचायला मिळते. भाकरचोरमध्ये अशीच एक रसभरित कथा आहे. प्रापंचिक स्त्रीयांनी वाचून तिच्यातून योग्य तो बोध घ्यावा, अशी एक कथा आहे 'चूक एकदाच होते'. ज्या समाजात आपला जन्म होतो, ज्या समाजात आपण जगतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागत असतो, हे फार मोठे तत्त्वज्ञान ' देणाऱ्याने देत जावे... ' या कथेत वाचायला मिळते. आपणही यातून काहीतरी बोध घेतला तर जगात नक्कीच चांगुलापणा वाढायला मदत होईल. शाळा, चंद्रमुखी यासुद्धा अशाच वाचनीय कथा आहेत.
एकंदरित, 'भाकरचोर' हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय झाला आहे. त्यातील पात्रे, घटना, प्रसंग, ग्रामीण जीवन जगताना माणसाच्या स्वभावातील गुण-दोषांचे दर्शन, माणसातील चांगुलपणा, योग्य म्हणींचा चपखल वापर यामुळे हा कथासंग्रह सर्वांगसुंदर झालेला आहे. लेखक परशराम आंबी सरांचे अभिनंदन व पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
पुस्तकाचे नाव-भाकरचोर
पृष्ठे-१२८
किंमत-१८० /- रुपये
प्रकाशन- हृदय प्रकाशन,कोल्हापूर
पुस्तक परिचय-धनाजी माळी(मो.नं. ९६७३२८७०९९ )

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील