भाषण संत तुकाराम

         महाराष्ट्र भूमी ही शूर-वीरांची आहे. संत महात्म्यांची आहे. 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस|' असे म्हटले जाते. अंधकाराने आंधळ्या झालेल्या समाजाचे ज्ञानरूपी काजळकाडीने डोळे स्वच्छ करणारी महाराष्ट्रभूमी आहे. यामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आहे. अठरापगड जाती-धर्माचे संत या संप्रदायामध्ये संघटित होऊन गेले. कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वसा घेतला. या वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांनी फार मोठे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील वेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना संत तुकारामांनी व्यवहार ज्ञान शिकवले आहे. अध्यात्म आणि व्यवहार यांची जीवनात कशी सांगड घालता येईल आणि जीवन आनंदमय बनवता येईल हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात ----
           'आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने,
              शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू||
              शब्दचि आमुच्या, जीवाचे जीवन
               शब्दे वाटू धन, जनलोका 
              तुका म्हणे पहा, शब्दचि हा देव
              शब्देचि गौरव, करू पूजा||'   असा शब्दांचा महिमा त्यांनी आपल्या कीर्तनातून आणि प्रवचनातून सांगितलेला आहे. तुकाराम महाराज हे केवळ कीर्तनकार नव्हते; तर आपल्या कीर्तनातून सामाजिक पर्यावरणविषयक आणि अध्यात्मिक बाबतीत सडेतोडपणे मार्गदर्शन करणारे प्रबोधनकार होते. तसेच त्यांनी समाजातील रूढी, परंपरा बरोबरच आपल्या कीर्तनातून समाजातील ज्वलंत प्रश्नाची मांडणी करण्याचे सामर्थ्य संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमध्ये होते. अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच त्यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्वही आपल्या अभंगातून सांगितलेले आहे असे आपणाला दिसून येते. ते म्हणतात, "वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे| पक्षीही सुस्वरे, आळविती||' या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी पर्यावरण हा घटक किती महत्वाचा आहे हे सांगितलेले आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेला विचार आजच्या काळातही उपयोगी पडतो. विठ्ठलाची भक्ती कशी करावी हे सांगताना ते म्हणतात की सुंदर ते ध्यान, उभा विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया||' म्हणजे आपली भक्ती ही निरपेक्षवृत्तीने असली पाहिजे. दुसऱ्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभाव असला पाहिजे. म्हणजेच संत गाडगे महाराजांच्या शब्दात बोलायचं तर 'दगडात देव शोधण्यापेक्षा माणसातच देव शोधला पाहिजे' आणि ते कार्य संत तुकारामांनी केलेले आहे. संत तुकाराम अध्यात्मिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानही समजावून सांगतात. असे सांगितले जाते की, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सोने-नाणे, दागिने आणि उंची कपडे पाठवून दिली होती. ते पाहून त्यांची पत्नी खूप आनंदी झाली होती; पण जेव्हा तुकाराम महाराज घरी आले. तेव्हा त्यानी सर्व दागिने परत करावयास सांगितले. ते महाराजांना म्हणाले, याची आम्हाला काही आवश्यकता नाही. खरंतर हे धन तुमच्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल, असे हे संत तुकाराम महाराज निरपेक्षवृत्तीचे होते. दुसऱ्यांना मदत करणारे होते. दुष्ट लोकांनी त्यांची अभंगगाथा पाण्यामध्ये बुडवली. तरीही ती अभंग राहिली. म्हणजे जनसामान्य लोकांच्या मुखामध्ये त्यांचे अभंग हे होते. अशा या तुकाराम महाराजाविषयी शेवटी मी इतकेच म्हणेन की
              विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, 
               हे भेदाभेद ब्रह्म, अमंगळ|'
       बोला पुंडलिक  हरी गुरू देव दत्त पंढरी महाराज की जय. 

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील