'कोरोना आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था. '
'कोरोना आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था'
'फिरत जावे कधी या गावी तर कधी त्या गावी, शिकून यावे नवीन काही.'
काही दिवसापूर्वी मीच रचलेल्या कवितेच्या या ओळी आहेत. माझ्या जीवनात भटकंती किती प्रिय आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. माझा प्रवास सुरू असताना अचानक कोरोनासारखं महासंकट केवळ एका देशावर आले ; नाही तर संपूर्ण विश्वावर येऊन कोसळलं होतं. त्याला प्रतिबंधक म्हणून लॉकडाऊन हाच सर्वोत्तम पर्याय निवडला गेला. तेव्हा सतत भिरभिरणारी माझी पावले अचानक स्थिरावली . 'कोरोना आणि महाराष्ट्र शिक्षण व्यवस्था' याविषयी मी आपल्यासमोर विषय मांडत आहे.
मित्रांनो, लाॅकडाऊन नंतरची जी सकाळ उजाडली, ती अतिशय जिवंत वाटत होती. इतके दिवस अबोल झालेली घरे बोलकी झालेली दिसत होती. सकाळी जसा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू यावा, अगदी तसाच माणसांचा गोंगाट ऐकू येत होता. न्यूज पेपरचं पहिलं पान व्यापणाऱ्या खून, बलात्कार, गाडी अपघात या बातम्या केव्हाच हद्दपार झाल्या होत्या. हे सारं एका कोपऱ्यात कायमचं साठवून ठेवण्यासारखे होतं.
सतत आईला दोष देऊन तिच्यावर रागावणारी मी, या दिवसात कधी शांत झाले हे माझं मला कळलंसुद्धा नाही. माझ्या कल्पनेतील माझी आई आणि वास्तवातील माझी आई यामधील खूप मोठा फरक मला आता जाणवत होता. कधीही मिरची न खाणारी मी आज मला तेही अप्रुप वाटू लागलं होतं. आणि हीच मिरची खाऊन माझे आई बाबा दिवसभर रानात काबाडकष्ट करतात, या जाणिवेनं टचकन डोळ्यात पाणी आले. एक तरी पोपट आपल्या पिंजऱ्यात असावा असा बाबांकडे हट्ट करणारी मी. जेव्हा स्वतःच एका पिंजऱ्यात कैद झाले. तेव्हा जिवंतपणे मी मरण अनुभवले. आणि पुन्हा एकदा पोपट हा पिंजरा असावा अशी कल्पना करणेसुद्धा नको वाटू लागलं. जसं माणसाला मन असतं, तसं पशुपक्ष्यांनादेखील मन असतं याची चाहूल लागली.
घरातील सर्व एकत्र आल्यानंतर मी एकटीच होते हा विचारही मनातून पुसून गेला. आणि केसावरून हात फिरवणारी माझी आई, जेव्हा मायेचे गोड शब्द माझ्याशी बोलायला लागली की पाण्याचा झरा व्हावा तसा आपुलकीचा झरा वाहू लागतो असं वाटायचं. इतके दिवस मला याच सहवासाची गरज होती. असं मनाला पटून गेलं. मन हलकं झालं. जेव्हा भाऊबंदाशी मनसोक्त गप्पा मारल्या, तेव्हा आनंद मुसंडी मारत बाहेर पडल्याची चित्रं निर्माण झाली. आणि माझी आनंदाची परिकल्पना बदलून गेली. ती एका रक्ताच्या नात्यात बांधली गेली. हा सर्व आनंद अनुभवत असताना एकीकडे मनाला हुरहूर वाटत होती. जेव्हा माझी नजर आजूबाजूला डोकावत होती. आणि
खुले मोकळे आकाश शुभ्र, आज अंधकार दाटला |
उजेड असतानाही आता, काळोख मात्र पसरला ||
या कवितेच्या ओळी माझ्या ओठावरती येऊ लागल्या. त्याचं कारण म्हणजे कोरोनानं जसं माणसांना बंदिस्त केलं. तसं शिक्षणालाही बंदिस्त करून टाकलं. याचा अर्थ मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेणं बंद झालं. ऑफलाईन शिक्षण बंद होऊन ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. जगातील सगळ्याच देशात ही परिस्थिती निर्माण झाली होती. भारतातील विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती खूपच वेगळी आहे. महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांनी, उंच डोंगरांनी बनलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पण महाराष्ट्रात डोंगरकपारीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रेंजचा प्रॉब्लेम येऊ लागला. जिथे रेंज यायची तेथील गरीब मुलांना मोबाईल मिळायचे नाहीत. जिथे मोबाईल असायचे तिथे पालक आपले मोबाईल घेऊन कामावर जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाइल उपलब्ध व्हायचे नाहीत. त्यामुळे काही शाळेतील शिक्षकांनी सकाळी सात ते दहा या वेळेत तास ठेवायचे. नाहीतर पालक कामावरून परत आल्यानंतर रात्री सात ते दहा या वेळेत तास ठेवायचे. ऑनलाईन तास सुरू झाले तर काहीवेळा शिक्षकांचे आवाज नीट ऐकू यायचे नाहीत. असा हा कोरोना काळात महाराष्ट्रातील शिक्षणाचा सारा खेळखंडोबा सुरू होता. म्हणून मला असे वाटते की,
झाडाखाली भरायचा आम्हा पक्षांचा मेळा
कुठून आली देवा ही ऑनलाइन शाळा
तुम्ही सांगा नाही दंगा आणि नाही मस्ती
मोबाईलची स्क्रीन पाहुनि डोळे दुखती
सक्तीच्या सुट्टीचा या आला हो कंटाळा
नको नको रे देवा ही ऑनलाइन शाळा
कोरोना काळापूर्वी आई म्हणायची, "ठेव तो मोबाईल आणि अभ्यासाला बस." तर आता आई म्हणते, "घे तो मोबाईल आणि अभ्यास कर." आता साक्षात आई, कुटुंबीय, शिक्षक आणि महाराष्ट्र शासन यांच्याच परवानगीने विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला. झूम, गूगल मीट, टीच मीट, बायझूस, टॉप स्कोरर यासारखी अनेक ॲप डाऊनलोड करून घेण्यात आली. ऑनलाइन वर्ग सुरू झाले. या ऑनलाईन तासाबरोबरच शासनामार्फत अभ्यासक्रम पाठवून दिले जातात, तो प्रत्येक विद्यार्थ्यांना सोडवावा लागतो. मागील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नावली त्यालाच सेतू असे म्हणतात. किंवा अभ्यासमाला दिल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यावर खूप ताण पडत होता. पण त्याला पर्यायही नव्हता. कारण येणाऱ्या काळाला सामोरे जाण्यासाठी ऑनलाइन शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहेच. खरंच ज्यांची इच्छा प्रबळ असते. त्यांच्यासाठी मला म्हणावेसे वाटते--
लाथ मारुनी आव्हानांना, गंध यशाचा धुंद करावा
आपली स्वप्ने मिठीत घ्यावी,
महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्गाला यशस्वी आयुष्याच्या सदिच्छा देताना, महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था पुन्हा उच्च स्तरावर न्यावी. ऑफलाइन शिक्षण असो किंवा ऑनलाईन शिक्षण असो. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी ध्यास घ्यावा. शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेली मरगळ झटकून टाकावी. नव्या दमाने सुरुवात करावी. या विचाराने मी केशवसुतांच्या शब्दात एवढेच म्हणेन-
'नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे'
Comments
Post a Comment